व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रूममेटबरोबर मैत्री कायम कशी ठेवावी?

रूममेटबरोबर मैत्री कायम कशी ठेवावी?

तरुण लोक विचारतात . . .

रूममेटबरोबर मैत्री कायम कशी ठेवावी?

“मला स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलेलं आवडायचं. पण माझ्या रूममेट्‌सना, खरकटी भांडी तशीच ठेवायला किंवा स्टोव्हवर भांडी तशीच ठेवायला काहीच वाटायचं नाही. त्या अगदी बिनधास्त राहायच्या.”—लिन. *

रूममेट्‌स.“एकतर सख्खे मित्र असू शकतात नाही तर कट्टर शत्रू,” असे लेखक केवीन स्कोलरी म्हणतात. तुम्हाला स्वतःला कदाचित असे वाटणार नाही, पण दुसऱ्‍या व्यक्‍तीबरोबर राहणे खरोखरच आव्हानात्मक आहे. * विद्यापीठांतील विद्यार्थ्यांमध्ये, रूममेट्‌सचे आपापसांत उडणारे खटके ही इतकी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे, की पुष्कळ कॉलेज, रूममेट्‌सबरोबर शांतीने कसे राहायचे यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून विस्तृत उपक्रम राबवत आहेत तसेच मध्यस्थी कार्यक्रमांची व सेमिनरींची योजना करत आहेत.

पूर्ण वेळेच्या सेवेसाठी घर सोडलेल्या तरुण ख्रिश्‍चनांना देखील, दुसऱ्‍याबरोबर खोली करून राहताना समस्यांना तोंड द्यावे लागते. पण आनंदाची गोष्ट अशी आहे, की बायबल तत्त्वांचे पालन व “व्यवहार बुद्धीचा” वापर केल्यास बहुतेकदा आपण समस्या सोडवू शकतो.—नीतिसूत्रे २:७, NW.

एकमेकांना जाणून घ्या

नव्या ठिकाणी आल्यानंतर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर, तुम्हाला कदाचित घरची आठवण येऊ लागेल. (गणना ११:४, ५) पण तुम्ही घरची आठवण सतत काढत राहिलात तर तुम्हाला या नव्या ठिकाणी जुळवून घ्यायला कठीण जाईल. उपदेशक ७:१० हा सल्ला देते: “सांप्रतच्यापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.” होय, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणेच सर्वात उत्तम ठरेल.

तुमच्या रूममेटबरोबर ओळख करून तुम्ही सुरवात करू शकता. हे खरे आहे की रूममेट्‌स एकमेकांचे अगदी जिगरी दोस्त असलेच पाहिजे असे नाही. तुमचा/तुमची रूममेट कदाचित, तुम्ही सहजपणे जिच्याकडे आकर्षित व्हाल अशी व्यक्‍ती नसेल. तरीपण, तुम्हाला या व्यक्‍तीबरोबर राहावे लागत असल्यामुळे, तिच्याबरोबर शक्य तितका मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणेच शहाणपणाचे नाही का?

फिलिप्पैकर २:४ आपल्याला, “आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा,” असा सल्ला देते. उलटतपासणी करीत असल्याप्रमाणे नव्हे तर प्रेमाने तुमच्या रूममेटच्या कुटुंबाच्या पार्श्‍वभूमीबद्दल, त्याच्या/तिच्या आवडीनिवडींबद्दल, ध्येयांबद्दल आणि पसंतीबद्दल विचारता येईल का? स्वतःबद्दलचीही माहिती द्या. एकमेकांबद्दल तुम्ही जितके अधिक जाणाल तितके अधिक तुम्ही एकमेकांना समजू शकाल.

अधूनमधून एकत्र मिळून काहीतरी करण्याचा बेत करा. ली म्हणते: “कधीकधी मी आणि माझी रूममेट बाहेर जेवायला जातो किंवा एकत्र कला प्रदर्शनांना जातो.” ख्रिस्ती रूममेट्‌सनी, मंडळीच्या सभांची तयारी किंवा क्षेत्र सेवा यांसारखी आध्यात्मिक कार्ये एकत्र मिळून करणे हा, त्यांच्यातील मैत्रीचे बंधन मजबूत करण्यासाठी सर्वात प्रभावशाली मार्ग आहे.

डेव्हिड म्हणतो: “माझ्या रूममेटचं बायबलवर आधारित जाहीर भाषण होतं तेव्हा मीही त्याच्याबरोबर त्याच्या मंडळीत गेलो, यामुळे त्याला उत्तेजन मिळालं.” खेळ, संगीत याबाबतीत या दोघांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्या तरी, आध्यात्मिक गोष्टींबद्दल दोघांनाही आवड असल्यामुळे त्यांच्यामध्ये जणू काय एक नाते निर्माण झाले आहे. डेव्हिड म्हणतो: “आम्ही आध्यात्मिक विषयांवर पुष्कळ बोलतो. अगदी तासन्‌तास जरी बोलायला सांगितले तरी आम्ही बोलत बसू.”

पण एक सावधगिरीचा सल्ला: तुमच्या रूममेटच्या इतक्या जवळ जाऊ नका की तुम्हाला इतर कोणीच आवडेनासे होईल. तुमच्या रूममेटला कोणी आमंत्रण दिले असेल तर त्याच्या/तिच्याबरोबर तुम्हालाही बोलवलं पाहिजे असे जर त्यांना वाटत असेल तर मग नंतर त्याला/तिला हे एकप्रकारच्या बंधनासारखेच वाटू लागेल. मैत्रीच्या बाबतीत आपण आपले मन “विशाल” केले पाहिजे असा बायबल आपल्याला सल्ला देते.—२ करिंथकर ६:१३.

सुवर्ण नियमाचे पालन करा

तुम्ही एकमेकांना जसजसे ओळखू लागता तसतसे तुम्हाला एकमेकांच्या सवयींमधील, आवडीनिवडींमधील व विचारांमधील फरक दिसून येईल. मार्क नावाचा युवक ताकीद देतो: “तुम्ही अपरिपूर्णतांची अपेक्षा केली पाहिजे.” ताठरपणा किंवा आत्मकेंद्रितपणा यांमुळे ताणतणाव वाढतात. तसेच, आपल्याशी जुळवून घेण्यासाठी तुमच्या रूममेटने बदल केले पाहिजेत अशी जर तुम्ही अपेक्षा कराल तर तुमच्यामधील ताण वाढतील.

रूममेट या नात्याने फर्नांडोला याची जाणीव झाली आहे; तो म्हणतो: “तुम्ही निःस्वार्थी असले पाहिजे, आत्मकेंद्रित असू नये.” त्याचे बोलणे, जगप्रसिद्ध सुवर्ण नियमाशी सुसंगत आहे: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) उदाहरणार्थ, फर्नांडोने पाहिले, की त्याचे आणि त्याच्या रूममेटचे खोलीच्या तापमानावरून सारखे बिनसायचे; त्याला खोली उबदार असलेली आवडायची आणि त्याच्या रूममेटला थंड वातावरणात झोपायला आवडायचे. उपाय? फर्नांडो म्हणतो: “मी स्वतःसाठी एक ब्लँकेट आणली.” होय, मार्क म्हणतो त्याप्रमाणे “जुळवून घ्यायला तयार असा. तुम्हाला तुमच्या सर्वच सवयी बदलण्याची गरज नाही. फक्‍त एक किंवा दोन सवयी तुम्हाला बदलाव्या लागतील.”

सुवर्ण नियम लागू करण्यासाठी आणखी एक क्षेत्र: तुमच्या रूममेटच्या आवडीनिवडींविषयी सहनशील होण्यास शिका. तुम्हाला त्याच्या पसंतीचे संगीत आवडत नाही का? कदाचित त्यालाही तुमच्या आवडीच्या संगीताबद्दल असेच वाटत असेल. तेव्हा, जर ते संगीत नैतिकरीत्या खालावलेले नसेल तर, तुम्ही सहनशीलता दाखवू शकता. फर्नांडो म्हणतो: “संगीताच्या बाबतीत माझ्या रूममेटची पसंत थोडी वेगळी असती तर बरं झालं असतं. पण अलीकडे मला त्याची सवय होऊ लागली आहे.” दुसरीकडे पाहता, आपला रूममेट समजा अभ्यास करत असेल तर त्याला त्रास होऊ नये म्हणून आपण हेडफोन लावून संगीताचा आनंद लुटू शकतो.

सुवर्ण नियमाचे पालन केल्यामुळे, वस्तूंवरून होणारे नको ते वाद टाळता येऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला फ्रीजमधील खाद्यपदार्थ काढून खायची सवय असेल आणि संपल्यावर क्वचितच तुम्ही पुन्हा खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर साहजिकच तुमच्या रूममेटला तुमचा राग येऊ शकतो. पण, तुम्ही आणलेला एखादा खाद्यपदार्थ रूममेट घेत असताना त्याच्याकडे/तिच्याकडे रागाने पाहिल्याने देखील तुमच्यामध्ये प्रेमळ नातेसंबंध राहणार नाही. बायबल आपल्याला “परोपकारी व दानशूर” असण्याचे उत्तेजन देते. (१ तीमथ्य ६:१८) तुमचा गैरफायदा घेतला जात आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मौनव्रत बाळगू नका. शांतपणे व प्रेमळपणे तुमची तक्रार मांडा.

एकमेकांच्या वस्तूंचा आदर करा. जी वस्तू आपल्या मालकीची नाही ती न विचारता घेणे योग्य नाही. (नीतिसूत्रे ११:२) तुमच्या रूममेटलाही प्रायव्हसीची किंवा काही वेळ एकांतात घालवण्याची गरज आहे, हे समजून घ्या. लहानसहान गोष्टींतही नम्रता दाखवा; जसे की तिच्या किंवा त्याच्या खोलीत जाण्याआधी दार वाजवणे, वगैरे. तुम्ही आदर दाखवता तेव्हा तुमचा/तुमची रूममेट देखील तुमच्याशी तसेच वागेल. डेव्हिड म्हणतो: “आम्हा दोघांनाही रूममध्ये अभ्यास करायला कधीच कठीण जात नाही. एकमेकांचा आदर करून आम्ही त्या वेळी शांत बसतो. पण कधीकधी माझ्या रूममेटला रूममध्ये दुसरे काही करायचे असते तेव्हा मी लायब्ररीत अभ्यासाला जातो.”

सुवर्ण नियम लागू करण्यामध्ये, जबाबदारीने घराचे भाडे वेळेवर देणे किंवा घरातील कामे करायची तुमची पाळी येते तेव्हा ती न चुकता करणे, समाविष्ट होते.

वाद मिटवणे

बायबल काळात, पौल आणि बर्णबा नावाच्या दोन नामांकित ख्रिस्ती पुरूषांत “तीव्र मतभेद” झाला. (प्रेषितांची कृत्ये १५:३९) असेच तुमच्या दोघांमध्ये झाले तर? कदाचित तुमचे पटत नसेल किंवा चीड आणणाऱ्‍या एखाद्या सवयीमुळे तुमच्या धीराची परीक्षा घेतली जात असेल. एखाद वेळी तुमच्यामध्ये मतभेद झाले असतील किंवा जोरदार वादविवाद झाला असेल तर याचा अर्थ तुम्ही लगेच एकत्र राहणे सोडून द्यायचे का? नाही. पौल आणि बर्णबाने झालेले मतभेद मिटवले. खोली सोडून जाण्याचा निर्णय घेण्याआधी तुम्हीही तुमच्यातील मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्हाला मदत करतील असे काही बायबलमधील तत्त्वे आहेत.

● “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.”—फिलिप्पैकर २:३.

● “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.”—इफिसकर ४:३१, ३२.

● “ह्‍यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.”—मत्तय ५:२३, २४; इफिसकर ४:२६.

लाभ

रूममेटबरोबर राहाव्या लागणाऱ्‍या पुष्कळ तरुण ख्रिश्‍चनांना सुज्ञ राजा शलमोन याच्या या शब्दांची सत्यता पटली आहे: “एकट्यापेक्षा दोघे बरे.” (उपदेशक ४:९) रूममेटबरोबर राहिल्याने पुष्कळांना फायदा झाल्याचा अनुभव आला आहे. मार्क म्हणतो: “लोकांबरोबर आणखी चांगल्याप्रकारे कसे वागायचे, स्वतःला कसे जुळवून घ्यायचे हे मी शिकलो आहे.” रने म्हणते: “तुम्हाला स्वतःबद्दल पुष्कळ काही शिकता येतं. शिवाय, रूममेटच्या चांगल्या वर्तनाचा तुमच्यावर चांगला प्रभाव पडू शकतो.” लिन कबूल करते: “मी रूममेटबरोबर राहायला आले तेव्हा खूप बिघडलेली होते. पण आता मी, खूपच कडक व्हायचे नाही, हे शिकले आहे. दुसरी व्यक्‍ती, वेगळ्या पद्धतीने काहीतरी करते याचा अर्थ ती चूक करते असा होत नाही, हे मला आता समजू लागले आहे.”

रूममेटबरोबर मिळून मिसळून वागण्यासाठी परिश्रम आणि त्याग यांची आवश्‍यकता असते. पण बायबल तत्त्वे लागू करण्यास तुम्ही झटलात तर फक्‍त रूममेटबरोबर शांतीपूर्ण वातावरणातच राहणार नाही तर रूममेट असल्याचा आनंदही तुम्हाला होईल. (g०२ ६/२२)

[तळटीपा]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ “रूममेटबरोबर राहणं इतकं कठीण का आहे?” हा आमच्या जुलै-सप्टेंबर २००२ अंकामधील लेख पाहा.

[२६ पानांवरील चित्र]

दुसऱ्‍याचे खाद्यपदार्थ न विचारता खाल्ल्याने ताण वाढू शकतो

[२७ पानांवरील चित्र]

एकमेकांना समजून घ्या