व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मानव इतिहासातील सर्वात भयानक साथ”

“मानव इतिहासातील सर्वात भयानक साथ”

“मानव इतिहासातील सर्वात भयानक साथ”

दक्षिण आफ्रिकेतील सावध राहा! लेखकाकडून

“जगाच्या पाठीवर चाललेले कोणतेही युद्ध एड्‌सच्या साथीइतके विनाशकारक नाही.”—यु. एस. राष्ट्रसचिव कॉलिन पॉवेल.

एड्‌स (अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिन्ड्रोम) वरील पहिला अधिकृत अहवाल जून १९८१ मध्ये सादर करण्यात आला होता. एचआयव्ही/एड्‌सच्या (युएनएड्‌स) संयुक्‍त राष्ट्रांच्या कार्यक्रमाचे संचालक पीटर पियो म्हणतात, “एड्‌सवरील संशोधनाच्या त्या सुरवातीच्या काळात आमच्यापैकी कोणीही कल्पना केली नव्हती की ही साथ इतके रौद्र रूप धारण करेल.” मागील २० वर्षांत ही साथ इतिहासातील सर्वात भयंकर ठरली असून ती पसरतच जाण्याची चिन्हे दिसताहेत.

अंदाजानुसार ३ कोटी ६० लाख लोकांना एचआयव्हीचा (ह्‍यूमन इम्म्युनोडेफिशिएंसी व्हायरस) संसर्ग झाला असून, २ कोटी २० लाख लोक आधीच एड्‌सला बळी पडले आहेत. * २००० साली जगभरात तीस लाख लोक एड्‌समुळे मृत्यूमुखी पडले. ही साथ सुरू झाल्यापासून एकाच वर्षात या साथीला बळी पडलेल्यांची ही सर्वात मोठी संख्या आहे. शिवाय, ॲन्टीरिट्रोव्हायरल ड्रग थेरपीचा खासकरून श्रीमंत देशांत उपयोग करूनही हे घडले आहे.

आफ्रिकेत एड्‌सचे थैमान

सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकन देशांत जवळजवळ २ कोटी ५३ लाख जणांना या रोगाचा संसर्ग झाला असून हा भाग एड्‌स साथीचे जणू माहेरघर बनले आहे. या एकाच भागात २००० साली एड्‌समुळे २४ लाख जण मृत्यूमुखी पडले. जगभरातील एकूण संख्येपैकी ८० टक्के मरण पावणारे याच भागातले होते. या भागात एड्‌स हे मृत्यूचे एक मुख्य कारण आहे. *

दक्षिण आफ्रिकेत जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ४७ लाख लोकांना एचआयव्ही जिवाणूचा संसर्ग झाला आहे. येथे दर महिन्यात ५,००० एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेली मुले जन्माला येतात. जुलै २००० मध्ये दरबान येथे आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय एड्‌स परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे भूतपूर्व अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी असे म्हटले: “दक्षिण आफ्रिकेत दर दोन पैकी एक म्हणजे आमचे निम्मे तरुण एड्‌सला बळी पडणार हे ऐकून आम्ही थक्क झालो. सर्वात भयावह गोष्ट म्हणजे या सर्व आकड्यांवरून स्पष्ट होणारे संसर्गाचे प्रमाण आणि पर्यायाने इतक्या लोकांना सोसावे लागणारे दुःख . . . टाळता येण्यासारखे होते, आहे.”

इतर देशांत एड्‌सचा हैदोस

पूर्व युरोप, आशिया आणि कॅरिबियन येथेही एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण अतिशय जलद गतीने वाढत आहे. १९९९ सालच्या शेवटी पूर्व युरोपात ४,२०,००० जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. २००० सालच्या शेवटास ही संख्या ७,००,००० पर्यंत वाढल्याचा अंदाज करण्यात आला.

सहा मोठ्या अमेरिकन शहरांत तरुण समलिंगी पुरुषांत एचआयव्ही जिवाणूच्या संसर्गाचे प्रमाण १२.३ टक्के असल्याचे आढळले. शिवाय एचआयव्ही पॉझिटिव्ह असणाऱ्‍यांपैकी केवळ २९ टक्के जणांना आपल्याला संसर्ग झाल्याचे माहीत होते. साथींचा अभ्यास करणाऱ्‍या प्रमुख महिला संशोधकांनी म्हटले: “इतक्या कमी एचआयव्ही पॉझिटिव्ह पुरुषांना आपल्या स्थितीची जाणीव आहे हे जाणून आमचे धैर्य खचले आहे. याचा अर्थ नव्यानेच संसर्ग झालेले कितीतरी जण नकळत आणखी कित्येकांना हा रोग देत आहेत.”

मे, २००१ मध्ये स्वित्झर्लंड येथे झालेल्या एड्‌स तज्ज्ञांच्या एका बैठकीत या रोगाला “मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारक महासाथ” घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे एड्‌सचा तडाखा विशेषतः सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकन देशांना बसला आहे. असे का घडले आहे याविषयी पुढील लेखात माहिती आहे. (g०२ ११/०८)

[तळटीपा]

^ येथे दिलेले आकडे युएनएड्‌स यांनी प्रकाशित केलेल्या अंदाजांनुसार आहेत.

^ सावध राहा!, फेब्रुवारी २२, २००१ (इंग्रजी), पृष्ठे १४-१५ पाहा.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

सर्वात भयावह गोष्ट म्हणजे या . . . संसर्गाचे प्रमाण आणि . . . लोकांना सोसावे लागणारे दुःख . . . टाळता येण्यासारखे होते, आहे.—नेल्सन मंडेला

[२, ३ पानांवरील चित्र]

एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या कित्येकांना हे माहीत नाही

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

UN/DPI Photo १९८५९४C/Greg Kinch