व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भारतीय रेल्वे देशभर पसरलेले विस्तृत जाळे

भारतीय रेल्वे देशभर पसरलेले विस्तृत जाळे

भारतीय रेल्वे देशभर पसरलेले विस्तृत जाळे

भारतातील सावध राहा! लेखकाद्वारे

चार हजार वर्षांहून अधिक वर्षांआधीची गोष्ट. उत्तर भारतात बांधकाम करणारे विटा बनवत होते. परंतु, त्या विटांचा उपयोग भारतीय उपखंडावरील रेल्वेच्या सर्वात विस्तृत जाळ्याच्या निर्माण कार्यात होईल याची तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती.

भारतीय रेल्वे ही एक अतिविशाल यंत्रणा आहे! एक अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतातील ते वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. दररोजच्या सर्वसाधारण प्रवासाव्यतिरिक्‍त भारताच्या रुढीप्रिय संस्कृतीमुळे नातेवाईकांपासून दूर राहणाऱ्‍या कोट्यवधी लोकांना जन्मदिन, मृत्यूदिन, सणवार, विवाह किंवा आजारपण अशा कौटुंबिक प्रसंगांसाठी सारखा प्रवास करावा लागतो.

दररोज सरासरी ८,३५० रेलगाड्या १ कोटी २५ लाखांहून अधिक प्रवाशांना घेऊन सुमारे ८०,००० किलोमीटरचा प्रवास करतात. मालगाड्या १३ लाख टनांपेक्षा अधिक माल वाहून नेतात. हे दररोजचे एकंदरीत अंतर, चंद्रापर्यंतच्या अंतराच्या साडेतीनपट इतके होते!

६,८६७ स्टेशने, ७,५०० इंजिने, २,८०,००० हून अधिक प्रवाशांचे डबे व मालांच्या वाघिण्या आणि एकूण १,०७,९६९ किलोमीटरचा प्रमुख रेलमार्ग तसाच विश्रांतीमार्ग हे सर्व लक्षात घेतल्यावर भारतीय रेल्वेला सुमारे १६ लाख कर्मचारी ठेवण्याची गरज का पडते हे तुमच्या लक्षात येईल; जगातील कोणत्याही कंपनीपेक्षा सर्वाधिक मनुष्यबळ असलेली, खरोखरच अवाढव्य अशी यंत्रणा!

या विस्तृत जाळ्याची सुरवात कशी झाली?

भारतामध्ये लोहमार्गांचे बांधकाम कशामुळे सुरू झाले? हा भलामोठा प्रकल्प केव्हा सुरू झाला? आणि त्या ४,००० वर्षे जुन्या असलेल्या विटांचे काय झाले?—पुढील पेटी पाहा.

एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात, भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या कापसाचे उत्पादन झाले आणि ते निर्यात करण्यासाठी बंदरांवर रस्त्याने आणण्यात आले. ब्रिटिशांच्या कापड कारखान्यांना भारतातून कापसाचा प्रामुख्याने पुरवठा केला जात नव्हता; त्यांच्याकरता अमेरिकेतील आग्नेयकडील राज्यांमधून कापूस येत असे. परंतु, १८४६ साली अमेरिकेतील हे कापसाचे उत्पादन तयार झाले नाही आणि त्यानंतर १८६१ पासून १८६५ पर्यंत चाललेल्या मुलकी युद्धामुळे पर्यायी पुरवठ्याची तातडीने गरज निर्माण झाली. भारत यावर उपाय ठरला. परंतु, इंग्लंडच्या लँकाशायर कारखाने चालू राहण्याकरता वाहतूक जलद असायला हवी होती. ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी (१८४५) आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (१८४९) यांची स्थापना करण्यात आली. भारतीय उपखंडातील प्रमुख व्यापारी असलेल्या इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीसोबत सौदा देखील करण्यात आला. झपाट्याने कामाला सुरवात झाली आणि एप्रिल १६, १८५३ रोजी भारतातील सर्वात पहिल्या रेलगाडीने मुंबईतील बोरी बंदरच्या गोदीतून ठाण्यापर्यंत ३४ किलोमीटर लांबीचा प्रवास केला.

मुंबईपासून कापूस तयार होत असलेल्या ग्रामीण भागात जाण्याकरता पश्‍चिम घाटातून जावे लागत होते—हा डोंगरराशींचा उंचसखल प्रदेश होता. ब्रिटिश अभियांत्रिकांनी आणि कर्मचाऱ्‍यांनी, हजारो—काही वेळा ३०,०००—भारतीय कर्मचाऱ्‍यांसोबत मिळून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याविना परिश्रम केले. जगात पहिल्यांदाच नागमोडी पद्धतीच्या मार्गांचा उपयोग करून त्यांनी केवळ २४ किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बांधून ५५५ मीटरची उंची गाठली. त्यांनी एकूण ३,६५८ मीटर लांबीचे २५ बोगदे खणले. डेक्कन पठार गाठण्यात आल्यावर रेल्वेमार्ग सुरू झाला. सबंध देशभर कार्याची गती वाढली; यामागे फक्‍त व्यापारी हेतू नव्हते तर ब्रिटिशांनी या उपखंडात हितसंबंध वाढवले तसे सैनिकांना आणि कर्मचाऱ्‍यांना एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी लवकर पोहंचवण्याची आवश्‍यकता होती.

एकोणीसाव्या शतकात, पहिल्या वर्गातून रेल प्रवास करण्याची ऐपत असलेल्या मोजक्या लोकांना निदान उष्णता आणि धुळीपासून सुटका मिळत असे. एका खासगी डब्यात एक आरामदायी पलंग, शौचालय, स्नानगृह, सकाळच्या चहापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळी व्यवस्था पाहणारे सेवक, थंड हवा देण्यासाठी बर्फ असलेल्या टबवर ठेवलेला पंखा, न्हावी आणि व्हीलर यांच्या रेल्वे ग्रंथालयातील साहित्य तसेच भारतात जन्मलेला लेखक, रूडयर्ड किपलिंग याच्या सर्वात अलीकडील कादंबऱ्‍या होत्या. १८६० च्या दशकात प्रवास करत असलेल्या लुई रुसले यांनी म्हटले की, “हा अत्यंत लांबचा प्रवास ते न थकता करू शकत होते.”

विस्तृत जाळे आणखीच विस्तारते

१९०० सालापर्यंत, भारतातील लोहमार्ग व्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची होती. वाफेवर, डिझेलवर आणि विद्युतशक्‍तीवर चालणारी इंजिने आणि प्रवासी डबे असलेल्या गाड्या पूर्वी आयात केल्या जात होत्या परंतु आता स्थानिकरित्या तयार केल्या जाऊ लागल्या. काही इंजिने खूपच मोठी होती—जवळजवळ २३० टन वजनाची इंजिने, ६,००० अश्‍वशक्‍ती असलेली विद्युत इंजिने, आणि १२३ टन वजनाचे व ३,१०० अश्‍वशक्‍तीचे एक डिझेल इंजिन. १८६२ साली जगातील सर्वात पहिली दुमजली ट्रेन निर्माण करण्यात आली. भारतात, पश्‍चिम बंगालमधील खरगपूर येथे ८३३ मीटरचा जगातील सर्वात लांब आणि कोलकात्यातील शिल्डा येथे छप्पर असलेले सर्वात लांब म्हणजे प्रत्येकी ३०० मीटर लांबीचे प्लॅटफॉर्म आहेत.

सर्वात पहिल्या रेलगाड्या ब्रॉड गेजवर धावत होत्या. नंतर पैशांची बचत करण्यासाठी मीटर गेज आणि डोंगराळ भागांकरता नॅरो गेजची सुरवात करण्यात आली. १९९२ साली, युनिगेज प्रकल्प हाती घेण्यात आला आणि आतापर्यंत ७,८०० किलोमीटरचा लोहमार्ग नॅरो व मीटर गेजपासून ब्रॉड गेजमध्ये बदलण्यात आला आहे.

मुंबई उपनगरातील रेल्वे, जगातील सर्वात मोठे जाळे असून लाखो प्रवाशांची ने-आण करते; तेथील गाड्या कायम खच्चाखच भरलेल्या असतात. कोलकाता येथील भूमिगत मेट्रोने दररोज १७ लाख प्रवासी प्रवास करू शकतात. चेन्‍नई (पूर्वीचे मद्रास) येथे भारतातील सर्वात पहिला उंचावर बांधलेला लोहमार्ग आहे. कम्प्युटराईझ्ड बुकिंग आणि मल्टीमिडिया माहिती केंद्रे यांची भर अलीकडे पडली आहे. ही व्यवस्था अत्यंत व्यस्त आणि विस्तारत चालली आहे.

“चिमुकल्या झुकझुक गाड्यांमधला” मजेदार प्रवास

उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी ब्रिटिशांना डोंगरांमध्ये जायला आवडत असे. तेथे लवकरात लवकर पोहंचता यावे म्हणून त्यांनी डोंगराळ भागांसाठी “चिमुकल्या झुकझुक गाड्या” बनवल्या. त्यामुळे, घोड्यावर जाण्यापेक्षा किंवा पालखीत बसून जाण्यापेक्षा हा प्रवास लवकर करता येऊ लागला. उदाहरणार्थ, दक्षिण भारतातील “चिमुकली झुकझुक गाडी” प्रवाशांना निलगिरी डोंगरांमध्ये किंवा निळ्या पर्वतांमध्ये घेऊन जाते. ती ताशी १०.४ किलोमीटर वेगाने जाते आणि ती भारतातली सर्वात हळू जाणारी रेलगाडी असावी. पण कन्‍नूरला १,७१२ मीटर उंचीवर चहा आणि कॉफीच्या मळ्यांमधून केला जाणारा प्रवास अत्यंत आल्हाददायक आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेला हा लोहमार्ग १२ मीटरला १ मीटर अशाप्रकारे वर चढतो आणि त्यात २०८ वळणे आणि १३ बोगदे आहेत. यासाठी ॲप्ट दंतचक्र पट्टी पद्धतीचा उपयोग करण्यात आला. दंतपट्ट्या शिडीसारख्या ठरतात ज्यांवर इंजिन चढते आणि रेलगाडी मागून पुढे ढकलली जाते. दंतपट्टी आणि संलग्नता तंत्राचा उपयोग करणारा हा जगातला सर्वात जुना आणि सर्वात कठीण चढण असलेला लोहमार्ग आहे.

दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या रूळांमधील अंतर केवळ दोन फुटांचे आहे आणि हा लोहमार्ग २२.५ मीटरला १ मीटर या प्रमाणात घूमपर्यंत चढतो; घूम हे समुद्र सपाटीपेक्षा ७,४०८ फुटांवरील भारतातले सर्वात उंच स्टेशन आहे. या लोहमार्गात तीन वेटोळे आणि सहा व्युत्क्रमी नागमोडी वळणे आहेत. सर्वात प्रसिद्ध असलेल्या बटासिया लूपवर प्रवाशांना गाडीतून उड्या मारून गवताळ उतारा चढून वळणावरून फिरून आलेल्या गाडीत पुन्हा चढायचा मोह अनावर होतो. प्रवासाच्या शेवटी जगातील तिसऱ्‍या क्रमांकाच्या शिखराचे अर्थात काचंनजंगाचे दर्शन देखील होते. १९९९ साली या रेल्वेला युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज हे पदक देऊन त्याचे भविष्य अधिक सुरक्षित केले.

ब्रिटिशांच्या राज्यात, उन्हाळ्यातले थंड हवेचे ठिकाण असलेल्या भारतातील ७,१०० फूट उंचीच्या शिमल्यापर्यंत पोहंचायला केवळ ९५ किलोमीटर अंतरात १०२ बोगदे आणि ८६९ पूल पार करावे लागतात व ९१९ वळसे घ्यावे लागतात! मोठ्या खिडक्यांमधून आणि फायबरग्लासच्या पारदर्शक छप्परातून सुंदर देखावा दिसतो. या “चिमुकल्या झुकझुक गाड्यांमधला” प्रवास खरोखर आनंददायक असतो. भाडे फार कमी ठेवल्यामुळे या डोंगरातील रेल्वेंचे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाय काढून या मजेदार गाड्या तारल्या जातील अशी रेल्वे चाहते आशा करतात.

लांबचा प्रवास

भारतात रेल्वे सुरू झाल्यापासून “एका युगाची समाप्ती झाली व दुसरे युग सुरू झाले” आणि “भारताला एकत्र आणणे इतर कोणत्याही व्यवस्थेमुळे शक्य झाले नाही ते रेल्वेने शक्य केले” असे म्हटले जाते. किती खरे! हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जम्मूत ट्रेन धरली तर थेट भारताच्या दक्षिण टोकाला म्हणजे कन्याकुमारीला पोहंचता येते जेथे अरेबियन समुद्र, भारतीय महासागर आणि बंगालचा महासागर यांचा संगम होतो. हा १२ राज्यांतून ३,७५१ किलोमीटर्सचा व ६६ तासांचा प्रवास आहे. ६०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतही तुम्ही स्लीपर बर्थेने प्रवास करू शकता. प्रवासादरम्यान विविध संस्कृतीच्या मैत्रीपूर्ण, बोलक्या लोकांशी तुमचा परिचय होईल आणि तुम्हाला अनेक लक्षवेधक ठिकाणांचे दर्शन घडेल. आरक्षण करायला विसरू नका—तुमचा प्रवास सुखाचा होवो! (g०२ ७/८)

[१४ पानांवरील चौकट]

त्या प्राचीन विटा

ब्रिटिशांच्या राज्यात (१७५७-१९४७), भारतीय उपखंडातील रेल्वे, दूरच्या ठिकाणांहून सैनिकांची ने-आण करण्यासाठी सर्वात उत्तम होती. भारतातली पहिली रेलगाडी सुरू झाल्यावर तीन वर्षांच्या आत, अभियांत्रिकांनी सध्या पाकिस्तानात असलेल्या कराची ते लाहोर दरम्यान लोहमार्ग बांधायला सुरवात केली. रूळे स्थिर राखण्यासाठी खडी उपलब्ध नव्हती, पण हडप्पा गावाजवळ कर्मचाऱ्‍यांना भट्टीत भाजलेल्या विटा सापडल्या. जॉन आणि विल्यम ब्रुटन या स्कॉटिश अभियांत्रिकांना हा योग्य आणि स्वस्त पर्याय वाटला. या मोठाल्या विटा खणून काढताना कामगारांना मातीचे पुतळे आणि काही शिक्के मिळाले ज्यांवर अज्ञात भाषेत कोरले गेले होते; परंतु यामुळे लोहमार्ग बांधकामाच्या महत्त्वपूर्ण कामात अडथळा आला नाही. हडप्पा येथील विटांनी एकशे साठ किलोमीटरचा लोहमार्ग बांधण्यात आला. पासष्ठ वर्षांनंतर वस्तूपुरातनशास्त्रज्ञांनी हडप्पा येथे पद्धतशीर उत्खनन केल्यावर सिंधू खोऱ्‍यातील संस्कृतीचे चकित करणारे अवशेष त्यांना मिळाले; ही ४,००० हून अधिक वर्षांआधीची संस्कृती, प्राचीन मेसोपोटेमियाच्या काळातली होती!

[१६ पानांवरील चौकट/चित्र]

कोंकण रेल्वे—अत्याधुनिक चमत्कार

कोंकण हा भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर अरबी समुद्र आणि सह्‍याद्री पर्वतराजींच्या दरम्यान सुमारे ७५ किलोमीटर रुंदीचा प्रदेश आहे. भारताचे व्यापार केंद्र, मुंबई याच्या दक्षिणेपासून मंगळूरच्या मुख्य बंदरापर्यंत विस्तारलेले कोंकण व्यापारिकदृष्ट्या अत्यंत मोक्याचे आहे. अनेक शतकांपासून किनारपट्टीवरील बंदरे, भारताअंतर्गत आणि परदेशांसोबतचा येथून होणारा व्यापार हाताळत होते. परंतु, समुद्रप्रवास धोक्याचा होता—विशेषतः पावसाळ्यात जेव्हा नद्या देखील पार करता येऊ शकत नव्हत्या—आणि रस्ते व रेलमार्ग नैसर्गिक अडखळणे टाळण्यासाठी अगदी वळसे घेऊन जात असत. किनाऱ्‍यालगतच्या एका भागातून दुसऱ्‍या भागातील मुख्य बाजारांमध्ये माल वाहून नेण्यासाठी खासकरून टिकत नसलेला माल वाहण्यासाठी तेथील लोकांना जमिनीवर थेट पोहंचणारा मार्ग हवा होता. यावर उपाय?

कोंकण रेल्वे हा विसाव्या शतकात हाती घेतलेला या उपखंडातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प होता. यात काय गोवलेले होते? ७६० किलोमीटर लांबीच्या लोहमार्गासाठी २५ मीटर भराव आणि २८ मीटर खोदकाम करावे लागले. २,००० हून अधिक पूल बांधावे लागले ज्यामध्ये पन्वल नदीवरील २१० फूट उंचीचा, आशियातील सर्वात उंच पूल आहे जो १,६४० फूट रुंदीच्या दरीवरून आणि २,०६५ किलोमीटर लांबीच्या शरावती नदीवरून जातो. लोहमार्ग होता होईल तितक्या सरळ रेषेत करण्यासाठी पर्वतरांगांमधून ९२ बोगदे खणावे लागले; यांतील ६ बोगदे ३.२ किलोमीटरहून अधिक लांबीचे आहेत. आतापर्यंत भारतातला सर्वात लांब बोगदा यांपैकीच एक आहे—६.५ किलोमीटर लांबीचा कर्बुदे बोगदा.

यात पुष्कळ अडथळेही निर्माण झाले—मुसळधार पाऊस, भूघसरण तसेच कठीण खडकातून आणि सर्वात मुश्‍कलीचे म्हणजे टुथपेस्टसारख्या मऊ मातीतून बोगदे खणणे. या सर्व नैसर्गिक अडथळ्यांना अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्राच्या साहाय्याने मात करायची होती. बोगद्यांमधील केंद्रोत्सारी व जेट-पंखांनी संवातन तसेच इतर सुरक्षा उपाय हीच मुळात मोठ्या मुश्‍कीलीची कामे होती. ४२,००० विविध जमीनदारांकडून जमीनी खरेदी कराव्या लागल्या; त्याकरता प्रचंड प्रमाणात कायदेशीर कामे पार पाडावी लागली.

परंतु, जानेवारी २६, १९९८ रोजी, केवळ सात वर्षे बांधकाम करून झाल्यावर—एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा हा विक्रम ठरला—कोंकण रेल्वेची पहिली रेलगाडी धावू लागली. मुंबई ते मंगळूरचा प्रवास पूर्वीच्या वळसा घेऊन जाणाऱ्‍या मार्गापेक्षा १,१२७ किलोमीटरने कमी होता आणि प्रवासाचा वेळही २६ तासांनी कमी झाला. कोंकण रेल्वेने प्रवाशांना विलोभनीय देखाव्यांचे दर्शन घडवले, पर्यटकांसाठी नवनवीन ठिकाणे उपलब्ध केली आणि लाखो लोकांच्या पैशांची बचत केली.

[नकाशा]

मुंबई

मंगळूर

[चित्र]

पन्वल नदीचा पूल, आशियातील सर्वात उंच पूल

[चित्राचे श्रेय]

Dipankar Banerjee/STSimages.com

[१६ पानांवरील चौकट/चित्र]

फेरी क्वीन

फेरी क्वीन हे जगातले सर्वात जुने काम करणारे वाफेवरचे इंजिन आहे. १९५५ साली, इंग्लंड येथील लीड्‌स येथे किट्‌सन, थॉम्सन ॲण्ड ह्‍युइट्‌सन या अभियांत्रिक कंपनीने तयार केलेले हे इंजिन कोलकात्याजवळील हावडा स्टेशनपासून बंगालमधील रानीगंजपर्यंत मालगाड्या ओढून नेत असे. १९०९ साली ते बंद पडल्यावर रेल्वे चाहत्यांसाठी आकर्षण म्हणून ते नवी दिल्ली येथील नॅशनल रेल म्यूझियममध्ये ठेवण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे साजरी करतेवेळी या विश्‍वासू इंजिनला पुन्हा बाहेर आणण्यात आले. १९९७ सालापासून फेरी क्वीन एक्सप्रेस पर्यटकांना घेऊन दिल्ली ते राजस्थानमधील अल्वरपर्यंतचा १४३ किलोमीटरचा प्रवास करत आहे.

[१७ पानांवरील चौकट/चित्रे]

आराम आणि वेग—भारताकडे दोन्ही आहेत

आराम भारताचा इतिहास प्राचीन आणि बहुतेककरून ऐषारामाचा राहिला आहे. त्या इतिहासाची झलक देण्यासाठी ऐषारामाचे परंतु महाग असलेले खास रेल्वे दौरे आहेत. वाफेच्या इंजिनने ओढणारी पॅलेस ऑन व्हील्स १९८२ सालापासून सुरू करण्यात आली. राजा-महाराजांनी व व्हाईसरॉय यांनी वापरलेल्या गाड्या पुन्हा सुशोभित करून राजेशाही वारशाचा भारदस्तपणा टिकवण्यात आला. बाहेरून पांढरा मोतिया रंग, बर्मा टीकचे तावदानी काम, काचेची झुंबरे आणि गडद रंगातील भरजरी रेशमी कापडांतून भव्यता झळकते. राजवाड्यासारख्या प्रशस्त शयनकक्ष, डायनिंग रूम्स, लाऊन्ज, लायब्ररी, उत्कृष्ठ दर्जाचे आंतरराष्ट्रीय भोजन आणि खास पोषाखातील सेवक प्रवाशांची सगळी हौस पूर्ण करतात.

सन १९९५ मध्ये, रूलमार्ग ब्रॉड गेजमध्ये बदलण्यात आल्यामुळे, नवीन पॅलेस बांधण्यात आले आणि जुने डबे काढून टाकण्यात आले. गुजरात आणि राजस्थानच्या पश्‍चिम राज्यांमधील आधीच्या मीटर गेजवरती द रॉयल ओरियंट ही नवीन आरामगाडी सध्या चालू आहे. या गाड्या सहसा रात्रीच्या वेळी धावतात त्यामुळे प्रवाशांना दिवसा प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येतात. प्राचीन किल्ले, दुर्ग आणि मंदिरे पाहत प्रवासी थरच्या वाळवंटातून पार होतात. येथे उंटावर बसून वाळुच्या टेकड्यांवरून फेरफटका मारता येतो आणि हत्तीवरून प्रसिद्ध अंबर किल्ल्यावर जाता येते. जवळपासच ऐतिहासिकरित्या सुसंपन्‍न असलेले आणि रत्न व हस्तकलेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले पिंक सिटी अर्थात जयपूर शहर आहे. सहलीत पक्षी अभयारण्ये, एक वाघ संग्रह, आणि जंगली आशियाई सिंहाचे वास्तव्य असलेले एकमेव ठिकाण देखील समाविष्ट आहेत. उदयपूरचा तलाव राजवाडा तसेच ताज महल मात्र पाहायला विसरू नका! या मोहवून टाकणाऱ्‍या रेल्वेच्या साहसी पर्यटनात या तसेच इतर अनेक गोष्टी विलक्षण आनंद देणाऱ्‍या आहेत.

वेग भारतीय रेलगाड्या फ्रान्स आणि जपान येथील अतिवेगवान रेलगाड्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. तरीही, भारतीय रेल्वेच्या एका शहरातून दुसऱ्‍या शहरात जाणाऱ्‍या सुपरफास्ट ट्रेनच्या १०६ जोड्यांनी लांब पल्ल्याचा जलद व आरामदायी प्रवास शक्य आहे. ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणाऱ्‍या राजधानी आणि शताब्दी रेलगाड्या आराम आणि सुखसोयींच्या बाबतीत हवाई प्रवासाच्या बरोबरीच्या आहेत. वातानुकुलित डब्यांमध्ये आराम खुर्च्या किंवा आरामदायी शयन बर्थ आहेत. या सुखसोयींयुक्‍त रेलगाड्यांच्या तिकिट दरातच भोजन, स्नॅक्स, चादरी-ब्लँकेट, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत सामील आहे.

[नकाशा]

जयपूर

उदयपूर

[चित्रे]

हवा महल, जयपूर

ताज महल, आग्रा

द रॉयल ओरियंट

“पॅलेस ऑन व्हील्सचे” आतील दृश्‍य

[चित्राचे श्रेय]

Hira Punjabi/STSimages.com

[१३ पानांवरील नकाशा/चित्रे]

नवी दिल्ली

[चित्रे]

काही मुख्य लोहमार्ग

वाफेवर चालणारी, जावर

वाफेवर चालणारी, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (डीएचआर)

विद्युतशक्‍तीवर चालणारी, आग्रा

विद्युतशक्‍तीवर चालणारी, मुंबई

डिझेलवर चालणारी, हैदराबाद

डिझेलवर चालणारी, शिमला

[चित्राचे श्रेय]

नकाशा: © www.MapsofIndia.com

[१५ पानांवरील नकाशा/चित्र]

मुंबई

[चित्र]

चर्चगेट स्टेशन, मुंबई

[चित्राचे श्रेय]

Sandeep Ruparel/STSimages.com

[१५ पानांवरील नकाशा/चित्र]

निलगिरी पर्वत

[चित्र]

निलगिरी “झुकझुक गाडीला” चढणावर ढकलणारे वाफेचे इंजिन

[१८ पानांवरील नकाशा/चित्रे]

दार्जिलिंग

[चित्रे]

बटासिया लूप, जेथे लोहमार्ग स्वतःलाच ओलांडतो

बटासिया लूपवरून कांचनजंगा पर्वताचे विलोभनीय दृश्‍य

[१४ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृष्ठे २, १३, १५ मध्यभागी, १६-१८ वरील रेलगाड्या: Reproduced by permission of Richard Wallace