व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या कमतरतांकडे देव दुर्लक्ष करील का?

आपल्या कमतरतांकडे देव दुर्लक्ष करील का?

बायबलचा दृष्टिकोन

आपल्या कमतरतांकडे देव दुर्लक्ष करील का?

‘मी खरं तर दुष्ट नाही! वाईट सवयी सोडण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्यात खूपच कमतरता आहेत!’

हे विचार, तुमच्या किंवा तुम्ही ज्यांना ओळखता त्यांच्या भावनांचे पडसाद आहेत असे तुम्हाला वाटते का? पुष्कळजण असा निष्कर्ष काढतात, की खोलवर रुजलेल्या नैतिक कमतरतांवर मात करणे जवळजवळ असंभव आहे. काही लोक, मद्यपान, तंबाखू किंवा ड्रग्जवर अवलंबून राहतात. इतरांच्या जीवनावर लोभाचे वर्चस्व आहे. आणि असेही पुष्कळ लोक आहेत जे लैंगिक दुर्वर्तनाच्या आहारी गेले आहेत; ते म्हणतात, की त्यांना सेक्सचे जणू काय व्यसन जडले आहे ज्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कोणतीच आशा दिसत नाही.

मत्तय २६:४१ मध्ये सूचित केल्यानुसार, येशूने मानवांच्या कमतरतेची त्याला जाणीव असल्याचे अतिशय दयाळुपणे व्यक्‍त केले आहे. * खरे तर, संपूर्ण बायबल अहवाल स्पष्टपणे सिद्ध करतो की यहोवा देव आणि येशू हे दोघेही मानवांप्रती दयाळु आहेत. (स्तोत्र १०३:८, ९) पण मग देवाने आपल्या सर्व दोषांकडे दुर्लक्ष करावे अशी आपण अपेक्षा करावी का?

मोशे आणि दावीद

मोशेच्या अहवालावर विचार करा. तो “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र” म्हणून प्रसिद्ध होता आणि या उत्तम गुणानुरूप वागण्याचा त्याने कसोशीने प्रयत्न केला. (गणना १२:३) इस्राएली लोक रानांतून प्रवास करत असताना अनेक वेळा असमंजसपणे वागले आणि देव व त्याचा प्रतिनिधी यांच्याप्रती त्यांनी अनादर दाखवला. या सर्व वेळी मोशेने नम्र होऊन देवाकडील मार्गदर्शन स्वीकारले.—गणना १६:१२-१४, २८-३०.

परंतु, इस्राएली लोकांचा लांबचा, शिणवणारा प्रवास जवळजवळ संपत आला होता, तेव्हा मोशेला एकदा राग अनावर झाला, आणि त्याने देवाकडील मार्गदर्शनाचा अव्हेर केला. अर्थात देवाने त्याला क्षमा केली, तरीपण त्याच्या कृत्याकडे त्याने दुर्लक्ष केले का? नाही. त्याने मोशेला सांगितले: “[तू] माझ्यावर विश्‍वास ठेविला नाही . . . म्हणून ह्‍या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास ह्‍यांना नेणे [तुझ्या] हातून घडणार नाही.” मोशेला वाग्दत्त देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली नाही. वाग्दत्त देशात प्रवेश करण्याच्या सुवर्ण संधीसाठी ४० वर्ष झटल्यानंतर, एका गंभीर चुकीमुळे त्याची ही संधी हुकली.—गणना २०:७-१२.

आणखी एक ईश्‍वरी मनुष्य होता, ज्याचे नाव होते राजा दावीद; त्याच्यातसुद्धा उणीव होती. एके प्रसंगी आपल्या वासनांवर ताबा न ठेवल्यामुळे त्याने दुसऱ्‍या एका पुरुषाच्या पत्नीबरोबर लैंगिक संबंध ठेवले. आणि आपले पाप झाकून टाकण्यासाठी त्याने तिच्या पतीला ठार मारले. (२ शमुवेल ११:२-२७) नंतर मात्र त्याला आपल्या गुन्ह्यांचा खूप पस्तावा झाला आणि देवाने त्याला क्षमा केली. पण दाविदाने एका कुटुंबाला उद्‌ध्वस्त केले होते आणि त्यामुळे आलेल्या विपत्तीजनक संकटांपासून यहोवाने त्याचे संरक्षण केले नाही. दाविदाला झालेला मुलगा खूप आजारी पडला आणि त्याने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी यहोवाकडे खूप विनवणी केली पण यहोवाने हस्तक्षेप केला नाही. त्याचा मुलगा मेला आणि त्यानंतर दाविदाच्या घराण्यावर एका पाठोपाठ एक अशी संकटे कोसळू लागली. (२ शमुवेल १२:१३-१८; १८:३३) नैतिक कमतरतेला बळी पडून दाविदाला खूप मोठी किंमत मोजावी लागली.

ही उदाहरणे, देव, मानवांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरत असल्याचे दाखवतात. जे त्याची सेवा करू इच्छितात त्यांनी आपल्या आध्यात्मिकतेतील उणिवा भरून काढून उत्तम ख्रिस्ती झाले पाहिजे. पहिल्या शतकात अनेकांनी असे केले.

पापापासून मुक्‍त होण्यासाठी दिलेला लढा

प्रेषित पौलाला ख्रिस्ती जीवनशैलीसाठी आदर्श असे उचितपणे म्हटले जाते. परंतु त्याला त्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी वारंवार लढा द्यावा लागत होता हे तुम्हाला माहीत आहे का? रोमकर ७:१८-२५ या झगड्याचे किंवा २३ व्या वचनानुसार या ‘लढ्याचे’ खुलासेवार वर्णन देते. पौलाचा हा लढा कधी मंदावला नाही कारण पाप कधी हार मानत नाही.—१ करिंथकर ९:२६, २७.

प्राचीन करिंथच्या ख्रिस्ती मंडळीतील काही सदस्यांना पूर्वी, चुका करणे जणू अंगवळणीच पडले होते. बायबल म्हणते की ते ‘जारकर्मी, व्यभिचारी, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी,’ होते. पण ते पुढे असेही म्हणते, की त्यांना ‘स्वच्छ धुण्यात आले.’ (१ करिंथकर ६:९-११) ते कसे? अचूक ज्ञान, ख्रिस्ती सहवास आणि देवाचा पवित्र आत्मा यांद्वारे त्यांना मजबूत करून दुष्ट प्रथा थांबवण्यास मदत करण्यात आली. कालांतराने देवाने त्यांना ख्रिस्ताच्या नावात धार्मिक ठरवले. होय, देवाने त्यांना क्षमा करून एक शुद्ध विवेक दिला.—प्रेषितांची कृत्ये २:३८; ३:१९.

पौल आणि करिंथमधील ख्रिश्‍चनांनी आपल्या पापी प्रवृत्ती कमी केल्या नाहीत. तर देवाच्या मदतीने ते त्यांच्याविरुद्ध लढले आणि त्यांच्यावर विजय मिळवला. आजूबाजूचा परिसर आणि अपरिपूर्ण प्रवृत्ती यांतही हे पहिल्या शतकातील उपासक नैतिकरीत्या वाखाणण्याजोगे ठरले. आपल्याबद्दल काय?

आपण आपल्या कमतरांविरुद्ध झगडावे अशी देव अपेक्षा करतो

एखाद्या कमतरतेविरुद्ध झगडल्याने, ती कमतरता पूर्णपणे नाहीशी होणार नाही. आपण आपल्या अपरिपूर्णतेला शरण जाण्याची गरज नाही. अर्थात आपण लगेच तिचे उच्चाटन करू शकत नाही. अपरिपूर्णतेमुळे, सतत भेडसावणारी कमतरता वाढत राहते. तरीपण आपण आपल्या कमतरतेपुढे हात टेकू नयेत. (स्तोत्र ११९:११) हे इतके महत्त्वाचे का आहे?

कारण देवाच्या दृष्टीत, अपरिपूर्णता ही सतत वाईट वर्तनासाठी सबब नाही. (यहूदा ४) मानवांनी आपले जीवन शुद्ध करावे आणि उत्तम नैतिक जीवन जगावे अशी यहोवाची इच्छा आहे. बायबल म्हणते: “वाइटाचा वीट माना.” (रोमकर १२:९) देव इतका कडक पावित्रा का घेतो?

एक कारण आहे, की कमतरतेला बळी पडणे हानीकारक आहे. गलतीकर ६:७ मध्ये बायबल असे म्हणते, की “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” व्यसनी, लोभी, स्वैराचारी जीवनशैली जगणाऱ्‍या लोकांना त्यांच्या जीवनात बहुधा भयंकर परिणाम भोगावे लागतात. परंतु याहूनही एक महत्त्वाचे कारण आहे.

पापामुळे देव नाराज होतो. पाप हे आपल्यात व यहोवा देवामध्ये “आडभिंतीप्रमाणे” आहे. (यशया ५९:२) पाप करणाऱ्‍यांना देवाची मर्जी प्राप्त करता येत नसल्यामुळे देव अशा लोकांना आर्जवतो: “आपणास धुवा, स्वच्छ करा; . . . दुष्टपणा करण्याचे सोडून द्या.”—यशया १:१६.

आपला निर्माणकर्ता प्रेमळ व दयाळु आहे. “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) कमतरतेच्या सतत आहारी जाणे, देवाची मर्जी प्राप्त करण्यास बाधा ठरते. तेव्हा, जर देव आपल्या कमतरतांकडे दुर्लक्ष करीत नाही तर आपणही दुर्लक्ष करू नये. (g०२ ११/०८)

[तळटीप]

^ येशूने तेथे म्हटले: “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.”