व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“एक पाशवी गुन्हा”

“एक पाशवी गुन्हा”

“एक पाशवी गुन्हा”

मारिया * १४ वर्षांची झाली तेव्हापासून वेश्‍याव्यवसाय करू लागली. ही नीच जीवनशैली तिला स्वतःच्या आईच्या सांगण्यावरून पत्करावी लागली; तिची आई तिला असे म्हणून प्रोत्साहन द्यायची, की तू खूप सुंदर आहेस आणि पुरुष तुझ्यावर सहज भाळतील. शिवाय, तुला अमाप पैसा कमवता येईल. त्यामुळे मारियाची आई तिला संध्याकाळी एका लॉजवर न्यायची आणि तेथे ती पुरुषांशी सौदा करायची. पैसे वसूल करण्यासाठी आई तिथेच थांबायची. दर रात्री, मारियाला तीन ते चार पुरुषांची वासना तृप्त करावी लागायची.

मारियाच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्‍या १३ वर्षांच्या करीनालाही वेश्‍याव्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात आले. तिच्या परिसरात राहणाऱ्‍या उसाच्या मळ्यांत काम करणाऱ्‍या बहुतेक मजूरांच्या कुटुंबांप्रमाणेच तिच्या घरच्यांनीही आपल्या बेताच्याच मिळकतीत भर पडावी म्हणून तिला देहविक्रीच्या धंद्यात लावले. दुसऱ्‍या एका प्रदेशात एस्टेला नावाची मुलगी अगदी कोवळ्या वयातच शाळा सोडून वेश्‍या बनली; तिला लिहिता वाचताही येत नव्हते. डेझी नावाची एक मुलगी सहा वर्षांची असताना तिच्याच एका भावाने तिच्यावर बलात्कार केला—यानंतर तिला स्वतःच्या नातेवाईकांकडून अनेकदा हा लैंगिक अत्याचार सहन करावा लागला. १४ वर्षांच्या वयात ती वेश्‍या बनली.

जगातल्या कित्येक भागांत बाल वेश्‍यांची समस्या एक भयानक वस्तुस्थिती आहे. याचे परिणाम अर्थातच घातक आहेत. काही बाल वेश्‍या अधूनमधून हा धंदा करतात तर काही नियमित करतात, पण त्यांच्यापैकी बहुतेकजणी गुन्हेगारी आणि ड्रग्सच्या विश्‍वातही प्रवेश करतात. बऱ्‍याच बाल वेश्‍यांना जीवनात वैफल्याच्या व कुचकामीपणाच्या भावना सतावतात. आपल्या घृणास्पद जीवनातून सुटका मिळवण्याची काहीच आशा त्यांच्याजवळ नसते.

वरिष्ठ पदांवर असलेल्यांना बाल वेश्‍याव्यवसायाच्या भयानक परिणामांची जाणीव आहे. ब्राझीलचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष फर्नांडो एन्रीक कार्डोसू यांनी अगदी अचूक शब्दांत हे व्यक्‍त केले: “बाल वेश्‍याव्यवसाय एक पाशवी गुन्हा आहे.” ब्राझीलच्याच एका वृत्तपत्रात बाल वेश्‍यांच्या समस्येविषयी ही विचारप्रवर्तक टिप्पणी प्रकाशित करण्यात आली: “ज्या देशांत हा प्रकार सर्वसामान्य आहे, खपवून घेतला जातो, स्वीकारला जातो आणि केवळ [पैशांसाठी] त्याला उत्तजेन दिले जाते त्या देशांना याचे विघातक परिणाम दररोज भोगावे लागतात. या धंद्यातून आर्थिक नफा होत असला तरीसुद्धा त्यामुळे निर्माण होणाऱ्‍या वैयक्‍तिक, कौटुंबिक व सामाजिक संकटांचा विचार करता हा नफा निरर्थक ठरतो.”

बाल वेश्‍याव्यवसायाला आळा घालू इच्छिणाऱ्‍यांचे हेतू उदात्त असले तरीसुद्धा ही समस्या वाढतच आहे. या भयानक वस्तुस्थितीला कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत? लोक अशाप्रकारचे गुन्हे का खपवून घेतात किंवा त्यांना का उत्तेजन देतात? (g०३ २/०८)

[तळटीप]

^ या मुख्य लेखांतील नावे बदलण्यात आली आहेत.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“बाल वेश्‍याव्यवसाय एक पाशवी गुन्हा आहे.”—ब्राझीलचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष फर्नांडो एन्रीक कार्डोसू

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“सर्व प्रकारचे लैंगिक शोषण अपमानास्पद आहे आणि बळी पडणाऱ्‍या व्यक्‍तीचे वय, लिंग, वंश, जात, किंवा वर्ग कोणताही असो पण यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होते.”—युनेस्को सोर्सेस.