व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

थरारक भयनाट्यात आशेची किरणे

थरारक भयनाट्यात आशेची किरणे

थरारक भयनाट्यात आशेची किरणे

“भोवतालच्या सर्व इमारती कोसळत होत्या आणि सर्वत्र आगीचे लोळ दिसत होते. मी पळत सुटलो, लोक जिवाच्या आकांताने रडत, ओरडत होते. मला तर वाटले की जगाचा अंत होणार.”—जी. आर. एक भूकंपग्रस्त.

दर वर्षी आपल्या या प्रक्षोभित ग्रहाच्या कवचातून लाखो कंपने होत असतात. अर्थात, ही कंपने सहसा आपल्याला जाणवत नाहीत. * पण ज्यांना “विध्वंसक,” “अनर्थकारी” किंवा “पराकोटीचे संहारक” म्हणता येईल असे सरासरी १४० भूकंप दरवर्षी होतात. सबंध इतिहासात भूकंपांमुळे कोट्यवधी लोकांचा बळी गेला असून, त्यांमुळे झालेल्या मालमत्तेच्या हानीचा हिशोबच नाही.

भूकंपांतून जिवंत बचावणाऱ्‍यांच्या मनावर अतिशय तीव्र भावनिक आघात झालेला असतो. उदाहरणार्थ, अलीकडे २००१ साली एल साल्व्हाडोर येथे दोन भूकंपांचे हादरे बसल्यावर त्या देशातील आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या मानसिक-आरोग्य सल्लागार समितीच्या संचालकांनी असे म्हटले: “खिन्‍नता, निराशा व रागीटपणा यांसारख्या मानसिक समस्यांची मालिकाच सुरू झाली आहे.” आणि यामुळे एल साल्व्हाडोर येथील आरोग्य कार्यकर्त्यांनी निराशा व चिंता यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांच्या संख्येत ७३ टक्के वाढ झाल्याचे वृत्त दिले आहे. किंबहुना, पुनर्वसन शिबिरांत घेतलेल्या सर्वेक्षणांतून, अत्यावश्‍यक गरजांच्या यादीत पाण्याच्या पाठोपाठ मानसिक उपचार असल्याचे निदर्शनास आले आहे.

भूकंप म्हटले की केवळ मृत्यू, विध्वंस आणि नैराश्‍य हेच आपल्या डोळ्यासमोर येते. पण बऱ्‍याचदा भूकंपांसारख्या विपत्ती लोकांना असाधारण परोपकार आणि आत्मत्याग करण्यास प्रेरित करतात. किंबहुना, भूकंपात नेस्तनाबूत झालेल्या इमारतींची आणि उद्‌ध्वस्त झालेल्या लोकांच्या जीवनाची पुनर्बांधणी करण्यासाठी कित्येकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. भूकंपाच्या भयनाट्यातही अशी आशेची किरणे दिसून आली आहेत. याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. (g०२ ३/२२)

[तळटीप]

^ यात अगदी सौम्य भूकंपांचाही समावेश आहे. असे हजारो भूकंप दररोज घडत असतात.

[२, ३ पानांवरील चित्रे]

पृष्ठे २ व ३: ग्रीसमधील अथेन्स शहरात, एका कोसळलेल्या इमारतीत आपली आई सापडली आहे हे कळल्यानंतर एका तरुणीची अवस्था. दरम्यान आपल्या पाच वर्षीय मुलीला बचावण्यात आले आहे हे पाहून एका पित्याला झालेला अकथनीय आनंद.

[चित्राचे श्रेय]

AP Photos/Dimitri Messinis