व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वन्यजीवनावर पाळत

वन्यजीवनावर पाळत

वन्यजीवनावर पाळत

असे समजा की, तुमच्या पाठीवर एक छोटासा रेडिओ ट्रान्समिटर लावलाय ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेवून त्याचे परीक्षण केले जाऊ शकते. श्रीमती गिबसन असे नाव ठेवलेल्या एका प्रवासी ॲल्बट्रॉसचे हेच जीवन आहे. तिच्यावरील छोट्या ट्रान्समिटरने संशोधक तिच्या सूचना—त्याचप्रमाणे अशी उपकरणे लावलेल्या इतर पक्ष्यांच्या सूचना—खेचून पृथ्वीवर पाठवणाऱ्‍या उपग्रहांच्या माध्यमाने तिच्यावर पाळत ठेवतात. अशा तऱ्‍हेने मिळवलेल्या तपशीलांवरून या अद्‌भुत पक्ष्यांविषयी काही आश्‍चर्यजनक माहिती प्राप्त झाली आहे ज्याकरवी त्यांचे संरक्षण करण्यास योगदान मिळेल अशी आशा केली जाते.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया येथील ल ट्रोब विद्यापीठाने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांना अशी माहिती मिळाली की, प्रवासी ॲल्बट्रॉस दर दिवशी सरासरी ३०० किलोमीटर उड्डाण करतात आणि काही वेळा एकाच दिवसात १,००० हून अधिक किलोमीटर उड्डाण करतात. त्यांच्या पंखांचा विस्तार ३४० से.मी. असून इतर कोणत्याही पक्ष्यापेक्षा तो मोठा आहे; हवेवर तरंगण्यात पटाईत असलेले हे पक्षी समुद्रावर गोल गोल उड्डाण करत कित्येक महिन्यांत ३०,००० पेक्षा अधिक किलोमीटर प्रवास करतात. अमेरिकेत घेतलेल्या अशाच अभ्यासांवरून दिसून आले की, एका लेसॅन ॲल्बट्रॉस पक्ष्याने केवळ आपल्या एका पिल्लासाठी अन्‍न आणायला हॉनलुलुच्या वायव्येकडील टर्न बेटावरून अलुशन बेटांपर्यंत (हा संपूर्ण प्रवास ६,००० किलोमीटरचा आहे) चार फेऱ्‍या मारल्या!

या अत्याधुनिक अभ्यासांवरून नर ॲल्बट्रॉस पक्ष्यांपेक्षा प्रवास करणाऱ्‍या मादी पक्ष्यांची संख्या अचानक कमी का झाली आहे हे देखील स्पष्ट झाले असावे. उड्डाण मार्गांवरून हे दिसून येते की, पिलांची काळजी घेणारे नर अन्टार्टिकाच्या जवळच्या क्षेत्रात भक्ष्य शोधण्याचा प्रयत्न करतात तर माद्या सहसा उत्तरेकडे दूरवर लाँगलाईन पद्धतीची मासेमारी करणाऱ्‍या बोटींच्या क्षेत्रात अन्‍न शोधतात. बोटींच्या मागे सोडलेल्या पाशांवर झडप मारल्यामुळे हे पक्षी अडकले व बुडून मेले. पिलांची काळजी घेणाऱ्‍या काही पक्ष्यांमध्ये नरांची संख्या माद्यांपेक्षा दुप्पट आहे. इतर ॲल्बट्रॉस पक्ष्यांवरही याचा परिणाम झाला आहे. एक काळ असा होता की, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपासून दूरवरच्या सागरांमधील लाँगलाईन पद्धतीच्या मासेमारीमुळे एका वर्षात ५०,००० पक्षी बुडून मरण पावले आणि विविध जाती लोप पावण्याच्या धोक्यात आहेत. ऑस्ट्रेलियात तर प्रवासी ॲल्बट्रॉस पक्ष्याला नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली जात असे घोषितही केले आहे. या माहितीमुळे मासेमारीच्या पद्धतींमध्ये फेरफार करण्यात आला आहे आणि प्रवासी ॲल्बट्रॉस पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. तरीसुद्धा, प्रमुख विणीच्या स्थानी या जातींची संख्या अजूनही कमी होत चालली आहे.

पक्ष्यांना कड्या बसवणे

विशिष्ट जातींच्या पक्ष्यांवर पाळत ठेवण्यासाठी संशोधक बारीक इलेक्ट्रॉनिक साधनांचा उपयोग करत असले तरीही अनेक वर्षांपासून कमी खर्चाच्या व अधिक साध्या पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. यातली एक पद्धत म्हणजे पक्ष्यांना कड्या बसवणे; यामध्ये पक्ष्यांच्या पायांमध्ये पैंजणासारखी लहानशी धातूची किंवा प्लास्टिकची कडी बसवली जाते.

स्मीथसोनियन मासिकानुसार, पक्ष्यांना कड्या बसवण्याची पद्धत, १८९९ साली सुरू झाली जेव्हा हान्स क्रिस्चन मॉर्टनसन या डेनिश शिक्षकाने “स्वतः धातूच्या कड्या बनवल्या, त्यांवर आपले नाव आणि पत्ता गिरवला आणि १६५ पिलांच्या पायांमध्ये त्या अडकवल्या.” आजकाल, पक्ष्यांना कड्या बसवण्याची पद्धत संपूर्ण जगभर आचरली जाते; याद्वारे पक्ष्यांचा विस्तार आणि त्यांच्या स्थलांतरणाच्या सवयी, वर्तन, सामाजिक रचना, संख्या आणि जगण्याचे व उत्पादनाचे प्रमाण यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. शिकारीला परवानगी आहे तेथे कड्या बसवण्यामुळे, शिकारीच्या पक्ष्यांच्या दीर्घकालीन नियंत्रणाकरता नियम बनवण्यासाठी प्रशासनाला मदत होते. कड्या बसवण्यामुळे पक्ष्यांवर रोगांचा आणि विषारी रासायनिक पदार्थांचा काय परिणाम होतो हे देखील कळते. काही पक्ष्यांमध्ये मानवी रोग असू शकतात जसे की, मस्तिष्कशोथ आणि लाईम रोग; त्यामुळे, पक्ष्यांचे जीवशास्त्र व सवयी यांविषयीची माहिती आपल्या आरोग्याचेही रक्षण करू शकते.

कड्या बसवणे क्रूर प्रथा आहे का?

ज्या देशांमध्ये पक्ष्यांना कड्या बसवल्या जातात तेथे त्यासंबंधी अनेक नियम असतात आणि कड्या बसवणाऱ्‍या लोकांकडे सहसा परवाना असावा लागतो. ऑस्ट्रेलियन निसर्ग संरक्षण एजेंसीनुसार ऑस्ट्रेलियात, “पक्ष्यांना कड्या बसवणाऱ्‍या लोकांना पक्ष्यांना कसलेही नुकसान न पोहंचवता त्यांना पकडण्याचे, हाताळण्याचे आणि कड्या बसवण्याचे चांगले प्रशिक्षण दिले जाते. सहसा या प्रशिक्षणाला दोन वर्षे लागतात आणि पुष्कळ सराव करावा लागतो.” युरोप, त्याचप्रमाणे कॅनडा, अमेरिका आणि इतर देशांमध्येही असेच नियम आहेत.

पक्ष्यांच्या कड्या विविध आकाराच्या, मापाच्या, रंगाच्या आणि पदार्थांच्या असतात. बहुतेक कड्यांसाठी अल्युमिनियम किंवा प्लास्टिकसारखे हलके पदार्थ वापरले जातात, परंतु दीर्घ आयुर्मान असलेल्या पक्ष्यांसाठी किंवा खाऱ्‍या पाण्याच्या वातावरणातील पक्ष्यांसाठी स्टेनलेस स्टीलसारखे झीजरोधक पदार्थ वापरले जातात. रंगीत कड्यांमुळे पक्ष्यांना दूरूनच ओळखणे सहजसोपे होते. यासाठी अनेक कड्या बसवाव्या लागत असल्या तरीही निदान पक्ष्यांना ओळखण्यासाठी त्यांना पकडले जाते तेव्हा त्यांच्यावर तणाव येत नाही.

कड्या बसवण्याची किंवा खुणा करण्याची कसलीही पद्धत वापरली तरी पक्ष्यांना ते त्रासदायक होणार नाही किंवा त्यांचे वर्तन, शरीर, आयुर्मान, सामाजिक जीवन, परिस्थितीकी किंवा जगण्याची शक्यता यांवर कसलाही विपरीत परिणाम घडणार नाही याची संशोधक काळजी घेतात. उदाहरणार्थ, पंखांवर एखाद्या भडक रंगाची खूण लावल्यास भक्षकांना पक्षी सहज दिसेल किंवा संग करण्याच्या यशस्वीपणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही जातीच्या पक्ष्यांची विष्ठा त्यांच्या पायांवरच पडत असल्यामुळे कड्यांनी त्यांना संसर्ग होऊ शकतो. थंड प्रदेशांमध्ये, कड्यांवर बर्फ जमू शकतो आणि यामुळे विशेषतः पाण्यात राहणाऱ्‍या पक्ष्यांना इजा होऊ शकते. पक्ष्यांवर खूण करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली जाते याची ही केवळ काही उदाहरणे आहेत. तथापि यावरून, कार्यक्रम परिणामकारक ठरायला तसेच पक्ष्यांना इजा होणार नाही अशा तऱ्‍हेने पार पडायला पक्ष्यांच्या जीवशास्त्राविषयी व वर्तनाविषयी किती शास्त्रीय माहिती लागते याची कल्पना येते.

कड्या बसवलेला किंवा टॅग असलेला प्राणी तुम्हाला सापडल्यास?

काही वेळा कड्यांवर किंवा टॅग्सवर टेलिफोन नंबर किंवा पत्ता दिलेला असतो ज्यामुळे तुम्ही मालकाला किंवा कड्या बसवणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांशी संपर्क साधू शकता. * मग तुम्ही मालकाला, हा टॅग कोठे व केव्हा मिळाला तसेच इतर तपशील सांगू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या माशाला टॅग लावून सोडल्यास त्याने किती दूरपर्यंत व किती वेगाने प्रवास केला, हे एका जीवशास्त्रज्ञाला सांगता येईल.

जगभरातील संशोधकांच्या कार्यामुळे आणि सापडलेल्या टॅग्सची आणि कड्यांची खबर देणाऱ्‍या प्रामाणिक लोकांच्या प्रयत्नांमुळे वन्यजीवनाविषयी आश्‍चर्यजनक माहिती गोळा केली जात आहे. रेड नॉट या पक्ष्याचेच उदाहरण घ्या; १०० ते २०० ग्रॅम वजनाचा हा पक्षी सँडपायपर पक्ष्यांचा भाईबंद आहे. आता शास्त्रज्ञांना हे माहीत झाले आहे की, काही रेड नॉट पक्षी दरवर्षी कॅनडाच्या उत्तर टोकापासून अमेरिकेच्या दक्षिण टोकाला जाऊन पुन्हा येतात—हे सुमारे ३०,००० किलोमीटरचे अंतर आहे.

एका म्हाताऱ्‍या परंतु सुदृढ रेड नॉट पक्ष्याच्या कडीवरून हे निष्पन्‍न झाले की, कदाचित १५ वर्षांपर्यंत त्याने हे केले असावे. म्हणजे या चिमुकल्या पक्ष्याने ४,००,००० किलोमीटरचा प्रवास केला असेल जे पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या सामान्य अंतरापेक्षाही जास्त अंतर आहे! या सुंदर पक्ष्याला आपल्या हाताच्या पंजावर बसवून लेखक स्कॉट वायडनसॉल म्हणाले: “या विखुरलेल्या जगाला विणणाऱ्‍या या प्रवाशांपुढे मी नतमस्तक होतो.” होय, पृथ्वीवरील विविध प्राणीमात्रांविषयी आपण जितके शिकून घेऊ तितकाच आपल्याला “आकाश, पृथ्वी . . . व त्यातील सर्वकाही निर्माण” करणाऱ्‍या यहोवा देवाविषयी आदर व भय वाटेल.—स्तोत्र १४६:५, ६. (g०२ ३/२२)

[तळटीप]

^ कड्या किंवा टॅग काही वेळा इतके जीर्ण होतात की त्यावरील माहिती स्पष्ट दिसत नाही. परंतु आम्ललेखनाद्वारे न दिसणारे हे तपशील वाचता येऊ शकतात. अमेरिकेत, बर्ड बँडिंग लॅबोरेटरीमध्ये, दरवर्षी अशा शेकडो कड्यांवरील अक्षरे वाचली जातात.

[२७ पानांवरील चौकट/चित्रे]

खुणा करण्याच्या व शोधून काढण्याच्या पद्धती

पक्ष्यांव्यतिरिक्‍त अनेक प्राण्यांवरही अभ्यासाकरता खुणा केल्या जातात. खुणा करण्याच्या पद्धती, वैज्ञानिक उद्देश आणि प्राण्यांची शारीरिक वैशिष्ट्ये व सवयी यांवर अवलंबून असतात. पायांतल्या कड्यांव्यतिरिक्‍त फीत, पट्टी, टॅग, पेंट, छापा, डाय, डाग, कॉलर, रेडिओ साधने, मायक्रोकम्प्युटर, स्टेन्लेस स्टीलचे लहान बाण (ज्यामध्ये कोड असलेले टॅग लावलेले असतात), नख, कान व शेपटीचा तुकडा कापणे आणि इतर विविध पद्धती व साधनांचा संशोधक उपयोग करतात. यातली काही साधने अगदी स्वस्त आहेत. तर इतर फार खर्चीक आहेत जसे की, सील प्राण्यांच्या पाण्यातील सवयींचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे ६,९०,००० रुपये किंमतीचे कॅमकॉर्डर जोडलेले बारीक इलेक्ट्रॉनिक साधन.

पॅसिव्ह इंटेग्रेटेड ट्रान्सपाँडर नावाचे एक इलेक्ट्रॉनिक साधन भूल दिलेल्या प्राण्याच्या त्वचेखाली किंवा त्याच्या शरीरात घातले जाऊ शकते आणि मग त्यातून मिळणारी माहिती बाहेरून एका खास उपकरणाने वाचली जाऊ शकते. ब्ल्यूफीन ट्यूनाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ आर्कायव्हल टॅग किंवा स्मार्ट टॅग नावाचे एक लघु कम्प्युटर त्या माशाच्या आत घालतात. नऊ वर्षांपर्यंत या मायक्रोचिप्सवर तापमान, खोली, प्रकाशाचे प्रमाण आणि समय यांबद्दल माहिती गोळा करून साठवली जाते. हा टॅग परत मिळाल्यावर, दिवसाच्या प्रकाशाच्या माहितीची वेळेच्या माहितीशी तुलना करून महत्त्वपूर्ण तपशील मिळवता येतात.

सापांच्या अंगावरील काही खवले काढून; कासवांच्या कवचावर खाच पाडून; पालींच्या पायांची नखे कापून; सुसरी आणि मगरींची नखे कापून किंवा शेपटीवरील काटेरी खवले काढून त्यांच्यावर खुणा केल्या जातात. काही प्राणी इतरांपेक्षा वेगळे दिसत असल्यामुळे त्यांना केवळ फोटोंद्वारे ओळखता येते.

[चित्रे]

काळ्या अस्वलाच्या कानावर टॅग लावताना; एका डॅमसेलफीशचा स्पगेट्टीसारखा टॅग; सुसरींच्या शेपटींवर लावलेले टॅग

पेरेग्रीन फॅल्कनला लावलेला उपग्रह प्रक्षेपक

रेनबो ट्राऊटच्या आत बसवलेले दूरमापन उपकरण

[चित्राचे श्रेय]

अस्वल: © Glenn Oliver/Visuals Unlimited; डॅमसेलफीश: Dr. James P. McVey, NOAA Sea Grant Program; सुसर: Copyright © २००१ by Kent A. Vliet; पृष्ठे २ आणि २७ वरील फॅल्कन: Photo by National Park Service; मासे धरलेली माणसे: © Bill Banaszewski/Visuals Unlimited

[२५ पानांवरील चित्र]

धारदार नडगी असलेल्या हॉक पक्ष्याला कडी बसवताना

[चित्राचे श्रेय]

© Jane McAlonan/Visuals Unlimited