व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ब्रिटनचा बिजू जंगलाचा जहागीर

ब्रिटनचा बिजू जंगलाचा जहागीर

ब्रिटनचा बिजू जंगलाचा जहागीर

ब्रिटनमधील सावध राहा! लेखकाद्वारे

कस्तूरकाच्या गाण्याने जंगलातील शांत वातावरणाचा भंग झाला. दिवस मावळतीला झुकला होता. मी एका सिल्व्हर बर्चच्या पडलेल्या झाडावर बसून परिसर न्याहाळत होतो; पावसाच्या हलक्याशा सरीनंतर भिजलेल्या वनस्पतींचा सुवास संध्याकाळच्या हवेत दरवळत होता.

मी मुद्दामहून अशी जागा निवडली होती जेथे वाऱ्‍याची झुळुक माझ्या दिशेने येईल; कारण मी बिजूंचे निरीक्षण करायला आलो होतो. बिजूंचे डोळे आणि पांढऱ्‍या टोकांचे कान बारीक असतात, पण त्यांच्या ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता एकदम तीव्र असते हे मला माहीत आहे. मला चांगले ठाऊक होते की, त्याला माझी जराही चाहुल लागली किंवा माझा वास लागला तर ते थेट बिळात शिरून संपूर्ण रात्रभर बाहेर येणार नाही.

युरोपियन बिजू हा मोठा, लपून राहणारा प्राणी आहे; त्याची लांबी सुमारे एक मीटर आणि उंची ३० सेंटीमीटर इतकी असून सरासरी वजन सुमारे १२ किलोग्रॅम इतके असते. याच्या अंगावर करड्या रंगाचे राठ केस असतात, तोंड व पोटाचा भाग काळ्या रंगाचा असतो. याचे पाय छोटे, काळ्या रंगाचे आणि शेपूट आखूड व करड्या रंगाची असते. पायाला पाच बोटे आणि तीक्ष्ण नख्या असतात.

मुस्कटापासून कानांपर्यंत गेलेल्या तीन पांढऱ्‍या पट्ट्या हे त्याचे वैशिष्ट्य आहे शिवाय वादाचा विषयही आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, गुडुप अंधारात, हे बिजू आपल्या जातीच्या इतर प्राण्यांना या पट्ट्यांद्वारे ओळखतात—परंतु, बिजू एकमेकांना वासाने ओळखतात हे आपल्याला माहीत आहे. या पट्ट्यांचे कारण काहीही असले तरी एक गोष्ट मात्र खरी की यामुळे बिजू देखणा दिसतो.

बिजू हा प्राणी ब्रिटनच्या ग्रामीण भागात सर्रास आढळतो. उकरण्याची सवय असलेला बिजू, बिळे किंवा खड्डे करून त्यात राहतो. ही बिळे ३० मीटर व्यासाची आणि ३०० मीटर लांबीची असू शकतात! बिजू हा निशाचर प्राणी असून दिवसा तो आपल्या झोपेच्या खोल्यांमध्ये झोप काढत असतो. मादी आपल्या पिलांना जन्म देते तेव्हा तिच्या खास खोल्यांना गवताचे अस्तर लावले जाते.

या बिळांची तोंडे सहसा ऑल्डर वृक्षांपाशी आणि हॉथॉर्न किंवा विलायती आंचूच्या झुडुपांपाशी जमिनीवर असतात. इंग्लंडमध्ये, काही बिळांना ५० हून अधिक तोंडे आहेत आणि ही बिळे १५० वर्षांपेक्षा जुनी आहेत; अशा बिळांमध्ये, एकाच कुटुंबाच्या कित्येक पिढ्या राहू शकतात. बिजू १५ किंवा त्याहूनही अधिक वर्षे जगू शकतात; परंतु, सहसा ते २ ते ३ वर्षांपर्यंतच जगतात.

बिजूंची बिळे सहजासहजी ओळखता येतात; त्यांच्या बिळांच्या तोंडापाशी मातीचा ढीग असतो आणि त्यात बिळातून काढून टाकलेले दगड आणि खडकही असतात. बिळाच्या बाहेर टाकलेल्या गोष्टी पाहून हा प्राणी किती शक्‍तिशाली आहे हे तुमच्या लक्षात येईल.

बिळात हे प्राणी आहेत की नाहीत हे कसे ओळखता येते? प्रथम, बिजूंची शौचालये पाहा—हे १५ ते २३ सेंटीमीटर रुंदीचे आणि २३ सेंटीमीटर खोलीचे खड्डे असतात व ते बिळाच्या चहुबाजूला असतात. त्यात मल दिसला आणि तो ओला असला तर त्याचा अर्थ बिजू बिळात आहेत. शिवाय, बिळातून बाहेर जाणाऱ्‍या वाटा पाहा आणि उन्हाळ्यात, आजूबाजूला कुरतडलेल्या वनस्पती आहेत का ते पाहा. ओल्या मातीत बिजूच्या पायांच्या खुणा पाहा किंवा बिळाच्या जवळ झाडांवर चिखल लागलेला किंवा ओरखडे आहेत का ते पाहा. मांजरीप्रमाणे हे प्राणी पुढच्या दोन पायांनी झाडाला धरून अंग ताणतात तेव्हा या खुणा होतात. एखादे बिळ फारच मोठे असले तर निरीक्षण करणे कठीण असू शकते कारण बिजू दुसऱ्‍या एखाद्या प्रवेशद्वारातून येत-जात असतील. त्यामुळे दिवसा जाऊन प्रत्येक बिळावर काटक्या ठेवा. दुसऱ्‍या दिवशी सकाळी, या प्राण्यांनी कोणती बिळे वापरली आहेत ते तुमच्या लक्षात येईल—काटक्या बाजूला सारल्या गेल्या असतील.

अन्‍नाच्या शोधात, बिजू रात्रीच्या वेळी खूप दूरपर्यंत प्रवास करतात. ते ओक किंवा बीचच्या वृक्षांची फळे खातात किंवा बिळातील सशांची पिले वासाने खणून काढतात किंवा गांधीलमाशीचे घरटे शोधून त्यातले डिंभ खातात. पण त्याचे मुख्य अन्‍न काय असावे? गांढूळ. तसे पाहिले तर, बिजू मिळेल ते खातात; रान फळे, ब्लुबेलचे कंद, मशरूम आणि कीटक यांच्यावरही ते उपजीविका करतात. एकदा, जुलै महिन्याच्या एका पावसाळी रात्री मला आठवते की, एका बिळातले बिजू तिथल्या तिथेच फिरत होते कारण मैदानातल्या वाढलेल्या गवतात कितीतरी गोगलगाई होत्या—जणू पावसाने त्यांच्याकरता मिष्टान्‍न पुरवले होते.

सहसा बिजूंचे मिलन जुलै महिन्यात होते आणि फेब्रुवारीत मादीला सर्वसाधारणपणे चार ते पाच पिले होतात. ही पिले सुमारे तीन महिन्यांची झाल्यावर ती बिळाच्या तोंडापाशी येऊन वर जमिनीवर खेळतात. पिले एकदाची बिळाबाहेर पडू लागल्यावर नर-मादी दोघेही बिळातले अस्तर बदलतात. बिजू अत्यंत नीटनेटके प्राणी असतात; त्यांची बिळे फार स्वच्छ असतात. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बिळातले अस्तर बदलण्याची प्रथा सामान्य असली तरी हे काम वर्षात कधीही केले जाते. नर-मादी वाळलेले गवत आणि झाड-पाला बिळाबाहेर ओढून काढतात आणि त्याऐवजी नवीन अस्तर घालतात. काही वेळा तर एकाच रात्रीत ३० पेंढ्या गोळा केल्या जातात. या पेंढ्या हनुवटी आणि पुढच्या पायांमध्ये धरून ते मागे फरफरटत आणतात आणि तशाच पाठमोऱ्‍या स्थितीत बिळात शिरतात.

शेपटीखाली असलेल्या एका ग्रंथीतून बिजू एक उग्र वासाचे द्रव गवतावर, दगडांवर किंवा कुंपणाच्या खांबांवर सोडून आपले क्षेत्र आखतो. ते ओळख पटण्यासाठी देखील एकमेकांवर हे द्रव सोडतात. या वासाकरवी बिजू पाठमोरा असतानाही आपल्या बिळाचे तोंड सहजासहजी ओळखू शकतो.

कस्तूरकाचे गाणे संपले होते, आणि अंधार पडत असलेल्या जंगलात सगळीकडे शांतता पसरत होती. मी स्तब्ध राहून श्‍वास जवळजवळ रोखून ठेवलेला असताना, बिजूचे काळे-पांढरे डोके बाहेर येताना मला माझ्या डोळ्याच्या कोपऱ्‍यातून दिसले. रात्रीच्या अंधारात बाहेर पडण्याआधी तो क्षणभर बिळाच्या तोंडाशी थांबून वास घेऊन धोक्याची चाहुल लागते का ते पाहात राहिला—जणू एखादा मोठा जहागीर आपल्या वाडवडिलांच्या इस्टेटीत फेरफटका मारायला बाहेर पडला होता. (g०२ ११/०८)

[१२, १३ पानांवरील चित्र]

पिलांना जन्म देण्यासाठी वापरली जाणारी खोली

झोपेची खोली

अस्तर

[१३ पानांवरील चित्र]

बिजूची पिले

[१३ पानांवरील चित्रे]

ओकची फळे, मशरूम आणि गांढूळ यांवर बिजू गुजराण करतो

[१३ पानांवरील चित्राचे श्रेय]

बिजूंची चित्रे: © Steve Jackson, www.badgers.org.uk