पाणी जाते तरी कोठे?
पाणी जाते तरी कोठे?
ऑस्ट्रेलियातील सावध राहा! लेखकाद्वारे
गोंधळ! हीच माझी पहिली प्रतिक्रिया होती. माझ्या बाथरूममधून वर येणारे गढूळ पाणी माझ्या घरात भरून घाण वास येणार असे दिसत होते. मी तत्काळ प्लमरला बोलावले. मी त्याची वाट पाहत बसलो. माझे मोजे पाण्यात भिजू लागले आणि मी गोंधळून विचारात पडलो की, ‘हे पाणी आलं कुठून?’
ड्रेनमध्ये अडकलेली घाण काढता काढता प्लमरने मला थोडे स्पष्टीकरण दिले: “शहरातला सामान्य रहिवाशी दिवसाला २०० ते ४०० लिटर [५० ते १०० गॅलन] पाणी वापरतो. प्रत्येक पुरुष, स्त्री आणि बालकामागे वर्षाला १,००,००० लिटर [२५,००० गॅलन] पाणी वापरले जाते.” मी विचारले: “पण इतकं पाणी मी कशाला वापरेन? पिण्यासाठी तर इतकं लागत नाही!” तो म्हणाला, “नाही, पण दररोज तुम्ही अंगावर पाणी घेता किंवा अंघोळ करता, शौचालयात पाणी वापरता आणि कदाचित वॉशिंग मशिन किंवा डिशवॉशर वापरता. या आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या वाडवडिलांपेक्षा दुप्पट प्रमाणात आपण पाण्याचा वापर करतो.” मग माझ्या मनात प्रश्न आला, ‘हे सगळं पाणी कुठे जात असावं?’
मला लक्षात आले की, दररोज आपण ज्या पाण्याचा वापर करतो त्याचे काय केले जाते हे विविध देशांच्या किंवा शहरांच्या विविध पद्धतींवर अवलंबून आहे. काही देशांमध्ये हा सध्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. (पृष्ठ २७ वरील चौकोन पाहा.) माझ्या परिसरातील सांडपाणी शुद्धीकरण कारखान्यात तुम्ही भेट द्यायला या आणि हे सगळे पाणी कोठे जाते व आपण कोठेही राहत असलो तरी ड्रेनमध्ये किंवा शौचालयात काहीही टाकण्याआधी विचार करणे फायद्याचे का आहे ते पाहा.
शुद्धीकरण कारखान्याला भेट
शुद्धीकरण कारखाना तुम्हाला किळसवाणे ठिकाण वाटेल. माझेही तेच मत आहे. पण, आपले शहर स्वतःच्या घाणीत पुरले जाऊ नये म्हणून आपल्यातील बहुतेक जण या शुद्धीकरण कारखान्यावर अवलंबून आहेत—आणि हे कारखाने सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी आपलाही त्यात हातभार आहे. सुप्रसिद्ध सिडनी हार्बरच्या दक्षिणेकडे असलेल्या मॅलबार येथील प्राथमिक शुद्धीकरण कारखाना येथे आम्ही जाणार आहोत. माझ्या बाथरूममधले पाणी या कारखान्यात कसे जाते?
शौचालयात, सिंकमध्ये किंवा अंघोळीच्या वेळी वापरलेले पाणी सांडपाण्याच्या शुद्धीकरण कारखान्याकडे जाते. ५० किलोमीटरचा प्रवास केल्यावर हे पाणी शुद्धीकरण कारखान्यात प्रती दिवशी जमा होणाऱ्या ४८ कोटी लिटर पाण्यात येऊन मिसळते.
हा शुद्धीकारण कारखाना पाहायला किळसवाणा किंवा वासमारा का नाही याविषयी कारखान्यातील कम्युनिटी लायझॉन अधिकारी, रॉस, म्हणाले: “कारखान्याचा बहुतांश भाग जमिनीखाली आहे. यामुळे निर्माण होणारे वायु एकत्र करून ते वायु शुद्धीकरण साधनांकडे (मोठ्या मडक्याच्या आकाराच्या चिमण्यांची रांग) आम्हाला पाठवता येतात ज्यांमध्ये दुर्गंधी दूर केली जाते. मग स्वच्छ केलेला वायु वातावरणात सोडला जातो. या कारखान्याभोवती हजारो घरे असली तरी वर्षातून केवळ
दहा लोक फोन करून घाण वास येत असल्याची तक्रार करतात.” रॉस आता आम्हाला ही “दुर्गंधी” कशामुळे निर्माण होते ते दाखवायला नेत आहेत असे दिसते.सांडपाणी काय असते?
कारखान्यात जाण्यासाठी खाली उतरताना, आमचा गाईड म्हणतो: “सांडपाण्यात ९९.९ टक्के पाणी शिवाय मल, रसायने आणि इतर लहानमोठ्या गोष्टी असतात. ५५,००० हेक्टरच्या [१,३०,००० एकर] परिसरातील घरांमधून आणि कंपन्यांतून २०,००० किलोमीटर [१२,००० मैल] दूरपर्यंत असलेल्या पाईपमधून येणारे सांडपाणी समुद्र सपाटीपासून दोन मीटर [६ फूट] खाली असलेल्या कारखान्यात येते. येथे आल्यावर हे पाणी अनेक गाळण्यांमधून पार होऊन त्यातील फडकी, दगड, कागद आणि प्लॅस्टिकसारख्या वस्तू गाळल्या जातात. त्यानंतर, रेवकुंडात,
पाण्यामध्ये बुडबुडे निर्माण करून जैव पदार्थ पाण्यात निलंबित स्थितीत आणले जातात, आणि जड रेव तळाशी साठते. हे अजैव अपशिष्ट गोळा करून जमीन भरण्याच्या ठिकाणी पाठवले जाते. उरलेले सांडपाणी १५ मीटर [५० फूट] वरती अवसादन टाक्यांमध्ये पाठवले जाते.”या टाक्या फुटबॉलच्या मैदानाच्या आकारमानाच्या असतात; वायू शुद्धीकरणाची व्यवस्था परिणामकारक नसल्यास शेजाऱ्यांकडून किती तक्रारी येतील याची कल्पना तुम्हाला येथे आल्यावर होईल. या टाक्यांमधून पाणी मंदगतीने वाहत असताना, तेल आणि ग्रीससारखे पदार्थ पाण्यावर तरंगतात आणि ते काढले जातात. पण जैव पदार्थ अर्थात गाळ तळाशी जमतो आणि यंत्रसंचलित पट्ट्यांनी तो गोळा करून पुढे अधिक प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जातो.
हे प्रक्रिया केलेले सांडपाणी तीन किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलाधिवाहिनीतून समुद्रात जाते. तेथे हे पाणी समुद्रतळाच्या वर, लाटांच्या ६० ते ८० मीटर खाली समुद्रात सोडले जाते. तीव्र समुद्रप्रवाहांनी हे सांडपाणी वाहून नेले जाते आणि खाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्माने शुद्धीकरणाची प्रक्रिया संपुष्टात येते. शुद्धीकरण कारखान्यात राहिलेला गाळ अवायुजीवी स्वयंक्षपण टाक्यांमध्ये टाकला जातो आणि तेथे सूक्ष्मजंतू या जैव पदार्थांचे विघटन करून मिथेन वायू आणि विघटित गाळ निर्माण करतात.
गाळापासून माती
दीर्घ निःश्वास सोडून मी, रॉससोबत शुद्ध हवेत वर आलो आणि आम्ही एका हवाबंद गाळाच्या टाकीवर चढलो. ते पुढे म्हणाले: “सूक्ष्मजंतूंनी निर्माण होणाऱ्या मिथेन [वायुद्वारे], इलेक्ट्रिक जेनरेटर्स चालवले जातात आणि ६० हून अधिक टक्के शक्तीपुरवठा शुद्धीकरण कारखान्यासाठी केला जातो. विघटित गाळ निर्जंतुक करून त्यात चुना मिसळून बायोसॉलिड नावाचा वनस्पतींना अत्यंत पोषक असलेला एक उपयुक्त पदार्थ तयार होतो. एकट्या मॅलबार सांडपाणी शुद्धीकरण कारखान्यात वर्षाला ४०,००० टन बायोसॉलिड तयार होते. दहा वर्षांआधी प्रक्रिया न केलेला गाळ जाळून टाकला जात असे किंवा समुद्रात फेकला जात असे; पण आता याचा उत्तम उपयोग केला जातो.”
रॉस मला एक ब्रोशर देतात ज्यात अशी माहिती दिली आहे: “बायोसॉलिड्सचा उपयोग केल्यावर [न्यू साऊथ वेल्स] येथील जंगलांमध्ये २० ते ३५ टक्के वाढ दिसून आली.” त्यात असेही म्हटले होते की, ‘बायोसॉलिड्स घातलेल्या जमिनीत गव्हाचे पीक काढल्याने ७० टक्के अधिक उत्पन्न निघाले आहे.’ यावरून मला असे वाटते की, विघटित बायोसॉलिड्स माझ्या फुलबागेसाठी वापरण्यात काहीच हरकत नाही.
दृष्टिआड सृष्टी
आमची टूर संपल्यावर आमच्या गाईडने आम्हाला पुन्हा आठवण करून दिली की, ड्रेनमध्ये पेंट, कीटकनाशके, औषधे किंवा तेल ओतल्याने शुद्धीकरण कारखान्यातील सूक्ष्मजंतू मरू शकतात आणि यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. ते म्हणाले की, ‘आपल्या रक्तवाहिन्यांप्रमाणेच प्लमिंग व्यवस्थेतील वाहिन्यांमध्ये देखील तेल आणि मेदयुक्त पदार्थांनी अडखळण निर्माण होते आणि शौचालयात डिस्पोझेबल डायपर्स, फडकी आणि प्लॅस्टिक टाकल्याने ती काही गायब होत नाहीत. तर त्यांच्यामुळे वाहिन्या तुंबल्या जातात.’ मला हा धडा शिकायला मिळाला की, कसलाही कचरा पाणी ओतून नजरेसमोरून घालवला तरी तुंबलेले पाणी ड्रेनमधून बाहेर येऊ लागले तर त्याची पुन्हा आठवण होते. म्हणून अंघोळ करतेवेळी, शौचालय किंवा सिंक वापरतेवेळी तिथले पाणी कोठे जाते त्याचा विचार करा. (g०२ १०/०८)
[२१ पानांवरील चौकट/चित्र]
सांडपाण्यातून पिण्याचे पाणी
ऑरेंज काउंटी या कॅलिफोर्नियातील कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील लाखो रहिवाशांना सांडपाण्याच्या समस्येवर एक अत्याधुनिक तोडगा सापडला आहे. लाखो लिटरचे सांडपाणी थेट समुद्रात सोडण्याऐवजी यातील बहुतांश पाणी पिण्याच्या पाणीपुरवठ्याला पाठवले जाते. एका सांडपाणी शुद्धीकरण कारखान्याद्वारे ही मोठी कामगिरी अनेक वर्षांपासून साध्य केली जात आहे. प्राथमिक शुद्धीकरणानंतर, सांडपाण्यावर द्वितीय आणि तृतीय प्रक्रिया करण्यात येते. यामध्ये हे पाणी साधारण पिण्याच्या पाण्यासारखे शुद्ध केले जाते. त्यानंतर ते जमिनीतल्या पाण्यासोबत मिसळले जाऊन जमिनीखालच्या पाण्यात जाते. अशाप्रकारे, पाण्यात भर पडते आणि त्यात खारे पाणी मिसळले जाऊन जमिनीखालचा पाणीपुरवठा खराब होण्याचेही टळते. या प्रांताची ७५ टक्के पाण्याची गरज या जमिनीखालच्या पाणीपुरवठ्यातून भागवली जाते.
[२३ पानांवरील चौकट]
पाण्याचा जपून वापर करण्याच्या पाच पद्धती
◼ गळणारे वॉशर बदलून टाका—गळक्या नळातून वर्षाला ७,००० लिटर पाणी वाया जाऊ शकते.
◼ तुमच्या शौचालयात पाणी गळते का ते तपासा—यामुळे वर्षाला १६,००० लिटर पाणी वाया जाऊ शकते.
◼ पाण्याची बचत करणारा शॉवर हेड वापरा. साधारण शॉवर हेडमधून मिनिटाला १८ लिटर पाणी येते; तर कमी प्रवाहाच्या शॉवर हेडमधून मिनिटाला ९ लिटर पाणी येते. चार लोकांच्या कुटुंबात वर्षाला ८०,००० लिटर पाणी वाचवले जाईल.
◼ तुमच्याकडे ड्युएल-फ्लशची व्यवस्था असलेले शौचालय असेल तर शक्यतो अर्धे फ्लश करण्याचे बटन वापरा—यामुळे चार व्यक्तींच्या कुटुंबामागे दरवर्षी ३६,००० हून अधिक लिटर पाणी वाचवले जाते.
◼ तुमच्या नळाला एरेटर बसवून घ्या—त्यांची किंमत जास्त नसते आणि त्यांच्यामुळे पाण्याचा प्रवाह निम्मा होतो पण परिणाम तोच असतो.
[२३ पानांवरील चौकट]
जागतिक सांडपाणी संकटप्रसंग
“अजूनही १२० कोटी लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही तर २९० कोटी लोकांजवळ स्वच्छतेच्या योग्य सुविधा नाहीत; यामुळे दरवर्षी ५० लाख व्यक्ती खासकरून बालके पाण्याद्वारे होणाऱ्या रोगांनी मृत्यूमुखी पडतात.”—नेदरलंडमधील हेग येथे भरवलेले दुसरे जागतिक पाणी चर्चापीठ.
[२२ पानांवरील रेखाचित्र/चित्रे]
मॅलबार येथील सांडपाणी शुद्धीकरण कारखाना (साधे वर्णन)
१.सांडपाणी कारखान्यात प्रवेश करते
२.गाळणे
३.रेवकुंड
४.जमीन भरण्याचे ठिकाण
५.अवसादन टाक्या
६.समुद्रात
७.अवायुजीवी स्वयंक्षपण टाक्या
८.विद्युत जेनरेटर्स
९.बायोसॉलिड साठवण टाकी
[चित्रे]
अवायुजीवी स्वयंक्षपण टाक्यांमध्ये गाळाचे रूपांतर उपयुक्त खत आणि मिथेन वायुत होते
मिथेन वायुचे ज्वलन करून विद्युतशक्ती निर्माण केली जाते