पोलिस त्यांची खरच गरज आहे का?
पोलिस त्यांची खरच गरज आहे का?
पोलिस नसते तर? १९९७ साली, ब्राझीलमधील रसीफा शहरात १८,००० पोलिस अधिकाऱ्यांनी संप केला तेव्हा तेथील दहा लाख रहिवाशांना पोलिस नसल्याने काही फरक पडला का?
द वॉशिंग्टन पोस्ट या बातमीपत्राने असे वृत्त दिले: “अवघ्या पाच दिवसांत या समुद्रकिनाऱ्यावरील महानगरीत अक्षरशः हाहाकार माजला आहे. दररोज होणाऱ्या खुनांची सरासरी संख्या तिप्पट झाली आहे. आठ बँका लुटल्या गेल्या. एका शॉपिंग मॉलमध्ये गुंडांनी धुमाकूळ घातला आणि उच्चभ्रू परिसरांत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाहतुकीच्या नियमांना तर सगळ्यांनी धाब्यावर बसवले आहे. . . . गुन्हेगारीच्या या अचानक आलेल्या लाटेने शवागरे तुडुंब भरली आहेत आणि सर्वात मोठ्या सरकारी इस्पितळात तर रुग्णांची जणू जत्राच भरली आहे; गोळीबारात किंवा भोसकाभोसकीत जखमी झालेले, इस्पितळात जागा सापडेल तेथे जमिनीवर पडलेले आहेत.” न्यायालय सचिवांनी असे विधान केल्याचे वृत्त आहे की “इथे पूर्वी कधीच एवढा अनाचार घडला नव्हता.”
जगातल्या कोणत्याही भागात आपण राहात असलो तरीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती सर्वत्र आढळते, केवळ सुसंस्कृतपणाच्या पडद्याखाली ती लपलेली आहे इतकेच. पोलिसांच्या संरक्षणाची आपल्याला नितान्त गरज आहे. अर्थात काही पोलिस अधिकारी स्वतःच निर्दयी, भ्रष्टाचारी, बेपर्वा वृत्तीचे असतात आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात. प्रत्येक देशात हे कमी जास्त प्रमाणात आढळते. पण पोलिस नसते तर आपण काय केले असते? ते बऱ्याचदा अतिशय आवश्यक असणाऱ्या सेवा पुरवतात हे खरे नाही का? सावध राहाच्या! प्रतिनिधीने जगातल्या विविध भागांतील काही पोलिस अधिकाऱ्यांना विचारले की त्यांनी हा व्यवसाय का निवडला?
एक समाजकार्य
आयव्हन नावाच्या एका ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याने म्हटले, “मला लोकांना मदत करायला आवडते. या कामात तोचतोपणा नाही, म्हणूनच मी या व्यवसायाकडे
आकर्षित झालो. बऱ्याच लोकांना कल्पना नाही, पण गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांच्या कामांत केवळ २० किंवा ३० टक्के मोडते. ही मुळात एक समाजसेवा आहे. सर्वसामान्यपणे दररोज आम्ही काय काय करतो याचा आढावा घेतल्यास, आकस्मिक मृत्यू, रस्त्यावरील दुर्घटना, एखादा गुन्हा हाताळणे आणि एखाद्या वाट चुकलेल्या वयस्क व्यक्तीला मदत करणे यांसारखी कामे आम्हाला करावी लागतात. खासकरून एखाद्या हरवलेल्या मुलाला सुखरूप घरी पोचवण्यात किंवा गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीला सांत्वन देण्यात आगळेच समाधान मिळते.”स्टीव्हन हे अमेरिकेतील एक निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. ते म्हणतात: “एक पोलिस अधिकारी या नात्याने, तुमच्याजवळ आशेने मदत मागायला येणाऱ्या लोकांना उत्तम प्रकारचे साहाय्य पुरवण्याकरता लागणारी साधने व वेळ असतो. म्हणूनच मी या कामाकडे आकर्षित झालो. मला लोकांना मदत करायची, त्यांच्या खांद्यावरील ओझे कमी करण्याची इच्छा होती. मला वाटते मी निदान काही प्रमाणात तरी लोकांना गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवण्यात हातभार लावला आहे. पाच वर्षांत मी १,००० पेक्षा अधिक व्यक्तींना अटक केली. अर्थात, हरवलेल्या मुलांना मदत करणे, वाट चुकलेल्या अल्झायमर्स रुग्णांना मदत करणे आणि चोरलेली वाहने शोधून काढणे यांसारखी कामे देखील समाधानदायक होती. शिवाय, संशयित गुन्हेगाराचा पिच्छा करून त्याला धरण्यातही निराळाच रोमांच होता.”
बोलिव्हिया येथील रॉबर्टो नावाचे एक अधिकारी म्हणतात, “मला आणीबाणीच्या स्थितीत सापडलेल्यांना मदत करण्याची इच्छा होती. लहानपणी मला पोलिसांचे खूपच अप्रूप वाटायचे कारण ते लोकांना धोकेदायक परिस्थितीतून सोडवतात. पोलिस खात्यात मी आलो तेव्हा सुरवातीला मला शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी कार्यालयांभोवती गस्त घालणाऱ्यांचा प्रमुख म्हणून नेमण्यात आले. जवळजवळ दररोज त्या भागात राजकीय आंदोलने व्हायची. परिस्थितीने हिंसक वळण घेऊ नये म्हणून काळजी घेण्याचे माझे काम होते. पण सहसा मला आढळले की पुढाऱ्यांशी मैत्रीपूर्ण आणि समंजसपणे वागल्यामुळे, दंगली पेटून बऱ्याच लोकांना नाहक दुखापती होण्याचे टळत असे. यामुळे मनाला समाधान वाटायचे.”
पोलिसयंत्रणेच्या सेवा अनेकाविध आहेत. झाडावर अडकलेल्या मांजरीला सोडवण्यापासून अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्यांना सोडवणे आणि बँक लुटणाऱ्यांचा सामना करण्यासारखी बहादुरी त्यांना करावी लागते. पण एक गोष्ट मात्र खरी, की आधुनिक काळातील पोलिसयंत्रणेचा जन्म झाल्यापासूनच या सेवेबद्दल लोकांच्या मनात अनेक आशा आणि आशंका देखील आहेत. हे असे का, याविषयी पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. (g०२ ७/८)
[२, ३ पानांवरील चित्रे]
पृष्ठे २ व ३: चेंगडू, चीन येथे वाहतूक नियंत्रण; दंगलींकरता प्रशिक्षित ग्रीक पोलीस; दक्षिण आफ्रिकेतील पोलिस अधिकारी
[चित्राचे श्रेय]
Linda Enger/Index Stock Photography
[३ पानांवरील चित्र]
जुलै, २००१ मध्ये साल्व्हाडोर, ब्राझील येथील पोलिस संपादरम्यान लुटण्यात आलेले एक दुकान
[चित्राचे श्रेय]
Manu Dias/Agência A Tarde
[४ पानांवरील चित्र]
स्टीव्हन, अमेरिका
[४ पानांवरील चित्र]
रॉबर्टो, बोलिव्हिया