व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्वेषाच्या बंधनातून मुक्‍तता

द्वेषाच्या बंधनातून मुक्‍तता

द्वेषाच्या बंधनातून मुक्‍तता

होसे गोमेझ यांच्याद्वारे कथित

माझा जन्म, सप्टेंबर ८, १९६४ रोजी फ्रान्सच्या दक्षिणेकडील लहानशा रोन्याक नगरात झाला. माझ्या आईवडिलांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा, उत्तर आफ्रिकेतील अल्जेरिया आणि मोरोक्को येथे जन्म झाला होता; ते अन्डालुसियन जिप्सी होते. जिप्सी संस्कृतीमध्ये असल्याप्रमाणे, आमचे कुटुंब फार मोठे होते.

माझे वडील अतिशय हिंसक प्रवृत्तीचे होते; मी लहान असताना ते माझ्या आईला मारत असतानाचे दृश्‍य मला चांगले आठवते. कालांतराने, माझ्या आईने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला—जिप्सी लोकांमध्ये हे सहसा घडत नाही. ती माझ्या भावाला, बहिणीला आणि मला घेऊन बेल्जियमला गेली; तेथे पुढील आठ वर्षे आम्ही सुखाने राहत होतो.

परंतु, परिस्थिती बदलली. आम्हा मुलांना आमच्या वडिलांना पाहायचे होते म्हणून आई आम्हाला फ्रान्सला घेऊन गेली आणि आम्ही पुन्हा वडिलांपाशी गेलो. वडिलांसोबत असताना माझ्यासाठी पुन्हा समस्या निर्माण झाल्या. बेल्जियममध्ये असताना आम्ही आई जाईल तेथे सगळीकडे तिच्यासोबत जायचो. पण वडिलांच्या येथे, पुरुषांनी फक्‍त पुरुषांसोबतच असावे असे होते. पुरुषांनी अधिकार गाजवायचा आणि स्त्रियांनी कामे करायची अशी त्यांची पुरुषाभिमानी मनोवृत्ती होती. जसे की, एकदा रात्रीच्या जेवणानंतर मी आवराआवर करण्यासाठी माझ्या आत्याला मदत करू लागलो तेव्हा माझ्या काकांनी मला समलिंगी म्हटले. त्यांच्या कुटुंबात, भांडी धुणे हे फक्‍त स्त्रियांचे काम होते. हळूहळू, या विकृत मनोवृत्तीचा माझ्यावरही परिणाम होऊ लागला.

काही काळानंतर, माझे वडिल पुन्हा आईला मारहाण करू लागले. पुष्कळदा आम्ही मध्ये पडायचो तेव्हा वडिलांचा मार चुकवण्यासाठी माझ्या भावाला आणि मला खिडक्यांमधून पळून जावे लागायचे. माझ्या बहिणीलाही वडिलांनी सोडले नाही. त्यामुळे, मी घरी कमीत कमी वेळ घालवायचो. वयाच्या १५ व्या वर्षी माझ्या जीवनाला काहीच दिशा नव्हती.

नंतर, मीही संतप्त वृत्तीचा बनलो. मला अरेरावीपणा करायला मजा वाटायची. काही वेळा मी मुद्दामहून इतर तरुणांना चिडवायचो, पण माझ्या वाट्याला लागायला लोक धजत नव्हते—कारण माझ्याजवळ सहसा एक चाकू किंवा साखळी असायची. मग, मी मोटारगाड्या चोरून त्या विकू लागलो. काही वेळा तर, फक्‍त मौजेखातर मी त्यांना आग लावायचो आणि अग्निशामक दलाचे लोक आग कशी विझवतात ती मजा पाहत उभा राहायचो. नंतर, मी दुकाने किंवा गुदामे फोडून चोरी करू लागलो. मला पुष्कळदा अटक करण्यात आली. प्रत्येक वेळी, मी देवाला मला मदत करण्यासाठी प्रार्थना करायचो!

होय, देवावर माझा विश्‍वास होता. बेल्जिममध्ये असताना मी एका धार्मिक शाळेत होतो. त्यामुळे मी जे करत आहे ते वाईट आहे याची मला जाणीव होती. तरीपण, देवावरील विश्‍वासाचा माझ्या वर्तनावर काही परिणाम झाला नाही. मला असे वाटायचे की, जर मी देवाला क्षमा मागितली तर माझे पाप माफ केले जाईल.

मला १९८४ साली, चोरीच्या आरोपावरून ११ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. मला मार्सेल्स येथे बोमेट तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे, मी माझ्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी गोंदून घेतले. एका ठिकाणी मी, “द्वेष आणि बदला” असे गोंदून घेतले. तुरुंगात जाऊन सुधारण्याऐवजी अधिकारातील लोकांबद्दल आणि सर्वसामान्य समाजाबद्दल माझा द्वेष अधिकच वाढला. तुरुंगातून केवळ तीन महिन्यांनी माझी सुटका झाली तेव्हा माझ्या मनात पूर्वीपेक्षा जास्त द्वेष निर्माण झाला होता. पण, माझ्या जीवनात घडलेल्या एका दुर्घटनेने माझे आयुष्य बदलले.

सूड हेच माझे ध्येय

माझ्या कुटुंबाचे दुसऱ्‍या एका जिप्सी कुटुंबाशी मुळीच पटत नव्हते. माझ्या काकांनी आणि मी ठरवले की, त्यांच्याकडे जाऊन हा मामला एकदाचा मिटवून टाकायचा. दोन्ही कुटुंबांकडे शस्त्रे होती. त्या वेळी, झालेल्या एका वादात माझे काका पियर आणि माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ गोळी लागून ठार झाले. हे पाहून मी सुन्‍न झालो, हातात बंदूक धरून मी रस्त्यात उभा राहून रागाने जोरजोरात ओरडू लागलो. शेवटी माझ्या एका काकांनी माझ्या हातातली बंदूक माझ्याजवळून हिसकावून घेतली.

पियर काका मला वडिलांसारखे होते; ते गेल्यावर मला अतीव दुःख झाले. जिप्सी लोकांच्या रिवाजानुसार मी शोक करू लागलो. अनेक दिवस मी केस कापले नाहीत किंवा मांस खाल्ले नाही. टीव्ही पाहायचे किंवा संगीत ऐकायचे मी सोडून दिले. माझ्या काकांचा सूड घ्यायची मी शपथ खाल्ली, पण माझ्या नातेवाईकांनी माझ्या हातात बंदूक येऊ दिली नाही.

ऑगस्ट १९८४ साली, माझी लष्करात भरती झाली. २० वर्षांचा असताना मी लेबनन येथे संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या शांती कायम राखणाऱ्‍या दलात सामील झालो. ठार मारायचे किंवा ठार मारले जायचे हा धोका मी पत्करला. त्या वेळी, मी खूप गांजा ओढायचो. त्यामुळे, मला बरे वाटायचे आणि कोणी मला काही करू शकत नाही असेही वाटायचे.

लेबननमध्ये शस्त्रे सहजासहजी मिळत होती, म्हणून ही शस्त्रे फ्रान्सला जहाजाने पाठवायची आणि माझ्या काकांचा सूड घ्यायचा असे मी ठरवले. मी स्थानीय रहिवाशांकडून दोन बंदुका आणि दारूगोळा विकत घेतला. या बंदुकांचे वेगवेगळे सुटे भाग करून ते दोन रेडिओंमध्ये घालून मी घरी पाठवले.

लष्करी सेवा संपण्याच्या दोन आठवड्यांआधी माझे तीन सोबती आणि मी रजा न काढता कामावर गेलो नाही. आम्ही बराकीत पुन्हा परतलो तेव्हा आम्हाला तुरुंगात डांबण्यात आले. जेलमध्ये असताना, मी एकदा रागाच्या भरात एका गार्डवर हल्ला केला. कोणा पेयोने अर्थात जिप्सी नसलेल्या माणसाने मला कमीपणा दाखवावा ही गोष्ट मला पचली नाही. दुसऱ्‍या दिवशी, आणखी एका अधिकाऱ्‍यासोबत माझे जबरदस्त भांडण झाले. त्यानंतर, पुढील लष्करी सेवा पार पाडण्यासाठी मला लायॉन्स येथील मॉन्टल्यूक तुरुंगात पाठवण्यात आले.

तुरुंगात स्वातंत्र्य लाभले

मोन्लुक तुरुंगातील पहिल्याच दिवशी एक सदगृहस्थ माझ्याशी फार चांगला वागला. मग मला कळाले की, तो एक यहोवाचा साक्षीदार होता आणि त्याने व त्याच्या धर्माच्या इतर लोकांनी शस्त्रे घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकले होते. हे ऐकून मी गोंधळात पडलो. मला आणखी जाणून घ्यावेसे वाटले.

मला दिसून आले की, यहोवाचे साक्षीदार देवावर खऱ्‍या मनापासून प्रेम करतात आणि नैतिकतेबाबत त्यांचे उच्च दर्जे पाहून मी अधिकच प्रभावित झालो. तरीपण, माझ्या मनात अनेक प्रश्‍न होते. खासकरून, मेलेले लोक स्वप्नांद्वारे जिवंत असलेल्यांशी संवाद साधतात का हे मला जाणायचे होते—जिप्सी लोकांमध्ये यावर विश्‍वास केला जातो. झॉ पॉल या साक्षीदाराने, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल * या पुस्तकाद्वारे माझ्यासोबत बायबलचा अभ्यास करायची तयारी दाखवली.

ते पुस्तक मी एका रात्रीत वाचून काढले आणि त्यातील माहिती माझ्या अंतःकरणाला स्पर्शून गेली. या तुरुंगात मला खरे स्वातंत्र्य मिळाले होते! शेवटी मला तुरुंगातून सुटका मिळाली तेव्हा बायबल प्रकाशनांनी भरलेली एक बॅग घेऊन मी ट्रेनने घरी निघालो.

माझ्या परिसरातील साक्षीदारांशी संपर्क साधण्यासाठी मी मार्टीग येथील राज्य सभागृहात गेलो. मी एरीक नावाच्या एका तरुण पूर्ण-वेळेच्या सेवकासोबत बायबलचा अभ्यास चालू ठेवला. काही दिवसांतच मी धूम्रपान सोडले आणि माझ्या गुन्हेगार सोबत्यांकडे जाणे बंद केले. नीतिसूत्रे २७:११ नुसार वागण्याचा मी चंग बांधला होता; तेथे म्हटले आहे: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” यहोवा हा प्रेमळ पिता मला सापडला होता आणि त्याला खूष करणे हे आता माझे ध्येय होते.

जीवनात बदल करणे आव्हानात्मक

ख्रिस्ती तत्त्वे आचरणात आणणे माझ्याकरता इतके सोपे नव्हते. उदाहरणार्थ, अंमली पदार्थ बंद केल्यामुळे मला कित्येक आठवडे त्रास होऊ लागला. पण, सूडाची भावना मनातून काढून टाकणे हे सर्वात कठीण आव्हान होते. मी नेहमी माझ्यासोबत बंदूक बाळगायचो आणि माझ्या काकांना ठार केलेल्या लोकांचा सूड कसा घ्यायचा याचा मी सतत विचार करत असायचो, पण एरीकला याची काहीच कल्पना नव्हती. मी रात्र-रात्र त्यांना शोधण्यात घालवायचो.

मी एरीकला हे सांगितले तेव्हा, त्याने मला स्पष्टपणे सांगितले की, शस्त्र जवळ बाळगून सूड घेण्याचा विचार करत असताना तू देवासोबत चांगला नातेसंबंध प्रस्थापित करू शकत नाहीस. मला निवड करणे भाग होते. रोमकर १२:१९ येथील प्रेषित पौलाच्या सल्ल्यावर मी खोल विचार केला; तेथे म्हटले आहे: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या.” यासोबत मी कळकळीने प्रार्थना केली तेव्हा मला माझ्या भावनांवर काबू ठेवता आला. (स्तोत्र ५५:२२) शेवटी, माझ्याजवळची शस्त्रे देखील मी टाकून दिली. डिसेंबर २६, १९८६ रोजी, बायबलचा एक वर्ष अभ्यास केल्यावर, मी पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन यहोवा देवाला केलेले माझे समर्पण जाहीर केले.

माझ्या कुटुंबाची अनुकूल प्रतिक्रिया

माझ्या वर्तनात बदल केल्यामुळे माझ्या पालकांना बायबलचा अभ्यास करायला उत्तेजन मिळाले. त्यांनी पुन्हा विवाह केला आणि जुलै १९८९ साली माझ्या आईने बाप्तिस्मा घेतला. कालांतराने, माझ्या कुटुंबातल्या पुष्कळांनी बायबलचा संदेश स्वीकारला आणि ते यहोवाचे साक्षीदार बनले.

ऑगस्ट १९८८ मध्ये, मी पूर्ण-वेळेचा सेवक होण्याचा निश्‍चय केला. त्यानंतर, माझ्या मंडळीतील कॉट्या नावाची एक तरुण बहीण मला आवडू लागली. जून १०, १९८९ रोजी आमचा विवाह झाला. आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्षात बऱ्‍याच समस्या निर्माण झाल्या कारण मला स्त्रियांबद्दलच्या माझ्या दृष्टिकोनात अजूनही बदल करायचे होते. १ पेत्र ३:७ येथील शब्द लागू करणे मला फार कठीण गेले; तेथे पतींना आपल्या पत्नींशी सुज्ञतेने सहवास ठेवायला सांगितले आहे. माझा अंहकार गिळून माझ्या विचारसरणीत बदल करण्यासाठी मला वारंवार प्रार्थना करावी लागली. पण हळूहळू सुधार घडून आला.

माझ्या काकांच्या मृत्यूने मला अजूनही फार दुःख होते आणि काही वेळा मी त्यांचा विचार करतो तेव्हा मला माझे अश्रू आवरता येत नाहीत. त्यांचा खून झाला तेव्हाच्या आठवणींनी मला खूप मनःस्ताप होतो. बाप्तिस्मा झाल्यावरही कित्येक वर्षांपर्यंत, आमचे भांडण झाले होते त्या कुटुंबाच्या कोणा सदस्यांशी माझी अनपेक्षित भेट होईल याची मला भीती वाटायची. त्यांनी माझ्यावर हल्ला केल्यावर मी काय करीन? माझी काय प्रतिक्रिया असेल? त्या वेळी माझे जुने व्यक्‍तिमत्व मला काही करायला भाग पाडेल का?

एकदा, मी जवळपासच्या एका मंडळीत जाहीर भाषण दिले. तेथे मला पेपा दिसली; माझ्या काकांना मारलेल्या लोकांची ती नातेवाईक होती. मला हे कबूल करावे लागेल की, तिला पाहिल्यावर माझ्या खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तिमत्वाची परीक्षा झाली. पण मी माझ्या भावना बाजूला सारल्या. नंतर, पेपाचा बाप्तिस्मा झाला त्या दिवशी मी तिला आलिंगन देऊन तिने यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला याबद्दल तिचे अभिनंदन केले. जे काही घडले होते ते विसरून मी तिला माझी ख्रिस्ती बहीण म्हणून स्वीकारले.

यहोवाने मला द्वेषाच्या बंधनातून मुक्‍त होण्यासाठी मदत केल्याबद्दल मी दररोज त्याचे आभार मानतो. यहोवाने दया दाखवली नसती तर आज मी कोठे असतो? त्याच्यामुळे, आज मी सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. मला भविष्याकरताही एक आशा आहे—एका नव्या जगाची आशा जेथे द्वेष आणि हिंसेचा मागमूस नसेल. होय, मला पूर्ण भरवसा आहे की देवाचे पुढील अभिवचन पूर्ण होईल: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्‍वराच्या तोंडची ही वाणी आहे.”—मीखा ४:४. (g०३ १/०८)

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[१५ पानांवरील चित्र]

लेबननमध्ये युएन शांती दलासोबत, १९८५

[१६ पानांवरील चित्र]

कॉट्या आणि माझी मुले, टिमियो आणि पियर यांच्यासोबत