व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण कसा उपयोग करावा?

आपल्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण कसा उपयोग करावा?

बायबलचा दृष्टिकोन

आपल्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण कसा उपयोग करावा?

मानवांना निर्माण करताना देवाने त्यांना निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. देवाने एदेन बागेची देखरेख आदामाच्या हाती सोपवली. त्याच्या विविध जबाबदाऱ्‍यांमध्ये सर्व प्राण्यांकरता नावे निवडण्याचे काम देखील सामील होते. (उत्पत्ति २:१५, १९) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवाच्या आज्ञेचे पालन करावे किंवा करू नये हा निर्णय देखील आदाम व हव्वा यांच्यावर सोडण्यात आला होता.—उत्पत्ति २:१७, १८.

तेव्हापासून आजपर्यंत लोकांनी असंख्य निर्णय घेतले आहेत; यांपैकी बरेच चांगले निर्णय होते, काही तितके चांगले नव्हते, तर काही अगदीच दुष्टबुद्धीने घेतलेले होते. मनुष्याच्या काही अयोग्य निर्णयांमुळे भयंकर दुष्परिणाम झाले आहेत. तरीसुद्धा, देवाने कधीही आपले निर्णय स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेतले नाही. उलट, एका प्रेमळ पित्याप्रमाणे तो बायबलच्या साहाय्याने चांगले निर्णय घेण्यास आपल्याला मदत पुरवतो. तसेच अयोग्य निर्णय घेतल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात याबद्दलही तो आपल्याला सतर्क करतो. बायबल म्हणते की आपण जे काही पेरतो त्याचेच आपल्याला पीक मिळते.—गलतीकर ६:७.

वैयक्‍तिक बाबतीत निर्णय

काही गोष्टींबद्दल देवाने सुस्पष्ट मार्गदर्शन पुरवण्याद्वारे आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्‍त केली आहे. पण बहुतेक गोष्टींबद्दल बायबलमध्ये आपल्या वैयक्‍तिक जीवनाच्या सर्व पैलूंवर नियंत्रण करणारे नियम आखून दिलेले नाहीत. उलट त्यात प्रत्येकाच्या वैयक्‍तिक आवडीनिवडी व इच्छा सामावून घेता येतील अशाप्रकारचे खुले मार्गदर्शन देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, मनोरंजनाविषयी ते काय म्हणते त्याकडे लक्ष द्या.

शास्त्रवचनांत यहोवाला “आनंदी देव” म्हणण्यात आले आहे. (१ तीमथ्य १:११, NW) त्याच्या वचनात “हसण्याचा समय” व “नृत्य करण्याचा समय” असतो असे सांगण्यात आले आहे. (उपदेशक ३:१, ४) बायबल आपल्याला सांगते की राजा दावीद इतरांच्या करमणुकीकरता संगीत वाजवायचा. (१ शमुवेल १६:१६-१८, २३) येशू एका लग्नाच्या मेजवानीला उपस्थित राहिला होता व तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस करून त्या प्रसंगाची शोभा वाढवली.—योहान २:१-१०.

पण बायबल आपल्याला एक ताकीद देते जी अगदी रास्त आहे: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) “टवाळी” आणि अनैतिक कृत्ये देवाला पसंत नाहीत आणि त्यांमुळे त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध बिघडू शकतो. (इफिसकर ५:३-५) सामाजिक प्रसंगी मद्याचा नियंत्रणाबाहेर उपयोग केला जातो तेव्हा गंभीर समस्या उद्‌भवण्याची शक्यता असते. (नीतिसूत्रे २३:२९-३५; यशया ५:११, १२) यहोवा देव हिंसाचाराचाही द्वेष करतो.—स्तोत्र ११:५; नीतिसूत्रे ३:३१.

या बायबल वचनांतून करमणुकीविषयी देवाचा दृष्टिकोन समजून घेण्यास आपल्याला मदत होईल. निर्णय घेताना ख्रिस्ती, बायबलची तत्त्वे विचारात घेतात. अर्थात, प्रत्येकाला त्याने घेतलेल्या निर्णयांचे चांगले किंवा वाईट परिणाम भोगावे लागतील.—गलतीकर ६:७-१०.

त्याचप्रकारे पेहराव, विवाह, मुलांचे संगोपन, आणि आर्थिक व्यवहारांतही ख्रिश्‍चनांना बायबलमधील तत्त्वांच्या आधारावर सुज्ञ निर्णय घेण्याचे प्रोत्साहन दिले जाते. यात अशाही गोष्टींचा समावेश आहे, की ज्यांविषयी शास्त्रवचनांत काही सुस्पष्ट निर्देशन देण्यात आलेले नाही; पण शास्त्रवचनांत सापडणारी तत्त्वे एका व्यक्‍तीला तिच्या विवेकाच्या आधारावर निर्णय घेण्यास मदत करू शकतात. (रोमकर २:१४, १५) ख्रिश्‍चनांच्या सर्व वैयक्‍तिक निर्णयांकरता पुढील मापदंड लागू करता आले पाहिजे: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

याच संदर्भात, ख्रिश्‍चनांनी आणखी एका तत्त्वाचा विचार करावा आणि तो म्हणजे ‘आपआपलेच कामकाज करणे.’ (१ थेस्सलनीकाकर ४:११) सहसा एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीपुढे असे अनेक पर्याय असतात ज्यांपैकी कोणताही देवाच्या इच्छेच्या विरोधात नसतो. त्यामुळे, एका ख्रिस्ती व्यक्‍तीची पसंत दुसऱ्‍यांपेक्षा वेगळी असू शकते. देवाचे सेवक एकमेकांना दोषी ठरवू लागले तर त्याला निश्‍चितच ते आवडणार नाही. (याकोब ४:११, १२) बायबल हा सुज्ञ सल्ला देते की “दुसऱ्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये.”—१ पेत्र ४:१५.

देवाची सेवा करण्याचा निर्णय

देवाला आज्ञाधारक राहणे किती फायदेशीर आहे यावर बायबलमध्ये बराच भर देण्यात आला आहे. तरीपण देव कोणालाही आपली उपासना करण्याची जबरदस्ती करत नाही. उलट तो मानवी प्राण्यांना आपले उपासक बनण्याचे निमंत्रण देतो. उदाहरणार्थ, बायबल सांगते: “या, परमेश्‍वर जो आपला उत्पन्‍नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.”—स्तोत्र ९५:६.

हे निमंत्रण प्राचीन इस्राएलास देण्यात आले होते. ३,५०० वर्षांपूर्वी इस्राएल राष्ट्र सिनाय पर्वतापुढे उभे होते आणि तेव्हा देवाने त्या लाखो लोकांना मोशेच्या नियमशास्त्रात सामावलेल्या खऱ्‍या धर्माच्या व्यवस्थेची ओळख करून दिली. आता त्यांना एक निर्णय घ्यायचा होता की ते देवाची सेवा करतील अथवा नाही? त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी एकसुरात म्हटले, “जे काही परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.” (तिरपे वळण आमचे.) (निर्गम २४:७) यहोवाची उपासना करण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता.

पहिल्या शतकात, येशूने देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यास प्रारंभ केला. (मत्तय ४:१७; २४:१४) त्याने कधीही कोणाला या कामात साथ देण्याची जबरदस्ती केली नाही. त्याउलट, त्याने प्रेमळपणे इतरांना असे निमंत्रण दिले की “चल, माझ्यामागे ये.” (मार्क २:१४; १०:२१) अनेकांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला व ते त्याच्यासोबत प्रचार करू लागले. (लूक १०:१-९) काही काळानंतर काहींनी येशूची साथ सोडून देण्याचा निर्णय घेतला. यहूदाने त्याचा विश्‍वासघात करण्याचे निवडले. (योहान ६:६६; प्रेषितांची कृत्ये १:२५) नंतर, प्रेषितांच्या मार्गदर्शनाखाली आणखी अनेकजण शिष्य बनले; पण हे तरवारीच्या धाकाने नव्हे तर आपल्या इच्छा-स्वातंत्र्याचा उपयोग करून शिष्य बनले. त्यांची “योग्य मनोवृत्ती” होती आणि त्यामुळे त्यांनी “विश्‍वास ठेवला.” (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW; १७:३४) आज देखील, खरे ख्रिस्ती स्वेच्छेने देवाच्या वचनाचे पालन करतात आणि येशूच्या शिकवणुकींचे अनुसरण करतात.

आपल्या निर्णयशक्‍तीचा आपण उपयोग करावा अशीच देवाची इच्छा आहे, यात काही शंका नाही. शिवाय, सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करण्याकरता त्याने बायबलच्या माध्यमातून मार्गदर्शन देखील पुरवले आहे. (स्तोत्र २५:१२) वैयक्‍तिक निर्णय घेताना, देवाने घालून दिलेल्या तत्त्वांचा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. केवळ असे केले तरच आपण ‘आपल्या तर्कशक्‍तीने देवाची पवित्र सेवा’ करू शकू.—रोमकर १२:१, NW. (g०३ ३/०८)