जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
“टेलिफोन आया” देतात घरचं जेवण
स्पेनच्या माद्रिदमध्ये, अविवाहित व व्यस्त असलेल्या परंतु पौष्टिक भोजन आवडत असलेल्या तरुणांना स्वयंपाक करायला एकतर वेळ नसतो किंवा स्वयंपाक करून खाण्याची इच्छा नसते, अशांना आता एक अनोखा उपाय मिळाला आहे. इंटरनेटवरून ते एका ‘टेलिफोन आईला’ दत्तक घेतात, असे स्पेनचे बातमीपत्रक, एल पाईस म्हणते. आठवड्यातून दोनदा, ही दत्तक आई त्यांच्यासाठी पुष्कळ दिवस टिकेल असे पौष्टिक, घरगुती जेवण टॅक्सीने पाठवते. भोजनात, मच्छी, पास्ता, भाज्या, शेंगभाज्या, मांस, फळे आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश असतो. ही ‘टेलिफोन आई’ प्रत्येक दत्तक ‘मुलाबरोबर’ टेलिफोनद्वारे वेळच्या वेळी संपर्क साधून, त्याच्याजवळ किती भोजन शिल्लक आहे, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या गरजा यांची विचारपूस करत असते. चार किंवा त्याहूनही अधिक लोकांसाठी दररोज त्यांच्या कार्यालयांत भोजन पोचते करण्याची तसेच शनिवार-रविवारच्या दिवसांसाठीसुद्धा मेनूची सोय उपलब्ध आहे. (g०३ १/२२)
“खोटे बोलण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो”
युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानियाच्या संशोधकांना असे आढळून आले आहे, की खोटे बोलण्यासाठी मेंदूला जितका ताण द्यावा लागतो तितका सत्य बोलण्यासाठी द्यावा लागत नाही. एक व्यक्ती खोटे बोलत असते तेव्हा तिच्या मेंदूतील कोणते भाग सक्रिय बनतात हे दाखवण्यासाठी डॉ. डॅन्यल लॅग्लेबन, फंक्शनल मॅग्नेटीक रिसोनंस इमेजींग यंत्राचा (एफएमआरआय) उपयोग करून या तत्त्वाचा अभ्यास करत आहेत. आपल्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्या मेंदूला आधी तो ग्रहण करावा लागतो. आणि मग, “जणू काय उपजतच, खोटे बोलणारी व्यक्ती खोटे उत्तर तयार करण्याआधी किंवा बोलण्याआधी खऱ्या उत्तराचा विचार करते,” असा अहवाल मेक्सिको सिटीच्या द न्यूजने दिला. लॅग्लेबन म्हणतात: “मेंदूत तुम्हाला तयार उत्तरे मिळणार नाहीत, तुम्हाला प्रयास करावा लागतो. खोटे बोलण्याची क्रिया खरे बोलण्याच्या क्रियेपेक्षा खूप जटील आहे; खोटे बोलताना चेताकोशांची क्रिया वाढते.” ही क्रिया एका एफएमआरआयवर बल्ब जळत असल्याप्रमाणे दिसून येते. बातमीपत्र म्हणते: “सराईतपणे खोटे बोलणाऱ्या व्यक्तीलाही, खोटे बोलण्यासाठी आपल्या मेंदूला ताण द्यावा लागतो.” (g०३ २/२२)
जगातील २५ टक्के अंध भारतात
“भारतात, १.२ कोटी अंध लोक आहेत ही अगदी शोचनीय गोष्ट आहे; याचा अर्थ जगातील एकूण अंध लोकसंख्येपैकी २५ टक्के भारतातच आहेत,” असे भारतातील डेक्कन हेराल्डने म्हटले. संपूर्ण भारतातील ४० पेक्षा अधिक शहरांतील कॉलेज व शाळांमधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर युथ व्हिजन इंडिया, २००२ ने दिलेल्या एका अहवालात असेही दाखवण्यात आले की “५० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांना याची देखील जाणीव नव्हती की त्यांना दृष्टिसंबंधाने समस्या होती.” या अभ्यासानुसार, प्रणमदोष आणि मोतीबिंदू हे देशातील बहुसंख्य लोकांच्या डोळ्यांच्या तक्रारींसाठी कारणीभूत आहेत, पण या दोषांवर इलाज केला जाऊ शकतो. “अज्ञानता” आणि “डोळ्यांच्या डॉक्टरांची कमी संख्या” हे भारताच्या समस्येचे मोठे कारण आहे असे बातमीपत्रकातील लेखात म्हटले होते. ते पुढे म्हणते: “डब्ल्यूएचओने शिफारस केल्याप्रमाणे भारतात ४०,००० डोळ्यांचे डॉक्टर असले पाहिजेत, पण याच्या तुलनेत केवळ ५,००० डोळ्यांचे डॉक्टर आहेत.” (g०३ १/०८)
ईन्यूट बायबल पूर्ण होते
कॅनडाच्या बायबल सोसायटीने नुकतेच, कॅनडाच्या ईन्यूट लोकांच्या ईनुकटीटूट भाषेत संपूर्ण बायबलचे भाषांतर करण्याचे २३ वर्षांपासून चाललेले काम पूर्णत्वास नेले. भाषांतराचे काम बरेच कठीण होते. “मेंढ्या, उंट, गाढव, तालवृक्ष अशा अभिव्यक्तींचा वापर करणाऱ्या भाषेचे भाषांतर, सील, वॉलरस आणि काही झाडपाल्यांच्या नावांचा उपयोग करणाऱ्या भाषेत करणे महाकठीण काम होते,” असे कॅनडियन बायबल सोसायटीच्या शास्त्रवचनांच्या भाषांतराचे व्यवस्थापक, हॉर्ट वीन्स यांनी म्हटले. “उदाहरणार्थ, बायबलमध्ये तालवृक्षांसाठी अनेक शब्द आहेत. परंतु नुनवुट येथे [कॅनडाचे उत्तरेकडील क्षेत्र] झाडेच नसल्यामुळे [तालवृक्षांचे] वर्णन करणे खूप कठीण होते.” ईनुकटीटूट ही भाषा, कॅनडाच्या अंदाजे २८,००० लोकांची मायबोली आहे. नॅश्नल पोस्टनुसार, “बायबल आता २,२८५ पेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.” (g०३ १/०८)
चर्चेसचे रूपांतर
“सन १८८१ मध्ये मार्क ट्वेनने मॉन्ट्रियलला भेट दिली तेव्हा त्याने असे म्हटले, की ‘तुम्ही एखादी वीट फेकली तर ती निश्चित एखाद्या चर्चच्या खिडकीची काच फोडेल.’ पण आज तुम्ही जर वीट फेकलीत तर चर्चच्या जागी उभ्या असलेल्या एखाद्या इमारतीच्या खिडकीची काच फोडाल” असे मॉन्ट्रियलच्या द गॅझेट बातमीपत्रकाने म्हटले. ते पुढे म्हणते, शहरात आज जवळजवळ ६०० उपासनास्थळे असली तरी, त्यांपैकी १०० तरी (ज्यांपैकी बहुतेक कॅथलिक आहेत) पुढील दशकापर्यंत विकण्यास काढले जातील. “मॉन्ट्रियलच्या आर्चडायोसीसनुसार १९६० पासून चक्कं २५ कॅथलिक चर्चेस बंद पडली आहेत.” कॅनडाची कॅथलिक लोकसंख्या १८७१ पासून १५ लाखाहून १९७१ पर्यंत जवळजवळ १ कोटीच्या घरात गेली; पण, खासकरून क्युबेकमध्ये “चर्चची उपस्थिती मात्र अगदीच खालावली,” असे द गॅझेटने म्हटले. मॉन्ट्रियलच्या आर्चडायोसीसच्या पाळकांच्या व्यवस्थापनाचे काम पाहणारे बर्नाड फोर्टीन यांनी बातमीपत्रकाला असे सांगितले, की १९७० मध्ये त्या भागातील चर्चची उपस्थिती ७५ टक्क्यांनी घसरली आणि आज तर ती केवळ ८ टक्के आहे. (g०३ २/२२)
रक्त संक्रमणामुळे फुफ्फुसांना हानी होते
“रक्तापासून बनवलेले पदार्थ, खासकरून रक्तद्रव असलेले पदार्थ घेणाऱ्या लोकांना, संक्रमणसंबंधित तीव्र फुफ्फुस हानी (टीआरएएलआय, ट्राली) होण्याचा धोका आहे,” असे यु. एस. फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या एफडिए कन्स्यूमर नावाच्या मासिकाने म्हटले. एखाद्याला झालेला हा आजार ओळखता आला नाही व त्यावर योग्य ते उपचार करण्यात आले नाहीत तर मृत्यू ओढावू शकतो. “रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी जेव्हा रक्त घेणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींना प्रतिक्रिया दाखवतात तेव्हा फुफ्फुसांतील पेशींत बदल होतो व यामुळे द्रवाला [फुफ्फुसांत] प्रवेश दिला जातो. दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या किंवा अनेक वेळा संक्रमण घेतलेल्या स्त्रिया ट्राली बदलात सामील आहेत.” या आजाराची लक्षणे म्हणजे, “ताप येणे, दम लागणे आणि रक्तदाब कमी होणे. क्ष-किरणांत सहसा रक्त घेतलेल्या व्यक्तीची फुफ्फुसे पूर्णपणे पांढरी दिसून येतात.” (g०३ ३/०८)
झाडे कमी करतात शहरी प्रदुषण
“वेगवेगळ्या प्रकारची झाडे प्रदूषण कसे कमी करू शकतात हे तज्ज्ञांना पहिल्यांदा मोजता आले,” असे लंडनच्या द संडे टाईम्सने म्हटले. वेस्ट मिडलँड्सच्या क्षेत्रात तीन वर्षे केलेल्या एका अभ्यासात, इंग्लंड व स्कॉटलँडहून आलेल्या शास्त्रज्ञांनी ३२,००० झाडांजवळच्या मातीचे नमुने घेतले व कोणत्या जातीच्या झाडांनी बहुतेक हानीकारक कणांना शोषून घेतले आहे ते त्यांनी मातीच्या नमुन्यांतून मोजून पाहिले. संशोधकांनी वातावरण आणि ओझोन पातळीतील कण देखील मोजून पाहिले. ॲश, लार्च आणि स्कॉट्स पाईन या वृक्षांनी सर्वात जास्त कण शोषले होते; तर, ओक, विलो आणि पॉप्लर यांनी कमी शोषले होते. “झाडे, गवताळ प्रदेशांपेक्षा वातावरणातील प्रदुषण कमी करण्यात तीन पटीने अधिक सक्षम आहेत,” असे या अभ्यासावरून दिसून आले. कंप्युटरवर तयार केलेल्या एका प्रक्षेपणात असे दिसून आले, की वेस्ट मिडलँड्सच्या खुल्या मैदानाच्या केवळ अर्ध्या मैदानातही वृक्षारोपण करण्यात आले तर कणांपासून हवेतले प्रदूषण २० टक्क्यांनी कमी होऊ शकेल. (g०३ ३/२२)
धर्म आणि युद्ध
“सर्वात रक्तपाती व घातक वादविवाद आज . . . धर्मामुळे घडतात,” असे युएसए टुडे बातमीपत्रकाने म्हटले. हे वादविवाद सोडवणे देखील अतिशय कठीण आहे. “देव आपल्या बाजूने आहे, असा लढाईत भाग घेणारे दावा करतात तेव्हा शांती प्रस्थापित करण्याचे प्रमाणभूत मार्ग—जसे की जुळवून घेण्याची आणि जुनी गाऱ्हाणी क्षमा करण्याची तयारी—यांसारखे मार्ग अवलंबण्यास कठीण जातात,” असे बातमीपत्रक पुढे म्हणते. “धार्मिक स्वरूप नसलेल्या जमिनीसंबंधीच्या किंवा सत्तेसंबंधीच्या संघर्षांवरील झगडा निर्माण करण्याऐवजी पाठिंबा मिळवण्याकरता धर्माला साधन म्हणून वापरण्यात येते तेव्हा देखील हेच खरे ठरते.” धार्मिक मतभेद असल्यास तात्पुरता तह करणे देखील कठीण जाते. याचे उदाहरण म्हणजे, कॉसोवो येथे अलीकडेच झालेले युद्ध. ईस्टरच्या दरम्यान एक तात्पुरता तह करण्याचे ठरवण्यात आले पण तो अंमलात आणता आला नाही कारण, कॅथलिक व ऑर्थोडॉक्स लोकांच्या ईस्टर सण साजरा करण्याच्या तारखांमध्ये फरक आहे. “सरतेशेवटी, तह झालाच नाही,” असे युएसए टुडेने म्हटले. (g०३ ३/२२)