व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भूकंपानंतरचे जीवन

भूकंपानंतरचे जीवन

भूकंपानंतरचे जीवन

“सकाळपासून आम्ही नुसते चालत आहोत. आमचा जीव घेऊन पळत आहोत. पिण्याचे पाणी नाही, अन्‍नाचा दाणा नाही. सगळीच्या सगळी घरे जमीनदोस्त झाली आहेत.”—हरजीवन, भारतात ७.९ महत्तेच्या भूकंपातून जिवंत बचावलेला एकजण. 

भूकंप हा अतिशय भयंकर अनुभव आहे. तायवानमध्ये १९९९ सालच्या भूकंपातून बचावलेल्या एका स्त्रीने म्हटले: ‘माझ्या पलंगाजवळ असलेल्या आठ फूट उंचीच्या लाकडी कपाटावरून माझ्या अवतीभवती धडाधड पुस्तकं आपटत होती. मोटरसायलवर जात असताना सुरक्षेसाठी नवीनच विकत घेतलेलं हेल्मेट कपाटावरून माझ्या पलंगावर अगदी माझ्या डोक्याजवळ आदळलं. सुरक्षेसाठी घेतलेल्या त्या हेल्मेटनंच माझा जीव घेतला असता.’

जिवंत बचावल्यानंतर

भूकंप होताना पाहणे तर भयावह आहेच, पण त्यातून जिवंत बचावणे ही केवळ एक सुरवात आहे. भूकंप येऊन गेल्यानंतर बचाव कार्यकर्ते, निर्भयपणे जखमी झालेल्यांना शोधून त्यांचा उपचार करण्याचा प्रयत्न करतात. सहसा हे कार्य करताना आणखी हादरे बसण्याची टांगती तलवार असतेच. एल साल्व्हाडोर येथे नुकताच आलेल्या भूकंपानंतर, एक सबंध वस्ती ज्याच्याखाली पुरली गेली अशा एका मोठ्या ढिगाऱ्‍यात खोदकाम करण्याआधी एका मनुष्याने म्हटले: “आम्हाला अतिशय सावधगिरीनं काम करावं लागेल. कारण अचानक पुन्हा जमीन हलली तर हा राहिलेला ढिगारासुद्धा कोसळेल.”

भूकंपग्रस्तांना मदत करण्याच्या प्रयत्नात काहीजण असाधारण आत्मत्यागाची वृत्ती दाखवतात. उदाहरणार्थ २००१ सालच्या सुरवातीला भारतात भयंकर भूकंप आला तेव्हा, सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले मनू नावाचे वयस्क गृहस्थ आपल्या देशी परतले. त्यांचे म्हणणे होते की “माझ्याच कुटुंबाला नव्हे तर सर्व दुःखितांना मदत करण्यासाठी मला गेलंच पाहिजे.” मनू जेथे कोठे गेले तेथे त्यांना हृदय विदारक दृश्‍ये पाहायला मिळाली. पण त्यांनी म्हटले: “लोकांचं धैर्य पाहून त्यांच्याविषयी कौतुक वाटतं.” एका पत्रकाराने लिहिले: “माझ्या परिसरात असा एकही जण नव्हता, की ज्याने आपल्याकडून होईल ती मदत केली नाही. कोणी एका दिवसाचं, कोणी आठवड्याचं, कोणी महिन्याचं वेतन किंवा आपल्या बचतीतून मदत कार्याकरता दान दिलं; थोडक्यात, सर्वांनी जमेल ती मदत केली.”

अर्थात, ढिगारे उपसणे आणि जखमींची सुश्रृषा करणे तितकेसे कठीण नाही; पण त्या काही क्षणांच्या भयनाट्याने ज्यांचे जीवन पार उद्‌ध्वस्त झाले त्यांना पुन्हा सामान्य मनःस्थितीत आणणे जवळजवळ अशक्यच असते. एल साल्व्हाडोर येथील डेलोरेस नावाच्या स्त्रीचे उदाहरण घ्या. ती म्हणते, “यापेक्षा युद्ध परवडलं. निदान तेव्हा आमच्या डोक्यावर छत होतं.”

पहिल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, कधीकधी केवळ आवश्‍यक वस्तूंच्या रूपात लागणारी मदतच नव्हे, तर भावनिक साहाय्याची गरज असते. उदाहरणार्थ १९९९ सालच्या सुरवातीलाच पश्‍चिम कोलंबियातील आर्मेनिया शहराला उद्‌ध्वस्त करणाऱ्‍या धरणीकंपाने एक हजारापेक्षा अधिक जणांचा बळी घेतला; अकस्मात आपत्ती आणि दुःखामुळे, मागे राहिलेल्या असंख्य लोकांचे मानसिक संतुलन साफ ढासळले होते. मनोविकारतज्ज्ञ रॉबर्टो एस्तफान, ज्यांची स्वतःची अपार्टमेंट बिल्डिंगसुद्धा भूकंपात जमीनदोस्त झाली, ते म्हणतात, “जेथे जावं तेथे लोक मानसिक उपचार मागत आहेत. साधा हॅमबर्गर खायला म्हणून मी बाहेर पडतो तर कोणी न कोणी नमस्कार करण्याच्या निमित्तानं हमखास मला आपली निद्रानाशाची आणि खिन्‍नतेची व्यथा सांगतात.”

डॉ. एस्तफान यांना चांगल्याप्रकारे माहीत असल्याप्रमाणे, भूकंपाचे भावनिक हादरे खरोखर विध्वंसक असतात. साहाय्य शिबिराच्या निर्माण कार्यात सहभागी झालेली एक स्त्री सांगते की ज्यांच्याजवळ नोकऱ्‍या होत्या ते लोक देखील कामाला जाऊ इच्छित नव्हते; आपणही लवकरच मरणार अशी त्यांना खात्री वाटत होती.

दुःखात दिलासा देणे

अशा संकटाच्या काळातही यहोवाचे साक्षीदार जिवंत बचावलेल्या लोकांना शारीरिकरित्याच नव्हे तर आध्यात्मिक व भावनिकरित्या देखील मदत करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, याआधी उल्लेख केल्याप्रमाणे कोलंबिया येथे भूकंप झाला तेव्हा तेथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराने लगेच एक स्थानिक आपत्कालीन समिती नेमली. देशभरातील हजारो साक्षीदार स्वयंसेवकांनी अन्‍नधान्य व पैसे देणगी म्हणून दिले. भूकंपग्रस्त भागात जवळजवळ ७० टन अन्‍नधान्य लगेच पाठवण्यात आले.

बऱ्‍याचदा आध्यात्मिक मदत सर्वात आवश्‍यक असते. कोलंबियामधील धरणीकंपानंतर, यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या एका स्त्रीने उद्‌ध्वस्त झालेल्या आर्मेनिया शहरातील रस्त्यावरून एका अत्यंत दुःखी दिसणाऱ्‍या स्त्रीला जाताना पाहिले. तिने त्या स्त्रीकडे जाऊन “मृत प्रिय जनांकरता कोणती आशा?” ही पत्रिका तिला दिली. *

त्या स्त्रीने ती पत्रिका घरी नेली आणि लक्षपूर्वक वाचली. पुढच्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांपैकी कोणीतरी तिच्याकडे आले तेव्हा तिने मोठ्या उत्सुकतेने त्यांना आपली कहाणी सांगितली. भूकंपामुळे, शहरात तिच्या मालकीची अनेक घरे जमीनदोस्त झाली होती. या घरांवरच तिचा उदरनिर्वाह बऱ्‍यापैकी चालत असे. आज ती अक्षरशः रस्त्यावर आली होती. पण तिची कहाणी इथेच संपत नाही. ती आपल्या २५ वर्षीय मुलासोबत ज्या घरात राहात होती तेसुद्धा भूकंपात उद्‌ध्वस्त झाले आणि त्यात तिच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या स्त्रीने तिच्या घरी आलेल्या साक्षीदाराजवळ कबूल केले की पूर्वी तिला देवाधर्मात रस नव्हता पण आज तिच्या मनात अनेक प्रश्‍न होते. तिने वाचलेल्या पत्रिकेने तिला एक खरी आशा दिली होती. लवकरच तिच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.

यहोवाच्या साक्षीदारांचा हा विश्‍वास आहे की लवकरच असा दिवस येईल जेव्हा मनुष्यजातीला भूकंपांसारख्या नैसर्गिक विपत्तींची भीतीच राहणार नाही. असा विश्‍वास ते का बाळगतात याविषयी पुढील लेखात वाचा. (g०२ ३/२२)

[तळटीप]

^ ही पत्रिका यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहे.

[६ पानांवरील चौकट]

तयार असा!

▪ पाण्याचे हिटर भिंतींना पक्के बसवावेत आणि जड वस्तू जमिनीवर किंवा कपाटाच्या खालच्या कप्प्यांत ठेवाव्यात.

▪ वीज तसेच गॅस व पाण्याचा पुरवठा कसा बंद करायचा हे कुटुंबातल्या सर्व सदस्यांना शिकवावे.

▪ घरात अग्नीशामक आणि प्राथमिक उपचारांची पेटी ठेवावी.

▪ नव्या बॅटरीज असलेला सोबत नेण्याजोगा रेडिओ जवळ असावा.

▪ गरज पडल्यास लवकरात लवकर घराबाहेर कसे पडायचे याची कुटुंबियांसोबत तालीम करावी आणि पुढील गोष्टी नेहमी आठवणीत ठेवण्यास सांगावे: (१) शांत राहा, (२) स्टोव्ह व हिटर बंद करा, (३) दारात उभे राहा किंवा मोठ्या टेबलाखाली लपा आणि (४) खिडक्या, आरसे व धुराड्यांपासून दूर राहा.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

इस्राएलातील भूकंप

प्राध्यापक आमोस नूर यांच्यानुसार, “पृथ्वीवरील इतर कोणत्याही देशापेक्षा भूकंपांचा सर्वात दीर्घकालीन व अखंड इतिहास” इस्राएलचा आहे. याचे कारण म्हणजे ग्रेट रिफ्ट व्हॅलीचा काही भाग, अर्थात भूमध्य व अरेबियन भूपट्टांच्या मधील विभंगरेषा—थेट इस्राएलमधून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाते.

पुरातत्त्वशास्त्रज्ञ एका रोचक वस्तूस्थितीकडे लक्ष वेधतात. ती अशी की भूकंपांमुळे कमीतकमी नुकसान व्हावे म्हणून प्राचीन काळातील वास्तूविशारद एका खास तंत्राचा वापर करीत. ही माहिती बायबलमधील शलमोनाच्या बांधकाम अहवालातील वर्णनाशी जुळते: “मोठ्या अंगणाच्या सभोवार तासलेल्या चिऱ्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळ्यांची एक रांग होती. परमेश्‍वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती.” (तिरपे वळण आमचे.) (१ राजे ६:३६; ७:१२) चिरेबंदी बांधकामात लाकडी तुळया बसवण्याच्या या तंत्राचे अनेक ठिकाणी पुरावे सापडले आहेत—यांपैकी मेगिद्दो येथे गवसलेले एक प्रवेशद्वार शलमोनाच्याच कालखंडातील किंवा त्याहीपूर्वीचे असावे असे मानतात. अभ्यासक डेव्हिड एम. रोल यांचे असे म्हणणे आहे की ‘बांधकामाला भूकंपामुळे हानी होऊ नये म्हणून या तुळया बसवल्या असण्याची’ शक्यता आहे.

[चित्र]

इस्राएलमधील बेत-शीअन येथील भूकंपामुळे झालेली पडझड

[८ पानांवरील चौकट/चित्रे]

दोन मिनिटांचा थरारक अनुभव—वाचलेल्या एकाचे स्वगत

भारतात, अहमदाबादमध्ये आमच्या घरी माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाची गडबड होती. २६ जानेवारी, २००१ रोजी मला जाग आली ती गजराने नव्हे, तर जबरदस्त हादऱ्‍यांनी. स्टीलची कपाटं मागेपुढे होताना त्यांच्या धडधडण्याचा आवाज येत होता, मला खात्री पटली की नक्कीच काहीतरी भयंकर घडतंय. तेवढ्यात मला काकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला, “घराबाहेर पडा!” बाहेर गेल्यावर आम्हाला घर अक्षरशः डोलताना दिसलं. हे भयनाट्य कधी संपेल असे वाटत होतं, पण तो क्षण जणू पुढे सरकतच नव्हता. खरं पाहता, भूकंप केवळ दोन मिनिटं जाणवला.

त्या भयंकर अनुभवामुळे आम्ही सगळेच हतप्रभ झालो होतो. कुटुंबातले सर्वजण सुखरूप आहेत याची आम्ही खात्री केली. जवळपासच्या गावांत राहणाऱ्‍या आमच्या नातलगांविषयी लगेच विचारपूस करण्याचा मार्ग नव्हता, कारण फोनच्या आणि विजेच्या तारा तुटल्या होत्या. एक तासाच्या अनिश्‍चिततेनंतर शेवटी आम्हाला कळले की सर्वजण सुखरूप आहेत. पण सगळ्यांच्याच बाबतीत हे खरे ठरले नाही. उदाहरणार्थ, अहमदाबादमध्ये शंभर पेक्षा अधिक इमारती कोसळल्या आणि ५०० पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले.

कित्येक आठवडे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. दररोज रात्री लोक, पुन्हा भूकंप होणार की काय या भीतीनेच झोपी जायचे. किंबहुना, असे वर्तवण्यातही आले होते. पुनर्वसनाचे काम मंदगतीने सुरू होते आणि बरेच जण बेघर झाले. हे सर्व केवळ दोन मिनिटांच्या त्या भूकंपामुळे झाले; पण आमच्या स्मृतीत मात्र तो कायमचा कोरला गेला.—समीर सरैय्या यांचे आत्मकथन.

[६, ७ पानांवरील चित्र]

भारतात, २००१ सालच्या जानेवारीत झालेल्या भूकंपातून जिवंत बचावल्यानंतर आपल्या मृत आईचा अंत्यविधी होत असताना तिचा फोटो दाखवताना एक माणूस

[चित्राचे श्रेय]

© Randolph Langenbach/UNESCO (www.conservationtech.com)