व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुरक्षित गर्भारपणासाठी

सुरक्षित गर्भारपणासाठी

सुरक्षित गर्भारपणासाठी

मेक्सिकोमधील सावध राहा! लेखकाद्वारे

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडनुसार, गर्भारपणाशी संबंधित असलेल्या कारणांमुळे दर वर्षी पाच लाखांपेक्षा अधिक स्त्रियांचा मृत्यू होतो. याशिवाय, संयुक्‍त राष्ट्र बालक निधी (युनिसेफ) असा अहवाल देते, की दर वर्षी सहा कोटी पेक्षा अधिक स्त्रियांमध्ये, गर्भारपणामुळे गंभीर समस्या निर्माण होतात व यांपैकी एक तृतीयांश स्त्रियांना या समस्यांमुळे कायमची इजा होते किंवा रोगांचे संसर्ग होतात. विकसनशील देशांत अनेक स्त्रिया वारंवार गर्भारपण, बाळंतपण, स्वतःकडे दुर्लक्ष या चक्रात अडकल्या आहेत, ज्यामुळे त्या अगदी गळून जातात व आजारी पडतात. होय, गर्भारपण केवळ हानीकारकच नव्हे तर घातकही ठरू शकते. बाळंतपण व्यवस्थित पार पडण्यासाठी स्त्री काही करू शकते का?

बाळंतपणाआधी आरोग्याची काळजी

योजना करणे. आपल्याला किती मुले हवीत यावर पतीपत्नी चर्चा करू शकतात. विकसनशील देशांत, अंगावर पिणारे बाळ असताना पुन्हा पोटशी असलेल्या बायका सर्वसामान्यपणे पाहायला मिळतात. काळजीपूर्वक योजना व विचार केल्यास मुलांमध्ये अंतर ठेवता येते; यामुळे स्त्रीला बाळंतपणानंतरची झीज भरून काढायला वेळ मिळतो.

आहार. कोअलिशन फॉर पॉझिटिव्ह आऊटकम्स इन प्रेगनन्सी नावाच्या संघटनेच्या मते, गर्भधारणा होण्याच्या चार महिन्यांआधीच, एखाद्या स्त्रीने हानीकारक प्रभावापासून स्वतःला बरे केले पाहिजे आणि बाळाच्या वाढीसाठी सकस आहार घेत राहिला पाहिजे. जसे की, गर्भिणीने फॉलिक आम्लाचा पुरेसा साठा घेतल्यास तंत्रिकानलिका चुकीच्या पद्धतीने बंद होण्याचा धोका कमी होतो. भ्रूणाची तंत्रिकानलिका गर्भधारणेपासून २४ व्या आणि २८ व्या दिवसादरम्यान—आपल्याला दिवस गेले आहेत हे अनेक स्त्रियांना कळायच्या कितीतरी आधी—बंद होत असल्यामुळे गरोदर होऊ इच्छिणाऱ्‍या काही स्त्रिया फॉलिक आम्ल घेऊ लागतात.

आवश्‍यक असलेले दुसरे महत्त्वाचे पोषक म्हणजे लोह. गर्भारपणी स्त्रीची लोहाची आवश्‍यकता दुप्पट होते. तिच्यात लोहाची कमतरता असेल—आणि विकसनशील देशांत अनेक स्त्रियांच्या बाबतीत हे खरे आहे—तर तिला अपुऱ्‍या लोहाचा पांडुरोग होण्याची शक्यता आहे. वारंवार गर्भ राहिल्यास तिची तब्येत आणखी बिघडू शकते कारण, स्त्रीला प्रत्येक बाळंतपणानंतरच्या काळात तिचे लोहाचे प्रमाण वाढवण्याची संधी मिळणार नाही. *

वय. १६ वर्षांखालील गर्भवती मुलींचा मृत्यू होण्याचा धोका, विशीत असलेल्या गर्भवती मुलींपेक्षा ६० टक्के अधिक आहे. आणि दुसऱ्‍या बाजूला पाहता, पस्तीशी उलटून गेल्यानंतर गर्भवती राहणाऱ्‍या स्त्रियांच्या बाळाला जन्मतःच, डाऊन्स सिंड्रोमसारखा आजार असण्याची शक्यता आहे. लहान वय असलेल्या किंवा वय उलटून गेलेल्या स्त्रिया गर्भवती राहतात तेव्हा त्यांना गर्भिणी विषबाधा होण्याची शक्यता आहे. या विकृतीत, गर्भ राहिल्याच्या २० व्या आठवड्यात रोग्याचा रक्‍तदाब वाढतो तसेच लघवीत एडीमा आणि श्‍वेतक यांचे प्रमाण वाढते ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

संसर्ग. मूत्रमार्ग, ग्रीवायोनी आणि जठरांत्रीय संसर्ग गर्भारपणात वाढू शकतात आणि यामुळे अकाली प्रसूतीचा आणि गर्भिणी विषबाधेचा धोका वाढू शकतो. कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर गर्भारपणाच्या आधीच औषधोपचार करणे उचित आहे.

गर्भारपणात आरोग्याची काळजी

प्रसवपूर्व काळजी. संपूर्ण गर्भावधीदरम्यान डॉक्टरांकडे नियमितरीत्या गेल्याने गर्भवती स्त्रीच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्या देशांत दवाखान्यात किंवा इस्पितळात नियमाने जाता येत नाही त्या देशांतही प्रशिक्षित सुईणी असू शकतील.

प्रसूतीच्या आधी काळजी घेतल्यास, प्रशिक्षित कर्मचाऱ्‍यांना तातडीच्या प्रसंगाची आधीच सूचना मिळेल. तातडीचे प्रसंग, जसे की गर्भबाहुल्य, अतिरिक्‍त रक्‍तदाब, हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्या व मधुमेह हे होय. काही देशांत, नवजात अर्भकातील धनुर्वात टाळण्यासाठी गर्भवतीला धनुर्वात विषसम लस टोचली जाते. गर्भारपणाच्या २६ व्या आणि २८ व्या आठवड्यादरम्यान, स्ट्रेपटोकॉकस ब गट यासाठी देखील तिची चाचणी केली जाऊ शकते. हे सूक्ष्मजंतू मोठ्या आंतड्यात असल्यास बाळंतपणाच्या वेळी बाळाला त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

आई होणाऱ्‍या स्त्रीने तिच्या डॉक्टरांना सर्वकाही तसेच तिच्या वैद्यकीय पूर्वेतिहासाविषयी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. तिने मनात कसलाही संकोच न बाळगता प्रश्‍ने विचारली पाहिजेत. योनिमार्गातून रक्‍तस्राव होत असेल, तोंडावर अचानक सूज आली असेल, तीव्रस्वरूपाची डोकेदुखी होत असेल किंवा बोटे दुखत असतील, दृष्टी अचानक अंधुकशी झाली असेल, पोटात तीव्र कळा येत असतील, सतत उलट्या होत असतील, थंडी वाजून ताप येत असेल, अर्भकाच्या हालचालीचे प्रमाण किंवा तीव्रता बदलली असेल, योनिमार्गातला ओलावा कमी झाला असेल, लघवी करताना त्रास होत असेल किंवा लघवीच होत नसेल तर तिने तातडीने दवाखान्यात जाणे गरजेचे आहे.

द्यपान आणि मादक पदार्थ. गर्भवतीने मद्यपान केले आणि मादक पदार्थांचे (तंबाखू देखील) सेवन केले तर, तिचे बाळ, मतिमंद, अपंग आणि वर्तनविकृतीसह जन्मण्याची दाट शक्यता असते. व्यसनी मातांच्या बाळांना अंमली पदार्थ घेण्याचे थांबल्यानंतर एखाद्याला जसा त्रास होतो तसा त्रास झाल्याचे दिसून आले आहे. काही लोकांचे म्हणणे आहे, की कधीतरी गर्भवती स्त्रीला एक ग्लास वाईन घ्यायला काही हरकत नाही; परंतु, सहसा तज्ज्ञ गर्भवतीला मद्य पूर्णपणे टाळण्याची शिफारस करतात. गर्भवती स्त्रीने धूम्रपानाच्या धूरापासूनसुद्धा दूर राहणे गरजेचे आहे.

औषधे. दिवस गेलेल्या स्त्रीने आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत; कारण तिच्या डॉक्टरांना, ती गरोदर असल्याचे माहीत असते शिवाय त्यांनी सर्व संभावणाऱ्‍या धोक्यांचा काळजीपूर्वक विचार केलेला असतो. पूरक म्हणून घेतलेले काही जीवनसत्व देखील हानीकारक ठरू शकतात. उदाहरणार्थ, अधिक प्रमाणात अ जीवनसत्व घेतल्याने अर्भकात विद्रुपता येण्याची शक्य आहे.

वजन वाढणे. वजनाच्या बाबतीत गर्भवती स्त्रीने टोकाची भूमिका घेऊ नये. क्रॉस फूड, न्यूट्रिशन ॲण्ड डायट थेरपी या पुस्तकानुसार, कमी वजनाच्या बाळाला, सामान्य वजनाच्या नवजात बाळापेक्षा मृत्यूचा धोका ४० पटीने अधिक असतो. दुसरीकडे पाहता, दोघांसाठी खाल्ले पाहिजे असा संभ्रम झाल्यामुळे स्त्री अधिक खाऊन स्थूल होते. चौथ्या महिन्यापासून गर्भवतीची उचित वजनवाढ होत असेल तर यावरून सूचित होते, की गर्भवती तिच्या वाढत्या गरजांनुसार उचित प्रमाणात खात आहे. *

आरोग्य आणि इतर गोष्टी. गर्भवती स्त्रीने दररोज अंघोळ केली पाहिजे परंतु वॅजिनल डाऊचेसचा (योनित घालावयाचे उपकरण) उपयोग करू नये. तिने विषाणुंचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीपासून, जसे की, रुबेल्ला किंवा ज्याला जर्मन गोवर असेही म्हटले जाते त्या रोग्यापासून चार हात लांब राहणे उचित ठरेल. तसेच, तिला टॉक्सोप्लासमोसीस होऊ नये म्हणून तिने अपुरे शिजलेले मांस आणि मांजरांच्या विष्ठेपासून पूर्णपणे दूर राहावे. स्वच्छतेच्या मूलभूत सवयी जसे की हात धुणे आणि कच्चे अन्‍नपदार्थ धुणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. गर्भावधीत, शरीर संबंधांमुळे सहसा धोका उत्पन्‍न होत नाही; केवळ बाळंतपणाच्या शेवटल्या आठवड्यांमध्ये किंवा रक्‍तस्राव झाला असेल, पोटात दुखत असेल किंवा आधी गर्भपात झाला असेल तर धोका उत्पन्‍न होण्याची शक्यता आहे.

यशस्वी बाळंतपण

गर्भारपणात स्वतःची काळजी घेणाऱ्‍या स्त्रीला बाळंतपणी तक्रारी उद्‌भवण्याची शक्यता कमी असू शकते. अर्थातच, आपले बाळंतपण घरी होऊ द्यावे की प्रसूतीगृहात होऊ द्यावे हे तिने आधीच ठरवलेले असेल. आपण काय अपेक्षा करावी आणि अनुभवी सुईण किंवा डॉक्टरांना सहकार्य कसे द्यावे याची तिला स्वतःला देखील पुरेशी माहिती असेल. आणि, गर्भिणीला ज्ञात असलेल्या माहितीच्या आधारे प्रसूतीची स्थिती, भगच्छेदन, संदंशांचा (फोर्सेप) वापर, वेदनाशामक औषधे आणि अर्भकाच्या हालचाली इलेक्ट्रॉनिक उपकरणावर पाहणे या बाबींबद्दल तिला निवड करता येत असल्यास तिला काय पसंत आहे हे सुईणी व डॉक्टरांना माहीत पडेल. इतर बाबतीतही एकमत असणे जरूरीचे आहे: घरात प्रसूती होत असताना काही तातडीचा प्रसंग उद्‌भवल्यास कोणत्या प्रसूतीगृहात किंवा क्लिनिकमध्ये जायचे? जास्तप्रमाणात रक्‍त गेल्यावर नेमके काय केले जाईल? रक्‍तस्रावामुळे पुष्कळ मातांचा मृत्यू होत असल्यामुळे, रक्‍त संक्रमण न घेणाऱ्‍या रुग्णांसाठी रक्‍ताचे पर्यायी पदार्थ तयार असले पाहिजेत. तसेच, सिझेरियनची गरज भासल्यास काय केले जाईल, यावरही पूर्वीच विचार केला पाहिजे.

बायबल म्हणते, की मुले देवाने दिलेले “धन” आहे. (स्तोत्र १२७:३) गर्भवती स्त्रीला आपल्या गर्भारपणाविषयी जितकी माहिती असेल तितकीच सोपी तिची प्रसूती होईल. गर्भारपणाआधी व नंतर, स्वतःची काळजी घेतल्याने व प्रसूतीच्या विविध पैलूंवर आधीच विचार केल्याने, गर्भवती स्त्री आपले गर्भारपण सुरक्षित करू शकेल. (g०३ १/०८)

[तळटीपा]

^ कलिजा, शेंगभाज्या, हिरव्या पालेभाज्या, कवचफळे आणि सत्व मिसळलेल्या कडधान्यांतून फॉलिक आम्ले आणि लोह मिळू शकते. अधिक मात्रेत लोह असलेले अन्‍न पचावयास हलके व्हावे म्हणून ते, क जीवनसत्व असलेले अन्‍नपदार्थ, जसे की, ताजी फळे यांच्यासोबत खाणे उत्तम ठरेल.

^ सुदृढ वजन असलेल्या गर्भवती स्त्रीचे बाळंत होईपर्यंत ९ ते १२ किलो वाढणे योग्य आहे. तरीपण, पौगंडावस्थेत असलेल्या अथवा कुपोषित स्त्रियांचे १२ ते १५ किलोंपर्यंत वजन वाढले पाहिजे; परंतु स्थूल असलेल्या स्त्रियांचे वजन ७ ते ९ किलोंपर्यंतच वाढले पाहिजे.

[२२ पानांवरील चौकट]

गर्भवतींसाठी काही कानमंत्रे

• गर्भवतीच्या रोजच्या आहारात, सहसा फळे, भाज्या (खासकरून गर्द हिरव्या, नारंगी आणि लाल रंगाच्या भाज्या), शेंगभाज्या (जसे की, श्रावणघेवडा, सोयाबीन, मसूर आणि हरभरा), धान्ये (गहू, मका, ओट आणि बार्ली—अख्खे किंवा सकस केलेले जास्त उत्तम), मांसाहार (मच्छी, चिकन, बीफ, अंडी, चीझ आणि दूध, विशेषकरून साय काढलेले) यांचा समावेश असावा. चरबी, साखर आणि मीठ यांचे मर्यादित सेवन केलेले बरे. भरपूर पाणी प्या. कॅफेन असलेली पेये तसेच परिरक्षक (प्रीझरव्हेटिव) आणि भर घातलेले पदार्थ (जसे की कृत्रिम रंग आणि स्वाद) टाळावेत. खळ, माती आणि खायचे नसतात असे इतर पदार्थ खाल्यामुळे कुपोषण आणि विषबाधा होऊ शकते.

• क्ष-किरण आणि हानीकारक रसायने यांसारख्या पर्यावरणाचे प्रदूषण करणाऱ्‍या गोष्टींपासून सावध राहा. फवाऱ्‍यांचा आणि घरात वापरल्या जाणाऱ्‍या इतर पदार्थांचा मर्यादित वापर करा. कमाल तापमानामुळे किंवा अतिव्यायामामुळे शरीर अतिउष्ण होऊ देऊ नका. खूप वेळपर्यंत उभे राहण्याचे आणि जास्त श्रम करण्याचे टाळा. गाडीत बसताना योग्य सीटबेल्ट वापरा.