व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेंट पीटरचा मासा

सेंट पीटरचा मासा

सेंट पीटरचा मासा

इस्राएलमधील गालील समुद्राच्या किनाऱ्‍यावर असलेल्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर मेनूवर “सेंट पीटरचा मासा” तुम्हाला हमखास आढळेल. तुम्ही म्हणाल, हा कोणता मासा? तिथला वेटर तुम्हाला सांगेल की, हा इथल्या लोकांच्या आणि खासकरून पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. हा मासा तळून गरमागरम असताना खाल्ला तर खूप स्वादिष्ट लागतो. पण प्रेषित पेत्राशी त्याचा काय संबंध?

बायबलमध्ये मत्तय १७:२४-२७ येथे वर्णन केलेल्या घटनेवरून याचे उत्तर मिळते. तेथे आपल्याला शिकायला मिळते की, गालील समुद्राच्या काठी वसलेल्या कफर्णहूम नगराला भेट देत असताना येशू मंदिरपट्टी देतो का असे पेत्राला विचारण्यात आले. नंतर येशूने स्पष्ट केले की, देवाचा पुत्र असल्यामुळे त्याला मंदिरपट्टी वगैरे देण्याची काही आवश्‍यकता नव्हती. परंतु लोकांना अडखळण होऊ नये म्हणून तो पेत्राला समुद्रात गळ टाकायला आणि पहिल्याने वर येणारा मासा धरून त्याच्या तोंडातले नाणे पट्टीसाठी द्यायला सांगतो.

“सेंट पीटरचा मासा” हे नाव बायबलमधील या अहवालावरून पडले आहे. पण पेत्राने नेमका कोणता मासा धरला होता?

विपुलतेत मासे असलेला समुद्र

गालील समुद्रात सुमारे २० जातींचे मासे आहेत; परंतु पेत्राने धरलेला मासा त्यातील केवळ १० जातींच्या माशांपैकी एक असू शकतो असे मानले जाते. हे दहा मासे व्यापारदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्‍या तीन गटांमध्ये मोडतात.

सर्वात मोठ्या गटाला मुश्‍त असे म्हटले जाते; अरेबिकमध्ये याचा अर्थ “फणी” असा होतो कारण या माशांच्या पाच जातींमध्ये पाठीवरील पर फणीसारखा असतो. मुश्‍त माशाच्या एका जातीची लांबी सुमारे ४५ सेंटीमीटर असू शकते आणि वजन दोन किलो भरू शकते.

दुसरा गट आहे किन्‍नेरेथ (गालील समुद्र) सार्डिन माशांचा; हे लहान हेरिंग माशांसारखे असतात. सार्डिन माशांचा हंगाम असतो तेव्हा दररोज रात्री कित्येक टन मासे धरले जातात आणि वर्षाकाठी एक हजार टन इतके मासे धरले जातात. अगदी प्राचीन काळापासून हे सार्डिन मासे टिकवण्यासाठी खारावले जातात.

तिसरा गट आहे बिनी किंवा बार्बेल म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्‍या माशांचा; या माशाच्या तीन जातींमध्ये तोंडाच्या कडेला काटे असतात म्हणून त्याला बिनी हे हिब्रू नाव पडले ज्याचा अर्थ होतो “केस.” हे मासे कालवे, गोगलगाय आणि लहान माशांवर गुजराण करतात. लांब डोक्याचा बार्बेल मासा सुमारे ७५ सेंटीमीटर लांबीचा असतो आणि सातपेक्षा अधिक किलोग्रॅम वजनाचा असतो. बार्बेल मासे मांसल असतात आणि ज्यू लोकांच्या शब्बाथ व इतर सणांसाठी हाच मासा पसंत केला जातो.

व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्‍या तीन गटांमध्ये गालील समुद्रातील सर्वात मोठा मासा कॅटफिश हा गणलेला नाही. त्याची लांबी १.२ मीटर असून त्याचे वजन ११ किलोग्रॅम इतके भरते. पण कॅटफिशला खवले नसल्यामुळे मोशेच्या नियमशास्त्रानुसार तो अशुद्ध होता. (लेवीय ११:९-१२) त्यामुळे ज्यू लोक तो खात नाहीत आणि पेत्राने पकडलेला मासा या प्रकारातला नसावा.

पेत्राने कोणता मासा पकडला?

सामान्यतः, मुश्‍त माशालाच “सेंट पीटरचा मासा” म्हटले जाते आणि गालील समुद्राजवळील रेस्टॉरंटमध्येही याच नावाने तो दिला जातो. या माशाला फार कमी व लहान काटे असल्यामुळे तो बनवायला आणि खायलाही सोपा असतो. पण पेत्राने खरोखर हाच मासा धरला होता का?

गालील समुद्राच्या किनाऱ्‍यावर ५० हून अधिक वर्षांपासून राहिलेले एक मच्छीमार, मेंडल नन यांना स्थानिक माशांसंबंधी जाणकार व्यक्‍ती म्हणून मानले जाते. ते म्हणतात: “मुश्‍त मासा प्लवकांवर गुजराण करत असल्यामुळे इतर प्रकारचे अन्‍न तो खात नाही. त्यामुळे हे मासे गळ टाकून नव्हे तर जाळ्यांनी पकडले जातात.” म्हणून पेत्राने कदाचित हा मासा पकडला नसावा. तो सार्डिनही असू शकत नाही कारण सेंट पीटरचा मासा म्हणायला तो फारच लहान आहे.

आता उरला फक्‍त बार्बेल मासा आणि काहींच्या मते हाच “सेंट पीटरचा मासा” असावा. नन म्हणतात: “[गालील समुद्रातील] मासेमाऱ्‍यांनी वर्षानुवर्षांपासून गळाला सार्डिन मासे लावून बार्बेल पकडले आहेत जे भक्षक असून तळाशी असलेल्या अन्‍नावर गुजराण करतात.” त्यामुळे त्यांचा असा निष्कर्ष आहे, की, “पेत्राने नक्कीच बार्बेल मासा धरला असावा.”

तर मग, मुश्‍त हा मासा “सेंट पीटरचा मासा” म्हणून का दिला जातो? नन म्हणतात: “या गडबडीचे एकच स्पष्टीकरण असू शकते. पर्यटनासाठी ते फायदेकारक होते! . . . यात्रेकरू दूरदूरहून येऊ लागले तेव्हा, सरोवराच्या काठावरच्या भोजनालयांमध्ये पूर्वीपासूनच दिल्या जाणाऱ्‍या मुश्‍त माशालाच “सेंट पीटरचा मासा” असे नाव देणे व्यापाराच्या दृष्टीने फायदेकारक होते. सर्वात लोकप्रिय आणि बनवायला सोपा असलेल्या माशालाच सर्वात जास्त खप घडवून आणणारे नाव मिळाले!”

पेत्राने नेमका कोणता मासा धरला हे आपण पक्क्या खात्रीनिशी सांगू शकत नसलो तरी “सेंट पीटरचा मासा” म्हणून तुम्हाला दिला जाणारा कोणताही मासा स्वादिष्ट असेल यात शंका नाही. (g०२ २/२२)

[१९ पानांवरील चित्र]

“मुश्‍त”

[१९ पानांवरील चित्र]

बार्बेल

[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]

Garo Nalbandian