व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कॉपी करण्यात काय हरकत आहे?

कॉपी करण्यात काय हरकत आहे?

तरुण लोक विचारतात . . .

कॉपी करण्यात काय हरकत आहे?

“कॉपी करणं चुकीचं आहे हे सर्वांना माहीत आहे, पण तोच सर्वात सोपा मार्ग असतो.”—जिमी, वय १७.

परीक्षा चालू असताना तुमच्या वर्गसोबत्याच्या पेपरमध्ये डोकावण्याचा मोह तुम्हाला कधी झाला आहे का? झाला असल्यास, तुम्ही एकटेच नाही. १२ वीत असलेली जेना, आपले वर्गसोबती कसे बिनधास्तपणे कॉपी करतात त्याविषयी म्हणते: “ते त्याविषयी फुशारकी मारतात. उलट, कोणी कॉपी करत नसेल तर ती व्यक्‍ती विचित्र आहे असे ते म्हणतात!”

एका यु.एस. सर्वेक्षणात, वर्गात चांगला नंबर काढणाऱ्‍या ८० टक्के किशोरवयीनांनी कॉपी केल्याचे कबूल केले आणि या “उत्तम मार्क” काढणाऱ्‍या मुलांपैकी ९५ टक्के मुले कधीही पकडले गेले नाहीत. २०,००० हून अधिक माध्यमिक व उच्च शालेय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण घेतल्यावर, जोसफसन इंस्टिट्यूट ऑफ एथिक्सने पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढला: “प्रामाणिकतेच्या आणि सत्यतेच्या बाबतीत पाहिल्यास, परिस्थिती अधिकच वाईट होत चालली आहे.” आज, कॉपी करणे किती सर्रासपणे चालते हे पाहून शिक्षक चाट पडले आहेत! इतकेच नव्हे तर, शाळा संचालक गॅरी जे. नील्स असेही म्हणाले की, “कॉपी न करणारे अल्पसंख्यांक आहेत.”

बहुतेक पालकांची अशी अपेक्षा असते की, शाळेच्या अभ्यासाबाबत त्यांच्या मुलांनी प्रामाणिक असावे. परंतु, दुःखाची गोष्टी अशी की, पुष्कळ तरुण लोक कॉपी करून प्रामाणिकतेशी हातमिळवणी करतात. ते कोणत्या नवीन पद्धतींचा उपयोग करतात? काही युवक कॉपी का करतात? तुम्ही ही सवय का टाळावी?

अत्याधुनिक कॉपी

कॉपी करणाऱ्‍या आधुनिक व्यक्‍तीकडे फसवेगिरीचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. उलट, दुसऱ्‍याचे गृहपाठ उतरून काढणे किंवा परीक्षेत उत्तरांच्या चिठ्या ठेवणे हे लबाडीचे प्रकार आजच्या अत्याधुनिक प्रकारांपुढे फिके पडतात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो, पेजरचा उपयोग ज्यात दुसऱ्‍या ठिकाणांहून कोणी परीक्षेच्या प्रश्‍नांची उत्तरे पाठवतात; “जादा” माहिती भरलेले कॅलक्यूलेटर; कपड्यांमध्ये लपवलेले बारीक कॅमेरे ज्यांच्याद्वारे दुसऱ्‍या ठिकाणाहून मदत करणाऱ्‍या व्यक्‍तीला प्रश्‍न दाखवले जातात; जवळपास असलेल्या वर्गसोबत्यांना इंफ्रारेड संदेश पाठवण्याची उपकरणे आणि इंटरनेट साईट्‌स देखील ज्यात कोणत्याही विषयावरती पूर्ण केलेले टर्म पेपर असतात!

कॉपी करण्याचा हा प्रकार थांबवण्याचा शिक्षक बराच प्रयत्न करत आहेत पण हे काम सोपे नाही. कारण, प्रत्येक विद्यार्थ्याकरता—किंवा शिक्षकाकरता—कॉपी करण्याचा वेगवेगळा अर्थ होतो. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांचे अनेक गट एकत्र मिळून एखाद्या प्रकल्पावर काम करत असतात तेव्हा प्रामाणिकपणे मिळून कार्य करणे आणि अप्रामाणिकतेने संगनमत करणे यांच्यातला फरक इतका स्पष्ट नसतो. त्यात असेही लोक असू शकतात जे एकत्र मिळून कार्य करण्याच्या पद्धतीचा फायदा उचलून इतरांना सगळे काम करायला लावतात. एका कम्युनिटी कॉलेजात जाणारा युजी म्हणतो, “यांतले काही विद्यार्थी तर फार आळशी असतात—ते काहीच करत नाहीत! आणि मग त्यांना बाकीच्यांइतकेच मार्क मिळतात. मला वाटतं हासुद्धा कॉपीचाच प्रकार आहे!”

कॉपी का केली जाते?

एका सर्वेक्षणानुसार, मुख्यतः तयारी न केल्यामुळे पुष्कळ विद्यार्थी कॉपी करतात. इतर विद्यार्थ्यांच्या शाळेत स्पर्धात्मक वातावरण असल्यामुळे किंवा पालकांच्या जास्त अपेक्षेमुळे आपल्याला कॉपी केल्याशिवाय पर्याय नाही असा ते विचार करतात. १३ वर्षांचा सॅम म्हणतो: “माझ्या पालकांना फक्‍त मार्क हवे असतात. ते मला विचारतात: ‘गणिताच्या परीक्षेत तुला किती मार्क मिळाले? इंग्रजीच्या पेपरमध्ये किती मार्क मिळालेत?’ मला याची चीड येते!”

काही जणांवर चांगले मार्क मिळवण्याचा सतत दबाव येत असल्यामुळे ते कॉपी करू लागतात. द प्रायव्हेट लाईफ ऑफ दि अमेरिकन टीनएजर या पुस्तकात म्हटले आहे: “ज्या व्यवस्थेत शिक्षणातून समाधान मिळवण्याऐवजी मार्क मिळवण्यावर जास्त जोर दिला जातो व त्यासाठी काही वेळा प्रामाणिकतेला धाब्यावर बसवले जाते त्यात निश्‍चित काहीतरी बिघडत आहे.” पुष्कळ विद्यार्थी याजशी सहमत आहेत. कोणालाही एखाद्या चाचणीत नापास झालेले आवडणार नाही तेव्हा पूर्ण वर्ष वाया जाण्याची गोष्ट तर दूरचीच आहे. उच्च शाळेतील एक विद्यार्थी, जिमी म्हणतो, “काही लोकांना नापास होण्याची भयंकर भीती असते. मग त्यांना उत्तर माहीत असले तरी फक्‍त त्याची खात्री करण्यासाठी ते कॉपी करतात.”

प्रामाणिकतेच्या दर्जांकडे डोळेझाक करणाऱ्‍या लोकांची संख्या इतकी जास्त असल्यामुळे कॉपी केल्याने काही नुकसान होत नाही असे भासू शकते. शिवाय, काही वेळा कॉपी करणेच फायदेकारक वाटू शकते. १७ वर्षांचा ग्रेग म्हणतो: “काल माझ्या वर्गात परीक्षेच्या वेळी एका मुलाला मी कॉपी करताना पाहिले. आज आम्हाला पेपर मिळाले तर त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले होते.” आपल्यासोबतच्या मुलांना कॉपी करत असल्याचे पाहून अनेकांना कॉपी करावीशी वाटते. युजी म्हणतो, “काही विद्यार्थ्यांना वाटते की, ‘दुसरे करत असतील तर मीही केलीच पाहिजे.’” पण हे खरे आहे का?

फसवे व्यसन

अशा फसवेगिरीची तुलना चोरीशी करा. पुष्कळ लोक चोरी करतात म्हणून त्यात काही चुकीचे नाही असे आहे का? ‘मुळीच नाही,’ असे तुम्ही म्हणाल—विशेषकरून तुमचे पैसे चोरीला गेले असतील तर! त्याचप्रमाणे, कॉपी करून आपण जे केलेले नाही त्याचे श्रेय स्वतःला घेत असतो—कदाचित आपण प्रामाणिक असलेल्या लोकांचाही फायदा घेत असू. (इफिसकर ४:२८) अलीकडेच उच्च शाळा पूर्ण केलेला टॉमी म्हणतो, “हे बिलकुल चुकीचे आहे! तुम्हाला एखाद्या विषयाच्या बाबतीत माहीत नसताना, ‘त्याविषयी मला माहीत आहे’ असे म्हटल्यासारखे ते होते. म्हणजे तुम्ही खोटे बोलताहात.” याबद्दल बायबलचा दृष्टिकोन कलस्सैकर ३:९ येथे स्पष्ट केला आहे: “लबाडी करू नका.”

कॉपीचे एखाद्याला व्यसन लागू शकते आणि मग ते थांबवणे कठीण जाते. जेन्‍ना म्हणते, “कॉपी करणाऱ्‍यांना माहीत असते की, पास व्हायला त्यांना अभ्यासही करावा लागत नाही, म्हणून ते कॉपी करण्यावरच अवलंबून राहतात. पण नंतर त्यांना कोणाचा आधार राहत नाही तेव्हा काय करावे हे त्यांना कळत नाही.”

गलतीकर ६:७ मधील तत्त्व विचारप्रवर्तक आहे: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” शाळेमध्ये कॉपी केल्याने विवेक बोचणे, मित्राचा तुमच्यावरील विश्‍वास उडणे आणि शिकण्याची क्रिया टाळल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या वाढ खुंटणे हे परिणाम होऊ शकतात. कर्करोगाचा जसा प्रसार होऊ शकतो त्याप्रमाणे फसवेगिरीची ही सवय जीवनाच्या इतर भागांमध्येही पसरू शकते आणि बहुमोलाचे नातेसंबंध नष्ट करू शकते. खासकरून, देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर निश्‍चितच परिणाम होईल कारण त्याला फसवेगिरी मुळीच पसंत नाही.—नीतिसूत्रे ११:१.

कॉपी करण्यावर अवलंबून राहणारे लोक स्वतःचीच फसगत करत असतात. (नीतिसूत्रे १२:१९) आपल्या कार्यांद्वारे ते जेरूसलेमच्या प्राचीन शहरातील भ्रष्ट शासकांसारखी भूमिका घेतात: “आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहो.” (यशया २८:१५) परंतु, वास्तविक पाहता, लबाडी करणारा देवापासून आपली कार्ये लपवू शकत नाही.—इब्री लोकांस ४:१३.

कॉपी करू नका!

पुष्कळदा, युवक कॉपी करण्यासाठी बराच प्रयत्न करतात आणि कौशल्य वापरतात पण हेच प्रयत्न आणि कौशल्य प्रामाणिकपणे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी वापरल्यास त्याचा अधिक फायदा होईल. १८ वर्षांची ॲबी म्हणते त्यानुसार, “कॉपी करण्यासाठी ते जितकी मेहनत घेतात तीच जर त्यांनी अभ्यासासाठी कारणी लावली तर त्यांना कदाचित चांगले मार्क मिळतील.”

हे खरे आहे की, कॉपी करण्यासाठी जास्त मोह होतो. पण हा नैतिक सापळा तुम्ही टाळला पाहिजे! (नीतिसूत्रे २:१०-१५) तुम्हाला ते कसे करता येईल? सर्वात आधी, तुम्ही शाळेत का आहात ते लक्षात ठेवा—तुम्ही तेथे शिकण्यासाठी आहात. हे खरे की, ज्या माहितीचा आपल्याला पुढे कधी उपयोग होणार नाही ती माहिती घेण्यात काही फायदा नाही असे भासू शकते. पण कॉपी करून ही क्रिया टाळण्याचा जो प्रयत्न करतो तो नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढवत नाही आणि ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करत नाही. खरी समज प्रयत्नांविना कधीही मिळवली जाऊ शकत नाही; तिच्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. बायबल म्हणते: “सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको.” (नीतिसूत्रे २३:२३) होय, अभ्यास आणि तयारी यांविषयी गंभीर असणे जरूरीचे आहे. जिमी म्हणतो, “तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे. मग आपल्याला उत्तरे माहीत आहेत असा भरवसा आपल्याला वाटतो.”

हे खरे की, काही वेळा आपल्याला सगळी उत्तरे ठाऊक नसतील आणि यामुळे कमी मार्क मिळतील. तरीपण, तुम्ही स्वतःच्या तत्त्वांशी हातमिळवणी केली नाही तर सुधार करण्यासाठी काय करण्याची गरज आहे हे तुम्हाला दिसेल.—नीतिसूत्रे २१:५.

आधी ज्याच्याविषयी सांगितले होते तो युजी एक यहोवाचा साक्षीदार आहे; त्याचे वर्गसोबती उत्तरे दाखवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणतात तेव्हा तो काय करतो याविषयी तो म्हणतो: “सर्वात आधी—मी त्यांना, मी एक साक्षीदार आहे हे सांगतो. याचा मला बराच फायदा झाला आहे कारण त्यांना माहीत आहे की यहोवाचे साक्षीदार प्रामाणिक लोक आहेत. मला परीक्षेच्या वेळी कोणी उत्तर विचारले तर मी सरळ नाही म्हणतो. मग वाटल्यास, नंतर मी असे का केले हे त्यांना समजावून सांगतो.”

प्रेषित पौलाने इब्रीकरांना जे लिहिले त्याच्याशी युजी सहमत आहे: ‘सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा आहे.’ (इब्री लोकांस १३:१८) प्रामाणिकतेचे उच्च दर्जे पाळले आणि कॉपी करण्यास नकार दिला तर तुम्हाला मिळणारे चांगले मार्क खरोखर मोलाचे ठरतात. त्यामुळे तुम्ही आपल्या पालकांना सर्वात उत्तम असे बक्षीस देता; ते म्हणजे, ख्रिस्ती सत्यतेचे बक्षीस. (३ योहान ४) शिवाय, तुमचा विवेक शुद्ध राहतो आणि तुम्हाला हे जाणून आनंद वाटतो की तुम्ही यहोवा देवाचे मन आनंदी केले आहे.—नीतिसूत्रे २७:११.

त्यामुळे, कॉपी कितीही सर्रासपणे केली जात असली तरी ती टाळा! असे केल्याने, तुम्ही इतरांसोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सत्य देव, यहोवा याच्यासोबत आपला चांगला संबंध टिकवून ठेवू शकाल.—स्तोत्र ११:७; ३१:५. (g०३ १/२२)

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

कॉपी करणाऱ्‍याला हे कळत नाही की तो खरे तर चोरी करत आहे

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

कॉपी केल्यामुळे सहसा फसवेगिरीची अधिक गंभीर कृत्ये घडतात

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

कॉपी करणारा देवापासून आपली कृत्ये लपवून ठेवू शकत नाही

[१९ पानांवरील चित्र]

परीक्षेआधी चांगला अभ्यास केल्याने तुमचा आत्मविश्‍वास वाढेल