व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एड्‌सने आफ्रिकेस ग्रासले

एड्‌सने आफ्रिकेस ग्रासले

एड्‌सने आफ्रिकेस ग्रासले

“आम्ही एकप्रकारच्या महाविपत्तीला तोंड देत आहोत.”

आफ्रिकेतील एचआयव्ही/एड्‌सकरता युएनचे खास प्रतिनिधी स्टीफन लुइस यांच्या वरील शब्दांतून सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकन देशांतील एड्‌सच्या वाढत्या प्रमाणाविषयी कित्येकांना वाटणारी भीती व काळजी व्यक्‍त होते.

एचआयव्हीचा प्रादुर्भाव होण्यात कित्येक गोष्टींचा समावेश आहे. शिवाय एड्‌समुळे आणखी कितीतरी समस्यांना तोंड फुटले आहे. एड्‌स जेथे झपाट्याने पसरत आहे अशा आफ्रिकेतील काही देशांत आणि जगातील इतर भागातील परिस्थितीचा खालील बाबींशी संबंध आहे.

नैतिकता. शारीरिक संभोग हा एचआयव्ही जिवाणूचा संसर्ग होण्याचा प्रमुख मार्ग असल्यामुळे, सुस्पष्ट नैतिक दंडकांचा अभाव साहजिकच या रोगाच्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे. पण, अनेकांना वाटते की अविवाहित लोकांनी शारीरिक संबंधच ठेवू नयेत असे सुचवणे व्यावहारिक नाही. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्‍नसबर्ग शहरातील द स्टार या दैनिकात फ्रान्स्वा ड्युफ्युर यांनी असे लिहिले: “किशोरवयीनांना केवळ सेक्स टाळण्याची ताकीद देऊन काही फरक पडणार नाही. दररोज त्यांच्यावर उत्तेजक लैंगिक दृश्‍यांचा भडिमार होत आहे, ज्यांच्या माध्यमातून कसे दिसावे आणि कसे वागावे यासंबंधी आदर्श त्यांच्याकरता घालून दिले जात आहेत.”

कोवळ्या वयातील मुलामुलींच्या वर्तनावरून वरील गोष्टीची खात्री पटते. उदाहरणार्थ, एका देशात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणावरून असे आढळले की १२-१७ या वयोगटातील एक तृतीयांश मुलांमुलींनी शरीर संभोग केला होता.

दक्षिण आफ्रिकेत बलात्काराला राष्ट्रीय संकटप्रसंग म्हणण्यात आले आहे. जोहान्‍नसबर्गच्या सिटिझन दैनिकातील एका बातमीवृत्तात असे म्हटले होते की “[बलात्कार] इतका सर्वसामान्य झाला आहे की या देशांतील स्त्रियांच्या आणि खासकरून मुलांच्या आरोग्याला धोकेदायक असलेल्या इतर कोणत्याही रोगापेक्षा हा सर्वात मोठा धोका ठरला आहे.” याच लेखात पुढे असे म्हटले आहे: “अल्पवयीन मुलींवर केले जाणारे बलात्कार अलीकडील काळात दुप्पट झाले आहेत . . . या कृत्यांच्या मागे अशी एक धारणा आहे की एचआयव्ही व्हायरसच्या वाहकाने कुमारिकेवर बलात्कार केल्यास तो या रोगापासून मुक्‍त होईल.”

गुप्त रोग. या भागात गुप्त रोग मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. साउथ ॲफ्रिकन मेडिकल जर्नल यात सांगितल्याप्रमाणे: “गुप्त रोगांमुळे एचआयव्ही-१ या जिवाणूच्या संसर्गाचा धोका २-५ पटीने वाढतो.”

दारिद्र्‌य. आफ्रिकेतील बरेच देश दारिद्र्‌याच्या गर्तेत अडकलेले आहेत आणि यामुळे एड्‌स पसरण्याकरता एक अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विकसित देशांत ज्या गोष्टी अगदी मूलभूत समजल्या जातात त्या बहुतेक विकसनशील देशांत उपलब्ध नसतात. कित्येक वस्त्यांमध्ये वीज किंवा स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही. खेडोपाड्यांत पक्के रस्ते नाहीत. कित्येक रहिवाशी कुपोषित असून वैद्यकीय सवलती अगदीच किमान स्वरूपाच्या आहेत.

एड्‌सचा व्यापारांवर व उद्योगांवर अनिष्ट परिणाम होत आहे. वाढत्या संख्येने कर्मचारी या रोगाला बळी पडत आहेत तसतसे खाणकाम करणाऱ्‍या कंपन्यांना उत्पादनात घट झाल्याचे जाणवू लागले आहे. यांपैकी काही कंपन्या कामगारांची उणीव भरून काढण्याकरता विशिष्ट प्रक्रिया यंत्रांच्या साहाय्याने पार पाडण्याचे मार्ग शोधू लागल्या आहेत. असा अंदाज केला गेला की, २००० सालादरम्यान एका प्लॅटिनम खाणीत कर्मचाऱ्‍यांतील एड्‌स रुग्णांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आणि एकूण कर्मचाऱ्‍यांपैकी २६ टक्के कामगारांना या जिवाणूचा संसर्ग झाला.

एड्‌सचा एक दुःखद परिणाम म्हणजे या रोगाला बळी पडणाऱ्‍या आईवडिलांची अनाथ होणारी असंख्य मुले. आईवडिलांना आणि आर्थिक सुरक्षिततेला मुकणाऱ्‍या या मुलांना एड्‌स रोगाशी संबंधित असलेली बदनामीही सोसावी लागते. नातेवाईक किंवा समाजातील इतर लोकांनी त्यांना मदत करावी म्हटले, तर ते स्वतः गरीब असतात शिवाय बहुतेकांना असे करण्याची इच्छा नसते. बरीच अनाथ मुले मधूनच शाळा सोडून देतात. काही वेश्‍याव्यवसायाकडे वळतात आणि अशारितीने हा रोग अधिकच पसरवतात. कित्येक देशांनी अशा या अनाथ मुलांचे संगोपन करण्याकरता सरकारी अथवा खासगी कार्यक्रम राबवले आहेत.

अज्ञान. एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या कित्येकांना याची पुसटशीही कल्पना नसते. वाळीत टाकल्या जाण्याच्या भीतीने बऱ्‍याचजणांना टेस्ट करून घेण्याचे धैर्य होत नाही. एचआयव्ही/एड्‌स (युएनएड्‌स) च्या संयुक्‍त राष्ट्र कार्यक्रमाच्या प्रसिद्धी वृत्तात असे म्हटले होते की “एचआयव्हीचा संसर्ग झालेले किंवा झाल्याची शंका असलेल्यांनाही आरोग्य सेवा, घर व नोकरी यांपासून वंचित ठेवले जाते, ओळखीचे लोक व सहकर्मचारी त्यांना वाळीत टाकतात, विमा उतरवू दिला जात नाही व परदेशांतही त्यांना प्रवेश दिला जात नाही.” काहींना तर एचआयव्ही पॉसिटिव्ह असल्याचे कळल्यावर चक्क ठार मारण्यात आले.

संस्कृती. बऱ्‍याच आफ्रिकन समाजांत, स्त्रियांना त्यांच्या साथीदारांच्या विवाहबाह्‍य संबंधांविषयी त्यांना विचारण्याची, लैंगिक संबंधाला नकार देण्याची किंवा सुरक्षित मार्गांनी संभोग करण्याविषयी सुचवण्याची परवानगी नसते. पारंपरिक विश्‍वास सहसा एड्‌सबद्दल असलेल्या अज्ञानावर किंवा खऱ्‍या परिस्थितीकडे डोळेझाक करण्याच्या प्रवृत्तीवर आधारित असतात. उदाहरणार्थ, जादूटोण्यावर या रोगाचे खापर फोडून इलाजाकरता मांत्रिकांची मदत घेतली जाते.

अपुऱ्‍या वैद्यकीय सवलती. आधीच रुग्णांच्या वाढत्या संख्येचा इस्पितळांवर ताण येत असताना त्यात एड्‌स रुग्णांची भर पडली आहे. दोन मोठ्या इस्पितळांनी सांगितले की त्यांच्याकडे दाखल असलेले निम्म्याहून अधिक रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. क्वाझुलू-नाताल या प्रांतातील एका इस्पितळाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्‍याने सांगितले की त्यांच्या एकेका वार्डांत १४० रुग्णांना दाखल केलेले आहे. कधीकधी दोन रुग्णांना एकाच कॉटवर झोपावे लागते आणि तिसरा कॉटखाली जमिनीवर झोपलेला असतो!—साउथ ॲफ्रिकन मेडिकल जर्नल.

आफ्रिकेची स्थिती खरोखर दयनीय आहे, आणि ती अधिकच बिकट होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. युएनएड्‌स या कार्यक्रमाचे संचालक पीटर पीयो सांगतात की “ही तर साथीची निव्वळ सुरवात आहे.”

अर्थात, काही देशांत या रोगाला तोंड देण्याकरता काही प्रयत्न केले जात आहेत. आणि जून २००१ मध्ये पहिल्यांदा संयुक्‍त राष्ट्रांच्या महासभेने एचआयव्ही/एड्‌स यावर चर्चा करण्याकरता एक खास परिषद आयोजित केली. मानवांच्या प्रयत्नांना यश येईल का? एड्‌सची ही जीवघेणी साथ कोठवर चालेल? (g०२ ११/०८)

[५ पानांवरील चौकट/चित्र]

एड्‌सवरील औषध नेव्हायरपीन आणि दक्षिण आफ्रिकेची दुविधा

नेव्हायरपीन काय आहे? पत्रकार नीकोल इटानो यांनी सांगितल्यानुसार हे “एक ॲन्टीरिट्रोव्हायरल औषध आहे ज्यावरील प्रयोगांतून, [मातेकडून] मुलास एड्‌सचा संसर्ग होण्याची शक्यता अर्धी होऊ शकते असे दिसून आले आहे.” एका जर्मन औषध कंपनीने हे औषध पुढच्या पाच वर्षांपर्यंत दक्षिण आफ्रिकेला फुकट पुरवण्याची तयारी दाखवली. पण २००१ सालच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारलेला नव्हता. का बरे?

दक्षिण आफ्रिकेत जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक म्हणजे ४७ लाख एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्‍ती आहेत. लंडनच्या द इकॉनॉमिस्ट यात फेब्रुवारी २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात असे सांगण्यात आले की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष टाबो म्बीकी यांना “एचआयव्हीमुळे एड्‌स होतो या सर्वमान्य दृष्टिकोनाविषयी शंका वाटते” आणि “एड्‌सविरोधी औषधाची किफायत, सुरक्षितता आणि उपयोगिता याविषयी त्यांना खात्री नाही. त्यांनी या औषधांवर बंदी तर घातलेली नाही, पण दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांना ही औषधे वापरण्याचे प्रोत्साहन दिले जात नाही.” ही चिंताजनक बाब का आहे? कारण दर वर्षी दक्षिण आफ्रिकेत हजारो एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले जन्माला येतात आणि २५ टक्के गरोदर स्त्रिया या जिवाणूच्या वाहक आहेत.

या मतभेदांमुळे, सरकारवर नेव्हायरपीन वापरण्यास भाग पाडण्याकरता न्यायालयीन खटला भरण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानिक न्यायालयाने एप्रिल २००२ मध्ये आपले मत जाहीर केले. राव्ही नेसमन यांनी द वॉशिंग्टन पोस्ट यात लिहिल्याप्रमाणे, “हे औषध उपचाराकरता वापरणे ज्या इस्पितळांना शक्य आहे, त्यांना सरकारने हे उपलब्ध करून द्यावे” असा निकाल न्यायालयाने दिला. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने सबंध देशातील १८ प्रायोगिक केंद्रावर हे औषध उपलब्ध करून दिले असले तरीसुद्धा न्यायालयाचा हा नवा निर्णय देशातील सर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह गरोदर स्त्रियांकरता एक आशेचा किरण आहे.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

शरीरातील पेशींना फसवणारा एक कावेबाज व्हायरस

ह्‍युमन इम्युनोडिफिशन्सी व्हायरसच्या (एचआयव्ही) सूक्ष्म जगात क्षणभर प्रवेश करू या. एका शास्त्रज्ञाने एकदा म्हटले: “इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपमधून विषाणूंच्या कणांचा अभ्यास करता करता आता मला बरीच वर्षे झाली आहेत, पण इतक्या सूक्ष्म कणांमधील अचूकता आणि गुंतागुंत पाहून मी अजूनही तोंडात बोट घालतो.”

व्हायरस हे बॅक्टेरियमपेक्षाही सूक्ष्म असते. आणि बॅक्टेरियम हे मनुष्याच्या शरीरातील सर्वसामान्य पेशीपेक्षा बरेच लहान असते. एका जाणकाराच्या मते एचआयव्हीचे कण इतके सूक्ष्म असतात की “या वाक्याच्या शेवटी येणाऱ्‍या पूर्णविराम चिन्हावर असे २३ कोटी [कण] बसतील.” शरीरातल्या एखाद्या पेशीत प्रवेश करून त्यातील प्रक्रियांचे नियंत्रण आपल्या हातात घेतल्याशिवाय व्हायरसची संख्या वाढू शकत नाही.

एचआयव्ही मानवी शरीरावर हल्ला करतो तेव्हा शरीरातील प्रतिकारशक्‍तीचे कार्य सुरू होते आणि त्या विषाणूला जणू एका प्रचंड सैन्याला तोंड द्यावे लागते. * अस्थिमज्जेत तयार होणाऱ्‍या पांढऱ्‍या पेशी या प्रतिकार यंत्रणेच्या मुख्य सूत्रधार आहेत. पांढऱ्‍या पेशींमध्ये दोन मुख्य प्रकारच्या लिंफोसाईट पेशींचा समावेश आहे, आणि त्या म्हणजे टी सेल आणि बी सेल. इतर पांढऱ्‍या रक्‍त पेशींना फॅगोसाईट किंवा “भक्षिकोशिका” म्हणतात.

टी सेल (पेशी) अनेक प्रकारच्या असतात आणि त्या सर्वांना वेगवेगळी कामे असतात. हेल्पर टी सेल नावाच्या पेशी प्रतिकार यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या शरीराबाहेरील विषाणू ओळखून या शत्रूवर हल्ला करून त्यास नष्ट करणाऱ्‍या पेशींचे उत्पादन सुरू करण्यास शरीराला निर्देशन देतात. एचआयव्ही शरीरावर हल्ला करतो तेव्हा खासकरून या हेल्पर टी सेलवर तो लक्ष केंद्रित करतो. शरीरातील ज्या पेशींवर विषाणूचा हल्ला झाला आहे त्या पेशी नष्ट करण्याकरता आक्रमक टी सेल्स लगेच जागरूक होतात. बी सेल प्रतिजैव तयार करण्याचे काम करतात. बाहेरून आलेल्या विषाणूला तोंड देण्याकरता या प्रतिजैवांचा उपयोग होतो.

कावेबाज युद्धनीती

एचआयव्ही हा रिट्रोव्हायरस प्रकारात मोडतो. एचआयव्हीची जननिक माहिती डीएनएवर (डिऑक्सीरायबोन्युक्लिइक ॲसिड) नसून आरएनएच्या (रायबोन्युक्लिइक ॲसिड) रूपात असते. एचआयव्ही हा रिट्रोव्हायरसच्या एका विशिष्ट गटात मोडतो ज्यांना लेन्टीव्हायरस म्हणतात कारण हे विषाणू शरीरात प्रवेश केल्यावर बराच काळ सुप्तावस्थेत राहतात आणि त्यामुळे बरीच वर्षे रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.

एचआयव्ही शरीरातील एखाद्या पेशीत प्रवेश करतो तेव्हा तो पेशींमध्ये चालणाऱ्‍या प्रक्रियेचा स्वतःच्या फायद्याकरता उपयोग करून घेतो. पेशींमधील डीएनएमध्ये फेरबदल करून तो स्वतःच्या अर्थात एचआयव्ही पेशींच्या असंख्य प्रती तयार करून घेतो. पण यासाठी एचआयव्हीला वेगळ्या प्रकारच्या जनुकीय संकेतांचा उपयोग करणे आवश्‍यक असते. हे करण्याकरता त्याला स्वतःच्या आरएनएचे डीएनएमध्ये रूपांतर करावे लागते जेणेकरून शरीरातील पेशीच्या यंत्रणेला त्यातील माहिती वाचून ती समजू शकेल. हे साध्य करण्याकरता एचआयव्ही रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाच्या व्हायरल एन्झाइमचा उपयोग करतो. कालांतराने, हजारो नव्या एचआयव्ही पेशी तयार केल्यानंतर मूळ टी सेल फुटतो. या नव्या पेशी मग इतर पेशींवर हल्ला चढवतात.

टी सेलची संख्या झपाट्याने कमीकमी होत जाते, तसतसे इतर जंतू शरीरावर बिनधोक हल्ला करतात कारण शरीराकडून कसलाही प्रतिकार केला जात नाही. शरीरात निरनिराळ्या रोगांचा व जंतूचा प्रार्दुर्भाव होतो. हा एड्‌सचा पूर्ण वाढ झालेला टप्पा म्हणता येईल. एचआयव्हीने शरीराच्या प्रतिकार शक्‍तीवर विजय मिळवलेला असतो.

हे अगदी साधे स्पष्टीकरण आहे. मानवी शरीरातील प्रतिकार शक्‍ती आणि एचआयव्ही यांबद्दल बरीच माहिती अद्याप संशोधकांनाही सापडलेली नाही हे आठवणीत ठेवावे लागेल.

आता जवळजवळ दोन दशकांपासून या लहानशा व्हायरसने जगभरातील प्रमुख वैद्यकीय संशोधकांची झोप उडवली आहे; शारीरिक व मानसिक ताणाव्यतिरिक्‍त आर्थिक दृष्ट्याही मोठ्या प्रमाणात व्यय सोसावा लागला आहे. अर्थात, यामुळे एचआयव्हीसंबंधी बरेच ज्ञान त्यांना मिळवता आले आहे. शल्यचिकित्सक डॉ. शर्विन बी. न्यूलँड यांनी काही वर्षांपूर्वी असे म्हटले: “ह्‍युमन इम्युनोडिफिशन्सी व्हायरसबद्दल जितकी माहिती गोळा करण्यात आली आहे आणि त्याच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यात जी प्रगती करण्यात आली आहे ती खरोखर आश्‍चर्यकारक आहे.”

आणि तरीसुद्धा, एड्‌सचे लोण झपाट्याने पसरतच आहे.

[तळटीप]

^ सावध राहा! (इंग्रजी), फेब्रुवारी ८, २००१, पृष्ठे १३-१५ पाहा.

[चित्र]

एचआयव्ही प्रतिकार यंत्रणेच्या लिंफोसाइट्‌सवर हल्ला करून त्यात फेरबदल करतो आणि त्यांच्याकडून नवीन एचआयव्ही तयार करून घेतो

[चित्राचे श्रेय]

CDC, Atlanta, Ga.

[७ पानांवरील चित्र]

बायबलच्या दर्जांचे पालन करणारेही हजारो तरुण आहेत