व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मॅग्ना कार्टा आणि स्वातंत्र्यासाठी मानवाची धडपड

मॅग्ना कार्टा आणि स्वातंत्र्यासाठी मानवाची धडपड

मॅग्ना कार्टा आणि स्वातंत्र्यासाठी मानवाची धडपड

ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाद्वारे

सरीच्या निसर्गरम्य इंग्रज प्रदेशातून टेम्स नदी वाहते. नदीच्या किनाऱ्‍यावर असलेल्या एका कुरणात, एक स्मारक आहे ज्यावरील लिखाण १३ व्या शतकातील एका घटनेची आठवण करून देते. येथे म्हणजे रन्‍नीमीडमध्ये, राजाच्या भारी करवसुलीने नाखूष होऊन त्याच्याविरुद्ध चढाई केलेल्या बॅरन अर्थात सरंजामशाही सरदारवर्गाशी इंग्रज राजा जॉन (११९९-१२१६ सत्ताधीन) याची भेट झाली. विशिष्ट हक्क समंत करून राजाने आपले गाऱ्‍हाणे ऐकून घ्यावे अशी सरदारांनी मागणी केली. शेवटी, दबावात येऊन राजाने एका सनदेवर शिक्कामोर्तब केला ज्याला नंतर मॅग्ना कार्टा (मोठी सनद) या नावाने ओळखण्यात आले.

या सनदेला “पाश्‍चात्य इतिहासातील अनन्य साधारण महत्त्व असलेले कायदेशीर दस्तऐवज” असे का म्हटले जाते? याचे उत्तर पाहिल्यावर स्वातंत्र्यासाठी मानवाने केलेल्या धडपडीबद्दल आपल्याला बरेच कळून येईल.

सरदारांचे कलम

राजा जॉनचा रोमन कॅथलिक चर्चशी तीव्र संघर्ष झाला होता. त्याने स्टीफन लँग्टन याला आर्चबिशप म्हणून स्वीकारण्यास नकार देऊन पोप इनोसंट तिसरे यांचा विरोध केला. त्यामुळे चर्चने आपले पाठबळ काढून घेतले आणि अशाप्रकारे राजाला बहिष्कृत केले. परंतु, जॉनने समेट करवण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड आणि आयर्लंड येथील आपली राज्ये पोपच्या हवाली करण्यास तो तयार झाला. परंतु, राजा चर्चला विश्‍वासू राहील आणि वार्षिक कर देईल या अटीवर पोपने जॉनला ही राज्ये परत केली. आता जॉन पोपच्या अधिकाराखाली राज्य करणारा राजा बनला.

आर्थिक अडचणींमुळे राजाच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडली. आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीदरम्यान, जॉनने सरदारांवरचे कर ११ पटीने वाढवले. चर्चशी झालेला संघर्ष आणि आर्थिक समस्या यांमुळे लोकांचे असे मत झाले की राजा विश्‍वासू नाही. लोकांच्या या मताचा जॉनच्या स्वभावावर मात्र काहीच परिणाम झाला नाही.

शेवटी, देशाच्या उत्तरेकडील सरदारांनी कर देण्यास नकार दिला तेव्हा अशांतता पसरली. त्यांनी लंडनला मोर्चा काढला आणि राजाला अधीनता दाखवण्यास नकार दिला. राजा, विंडसर येथील आपल्या राजमहालात होता आणि सरदारवर्गाने स्टेन्झ या जवळपासच्या नगरात पूर्वेकडे तळ ठोकला होता; दोन्ही पक्षांमध्ये बराच वादविवाद झाला. गुप्ततेत केलेल्या सौद्यामुळे दोन्ही नगराच्या मधोमध, रन्‍नीमीड येथे हे दोन्ही पक्ष अमोरासमोर आले. येथे, सोमवार, जून १५, १२१५ रोजी, जॉनने ४९ कलमांच्या सनदेवर शिक्का मारला. त्याची सुरवात अशाप्रकारे आहे: ‘सरदारांनी मागणी केलेली आणि राजाने संमती दिलेली ही कलमे आहेत.’

कायद्याखाली स्वातंत्र्य

परंतु, जॉनचे शंकास्पद हेतू लवकरच स्पष्ट झाले. राजाविरुद्ध आणि पोपविरुद्ध लोक असतानाही, राजाने रोममध्ये पोपला भेटण्यास दूत पाठवले. पोपने लगेच आज्ञापत्र काढून रन्‍नीमीड येथील करार व्यर्थ आणि निरर्थक ठरवला. इंग्लंडमध्ये लागलीच मुलकी युद्ध सुरू झाले. परंतु, दुसऱ्‍याच वर्षी जॉनचा अचानक मृत्यू झाला आणि त्याचा नऊ वर्षांचा मुलगा, हेन्री हा गादीवर बसला.

तरुण हेन्रीच्या पाठीराख्यांनी रन्‍नीमीडचा करार पुन्हा जारी केला. मॅग्ना कार्टा या पुस्तिकेनुसार, ही सुधारित आवृत्ती “जुलुमाचा अंत करणाऱ्‍या साधनापासून जाहीरनामा बनली ज्याद्वारे माफक मते बाळगणाऱ्‍या लोकांना राजाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र केले जाऊ शकेल.” हेन्रीच्या कारकीर्दीत हा करार अनेकदा जारी करण्यात आला. त्याच्यानंतर गादीवर बसलेल्या एडवर्ड पहिले यांनी ऑक्टोबर १२, १२९७ रोजी पुन्हा एकदा मॅग्ना कार्टाला योग्य ठरवले तेव्हा शेवटी त्याची एक प्रत कायद्यांच्या यादीत ठेवण्यात आली; ही जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दस्तऐवजांची यादी होती.

या सनदेने सम्राटाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या. त्यानुसार, राजाला देखील त्याच्या इतर सर्व प्रजेप्रमाणे कायद्याचे पालन करणे भाग होते. इंग्लंडचे २० व्या शतकातील प्रसिद्ध इतिहासकार आणि पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल यांच्या मते, मॅग्ना कार्टामुळे “नियंत्रण आणि संतुलनाची व्यवस्था करण्यात आली ज्यामध्ये सम्राटाला आवश्‍यक अधिकार मिळणार होता पण कोणा जुलूमशाही किंवा मूर्ख व्यक्‍तीने अधिकाराचा गैरवापर केल्यास त्यावर आळा बसणार होता.” ही उद्दिष्टे निश्‍चितच चांगली होती. पण सामान्य माणसासाठी या दस्तऐवजाचे काय महत्त्व होते? त्या काळी, काहीच नाही. मॅग्ना कार्टात केवळ “फ्री मेन” यांच्या हक्कांविषयी सांगितले होते—हा बड्या सरंजामदारांचा वर्ग असून त्या काळी तो लहान होता. *

एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात निरीक्षण केल्याप्रमाणे, मॅग्ना कार्टा हे “इतिहासात फार आधीच जुलुमाविरुद्धचे चिन्ह आणि आवाज बनले आणि प्रत्येक नवीन पिढी त्यास स्वतःच्या स्वातंत्र्याचे संरक्षण समजू लागली.” हे महत्त्व दाखवण्यासाठी इंग्लंडच्या कायदेमंडळाची प्रत्येक सभा मॅग्ना कार्टाला संमती दर्शवून सुरू होत असते.

इंग्लंडमध्ये १७ व्या शतकातील वकीलांनी पंचाद्वारे चौकशी, प्रत्यक्षीकरण, * कायद्यासमोर समानता, हुकुमीपणाने अटक करण्यापासून स्वातंत्र्य आणि करवसुलीबाबत कायदेमंडळाचे नियंत्रण अशा हक्कांसाठी मॅग्ना कार्टातील कलमांचा आधार घेतला. त्यामुळे, ब्रिटिश मुत्सद्दी विल्यम पिट्ट यांनी मॅग्ना कार्टाला ‘इंग्रजी राज्यघटनेचे बायबल’ असे संबोधले.

धडपड चालू राहते

इंग्लंड आणि वेल्स येथे १९९६ पासून २००० पर्यंत लॉर्ड चीफ जस्टिस, लॉर्ड बिंगहॅम यांनी कबूल केले की, “गतकाळात, मॅग्ना कार्टाचे घटनात्मक महत्त्व सनदेत नमूद केलेल्या गोष्टींपेक्षा त्या गोष्टींचा जो अर्थ काढण्यात आला त्यावर अधिक अवलंबून होते.” तथापि, सनदेशी संबंधित असलेल्या स्वातंत्र्याच्या कल्पना सर्व इंग्रजी भाषिकांमध्ये पसरल्या.

सन १६२० मध्ये इंग्लंड सोडून अमेरिकेला जाणाऱ्‍या प्रवाशांनी आपल्यासोबत मॅग्ना कार्टाची एक प्रत नेली. १७७५ साली, अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींनी प्रतिनिधीत्व न देता कर वसूल करण्याचा विरोध केला तेव्हा सध्या मॅसेच्यूसेट्‌सचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या सभेने जाहीर केले की, अशाप्रकारचा कर मॅग्ना कार्टाचे उल्लंघन आहे. त्या काळी, मॅसेच्यूसेट्‌सच्या अधिकृत शिक्क्यावर एका हातात तलवार आणि दुसऱ्‍या हातात मॅग्ना कार्टा धरून असलेल्या माणसाचे चित्र होते.

नवीन राष्ट्राचे प्रतिनिधी, अमेरिकेच्या संयुक्‍त संस्थानांचे संविधान तयार करण्यासाठी एकत्र जमले तेव्हा कायद्याखाली स्वातंत्र्य असण्याच्या तत्त्वाला त्यांनी पाठिंबा दिला. यु.एस. बिल ऑफ राईट्‌स देखील याच तत्त्वावर आधारलेले आहे. त्यामुळे, १९५७ मध्ये मॅग्ना कार्टाचा स्वीकार करण्यासाठी अमेरिकन बार असोसिएशनने रन्‍नीमीड येथे एक स्मारक उभारले आणि त्यावर ही अक्षरे कोरली, “कायद्याखाली स्वातंत्र्याचे चिन्ह—मॅग्ना कार्टा याच्या स्मरणार्थ.”

सन १९४८ मध्ये, अमेरिकन स्त्री मुत्सद्दी, एलनर रूझवेल्ट यांनी युनायटेड नेशन्स युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्‍यूमन राईट्‌स तयार करण्यासाठी मदत केली व अशी आशा केली की ते “सर्व मानवांकरता आंतरराष्ट्रीय मॅग्ना कार्टा” ठरेल. मॅग्ना कार्टाचा इतिहास केवळ हेच दाखवून देतो की, मानवांना स्वातंत्र्याची केवढी तीव्र इच्छा आहे. लोकांचे उच्च हेतू असतानाही मूलभूत मानवी हक्क आज अनेक देशांमध्ये धोक्यात आहेत. सर्वांकरता स्वातंत्र्याची हमी देण्याकरता आपण समर्थ नाही हे मानवी सरकारांनी वारंवार दाखवून दिले आहे. या एका कारणामुळे यहोवाचे लाखो साक्षीदार एका वेगळ्या सरकाराच्या अर्थात देवाच्या राज्याच्या कायद्याखाली अधिक श्रेष्ठ प्रकारचे स्वातंत्र्य सध्या उपभोगत आहेत.

बायबल देवाविषयी एक उल्लेखनीय गोष्ट सांगते: “जेथे प्रभूचा आत्मा असतो तेथेच खरे स्वातंत्र्य असते.” (२ करिंथकर ३:१७) देवाचे राज्य मानवजातीकरता कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य देते ते तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, यहोवाचे साक्षीदार तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही त्यांना विचारू शकता. याचे उत्तर चित्तवेधक आणि स्वतंत्र करणारे आहे असे तुम्हाला दिसेल. (g०२ १२/२२)

[तळटीपा]

^ “सन १२१५ मध्ये, ‘फ्री मेन’ या शब्दाचा मर्यादित अर्थ होता, परंतु सतराव्या शतकापर्यंत तो जवळजवळ सर्वांना लागू होत होता.”—पाश्‍चात्य संस्कृतीचा इतिहास (इंग्रजी).

^ “देहावर तुमचा ताबा असावा” या लॅटिन अर्थातून आलेला प्रत्यक्षीकरणाचा लिखित आदेश हा कायदेशीर दस्तऐवज असून एखाद्या व्यक्‍तीच्या अटकेची कारणे देण्यासाठी काढलेला आदेश आहे.

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

मोठी सनद

मॅग्ना कार्टा (“मोठी सनद” या अर्थाचा लॅटिन शब्द) याची सुरवात “सरंजामी सरदारवर्गाची कलमे” यांनी झाली. राजा जॉनने या ४९ कलमांच्या दस्ताऐवजावर शिक्का मारला. पुढील काही दिवसांमध्ये हा करार ६३ कलमांचा झाला आणि पुन्हा राजाने त्यावर शिक्का मारला. १२१७ साली ती पुन्हा तयार करण्यात आली तेव्हा त्यात एक दुसरी, लहान सनद जोडण्यात आली जिचा संबंध वन कायद्याशी होता. त्यानंतर, ही कलमे मॅग्ना कार्टा म्हणून ओळखण्यात येऊ लागली.

या ६३ कलमांचे नऊ गट आहेत; यामध्ये सरंजामी सरदारवर्गाची गाऱ्‍हाणी, कायदा आणि न्याय यांच्यात सुधारणा आणि चर्चचे स्वातंत्र्य हे गट होते. इंग्रज सामाजिक स्वातंत्र्याचा ऐतिहासिक आधार असलेले ३९ वे कलम असे म्हणते: “कोणत्याही स्वतंत्र माणसाला केवळ त्याच्या समान दर्जाच्या लोकांनी किंवा देशाच्या कायद्याने ठरवल्याशिवाय अटक केली जाणार नाही किंवा तुरुंगात टाकले जाणार नाही, त्याचे हक्क किंवा त्याची मालमत्ता त्याच्याजवळून काढून घेतली जाणार नाही, त्याला हद्दपार केले किंवा देशाबाहेर टाकले जाणार नाही, किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्याचे स्थान त्याच्याजवळून काढून घेतले जाणार नाही, त्याच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही किंवा इतरांकडून त्याच्यावर जबरदस्ती करवली जाणार नाही.”

[चित्र]

पार्श्‍वभूमी: मॅग्ना कार्टाची तिसरी सुधारित आवृत्ती

[चित्राचे श्रेय]

By permission of the British Library, ४६१४४ Exemplification of King Henry III’s reissue of Magna Carta १२२५

[२६ पानांवरील चित्र]

राजा जॉन

[चित्राचे श्रेय]

From the book Illustrated Notes on English Church History (Vols. I and II)

[२६ पानांवरील चित्र]

राजा जॉन आपला मुकुट पोपच्या दूताच्या हवाली करताना

[चित्राचे श्रेय]

From the book The History of Protestantism (Vol. I)

[२७ पानांवरील चित्र]

राजा जॉन सरंजामी सरदारवर्गाशी भेटून मॅग्ना कार्टावर शिक्का मारण्यास राजी होतो, १२१५

[चित्राचे श्रेय]

From the book The Story of Liberty, १८७८

[२८ पानांवरील चित्र]

रन्‍नीमीड, इंग्लंड येथील मॅग्ना कार्टाचे स्मारक

[चित्राचे श्रेय]

ABAJ/Stephen Hyde

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

वरची पार्श्‍वभूमी: By permission of the British Library, Cotton Augustus II १०६ Exemplification of King John’s Magna Carta १२१५; राजा जॉनचा शिक्का: Public Record Office, London