व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझं न जन्मलेलं बाळ गेलं

माझं न जन्मलेलं बाळ गेलं

माझं न जन्मलेलं बाळ गेलं

सोमवार, एप्रिल १०, २०००. छान ऊन पडलं होतं. म्हणून मी काही लहानसहान कामं करायला घराबाहेर पडले. मला चवथा महिना नुकताच सुरू झाला होता आणि थोडा अशक्‍तपणा जाणवत होता तरी बाहेर पडल्यावर मला बरं वाटलं. किराणाच्या दुकानात पैसे भरण्यासाठी मी थांबले असताना मला काहीतरी गडबड वाटली.

घरी आल्यावर मला ज्याची भीती वाटत होती, नेमकं तेच घडलं. मला रक्‍तस्राव होत होता; याआधीच्या दोन गरोदरपणात हे कधीच घडलं नव्हतं आणि मी एकदम घाबरून गेले! मी लगेच डॉक्टरांना फोन लावला पण त्यांनी एक दिवस थांबायला सांगितलं; नाहीतरी दुसऱ्‍या दिवशी मला त्यांच्याकडे जायचंच होतं. आमच्या मुलांना झोपी घालण्याआधी आम्ही एकत्र मिळून, यहोवा आम्हाला गरज पडेल त्या प्रकारे शक्‍ती दे अशी प्रार्थना केली. शेवटी, मलाही झोप लागली.

पण दोनच्या सुमारास तीव्र वेदनेने मी जागी झाले. हळूहळू वेदना कमी झाल्या आणि मला पुन्हा झोप लागणार इतक्यात परत वेदना सुरू झाल्या आणि या वेळी त्या थोड्या थोड्या अंतराने सुरूच होत्या. रक्‍तस्रावही वाढला आणि मला आकुंचन होत असल्याचे जाणवले. माझ्या हातून नेमकं काय झालं होतं ज्यामुळे हा त्रास मला सुरू झाला, हे मी आठवायचा प्रयत्न केला पण मी काही चूक केल्याचं मला आठवत नव्हतं.

पहाटे ५ वाजता मला खात्री पटली की आता दवाखान्यात जावेच लागेल. माझे पती आणि मी दवाखान्यात पोहंचल्यावर एमरजंसी स्टाफने आमची खूप काळजी घेतली आणि आम्हाला बरीच मदत केली. मग दोन तासांनी डॉक्टरांनी आम्हाला तेच सांगितलं ज्याची आम्हाला भीती होती—माझं बाळ वाचू शकलं नाही.

सुरवातीच्या सर्व लक्षणांमुळे मी मनाची तयारी केली होती म्हणून मला ही दुःखद बातमी कळली तेव्हा मी स्वतःला सावरू शकले होते. शिवाय, माझे पती सतत माझ्यासोबत राहिल्यामुळे मला खूप आधार मिळाला. पण आता बाळाला न घेता आम्ही घरी जाणार होतो; आमची सहा वर्षांची केटलिन आणि चार वर्षांचा डेव्हिड यांना काय सांगावं हे आम्हाला कळत नव्हतं.

मुलांना काय सांगणार?

रात्री झोपताना मुलांना कळलं होतं की काहीतरी गडबड आहे पण त्यांचा लहान भाऊ किंवा बहीण या जगात नाही हे आम्ही कसं सांगणार? आम्ही त्यांना उघड व स्पष्टपणे सगळं सांगायचं ठरवलं. माझ्या आईनं आमची मदत केली; तिनं मुलांना आधीच सांगून ठेवलं की बाळ आमच्यासोबत घरी येणार नाही. आम्ही घरी आल्यावर ते धावतच येऊन आम्हाला बिलगले. मग त्यांचा पहिला प्रश्‍न होता, “बाळ ठीक आहे नं?” मला तर काही बोलताच येईना, मग माझ्या पतीनं आम्हा सगळ्यांना जवळ धरून म्हटलं: “आपलं बाळ गेलं.” आम्ही एकमेकांना घट्ट धरून रडलो. यामुळे मन जरा हलकं झालं.

पण आमच्या मुलांच्या नंतरच्या प्रतिक्रियांची आम्ही अपेक्षा केली नव्हती. उदाहरणार्थ, माझा गर्भपात झाल्यावर साधारण दोन आठवड्यांनी, यहोवाच्या साक्षीदारांच्या आमच्या स्थानिक मंडळीतील एक वृद्ध साक्षीदार व आमच्या कुटुंबाचे अगदी जवळचे स्नेही मरण पावल्याची मंडळीत घोषणा करण्यात आली. हे ऐकून आमचा चार वर्षांचा डेव्हिड खूप रडू लागला; माझे पती त्याला बाहेर घेऊन गेले. तो थोडा शांत झाला, इतक्यात ज्यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली होती ते का मेले असे डेव्हिडने विचारले. मग, आपलं बाळ का मेलं असं त्यानं विचारलं. त्यानंतर, तो आपल्या वडिलांना म्हणाला: “तुम्हीपण मरणार का?” यहोवानं आतापर्यंत सैतानाला नाश का केलं नाही आणि “सगळं काही ठीक करायला” त्याने अजून सुरवात का केली नाही हेही त्याला जाणून घ्यायचे होतं. अर्थात, त्याच्या लहानशा मनात हे सगळे विचार घोळत होते हे पाहून आम्हाला आश्‍चर्य वाटलं.

कॅटलिननेसुद्धा पुष्कळ प्रश्‍न विचारले. तिच्या बाहुल्यांशी खेळताना ती सहसा असं समजून खेळायची की तिची एक बाहुली आजारी आहे आणि बाकीच्या बाहुल्या नर्सेस किंवा कुटुंबातले सदस्य आहेत. तिने पुठ्ठ्याच्या बॉक्सचा बाहुल्यांसाठी दवाखाना बनवला होता आणि तिची एक बाहुली मरते असं ती खेळायची. आमच्या मुलांच्या प्रश्‍नांमुळे आणि खेळांमुळे आम्हाला त्यांना जीवनाविषयी व बायबल आपल्याला परीक्षांचा सामना करायला मदत कसे करू शकते त्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी शिकवायला अनेक संधी मिळाल्या. या पृथ्वीला एक सुंदर परादीस केले जाईल आणि दुःख, वेदना आणि मृत्यू हे देखील नाहीसे केले जातील या देवाच्या उद्देशाची आम्ही त्यांना आठवण करून दिली.—प्रकटीकरण २१:३, ४.

मी या संकटाला कसे तोंड दिले

मी दवाखान्यातून घरी आले तेव्हा मी सुन्‍न झाले होते, मला काहीच सुचत नव्हतं. घरात पुष्कळ कामं होती पण कोठून सुरवात करावी हेच मला कळेना. मी काही मैत्रिणींना बोलावलं ज्यांना असाच अनुभव आला होता आणि त्यांच्याकडून मला खूप सांत्वन मिळालं. एका जवळच्या मैत्रिणीनं माझ्यासाठी फुलं पाठवली आणि दुपारी आमच्या मुलांना तिने तिच्या घरी नेलं. तिच्या प्रेमळ काळजीबद्दल आणि व्यावहारिक मदतीबद्दल मी तिचे आभार मानले.

मी कुटुंबाचे फोटो सगळे नीट अल्बममध्ये लावून ठेवले. माझ्या बाळासाठी घेतलेले पण त्याने कधीच न घातलेले कपडे पाहिले आणि हातात घेतले—माझ्या गेलेल्या बाळाची ही एकच आठवण माझ्याकडे राहिली होती. कित्येक आठवड्यांपर्यंत माझी मनःस्थिती ठीक नव्हती. काही वेळा, माझ्या कुटुंबाकडून आणि मित्रांकडून दिलासा मिळूनही माझं रडणं थांबत नव्हतं. काही वेळा, मला वाटायचं की मी वेडी होईन. आणि गरोदर मैत्रिणींना पाहून तर मला आणखी कठीण जात होतं. गर्भपात होणे म्हणजे एका स्त्रीच्या जीवनातली “क्षुल्लक” समस्या आहे आणि त्यातून लगेच स्त्रिया सावरतात अशी माझी आधी धारणा होती. पण माझा विचार किती चुकीचा होता! *

प्रेम—सर्वोत्तम उपाय

माझ्या पतीनं आणि इतर ख्रिस्ती बंधूभगिनींनी दाखवलेल्या प्रेमानं मला सावरायला खूप मदत मिळाली. एका साक्षीदारानं एकदा जेवणाचा डबा आणला. मंडळीतल्या एका वडिलांनी व त्यांच्या पत्नीनं फुलं आणली, प्रेमपूर्ण शब्दांनी भरलेलं कार्ड दिलं आणि आमच्यासोबत पूर्ण संध्याकाळ घालवली. ते किती व्यस्त असतात याची आम्हाला जाणीव होती म्हणून त्यांचा विचारीपणा आम्हाला स्पर्शून गेला. पुष्कळ इतर मित्रमैत्रिणींनी कार्ड किंवा फुलं पाठवली. “तुमचा विचार आम्ही करत आहोत” या साध्यासोप्या शब्दांनीही आम्हाला किती दिलासा मिळत होता! मंडळीतल्या एका बहिणीने लिहिलं: “यहोवाप्रमाणेच आम्हालाही जीवन मोलाचं वाटतं. एखादी चिमणी जमिनीवर कधी पडते हे त्याला ठाऊक आहे तर गर्भ पडतो हेही त्याला ठाऊक असेलच.” माझ्या वहिणीने लिहिलं: “जन्म आणि जीवनाचा चमत्कार इतका अद्‌भुत आहे की, तो घडून येत नाही तेव्हा देखील आपल्याला आश्‍चर्य वाटतं.”

काही आठवड्यांनी राज्य सभागृहात असताना मला रडू आवरलं नाही आणि सभा सुरू व्हायला थोडाच अवकाश असताना मला बाहेर जावं लागलं. दोन मैत्रिणींनी मला रडत बाहेर जाताना पाहिलं आणि त्या लगेच माझ्या मागे आल्या, कारमध्ये बसल्या आणि माझे हात हातात घेऊन त्यांनी मला शेवटी हसवलं. मग आम्ही तिघीही पुन्हा आत गेलो. ‘भावापेक्षाही चांगले असलेले असे जवळचे मित्र’ किती दिलासा देणारे असतात!—नीतिसूत्रे १८:२४.

माझ्याबद्दल लोकांना कळू लागलं तसं माझ्यासारखे पुष्कळ साक्षीदार होते हे पाहून मला आश्‍चर्य वाटलं. माझी ज्यांच्याशी अधिक जवळीक नव्हती अगदी त्यांनीही मला सांत्वन आणि उत्तेजन दिलं. मला गरज असताना त्यांनी जो आधार दिला त्यावरून बायबलमधल्या या म्हणीची मला आठवण झाली की, “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.

देवाच्या वचनातून सांत्वन

माझा गर्भपात झाल्यावर एका आठवड्याने ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी होता. एकदा संध्याकाळी आम्ही बायबलमधून येशूच्या अखेरच्या दिवसांसंबंधीचे अहवाल वाचत असताना मला अचानक लक्षात आलं: ‘आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर कसं वाटतं हे यहोवाला माहीत आहे. त्याच्या स्वतःच्या पुत्राचा मृत्यू झाला तेव्हा त्याने हे दुःख सहन केले!’ यहोवा आपला स्वर्गीय पिता असल्यामुळे तो आपल्याला किती समजून घेतो आणि त्याला त्याच्या सेवकांबद्दल—मग ते स्त्री असोत नाहीतर पुरुष—किती सहानुभूती आहे याचा काही वेळा मला विसर पडतो. त्याच क्षणी मला अगदी शांत झाल्यासारखं झालं. मला यहोवाच्या आणखी निकट असल्यासारखं वाटलं.

बायबल-आधारित प्रकाशनांतून, खासकरून प्रिय व्यक्‍ती गमावल्यासंबंधी गतकाळातल्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांतून मला खूप उत्तेजन मिळालं. उदाहरणार्थ, ऑगस्ट ८, १९८७ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातील “मूल गमावण्याचे दुःख” यावरील लेखांमुळे तसेच प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) या माहितीपत्रकामुळे बरीच मदत झाली. *

दुःख निवळले

काही काळानं मला जाणवू लागलं की मी सावरू लागले आहे कारण मला दोषी न वाटता मी हसू शकत होते आणि माझ्या मेलेल्या बाळाचा उल्लेख न करता मी बोलू शकत होते. पण काही वेळा, ज्यांनी माझ्याविषयी ऐकलं नव्हतं अशा मैत्रिणी भेटल्या किंवा आमच्या राज्य सभागृहात कोणी कुटुंब एखादं बाळ घेऊन आलं तर अचानक पुन्हा मनावरचा ताबा सुटायचा.

मग एकदा सकाळी मी उठले तेव्हा दुःखाचं सावट निघून गेल्यासारखं मला वाटलं. इतकंच नव्हे तर डोळे उघडायच्या आधीच मला एक प्रकारची शांती जाणवली; असं मला कित्येक महिन्यापासून वाटलं नव्हतं. पण माझ्या गर्भपाताला एक वर्ष होऊन गेल्यावर मी पुन्हा गरोदर राहिले तेव्हा परत गर्भपात होण्याची भीती मनात आल्याशिवाय राहिली नाही. ऑक्टोबर २००१ मध्ये मी एका निरोगी मुलाला जन्म दिला.

मला अजूनही गेलेल्या बाळाचं दुःख होतं. पण, या घटनेमुळे मला जीवनाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, सह-ख्रिश्‍चनांबद्दल आणि सांत्वन देणाऱ्‍या देवाबद्दल अधिक कदर वाटू लागली आहे. या अनुभवामुळे आणखी एक सत्य अधिकच स्पष्ट झाले की, देव आपल्या मुलांना नेत नाही तर “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.”—उपदेशक ९:११, पं.र.भा.

सर्व प्रकारचे रडणे, शोक आणि दुःख त्याचप्रमाणे गर्भपातामुळे होणारे शारीरिक आणि भावनिक दुःखही काढून टाकले जाईल त्या काळाची आपण किती आतुरतेने वाट पाहत आहोत! (यशया ६५:१७-२३) मग सर्व आज्ञाधारक मानव म्हणू शकतील: “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”—१ करिंथकर १५:५५; यशया २५:८.—सौजन्याने. (g०२ ३/२२)

[तळटीपा]

^ संशोधनावरून दिसून येते की, गर्भपात झालेल्या प्रत्येक व्यक्‍तीची प्रतिक्रिया वेगळी असते. काहीजणी गोंधळून जातात, काही निराश होतात तर काहींना दुःख आवरत नाही. गर्भपातासारखा गंभीर धक्का बसतो तेव्हा शोकाकूल होणं हे अगदी साहजिक आहे आणि आपला शोक व्यक्‍त केल्याने हळू हळू सावरण्यास मदत होते.

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[२१ पानांवरील चौकट]

गर्भपाताचे प्रमाण आणि कारणे

“अभ्यासांवरून हे दिसून येते की, तपासणींमध्ये सिद्ध झालेल्या १५ ते २० टक्के गरोदर स्त्रियांना गर्भपात होतो,” असे द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणते. “परंतु गर्भधारणा (फलन) झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते; या काळात बहुतेक स्त्रियांना त्या गरोदर आहेत हे माहीतही नसते.” आणखी एका संदर्भानुसार, “८० टक्क्यांहून [अधिक] गर्भपात गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यांमध्ये होतात” ज्यांतील निम्मे तरी गर्भाच्या गुणसूत्रांमधील दोषांमुळे घडतात असे समजले जाते. आईच्या किंवा वडिलांच्या गुणसूत्रांमध्येही तेच दोष असल्यामुळे असे घडत नाही.

आईच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या इतर कारणांमुळेही गर्भपात होऊ शकतो. वैद्यकीय अधिकाऱ्‍यांच्या मते, हार्मोनल व रोगप्रतिकारकशक्‍तीचे विकार, संसर्ग आणि मातेच्या ग्रीवेतील किंवा गर्भाशयातील दोषांमुळे गर्भपात होऊ शकतो. मधुमेह (नियंत्रणात न ठेवलेला) आणि उच्च रक्‍तदाब यांसारखे जुनाट रोगही कारणीभूत ठरू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, गर्भपात नेहमीच व्यायाम, जड वस्तू उचलणे किंवा लैंगिक संभोगामुळे होत नाही. त्याचप्रमाणे पडणे, हलका मार लागणे किंवा एकदम घाबरणे यांमुळे गर्भपात होण्याची शक्यता नसते. एका संदर्भानुसार: “जर इजा तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी धोकेदायक असण्याइतकी गंभीर असेल तरच ती गर्भाला धोकेदायक ठरू शकते.” गर्भाशयाची ही रचना आपला निर्माणकर्ता किती सुज्ञ आणि प्रेमळ आहे याची पुष्टी देते!—स्तोत्र १३९:१३, १४.

[२३ पानांवरील चौकट]

कुटुंब आणि मित्रमंडळीकडून आधार

आपल्या कुटुंबातल्या किंवा मैत्रिणींपैकी कोणाला गर्भपात होतो तेव्हा नेमके काय म्हणावे किंवा काय करावे हेच कळत नाही. अशा वेळी, प्रत्येक व्यक्‍तीची प्रतिक्रिया वेगळी असते म्हणून सांत्वन किंवा मदत देण्याची कोणतीही एक पद्धत सांगता येणार नाही. तथापि पुढील सल्ले फायदेकारक असू शकतात. *

व्यावहारिक मदत:

◆ मोठ्या मुलांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घ्या.

◆ कुटुं बासाठी जेवणाचा डबा आणा.

◆ पित्यालाही आधार द्या. एका पित्याने असे म्हटले: “अशा वेळी पित्यांसाठी कार्ड बनवण्याचा कोणी विचार करत नाहीत.”

बोलावयाच्या मदतदायी गोष्टी:

“तुझ्या गर्भपाताविषयी ऐकून खूप वाईट वाटलं.”

या साध्या शब्दांतून पुष्कळ काही व्यक्‍त होतं आणि असं म्हटल्याने आणखी सांत्वन द्यायला मार्ग मोकळा होतो.

“माझ्यासमोर रडायला लाजू नकोस.”

गर्भपात झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यांमध्ये किंवा महिन्यांमध्येही स्त्रीला फार चटकन रडू येत असतं. त्यामुळे, ती रडते तेव्हा आपल्या भावना व्यक्‍त केल्यामुळे तुम्हाला तिचा कमीपणा वाटत नाही याची तिला शाश्‍वती द्या.

“मी पुढच्या आठवडी फोन करून तुझी विचारपूस करीन, चालेल ना?”

सुरवातीला, गर्भपात झालेल्या स्त्रीला सगळेच जण सहानुभूती दाखवतात. पण काही काळानंतर त्यांचे दुःख अद्याप ओसरलेलं नसतं तेव्हा सगळेजण त्यांना विसरून गेले असं त्यांना वाटू शकतं. तुम्ही अजूनही आधार देऊ इच्छिता हे जाणून त्यांना आनंद वाटेल. कारण दुःखाच्या भावना कित्येक आठवड्यांपर्यंत किंवा महिन्यांपर्यंत राहू शकतात. कधी कधी दुसऱ्‍या बाळंतपणानंतरही या भावना उफाळून येऊ शकतात.

“काय म्हणावं कळत नाही.”

शांत राहण्यापेक्षा निदान हे शब्द बोलणं चांगलं असेल. तुमची प्रामाणिकता आणि तुम्ही मदत करायला तयार आहात यावरून तुमची काळजी व्यक्‍त होईल.

काय म्हणू नये:

“तुला दुसरं बाळ होईल.”

हे खरं असलं तरी यावरून तुम्हाला काहीच सहानुभूती वाटत नाही असं दिसू शकतं. पालकांना कोणतेही बाळ नको होते, त्यांना तेच बाळ हवे होते. दुसऱ्‍या बाळाचा विचार करण्याआधी त्यांना गेलेल्या बाळासाठी दुःख व्यक्‍त करण्याची गरज असेल.

“बाळात काहीतरी दोष असेल.”

हे जरी खरं असलं तरी असं म्हटल्याने सांत्वन मिळत नाही. कारण आईला वाटत असतं की, तिच्या पोटात सुदृढ बाळ होतं.

“निदान तुम्ही बाळाला पाहिलं तरी नव्हतं. बाळ मोठं झाल्यावर असं झालं असतं तर जास्त दुःख झालं असतं.”

पुष्कळ स्त्रियांची फार लवकर आपल्या पोटातल्या बाळाशी जवळीक वाढते. म्हणून बाळ मरतं तेव्हा दुःख होणं साहजिकच आहे. शिवाय, आईशिवाय इतर कोणालाही बाळाची “ओळख” नसते यामुळं तर आणखी दुःख वाटत असतं.

“निदान तुमची बाकीची मुलं तरी आहेत.”

दुःखी पालकांना असं म्हणणे म्हणजे, हात किंवा पाय नसलेल्या कोणा व्यक्‍तीला, “तुम्हाला निदान एक हात किंवा एक पाय तरी आहे,” असं म्हणण्यासारखं असतं.

अर्थात, मनस्वी कळकळ वाटत असलेल्या व्यक्‍तीच्या तोंडूनही नेहमीच योग्य शब्द निघत नाहीत. (याकोब ३:२) त्यामुळे, कोणी प्रामाणिकपणे सांत्वन देण्याच्या हेतूने चुकून काही बोलून गेल्यास गर्भपात झालेल्या विचारशील स्त्रियांनी ख्रिस्ती प्रेम दाखवावे आणि अशा लोकांबद्दल मनात राग बाळगू नये.—कलस्सैकर ३:१३.

[तळटीप]

^ वेलिंग्टन, न्यूझीलंड, गर्भपात आधार गटाने तयार केलेल्या गर्भपाताचा सामना करण्यासाठी मार्गदर्शिका (इंग्रजी) याच्या आधारे दिलेली माहिती.