व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एड्‌सचे लोण आटोक्यात येईल? कसे?

एड्‌सचे लोण आटोक्यात येईल? कसे?

एड्‌सचे लोण आटोक्यात येईल? कसे?

काही काळ, बऱ्‍याच आफ्रिकी देशांत एड्‌स महासाथीविषयी सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करण्याची प्रवृत्ती दिसून येत होती. बरेच लोक या विषयावर बोलण्याचे टाळत होते. पण अलीकडील वर्षांत लोकांना, खासकरून तरुण पिढीला या विषयासंबंधी जागरूक करण्याकरता आणि मोकळेपणाने चर्चा करण्याचे त्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रयत्न करण्यात आले आहेत. या प्रयत्नांना काही प्रमाणातच यश आले आले. लोकांची जगण्याची पद्धत आणि रितीरिवाज इतके दृढपणे स्थापित झालेले आहेत की त्यांच्यात काहीही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे अतिशय कठीण आहे.

वैद्यकीय प्रगती

वैद्यकीय बाजू पाहू जाता, शास्त्रज्ञांनी एचआयव्हीबद्दल बरेच ज्ञान मिळवले आहे आणि त्यांनी अशी औषधेही निर्माण केली आहेत ज्यामुळे अनेकांची आयुर्मर्यादा वाढली आहे. कमीतकमी तीन ॲन्टीरिट्रोव्हायरल औषधांचा एकत्र वापर केल्यामुळे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या उपचाराचे वर्णन अतिशय सक्रिय ॲन्टीरिट्रोव्हायरल उपचार असे करण्यात आले आहे.

या औषधांमुळे एड्‌स बरा होत नसला तरीसुद्धा या औषधांमुळे एचआयव्ही ग्रस्त रुग्णांतील मृत्यूचे प्रमाण, खासकरून विकसित देशांत, घटले आहे. बरेच लोक विकसनशील देशांतही ही औषधे पुरवण्याचा अट्टहास करत आहेत. पण ही औषधे महागडी असून या देशांतील सर्वसामान्य माणसाच्या ऐपती बाहेरची आहेत.

यामुळे एक महत्त्वाचा प्रश्‍न सामोरा आला आहे: आर्थिक फायदा मनुष्याच्या जीवापेक्षाही महत्त्वाचा आहे का? एचआयव्ही/एड्‌स वरील ब्राझीलच्या कार्यक्रमाचे संचालक डॉ. पाउलू तेशेरा यांनी ही परिस्थिती कबूल केली. ते म्हणाले: “नेहमीच्या नफ्यापेक्षा कितीतरी अधिक असलेल्या नफ्याच्या नावाखाली आम्ही हजारो लोकांना जीवनावश्‍यक औषधांपासून वंचित ठेवू शकत नाही.” त्यांनी पुढे म्हटले: “आर्थिक हितांना, नैतिक आणि मानवी दृष्टिकोनापेक्षा अधिक महत्त्व दिले जाऊ नये असे मला मनापासून वाटते.”

काही देशांनी मोठमोठ्या औषधनिर्माण कंपन्यांच्या औषधे विकण्याच्या हक्कांची पर्वा न करता काही औषधांचे सामान्य प्रकार बऱ्‍याच कमी किंमतीत निर्माण करण्याचा अथवा अशी औषधे आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. * साउथ ॲफ्रिकन मेडिकल जर्नल यातील वृत्तानुसार एका अभ्यासात “या [सामान्य औषधांचा] किमान खर्च अमेरिकन दरांपेक्षा ८२ टक्के कमी असल्याचे आढळले.”

उपचारातील अडथळे

कालांतराने, मोठ्या औषध निर्माण कंपन्यांनी गरजू विकसनशील देशांना एड्‌सविरोधी औषधे पूर्वीपेक्षा बऱ्‍याच कमी किंमतीत देऊ केली. या आशेने, की अधिकाधिक लोकांना या औषधांचा उपयोग करता येईल. पण विकसनशील देशांत ही औषधे सहज उपलब्ध करून देण्याकरता अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. पहिला अडथळा म्हणजे खर्च. अतिशय कमी किंमत लावूनही ही औषधे ज्यांना त्यांची गरज आहे अशा बहुतेक लोकांकरता अद्यापही अतिशय महागडी आहेत.

दुसरी समस्या म्हणजे, ही औषधे योग्यप्रकारे घेणे सोपे नाही. दररोज अनेक गोळ्या सांगितलेल्या वेळी घ्याव्या लागतात. या गोळ्या योग्यप्रकारे घेतल्या नाहीत किंवा उपचारात खंड पडल्यास, औषधांना दाद न देणारे एचआयव्ही विषाणूचे प्रकार निर्माण होऊ शकतात. शिवाय, आफ्रिकन देशांतील परिस्थिती लक्षात घेतल्यास, रुग्ण सांगितलेले डोस न चुकता घेतील याचीही खात्री देता येत नाही कारण येथे अन्‍न, पिण्याचे शुद्ध पाणी आणि वैद्यकीय सवलतींचाही तुटवडा आहे.

शिवाय, औषधे सुरू असताना रुग्णाच्या स्थितीचे निरीक्षण करणे आवश्‍यक असते. शरीर औषधांना दाद देत नसल्यास, औषधांत फेरबदल करणे आवश्‍यक असते. याकरता अनुभवी वैद्यकीय कर्मचारी असणे आवश्‍यक आहे, शिवाय महागड्या चाचण्याही कराव्या लागतात. तसेच, या औषधांचे दुष्परिणामही आहेत आणि औषधांना दाद न देणारे विषाणूचे प्रकार निर्माण होऊ लागले आहेत.

जून २००१ मध्ये संयुक्‍त राष्ट्र महासभेच्या एड्‌सवरील एका खास बैठकीत विकसनशील देशांना मदत करण्याकरता एक जागतिक आरोग्य निधी उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. अंदाजे सातशे कोटी ते दहा अब्ज डॉलर्सची गरज असल्याचा अंदाज बांधण्यात आला. विविध देशांनी या निधीकरता देऊ केलेल्या देणग्यांची आतापर्यंतची एकूण बेरीज आवश्‍यक रक्कमेपेक्षा बरीच कमी आहे.

एड्‌सविरोधी लस सापडण्याची शास्त्रज्ञांना मनःपूर्वक आशा वाटते आणि वेगवेगळ्या देशांत बऱ्‍याच लशींचे परीक्षण केले जात आहे. हे प्रयत्न यशस्वी ठरले तरीसुद्धा, ही लस तयार करून, तिचे प्रयोग करून सर्वसामान्य लोकांच्या उपयोगाकरता ती उपलब्ध होईपर्यंत बरीच वर्षे गेलेली असतील.

थायलंड, ब्राझील, आणि युगांडा यांसारख्या काही देशांत उपचार पद्धतींना बऱ्‍यापैकी यश आले आहे. ब्राझीलने आपल्याच देशात उत्पादित केलेल्या औषधांच्या साहाय्याने एड्‌ससंबंधी मृत्यूचे प्रमाण अर्ध्यावर आणले आहे. बोट्‌स्वाना या लहानशा पण आर्थिक कुवत असलेल्या देशात, ज्या कोणाला गरज असेल त्याला ॲन्टीरिट्रोव्हायरल औषधे आणि आवश्‍यक वैद्यकीय सवलती पुरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

एड्‌सचा नायनाट

इतर साथींपेक्षा एड्‌स एका महत्त्वाच्या बाबतीत वेगळा आहे: हा रोग टाळता येण्यासारखा आहे. मूलभूत बायबल सिद्धान्तांना जडून राहण्याची एका व्यक्‍तीची तयारी असल्यास, सर्व नाहीतरी बहुतेक केसेसमध्ये या विषाणूचा संसर्ग टाळता येतो.

बायबलचे नैतिक दर्जे सुस्पष्ट आहेत. अविवाहित व्यक्‍तींनी लैंगिक संबंध ठेवू नयेत. (१ करिंथकर ६:१८) विवाहित व्यक्‍तींनी आपल्या साथीदाराला विश्‍वासू राहावे आणि दुसऱ्‍या व्यक्‍तीशी संबंध ठेवू नयेत. (इब्री लोकांस १३:४) रक्‍तापासून दूर राहण्याच्या बायबलच्या आज्ञेमुळेही एका व्यक्‍तीचे या रोगापासून संरक्षण होते.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

ज्यांना आधीच संसर्ग झाला आहे अशा व्यक्‍ती, देवाने निकटच्या भविष्यात जे रोगमुक्‍त जग निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्याविषयी शिकून घेण्याद्वारे आणि देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याद्वारे या परिस्थितीतही आनंद आणि सांत्वन मिळवू शकतात.

बायबल आपल्याला आश्‍वासन देते की मानवांचे सर्व दुःख, ज्यांत आजार देखील सामील आहेत, लवकरच संपुष्टात येतील. प्रकटीकरणाच्या पुस्तकात असे अभिवचन देण्यात आले आहे: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’”—प्रकटीकरण २१:३, ४.

हे आश्‍वासन केवळ महागडी औषधे घेण्याची ऐपत असलेल्यांकरताच नाही. प्रकटीकरण अध्याय २१ यातील भविष्यसूचक प्रतिज्ञेला यशया ३३:२४ हे वचन पुष्टी देते: “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” मग या पृथ्वीवर राहणारे सर्वजण देवाच्या नियमांचे पालन करतील आणि परिपूर्ण आरोग्य अनुभवतील. एड्‌सचे आणि इतर सर्व रोगांचे पसरत असलेले लोण कायमचे आटोक्यात आणले जाईल. (g०२ ११/०८)

[तळटीप]

^ सामान्य औषधे ही इतर औषधनिर्माण कंपन्यांनी शोध लावलेल्या औषधांच्या प्रती असतात. जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य देश आणीबाणीच्या परिस्थितीत औषध निर्माण करणाऱ्‍या कंपनीच्या हक्कांचे कायदेशीर उल्लंघन करू शकतात.

[९, १० पानांवरील चौकट/चित्रे]

मी ज्याच्या शोधात होते ते औषध हेच आहे

मी आफ्रिकेच्या दक्षिण भागात राहणारी एक २३ वर्षांची मुलगी आहे. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे मला कळले तो दिवस मला चांगला आठवतो.

मी माझ्या आईबरोबर डॉक्टरांच्या खोलीत बसले होते, तेव्हा डॉक्टरांनी ही बातमी सांगितली. माझ्या जीवनात मी ऐकलेली ही सर्वात दुःखाची बातमी होती. मी अगदी गोंधळून गेले. मला विश्‍वासच बसेना. लॅबने चुकून हा रिपोर्ट दिला असावा असेही मला क्षणभर वाटले. काय बोलावे, काय करावे काहीच समजत नव्हते. खूप रडावेसे वाटत होते, पण डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता. डॉक्टर माझ्या आईला ॲन्टीरिट्रोव्हायरल औषधांविषयी सांगू लागले, पण मला इतका जबरदस्त धक्का बसला होता की मला कशाचेच भान नव्हते.

मी ज्या युनिव्हर्सिटीत अभ्यास करत होते तेथे कोणाकडून मला संसर्ग झाला असावा असा निष्कर्ष मी काढला. माझी स्थिती समजू शकेल अशा कोणा व्यक्‍तीशी बोलण्याची मला खूप इच्छा होती पण अशी कोणीच व्यक्‍ती नव्हती. आपण कशाच्याच लायकीचे नाही, जीवनाचे वाटोळे करून बसलो असे मला सतत वाटू लागले. माझ्या कुटुंबाने मला आधार दिला तरीसुद्धा मी पूर्णपणे हताश झाले आणि सतत भीतीखाली वावरू लागले. कोणत्याही सर्वसामान्य तरुणीप्रमाणे मी देखील भविष्याबद्दल कितीतरी गोड स्वप्ने पाहिली होती. आणखी केवळ दोन वर्षांत मी सायन्स पदवीधर झाले असते, पण ते स्वप्नही धुळीस मिळाले होते.

मी डॉक्टरांनी दिलेली ॲन्टीरिट्रोव्हायरल औषधे घेऊ लागले आणि एड्‌स सल्लागारांकडेही जात होते पण तरीही माझी निराशा दूर होत नव्हती. माझा मृत्यू होण्याआधी मला खरा ख्रिस्ती धर्म दाखव अशी मी देवाला प्रार्थना केली. मी एका पेन्टेकॉस्टल चर्चची सदस्या होते पण चर्चचा एकही सदस्य मला भेटायलासुद्धा आला नाही. मृत्यूनंतर माझे काय होईल याविषयीचे सत्य मला जाणून घ्यायचे होते.

ऑगस्ट १९९९ मध्ये एका दिवशी, दोन यहोवाचे साक्षीदार माझ्या घरी आले. त्या दिवशी मी खूपच आजारी होते, पण तरी बैठकीच्या खोलीत मी बसू शकत होते. त्या दोन स्त्रियांनी स्वतःची ओळख करून दिली आणि आपण लोकांना बायबलचा अभ्यास करण्यास मदत करत आहोत असे सांगितले. शेवटी माझ्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले म्हणून मला हायसे झाले. पण तोपर्यंत मी इतकी अशक्‍त झाले होते की काही वाचणे किंवा फार वेळ लक्ष केंद्रित करणे माझ्याकरता अशक्य होते.

तरीसुद्धा मला बायबलचा अभ्यास करण्याची इच्छा असल्याचे मी त्यांना सांगितले आणि त्यांनी दुसऱ्‍यांदा येण्याचा शब्द दिला. पण तो दिवस येण्याआधीच मला डिप्रेशनमुळे मनोरुग्णालयात नेण्यात आले. तीन आठवड्यांनंतर मला इस्पितळातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आणि साक्षीदार अजून मला विसरले नव्हते हे जाणून मला आनंद झाला. त्यांपैकी एक वेळोवेळी माझ्या स्थितीविषयी विचारपूस करत होती. शारीरिकरित्या माझ्यात थोडी सुधारणा झाली आणि त्या वर्षाच्या शेवटी मी बायबलचा अभ्यास सुरू केला. माझी तब्येत नेहमीच खालीवर होत असल्यामुळे मला हे सोपे गेले नाही. पण माझ्यासोबत अभ्यास करणारी खूप समजूतदार आणि सहनशील होती.

बायबलमधून यहोवाविषयी आणि त्याच्या गुणांविषयी, तसेच त्याला ओळखणे म्हणजे काय आणि सार्वकालिक जीवनाची आशा धरणे म्हणजे काय हे सर्व शिकल्यानंतर मी हरखून गेले. मनुष्याला दुःख का सोसावे लागते हे देखील मला पहिल्यांदा समजले. देवाचे राज्य लवकरच सर्व मानवी सरकारांची जागा घेईल हे जाणूनही मला खूप आनंद झाला. यामुळे मला माझे जीवन पूर्णपणे बदलण्याची प्रेरणा मिळाली.

याच औषधाच्या मी शोधात होते. यहोवा अजूनही माझ्यावर प्रेम करतो आणि माझी त्याला काळजी आहे ही जाणीव किती सांत्वनदायक होती! पूर्वी मला वाटायचे की देवाला माझी घृणा वाटते म्हणूनच मला हा रोग जडला. पण मला समजले की यहोवाने प्रेमळपणे पापाच्या क्षमेकरता येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या माध्यमाने तरतूद केली आहे. तेव्हा मला जाणीव झाली की देवाला खरोखरच काळजी वाटते, जसे १ पेत्र ५:७ यात म्हटले आहे: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”

दररोज बायबलचा अभ्यास करण्याद्वारे आणि राज्य सभागृहांत सभांना उपस्थित राहण्याद्वारे मी यहोवासोबत शक्य तितका जवळचा नातेसंबंध ठेवण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करत आहे. हे सोपे नसले तरी मी प्रार्थनेत यहोवाला माझ्या सर्व चिंता सांगते आणि शक्‍ती व सांत्वन देण्याची त्याच्याजवळ विनंती करते. मंडळीचे सदस्य देखील मला मदत करायला नेहमी तयार असतात आणि त्यामुळे मी आनंदी आहे.

स्थानिक मंडळीसोबत मी दर आठवड्यात सुवार्तिक कार्यात सहभागी होते. मला इतरांना आध्यात्मिकरित्या मदत करण्याची इच्छा आहे खासकरून, माझ्यासारख्या परिस्थितीत असलेल्या लोकांना. डिसेंबर २००१ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला.

[चित्र]

देवाच्या राज्याविषयी शिकल्यावर मला खूप आनंद झाला

[८ पानांवरील चित्र]

बोट्‌स्वाना येथील एड्‌स सल्लागार पथक

[१० पानांवरील चित्र]

नव्या जगात सर्वांना परिपूर्ण आरोग्य लाभेल