व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भूकंपांचे पृथक्करण

भूकंपांचे पृथक्करण

भूकंपांचे पृथक्करण

“आपल्याला भक्कम जमिनीवर राहण्याची सवय झाली आहे; तीच हादरू लागली तर साहजिकच माणूस कावराबावरा होतो.”—“प्रक्षुब्ध पृथ्वी,” (इंग्रजी).

वर्ल्ड बुक एसायक्लोपिडिया यात भूकंपांचे वर्णन “निसर्गातील सर्वात विध्वंसक शक्‍तींपैकी एक” याप्रकारे केले आहे. या विधानात मुळीच अतिशयोक्‍ती नाही कारण तीव्र भूकंपात विमुक्‍त होणारी ऊर्जा पहिल्या अणु बॉम्बच्या स्फोटातून विमुक्‍त झालेल्या ऊर्जेपेक्षा १०,००० पटीने अधिक असू शकते. भूकंपांची भयावहता वाढवणारी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही हवामानात, कोणत्याही मोसमात आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी घडू शकतात. तीव्र भूकंप कोठे घडून येऊ शकतात याची शास्त्रज्ञांना थोडीफार कल्पना असली तरीसुद्धा तो नेमका केव्हा घडेल हे त्यांना सांगता येत नाही.

पृथ्वीच्या कवचातील खडकांना धक्का लागून ते आपल्या जागेपासून हलतात तेव्हा भूकंप होतो. अशाप्रकारची हालचाल सतत सुरू असते. सहसा या हालचालीमुळे निर्माण झालेले तरंग पृथ्वीच्या भूपृष्ठावर जाणवण्याइतके तीव्र नसतात पण भूकंपलेखकाच्या साहाय्याने त्यांचा पत्ता लावता येतो व त्यांची तीव्रता नोंदवली जाऊ शकते. * इतर वेळी पुरेशा खडकांना तडे जाऊन पुरेसे स्थलांतर झाल्यामुळे अचानक जमीन जोराने हादरते.

पण पृथ्वीच्या कवचात सतत ही हालचाल का सुरू असते? राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र (एनईआयसी) या संस्थेनुसार, “भूपट्ट सांरचनिकी या सिद्धान्तामुळे याचा खुलासा होतो. भुपट्ट सांरचनिकी सिद्धान्ताने पृथ्वी विज्ञानविषयक विचारधारेत क्रांती घडवून आणली आहे. आता आम्हाला समजले आहे की पृथ्वीचे बाह्‍य कवच सात मुख्य पट्टांचे आहे आणि त्यात अनेक लहान भूपट्ट आहेत.” एनईआयसीने पुढे असे म्हटले: “हे सर्व भूपट्ट सतत एकमेकांकडे किंवा एकमेकांपासून दूर सरकत असतात. सरकण्याचा वेग वर्षाला १०-१३० मिलीमीटर [एका इंचाच्या तीन अष्टांशांपासून पाच इंच] इतका असतो.” एनईआयसी अनुसार बहुतेक भूकंप या पट्टांच्या सीमारेषेशी संबंधित असतात. या ठिकाणीच ९० टक्के मोठे भूकंप घडून येतात.

महत्ता आणि तीव्रता

भूकंप किती भयंकर होता हे त्याची महत्ता किंवा तीव्रता यावरून मापता येते. चार्ल्स रिश्‍टर यांनी १९३० च्या दशकात भूकंपांची महत्ता मापण्याकरता एक मापक्रम तयार केला. भूकंप नोंद स्थानकांची संख्या वाढू लागली तसतसे रिश्‍टर यांच्या संकल्पनेच्या आधारावर आणखी कित्येक नवे मापक्रम तयार करण्यात आले. उदाहरणार्थ, मोमेंट मॅग्नीट्यूड स्केल म्हटलेल्या एका मापक्रमाच्या साहाय्याने भूकंपाच्या नाभीपासून विमुक्‍त झालेली ऊर्जा मापली जाते.

अर्थात, या मापकांच्या साहाय्याने भूकंपामुळे झालेल्या हानीची खरी कल्पना येऊ शकत नाही. १९९४ सालच्या जून महिन्यात उत्तर बोलिव्हियात झालेल्या ८.२ महत्तेचा भूकंप विचारात घ्या. या भूकंपात केवळ पाच लोकांचा बळी गेला. पण १९७६ साली चीनमधील टॅन्गशॅन येथे त्यापेक्षा कमी म्हणजे ८.० महत्तेच्या भूकंपामुळे लाखो लोकांचा जीव गेला!

तीव्रता नोंदीतून भूकंपामुळे लोकांवर, इमारतींवर आणि वातावरणावर झालेला परिणाम लक्षात येतो. ही माहिती महत्ता मापकांवरून मिळत नाही. मानवांवर झालेल्या परिणामांचा विचार करता तीव्रता नोंद अधिक माहितीपूर्ण मापनपद्धती आहे. खरे पाहता, लोकांना हानी होते ती भूकंपांच्या हादऱ्‍यांमुळे नव्हे, तर इमारतींची पडझड, इंधन वायूचे नळ फुटणे किंवा विजेच्या तारा तुटणे, पडणाऱ्‍या वस्तू आणि यांसारख्या दुर्घटनांमुळे सर्वाधिक दुखापती व मृत्यू घडतात.

भूकंपवैज्ञानिकांचे एक ध्येय म्हणजे भूकंप हालचालींची पूर्वसूचना देणे. सध्या ॲडव्हान्स सीस्मिक रीसर्च ॲन्ड मॉनिटरिंग सिस्टम नावाचा गणकयंत्रीय प्रोग्रॅम तयार केला जात आहे. सीएनएनच्या एका वृत्तानुसार या सिस्टममुळे कमीतकमी वेळात माहिती उपलब्ध होऊ शकेल आणि यात इतर उच्चतंत्रीय संगणकीय प्रोग्रॅम्स वापरण्यात आले आहेत ज्यामुळे “भूकंपाचे सर्वात तीव्र धक्के नेमक्या कोणत्या क्षेत्राला बसले हे [अधिकाऱ्‍यांना] जवळजवळ त्याच क्षणी ठरवता येईल.” यामुळे त्यांना त्या त्या क्षेत्रात मदत पाठवणे सोपे जाईल.

साहजिकच भूकंपाकरता तयार राहिल्यामुळे दुखापती, मालमत्तेची हानी आणि विशेषतः जीवित हानीचे प्रमाण कमी करता येईल. पण भूकंपांची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे असा प्रश्‍न उद्‌भवतो की भूकंपानंतरच्या परिणामांना तोंड देण्याकरता काहींना कशी मदत करण्यात आली आहे? (g०२ ३/२२)

[तळटीप]

^ भूकंपलेखक हे भूकंपाच्या वेळी जमिनीत होणाऱ्‍या हालचाली मापून त्यांची नोंद करणारे उपकरण आहे. पहिले भूकंपलेखक १८९० साली निर्माण करण्यात आले. आज सबंध जगात ४,००० पेक्षा अधिक भूकंप नोंद स्थानके आहेत.

[५ पानांवरील तक्‍ता]

किती भूकंप?

वर्णन महत्ता वार्षिक सरासरी

संहारक ८ आणि त्यापेक्षा अधिक १

सर्वानर्थकारी ७-७.९ १८

विनाशक ६-६.९ १२०

मध्यम ५-५.९ ८००

किंचित ४-४.९ ६,२००*

सौम्य ३-३.९ ४९,०००*

क्षीण ३.० पेक्षा कमी २-३ महत्तेचे:

दररोज जवळजवळ १,०००

१-२ महत्तेचे:

दररोज जवळजवळ ८,०००

* अंदाजे.

[चित्राचे श्रेय]

उगम: राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र

By permission of USGS/National Earthquake Information Center, USA

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृष्ठ ४ व ५ वर भूकंप नोंदक्रम: Figure courtesy of the Berkeley Seismological Laboratory