व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जांभई देण्यातील सुख!

गर्भाशयातील बाळ, गर्भधारणा झाल्यानंतर केवळ ११ आठवड्यांतच जांभई द्यायला सुरू करते, असे सलूड नावाच्या एका स्पॅनिश साप्ताहिकाने म्हटले. बहुतेक सस्तन प्राणी आणि विशिष्ट पक्षी व सरपटणारे प्राणी ही अनैच्छिक प्रतिक्रिया दाखवतात. आपण जांभई का देतो याचे नेमके कारण अद्याप समजलेले नसले तरीसुद्धा संशोधन करणाऱ्‍यांच्या पाहणीत असे आले आहे की जांभई देताना हात-पाय किंवा शरीर ताणले जाते. ते म्हणतात, की या हालचालींमुळे “स्नायू आणि सांधे मोकळे होतात शिवाय, रक्‍तदाब आणि हृदयाच्या स्पंदनाचे प्रमाण देखील वाढते.” परंतु जबडा पूर्णपणे न उघडता आपण जांभई दिल्यास आपल्याला इच्छित लाभ होत नाहीत. तेव्हा, परिस्थिती अनुमती देत असेल तर आपण जांभई देताना “आपला जबडा आणि चेहऱ्‍याचे स्नायू नैसर्गिकरीत्या ताणले पाहिजेत,” अशी शिफारस हे संशोधनकर्ते करतात. सांगता येत नाही, एका मोठ्या जांभईमुळे कदाचित तुम्ही संपूर्ण दिवसभर टवटवीत राहाल! (g०२ ११/०८)

झोपेत असलेले स्वीफ्ट पक्षी आपला तोल कसा सांभाळतात

स्वीफ्ट पक्षी उडत असताना फक्‍त झोपतच नाहीत तर वाऱ्‍याच्या प्रवाहाबरोबर वाहवत न जाता ते आपल्याच राज्य-क्षेत्रात राहतात. ते असे कसे करतात हे पाहण्यासाठी, स्वीडनच्या लुंड युनिव्हर्सिटीचे पक्षीवैज्ञानिक युहान बकमन आणि टुमस अर्लस्टाम यांनी या पक्षांच्या रात्रीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरता रडारचा उपयोग केला. या संशोधकांनी पाहिले, की या पक्ष्यांच्या उडण्याच्या एका विशिष्ट पद्धतीमुळे ते योग्य स्थितीत राहतात, असे बिल्ट वीसनशाफ्ट नावाच्या जर्मन विज्ञान मासिकात म्हटले होते. हे पक्षी अगदी उंच म्हणजे ३,००० मीटर उंचीपर्यंत जातात आणि हवेच्या कर्णरेषेत उडतात व दर काही मिनिटांनी सतत दिशा बदलतात. उडण्याच्या या पद्धतीमुळे ते त्यांच्या राज्यक्षेत्रातच पुढे मागे असे उडत राहतात. हवेच्या कमी वेगाच्या वेळी स्वीफ्ट पक्ष्यांना घिरट्या घालत झोपलेले पाहण्यात आले आहे. (g०२ ११/२२)

घरकाम उत्तम व्यायाम

व्हॅक्यूम क्लिनर वापरणे, खिडक्या धुणे, बाबागाडी ढकलणे, ही सर्व कामे आरोग्यदायक व्यायामात मोडतात का? ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड येथे घेतलेल्या एका अलीकडच्या अभ्यासानुसार या प्रश्‍नाचे होय असे उत्तर आहे. संशोधकांनी, पाच वर्षांखालील मुले असलेल्या मातांना, दररोजचे काम करताना त्यांचे प्राणवायु घेण्याचे किती प्रमाण आहे हे पाहण्यासाठी वायु-विश्‍लेषक बांधले, असे द कॅनबेरा टाईम्स मधील एका अहवालात म्हटले होते. संशोधकांनुसार, “मिळालेल्या उत्तरांवरून असे सूचित होते, की घरगुती कामांशी संबंधित असलेली काही कामे इतक्या तीव्रपणे केली जातात जे काहीप्रमाणात आरोग्याला लाभ मिळण्यासाठी पुरेसे आहेत.” प्राध्यापक वेंडी ब्राऊन यांना असे दिसून आले आहे, की “स्त्रियांचे घरगुती काम अंदाजे, जलदगतीने चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारख्या मध्यम तीव्र व्यायामाच्या बरोबरीचे होते,” असे अहवाल म्हणतो. “हे फक्‍त प्राथमिक संशोधन आहे. पण दिवसभर स्त्रिया घरकाम करत असताना त्या क्रियाशील नाहीत असे तुम्ही म्हणू शकत नाही.” (g०२ ११/०८)

“टाळता येण्याजोगा आजार”

“ऑस्टोपोरोसीस नावाचा आजार आपण टाळू शकतो,” असे ऑस्ट्रेलियाच्या द सन हेराल्डने म्हटले. “हा पुष्कळ प्रमाणात टाळता येण्याजोगा आहे. तरीपण असे भाकीत केले जाते, की २०२० सालापर्यंत हॉस्पिटलमधल्या तीन खाटांपैकी एका खाटेवर हाडं मोडलेली स्त्री असेल.” ऑस्टोपोरोसीस ऑस्ट्रेलिया नावाच्या संस्थेने दिलेल्या अहवालावरून असे दिसते, की हाडांना सछिद्र व ठिसूळ बनवणारा हा आजार “उच्च कोलेस्ट्रॉल, अलर्जी किंवा सर्दीखोकला यांपेक्षा जास्त सर्वसामान्य झाला आहे. मधुमेह किंवा दम्यापेक्षा हा खर्चिक आहे. आणि कमरेच्या सांध्याच्या फ्रॅक्चरमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्‍या स्त्रियांची संख्या, सर्व प्रकारच्या कॅन्सर्समुळे मरणाऱ्‍या स्त्रियांच्या एकूण संख्येपेक्षा कैक पटीने अधिक आहे.” प्राध्यापक फिलिप सॅमब्रुक यांच्या मते, अंदाजावरून असे दिसते की ऑस्ट्रेलियातील अर्ध्या स्त्रियांचे आणि एक तृतीयांश पुरूषांचे त्यांच्या जीवनकालात ऑस्टोपोरोसीसमुळे हाड मोडेल. बातमीपत्र पुढे म्हणते, की “हा आजार टाळायचा असेल तर जीवनाच्या पहिल्या तीस वर्षांत, व्यायाम आणि पुरेसे कॅलशियम शरीरात घेऊन हाडांना होता होईल तितके मजबूत करणे.” धुम्रपान, अतिमद्यसेवन किंवा कॅफेनचे सेवन टाळण्याद्वारे ऑस्टोपोरोसीस होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो. नियमित व्यायाम व कॅलशियम तसेच व्हिटॅमीन डी भरपूर प्रमाणात असलेले अन्‍न खाणे, या काही चांगल्या सवयी आहेत. (g०२ ११/२२)

“गाठी” सोडवणारी संत

“अलीकडील वर्षांमध्ये, अपयशी ठरणाऱ्‍या गोष्टींपासून वाचवणारा संत ज्यूड थाडियस; उद्विग्न अवस्थेत असलेल्यांना सांत्वन देणारी संत रिटा; कर्जबाजारी झालेल्यांचा तारक संत हॅटवीक; आणि तातडीच्या घटनांपासून संरक्षण करणारा संत एक्सपीडिटस, हे सर्व प्रसिद्धीपथावर आहेत,” असे वझा नावाच्या बातमीपत्रात म्हटले होते. आणि ब्राझीलच्या कॅथलिकांमध्ये लोकप्रिय होणारी अलीकडची संत म्हणजे “गाठी सोडवणारी आवर लेडी.” हे असामान्य पद, जर्मनीतील ऑग्सबर्ग येथील एका चॅपलच्या भिंतीवरील रंगवलेल्या चित्रावरून पडले आहे; या चित्रात, कुमारी मरीयेला एका रिबीनीच्या गाठी सोडवताना दाखवले आहे. प्रसार माध्यमांनी, “गाठी सोडवणारी आवर लेडी” हिचा पुरस्कार केल्यामुळे तिच्याकडे अनेक भक्‍त, आपल्या आरोग्याच्या, वैवाहिक आणि आर्थिक समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी येतात. शिवाय, पदक, रोजरी, मूर्ती आणि कार स्टीकर विकणाऱ्‍यांची चंगळ चालली आहे. “गाठी ‘सोडवण्याचे’ खूळ हे वाईट नसले तरी जास्त दिवस टिकणार नाही,” असे भाकीत ब्राझीलच्या सर्वात मोठ्या कॅथलिक मठाचे व्यवस्थापक डार्सी निकोली यांनी केले. (g०२ ११/२२)

अवकाशात शुभवर्तमान

अवकाशात जीवन असण्याची शक्यता आहे यावर एकीकडे वैज्ञानिकांचा अजूनही वादविवाद चालू आहे आणि दुसरीकडे, बर्लीनर मोरगनपोस्ट नावाचे बातमीपत्र अशी बातमी देते, की व्हॅटिकन वेधशाळेतील पाळक, “विश्‍वातील केवळ पृथ्वीवरील रहिवाशीच देवाची सृष्टी नाहीत. देवाने परग्रहावरच्या लोकांनाही निर्माण केले आहे,” या निष्कर्षास पोहंचले आहेत. या वेधशाळेचे व्यवस्थापक, जॉर्ज कॉईन यांनी असे सांगितले की “हे विश्‍व इतके विशाल आहे आणि त्यात फक्‍त आपणच असणे अशक्य आहे.” या परग्रहावरच्या लोकांपर्यंत शुभवर्तमान घेऊन जाण्याकरता पुष्कळ मठ, नवीन करार सांकेतिक लिपीत अवकाशात पाठवत आहेत. बातमीपत्रात पुढे म्हटले होते, की व्हॅटिकनला आता हे माहीत करून घ्यायचे आहे, की “येशू ख्रिस्ताने स्वतःला इतर ग्रहांवर देखील प्रकट केले आहे की नाही.” आणि कॉईन पुढे म्हणतात, की “येशू ख्रिस्ताने त्या ग्रहांवरील रहिवाशांचेसुद्धा तारण केले आहे की नाही.” (g०२ ११/२२)

तापमापकाने होणारी विषबाधा

“केवळ एका थर्मोमीटरमधला पारा ११ एकर तलावातील पाणी दूषित करू शकतो; आणि दर वर्षी, फुटलेल्या थर्मोमीटरमधला सुमारे १७ टन पारा अमेरिकेतल्या सांडपाण्यात जातो,” असे नॅशनल जिओग्राफिक मासिक म्हणते. मासे हा पारा खातात आणि मनुष्य हे मासे खाऊन आपल्या शरीरात हा धातू घेतात ज्यामुळे मज्जातंतूवर हानीकारक परिणाम घडू शकतात. बहुसंख्य शहरांमध्ये तसेच बॉस्टनमध्येसुद्धा पारा असलेल्या थर्मोमीटर्सवर केव्हाच बंदी घालण्यात आली आहे; येथील काही दुकानांत पारा असलेले थर्मोमीटर देऊन त्याबदल्यात अंकीय किंवा डिजिटल थर्मोमीटर व इतर कमी हानीकारक उपकरणे घेता येतात. (g०२ १०/०८)

सर्वात जलद रोलर कोस्टर

जपानच्या असाही शिंबुन नावाच्या वृत्तपत्राने अशी बातमी दिली, की “फुजीक्यू हायलँड करमणुकीच्या बागेत जगातील सर्वात जलद रोलर कोस्टर सुरू करण्यात आला आहे.” “थांबल्या ठिकाणापासून दोन पेक्षा कमी सेकंदात ताशी १७२ किलोमीटर वेगाने सुरू होणारा हा रोलर कोस्टर डेरिंग असलेल्या लोकांसाठीच आहे. त्यात बसणाऱ्‍यांना असे वाटते जणू काय ते रॉकेटमधूनच बाहेर पडत आहेत. त्यांना लढाऊ वैमानिक सहसा अनुभवत असलेले गुरूत्वीय आकर्षण जाणवते.” हा रोलर कोस्टर बनवणाऱ्‍या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर हीथ रॉबर्टसन यांनी म्हटले: “हवेत सोडताना विमानाचा जमिनीवरील वेग २.५ [गुरुत्वीय बलाच्या २.५ पटीने अधिक] इतका असू शकतो. पण या रोलर कोस्टरचे ३.६ गुरुत्वीय बल आहे.” याची चाके ‘लहान विमानांच्या चाकांसारखी’ आहेत आणि त्याला तीन वात संपीडक आहेत ज्यातून ५०,००० अश्‍वशक्‍ती उत्पन्‍न होते जी “एका लहान रॉकेटसारखी” आहे. (g०२ ०९/२२)

भारतातील तंबाखूसंबंधित हृदयविकार

“[भारतातील] ज्येष्ठ कार्डिओलॉजिस्ट्‌सचे म्हणणे आहे, की अनेक लोकांमध्ये हृदयरोहिणी विकार वाढत चालला आहे,” असे मुंबई न्यूजलाईन मासिकात म्हटले होते. “जसलोक हॉस्पिटलमधील, कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. अश्‍वीन मेहता यांच्या मते, भारतीयांना हृदयविकार होण्याची जनुकीय प्रवृत्ती आहे.” पुष्कळ तरुण लोकांना “अतिधूम्रपानामुळे हृदयविकार जडत आहे,” ही चिंतेची बाब आहे. बॉम्बे हॉस्पीटलचे कन्सलटंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. पी. एल. तिवारी यांच्या मते ठोस पावले न उचलल्यास भारत हा हृदयविकाराचे सर्वाधिक रुग्ण असलेला पहिल्या नंबरावरचा देश होईल. शेजारच्या बांगलादेशात, ३५-४९ वयोगतील ७० पेक्षा अधिक टक्के पुरूष धूम्रपान करतात आणि “मिळकतीत जसजशी घट होत गेली तसतसे धूम्रपान करण्याच्या प्रमाणात वाढ होत गेली,” असे द टाईम्स ऑफ इंडिया मासिक म्हणते. सरासरी, धूम्रपान करणारी प्रत्येक व्यक्‍ती, “तिला लागणारा कपडालत्ता, घर, आरोग्य आणि शिक्षण यांसाठी होणाऱ्‍या एकूण खर्चाच्या तुलनेत सिगारेटींवर दुप्पट खर्च करते.” तंबाखूवर खर्च केला जाणारा पैसा जर अन्‍नासाठी वापरण्यात आला असता तर या गरीब देशातील १०.५ कोटी कुपोषित लोकांना पुरेसे अन्‍न खायला मिळाले असते, असा अंदाज लावला जातो. (g०२ ०९/२२)

आकाशाकडे झेपावणाऱ्‍या इमारतींची अजूनही मागणी

“ट्‌वीन टॉवर कोसळल्यामुळे, अचंबित झालेले वास्तुशिल्पकार आणि अभियंते यांना एक नवीन व भीतीदायक जाणीव होऊ लागली आहे,” असे यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टने म्हटले. “लोकांना तात्पुरती चिंता असली तरी, गगनचुंबी इमारतींबद्दलची मागणी कमी होणार नाही.” याचे एक कारण म्हणजे, जागा कमी व खूपच महाग झाली आहे. शिवाय, शहरांना बढाई मारायची असते. “एखाद्या ठिकाणाला, आधुनिक नाव आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथे अतिउंच इमारती बांधल्या जात आहेत,” असे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील वास्तुशास्त्र आणि परिलेख शाळेचे प्रमुख विल्यम मिशल यांचे म्हणणे आहे. परंतु, होता होईल तितक्या सुरक्षित इमारती कशा बांधल्या जाऊ शकतात यावर वास्तुशिल्पकारांचा वादविवाद चालला आहे. स्फोटकविरोधी भिंती व खिडक्या लावून इमारती मजबूत अशा बांधता येऊ शकतात परंतु त्या पुष्कळ वजनदार व खूपच महाग पडतात. चीनमध्ये, बांधकाम नियमांत, प्रत्येक १५ मजल्यांनंतर एक खुला, रिकामा “सुरक्षा मजला” असला पाहिजे, या नियमाचा समावेश होतो. इतर ठिकाणी, बांधकाम नियमांत इतरही नियमांचा समावेश होतो जसे की, अगदी वरच्या मजल्यापर्यंत एक अशी लिफ्ट असली पाहिजे जी अग्नीशामक दलासाठी खास बनवण्यात आली पाहिजे तसेच अशा पायऱ्‍या असाव्यात जेथे हवेचा दाब वाढेल आणि परिणामतः धूर बाहेरच राहील. शांघाय जागतिक आर्थिक केंद्राचे शिल्पकार, आपल्या वास्तुशिल्पात खबरदारीची जादा पावले घेत आहेत; ही इमारत कदाचित जगातील सर्वात उंच इमारत ठरू शकते. (g०२ ०९/२२)