तीस वर्षांनी अनोखी भेट
तीस वर्षांनी अनोखी भेट
सन १९६७ मध्ये, दोन तरुणांची योगायोगाने भेट झाली. अमेरिकेतल्या मिशिगन टेक्निकल विद्यापीठातील वस्तीगृहात ते एकाच खोलीत राहत होते. ओहायोतील लिमा येथील डेनिस शीट्स हा १८ वर्षांचा तरुण त्या वेळी, वनसंवर्धनशास्त्राचा पहिल्या वर्षातील विद्यार्थी होता. आणि वीस वर्षांचा मार्क रूज हा न्यूयॉर्कच्या बफेल्लो येथील होता. तो सिव्हिल इंजिनियरींगचा अभ्यास करणारा तिसऱ्या वर्षातला विद्यार्थी होता.
त्या वेळी, त्यांची मैत्री थोड्या काळापुरतीच असेल असे कदाचित वाटले असावे. त्या दोघांनीही विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केले नाही; ते दोघेही आपापल्या मार्गी गेले. तीसहून अधिक वर्षे ओलांडले. मग, एके दिवशी डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये, या दोघांचीही पुन्हा एकदा भेट झाली. ही आश्चर्यजनक भेट काही अंशी योगायोगाने घडली. पण यामागे दुसरेही एक कारण होते. ते काय होते? याचे उत्तर मिळण्याकरता त्या दोघांच्याही निराळ्या जीवनाचा आपण मागोवा घेऊ या.
डेनिस युद्धाला जातो
कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर डेनिस घरी परतला. मग, डिसेंबर १९६७ मध्ये त्याची भरती अमेरिकन सैन्यात झाली आणि जून १९६८ मध्ये तो व्हिएतनामला गेला. तेथे युद्धाचे भीषण परिणाम त्याने पाहिले. १९६९ साली सैन्यातील त्याचा कालावधी संपला तेव्हा तो पुन्हा अमेरिकेत आला आणि सरतेशेवटी त्याला ओहायोतील एका मोठ्या कंपनीत एक नोकरी मिळाली. पण तरीही तो समाधानी नव्हता.
“अलास्कात स्थाईक होऊन माझी शेती असावी हे माझं स्वप्न होतं,” असे डेनिस म्हणतो. म्हणून, १९७१ साली, तो आपल्या एका माध्यमिक शाळेतील मित्रासोबत ते स्वप्न पूर्ण करायला गेला. पण शेती करण्याऐवजी त्याला पुष्कळ लहानमोठ्या नोकऱ्या कराव्या लागल्या. काही काळापर्यंत त्याने तंबूत राहून अग्निशामक विभागात काम केले. त्याने दाढी वाढवली, केस वाढवले आणि त्याला गांजा ओढण्याची सवय लागली.
डेनिसने १९७२ साली, ल्युसिआना, न्यू ऑर्लिअन्स येथील मार्डी ग्रास उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी अँकोरेज सोडले. त्यानंतर, त्याने आर्कन्सास येथील जंगलात एक छोटेसे केबिन बांधले. तेथे तो घरांच्या फ्रेम्स बनवण्याचे आणि काँक्रीट फिनिशिंगचे काम करू लागला. जून १९७३ मध्ये, आपल्या जीवनातील उद्देश शोधण्याकरता तो देशातल्या विविध ठिकाणी जाऊ लागला.
प्रतियुद्ध चळवळीत मार्क
डेनिसने विद्यापीठ सोडल्यावर मार्क आणखी काही वेळ तेथे राहिला पण त्याला युद्धाला पाठिंबा देणाऱ्या व्यवस्थेचा भाग व्हायचे नव्हते म्हणून त्याने विद्यापीठ सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणून तो आपल्या ठिकाणी म्हणजे बफेल्लो येथे गेला आणि तेथे एका स्टील कंपनीत फोरमनचे काम करू लागला. युद्धाच्या प्रयत्नांनी अद्यापही असंतुष्ट असलेल्या मार्कने नोकरी सोडली, एक मोटारसायकल विकत घेतली आणि तो कॅलिफोर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्को येथे गेला. झाले असे, की डेनिस आणि मार्क हे दोघेही एकाच वेळी सॅन फ्रॅन्सिस्कोत होते पण याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती.
डेनिसप्रमाणे, मार्कनेही दाढी वाढवली, केस लांब ठेवले आणि तोही गांजा ओढू लागला. पण मार्क युद्धविरोधी चळवळींमध्ये खूप गोवलेला होता; तो प्रदर्शनांमध्ये आणि मोर्च्यांमध्ये भाग घेत असे. युद्धात भरती होण्याचे तो चुकवत असल्यामुळे एफबीआय त्याच्या शोधात होते; त्यासाठी काही
वर्षांपर्यंत तो पकडला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या नावांखाली वावरत राहिला. सॅन फ्रॅन्सिस्कोत त्याने हिप्पी जीवनशैली अवलंबली. तेथेच १९७० साली, दोन यहोवाचे साक्षीदार त्याच्या दारी आले.मार्क म्हणतो: “मला याबाबतीत रस आहे असे समजून ते कदाचित माझ्याकडे पुन्हा आले असावेत. त्या वेळी मी घरी नव्हतो, पण त्यांनी एक हिरवे बायबल आणि तीन पुस्तके ठेवली.” पण मार्क राजकीय हालचालींमध्ये आणि मौजमजा करण्यात इतका दंग होता की त्याने ती पुस्तके वाचली नाहीत. एफबीआयनेही त्याचा पिच्छा अद्याप सोडलेला नव्हता. म्हणून आपले नाव बदलून तो वॉशिंग्टन, डी.सी. येथे राहायला गेला. त्याच्या विद्यापीठातली त्याची मैत्रीण कॅथी यनीसकीव्हीस ही त्याच्यासोबत राहायला गेली.
शेवटी, १९७१ साली, तो एफबीआयच्या हाती सापडला. एफबीआयचे दोन एजंट वॉशिंग्टन, डी.सी.हून न्यूयॉर्कपर्यंत त्याच्यासोबत विमानात गेले आणि तेथून तो टोरोंटा, कॅनडात गेल्याची त्यांनी खात्री केली. एफबीआयला सुव्यवस्थेकरता त्याचा कसलाही धोका जाणवला नाही; मात्र त्यांना त्याला देशाबाहेर पाठवायचे होते. पुढच्या वर्षी कॅथी आणि त्याचा विवाह झाला आणि ते दोघेही गॅब्रिओला आयलंड, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथे राहायला गेले. त्यांना समाजापासून दूर जायचे होते पण जीवनात पुष्कळसे काही आहे असेही त्यांना वाटत होते.
ते साक्षीदार बनतात
तुम्हाला अजून आठवत असेल की, डेनिस या दरम्यान जीवनातला उद्देश शोधण्याकरता देशभर प्रवास करत होता. त्याच्या या दौऱ्यामुळे तो माँटाना येथे आला; तेथे शिनुक शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका ठिकाणी एका शेतकऱ्याकडे त्याला कापणीच्या वेळी काम मिळाले. या मनुष्याची पत्नी आणि त्याची मुलगी यहोवाचे साक्षीदार होते. डेनिसला त्यांनी सावध राहा! मासिकाचा एक अंक वाचायला दिला. आणि थोडक्यातच त्याला खात्री पटली की साक्षीदारांचा धर्म खरा आहे.
डेनिसने शेतावरचे काम सोडले आणि एक बायबल सोबत घेऊन तो कालसस्पेल, माँटाना येथे राहायला गेला. तेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला तो पहिल्यांदा गेला. त्या सभेत त्याने बायबल अभ्यासाची मागणी केली. त्यानंतर काही काळातच त्याने आपले लांब केस कापले आणि दाढी काढली. जानेवारी १९७४ साली तो पहिल्यांदा प्रचार कार्यासाठी गेला आणि मार्च ३, १९७४ मध्ये पोल्सन, माँटाना येथे एका हौदात त्याचा बाप्तिस्मा झाला.
यादरम्यान, गॅब्रिओला बेटावर राहणाऱ्या मार्क आणि कॅथीने आपल्याजवळ पुष्कळ वेळ असल्यामुळे बायबलचे परीक्षण करण्याचे ठरवले. त्यांनी किंग जेम्स व्हर्शन वाचायला सुरू केली पण त्यातली जुनी इंग्रजी त्यांना समजायला कठीण जात होती. मग मार्कला आठवले की, साक्षीदारांनी दिलेले बायबल आणि पुस्तके त्याच्याजवळ अजूनही होती. सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते आणि बायबल खरोखर देवाचे वचन आहे का? (इंग्रजी) या पुस्तकांसोबत त्यांनी बायबल वाचून काढले. मार्क आणि कॅथीला ज्या नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या त्यांनी ते फार प्रभावित झाले होते.
मार्क म्हणतो: “सत्य पुस्तकातल्या एका गोष्टीची विशेष छाप माझ्या मनावर पडली आणि ती म्हणजे ख्रिश्चनांचा एक गट कोणत्याही परिस्थितीत युद्धात सामील होत नाही. हे लोक खरा ख्रिस्ती धर्म पाळतात असं मला वाटलं.” त्यानंतर काही काळातच, मार्क आणि कॅथी, यांना अटक केली जाण्याची भीती असतानाही ते होटन, मिशिगन येथे कॅथीच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले. तेथे, हिप्पींच्या वेषातच ते साक्षीदारांच्या सभेला उपस्थित राहिले. त्यांनी बायबलचा अभ्यास स्वीकारला आणि एक महिन्यासाठी मिशिगनमध्ये असताना ते अभ्यास करत होते.
गॅब्रिओला बेटावर परतल्यावर, ननायमो, ब्रिटिश कोलंबिया येथील एकदा रस्त्यावर त्यांना एक साक्षीदार भेटली आणि त्यांनी तिला बायबल अभ्यास हवा असल्याचे सांगितले. त्याच दिवशी, बोटीतून एक कारभरून साक्षीदार त्यांच्याकडे आले आणि बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. तीन महिन्यांनी मार्क आणि कॅथी यांनी प्रचारकार्य सुरू केले. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे मार्च १०, १९७४ रोजी दोघांचाही बाप्तिस्मा झाला. डेनिसच्या बाप्तिस्म्यानंतर बरोबर एका आठवड्याने त्यांचा बाप्तिस्मा झाला!
डेनिस पूर्ण-वेळेच्या सेवेत
सप्टेंबर १९७४ साली, डेनिस, पायनियर किंवा पूर्ण-वेळेचा सेवक बनला. तो म्हणतो: “मी पायनियरींग करण्यात एकदम खुश होतो पण मला माझे सेवाकार्य वाढवायचे होते; म्हणून जुलै १९७५ साली मी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा करण्यासाठी अर्ज भरला. त्याच डिसेंबर महिन्यात मला तेथे येण्याचे आमंत्रण मिळालं.”
डेनिसला, मुख्यालयातील सेवकांच्या निवासासाठी भूतपूर्व टॉवर्स हॉटेलचे रूपांतर करण्याची सर्वात पहिली नेमणूक मिळाली. त्याने अनेक वर्षे तेथे काम केले आणि टाईल्सच्या कामाची देखरेख केली. मग, लग्न करण्यासाठी तो कॅलिफोर्नियाला
राहायला गेला. १९८४ साली, कॅथड्रल सिटी मंडळीत वडील म्हणून सेवा करताना त्याने कॅथी एन्स नावाच्या एका पायनियरसोबत लग्न केले.डेनिस आणि कॅथी यांचे मुख्य ध्येय देवाच्या राज्याला प्रथम स्थान देणे हे होते आणि त्याकरता त्यांनी साधीसुधी जीवनशैली जगण्याचे ठरवले होते. त्यामुळे, दक्षिण कॅलिफोर्नियातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या बांधकाम व्यापारात पैसा कमवण्याच्या अनेक संधी डेनिसने नाकारल्या. १९८८ साली त्याने आणि कॅथीने यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय बांधकाम कार्यात मदत करण्यासाठी अर्ज भरला. त्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात, ब्वेनास एअरीझ, आर्जेंटिनाच्या शाखा बांधकाम प्रकल्पावर काम करण्याची त्यांना नेमणूक मिळाली.
डेनिस आणि कॅथीला १९८९ साली, यहोवाच्या साक्षीदारांच्या बांधकाम कार्यात कायमसाठी सेवा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. पूर्ण-वेळेच्या या खास प्रकारात त्यांनी सुरीनाम आणि कोलंबिया येथे दोन वेळा सेवा केली. त्यांनी एक्वाडोर आणि मेक्सिकोतील शाखेच्या बांधकाम प्रकल्पावर तसेच डोमिनिकन रिपब्लिकमधील अशाच एका प्रकल्पावर काम केले.
पूर्ण-वेळेच्या सेवेत मार्क
लष्करात भरती होऊ नये म्हणून कॅनडाला पलायन केलेल्या हजारो अमेरिकन तरुणांबरोबर मार्कलाही १९७६ साली अमेरिकन सरकारने माफ केले. तो आणि त्याची पत्नी, कॅथी, यांनीही सेवेत अधिक वेळ खर्च करता यावा म्हणून साधी जीवनशैली जगण्याची इच्छा धरली. म्हणून मार्कने सर्व्हेअर म्हणून अर्ध-वेळेची नोकरी घेतली आणि त्याने व कॅथीने बाप्तिस्म्याआधी, त्यांचे कर्ज हळूहळू पूर्णपणे फेडले.
कॅनडातले साक्षीदार, १९७८ साली टोरोंटो, ओन्टारियोजवळ नवीन शाखा संकुल बांधण्याची योजना करत होते तेव्हा मार्क आणि कॅथी स्वतःला सादर करण्याच्या स्थितीत होते. मार्कला सर्व्हेइंगचा अनुभव असल्यामुळे त्यांना बांधकामाच्या कामासाठी आमंत्रण मिळाले. त्यांनी जून १९८१ साली हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्या प्रकल्पावर जॉर्जटाऊन येथे काम केले. नंतर, ते पुन्हा एकदा ब्रिटिश कोलंबिया येथे राहायला गेले आणि पुढील चार वर्षे त्यांनी तेथील यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलन गृहाचे बांधकाम करण्यात मदत केली. ते पूर्ण झाल्यावर, त्यांना पुन्हा कॅनडा शाखेचा विस्तार होताना काम करण्यासाठी बोलावण्यात आले.
जॉर्जटाऊनमध्ये राहून काही महिने झाल्यावर १९८६ साली, मार्क आणि कॅथी यांना कॅनडा शाखेत नियमित सदस्य म्हणून तेथे राहण्याचे आमंत्रण मिळाले. तेव्हापासून ते शाखेत आहेत आणि अनेक देशांमध्ये त्यांना बांधकामाच्या कार्यात पुष्कळदा काम करायला मिळाले आहे. मार्कच्या सर्व्हेइंगच्या अनुभवामुळे तो दक्षिण आणि मध्य अमेरिकेत त्याचप्रमाणे कॅरिबियनमधील बेटांवर यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा इमारतींचे आणि संमेलन गृहांचे सर्व्हेइंग करू शकला आहे.
गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्याने व कॅथीने व्हेनेझुएला, निकाराग्वा, हाइती, गयाना, बार्बाडोस, बहामास, डोमिनिका, अमेरिका (फ्लोरिडा), आणि डोमिनिकन प्रजासत्ताक येथे सेवा केली आहे. पूर्ण-वेळ सेवेच्या या खास प्रकारामुळे मार्क आणि डेनिसची पुन्हा एकदा भेट झाली.
डोमिनिकन प्रजासत्ताकमध्ये भेट
डोमिनिकन प्रजासत्ताकमध्ये मार्क आणि डेनिस दोघेही एकसारख्या प्रकल्पांवर काम करत होते आणि याची त्यांना कल्पनाही नव्हती. एके दिवशी, सँटो डोमिंगो येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखेत दोघांची अचानक भेट घडली. त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! ते दोघेही ३३ वर्षांनंतर भेटत होते आणि त्यांना एकमेकांना पुष्कळ काही सांगायचे होते. तुम्ही वर वाचलेल्या बहुतेक गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितल्या. पण त्या दोघांच्या जीवनात किती साम्य
होते याचे त्यांना त्याचप्रमाणे इतरांनाही ऐकून सर्वात जास्त आश्चर्य वाटले.दोघेही हिप्पी बनले होते आणि आधुनिक भौतिक जीवन आणि त्याच्या चिंतांपासून दूर राहण्यासाठी ते एकान्ताच्या ठिकाणी राहायला गेले होते. डेनिसने कॅथी नावाच्या मुलीशी लग्न केले; मार्कच्या पत्नीचेही नाव कॅथी आहे. दोघांनीही यहोवाच्या साक्षीदारांच्या पहिल्या सभेतच बायबल अभ्यास स्वीकारला. दोघांचाही बाप्तिस्मा मार्च १९७४ मध्ये झाला. दोघेही यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखेचे सदस्य बनले—डेनिस अमेरिकेत आणि मार्क कॅनडात. दोघांनीही आध्यात्मिक ध्येय ठेवण्यासाठी आपली जीवनशैली साधी ठेवण्याचा प्रयत्न केला. (मत्तय ६:२२) दोघेही आंतरराष्ट्रीय बांधकामाच्या कार्यात गोवले गेले आणि दोघांनाही निरनिराळ्या देशांमध्ये नेमणुका मिळाल्या. डोमिनिकन प्रजासत्ताकातील योगायोगाच्या भेटीशिवाय त्या दोघांचीही भेट बायबल सत्ये स्वीकारलेल्या पूर्वीच्या मित्रांशी झाली नव्हती.
ही योगायोगाची भेट नशीबामुळे घडली असा मार्क आणि डेनिसचा विश्वास आहे का? मुळीच नाही. त्यांना हे ठाऊक आहे की, बायबल म्हणते त्याप्रमाणे “समय व प्रसंग हे [आपल्या] सर्वांना घडतात”—काही वेळा ते अशा आश्चर्यकारक पद्धतींनी घडतात. (उपदेशक ९:११) परंतु, त्यांना हे देखील माहीत आहे की, त्यांची भेट होण्यामागे आणखी एक कारण होते आणि ते म्हणजे, जीवनाच्या उद्देशाविषयी त्या दोघांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आणि यहोवा देवाविषयी त्यांना असलेले प्रेम.
डेनिस आणि मार्कच्या कहाणीत, बायबल सत्य शिकणाऱ्या प्रामाणिक अंतःकरणाच्या सर्व लोकांमध्ये आढळणाऱ्या काही समान गोष्टी देखील दिसून येतात. डेनिस म्हणतो: “मार्क आणि मला जो अनुभव आला त्यातून यहोवाला लोकांच्या जीवनाची माहिती असते आणि त्यांच्या अंतःकरणाची योग्य मनोवृत्ती दिसल्यास तो त्यांना स्वतःकडे आर्कषून घेतो हे दिसून येते.”—२ इतिहास १६:९; योहान ६:४४; प्रेषितांची कृत्ये १३:४८.
मार्क पुढे म्हणतो: “आमच्या या अनुभवाने आम्हाला हे समजून घ्यायला देखील शिकवले आहे की, यहोवाच्या दर्जांनुसार एक व्यक्ती स्वतःत बदल करते, त्याला आपले जीवन समर्पित करते, स्वतःला उपलब्ध करून देते तेव्हा यहोवा आपल्या लोकांच्या भल्याकरता त्या व्यक्तीच्या कुशलतेचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग करून घेऊ शकतो.”—इफिसकर ४:८.
शिवाय त्यांच्या अनुभवातून हेसुद्धा दिसून येते की, पूर्ण अंतःकरणाने केलेल्या लोकांच्या सेवेवर यहोवा आशीर्वाद देतो. डेनिस आणि मार्क या दोघांनाही अशा आशीर्वादाचा प्रत्यय आला आहे. डेनिस म्हणतो: “पूर्ण-वेळेच्या खास सेवेत राज्याच्या वाढीकरता काम करणे हा एक बहुमान आहे. यामुळे जगभरातील ख्रिस्ती बंधू-बहिणींसोबत काम करताना आम्हाला एकमेकांना प्रोत्साहन देता आले आहे.”
मार्क म्हणतो: “आपल्या राज्याला प्रथम स्थान देणाऱ्यांना यहोवा निश्चित आशीर्वादित करतो. कॅनडाच्या शाखा कुटुंबाचा सदस्य म्हणून सेवा करण्याची आणि आंतरराष्ट्रीय बांधकामाच्या कार्यात सेवा करण्याची संधी माझ्याकरता एक खास आशीर्वाद ठरला आहे.”
ही अनोखी भेट म्हणता येईल का? होय, कारण मार्क म्हणतो: “आम्हा दोघांनाही एकमेकांना भेटण्याचा सर्वात जास्त आनंद झाला त्याचे कारण असे की, अनोखा देव, यहोवा याला आम्ही दोघांनीही जाणले, त्याच्यावर प्रेम केले आणि आता दोघेही त्याची सेवा करत आहोत.” (g०२ १०/२२)
[१७ पानांवरील चित्र]
डेनिस, १९६६
[१७ पानांवरील चित्र]
मार्क, १९६४
[१९ पानांवरील चित्र]
दक्षिण डाकोटा येथे डेनिस, १९७४
[१९ पानांवरील चित्र]
ओन्टारियो येथे मार्क, १९७१
[२० पानांवरील चित्र]
योगायोगाच्या अनोख्या भेटीनंतर लगेच डेनिस आणि मार्क आपल्या पत्नींसोबत, २००१