व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ही समस्या का वाढत आहे?

ही समस्या का वाढत आहे?

ही समस्या का वाढत आहे?

ड्रग्स व शस्त्रांच्या व्यापाराच्या पाठोपाठ वेश्‍याव्यवसाय हा जगातील सर्वात मोठा व्यापार आहे हे तुम्हाला माहीत होते का? संयुक्‍त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रकारच्या वेश्‍याव्यापारात जलद गतीने वाढ होत आहे.

एका लॅटिन-अमेरिकन देशातील चौकशी समितीने असे वृत्त दिले की देहाचा व्यापार बेकायदेशीर असूनसुद्धा देशात ५,००,००० बालिका वेश्‍या आहेत.

दुसऱ्‍या एका देशात, जवळजवळ ३,००,००० बाल वेश्‍या रस्त्यांवर, खासकरून ड्रग्सचा व्यापार असलेल्या परिसरांत धंदा करतात.

एका आशियाई देशात सुमारे दहा लाख मुलींना वेश्‍या बनवून त्यांना अक्षरशः गुलामांप्रमाणे वागवले जाते. काही देश तर बाल वेश्‍या व सेक्स पर्यटनाची माहेरघरे समजली जातात.

एड्‌ससारख्या लैंगिकरित्या संक्रमित रोगांच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्राहक लहान मुलांसाठी मोठी किंमतही द्यायला तयार होतात कारण मुलांच्या कौमार्याची थोडीफार खात्री असल्यामुळे त्यांना या रोगांची लागण झाल्याची शक्यता कमी असते. ब्राझीलच्या न्याय खात्याच्या लुईजा नाजीब एलूफ यांनी म्हटले की “एड्‌सच्या भीतीमुळे पुरुषांचे लक्ष आता अगदी कोवळ्या मुलामुलींवर गेले आहे आणि यामुळे समस्या अधिकच बिकट झाली आहे.” त्यांनी पुढे म्हटले की “मुलींचे व किशोरवयीनांचे लैंगिक शोषण ही ब्राझीलच्या गरीब स्त्रियांमध्ये सर्वात गंभीर सामाजिक समस्या बनली आहे.”

दारिद्र्‌य आणि बाल वेश्‍याव्यवसाय

बाल वेश्‍याव्यवसाय हा दारिद्र्‌याच्या वातावरणात फोफावणारा धंदा आहे. सरकारी अधिकारी असलेल्या एका महिलेच्या मते, तिच्या देशातील बाल शोषण व वेश्‍याव्यवसाय “कौटुंबिक अशांतीशी थेटपणे संबंधित असून, दुःख व उपासमारीतून निपजणारी फळे” आहेत. काही पालक आपल्या मुलांना या धंद्यात विकण्याकरता गरीबीचे निमित्त सांगतात. रस्त्यावरील मुले या धंद्याकडे वळतात कारण पोट भरण्याचा हा एकमात्र मार्ग आहे असे त्यांना वाटते.

ओ एस्टाडो दी साऊं पाउलू या वृत्तपत्रानुसार मुली रस्त्यांवरील गुंडांच्या टोळ्यांत सामील होतात तेव्हा पुढेमागे कधीतरी त्या वेश्‍या बनतील हे ठरलेलेच आहे. पोट भरण्यासाठी त्या चोऱ्‍या करतात आणि अधूनमधून आपले शरीरही विकतात. नंतर मात्र त्या हाच धंदा पत्करतात.

काही वेळा किशोरवयीन मुलींना परदेशात वेश्‍याव्यवसाय करण्याकरता पाठवले जाते. युनेस्को सोर्सेसच्या वृत्तानुसार, “आशियाई व आफ्रिकी देशांतील गरिबी लक्षात घेता, परदेशी गेलेल्या या वेश्‍या आपल्या कुटुंबांना जो पैसा पाठवतात ती त्यांच्याकरता बरीच मोठी किंमत असते. या देशांत वेश्‍याव्यवसायाला प्रोत्साहन दिले जाते कारण श्रीमंत देशांतील पर्यटक खासकरून येथील तरुण व बालकांच्या ‘सेवेचा’ फायदा उचलण्यास येतात.”

एका लॅटिन अमेरिकन शहरात वेश्‍या असलेल्या बेघर बालकांना ज्या बिकट परिस्थितीत जगावे लागते त्याविषयी टाईम नियतकालिकात असे वृत्त देण्यात आले होते: “काही वेश्‍या अवघ्या १२ वर्षांच्या असतात. मोडकळीस आलेल्या कुटुंबातली ही मुले दिवसा जागा मिळेल तिथे झोपतात आणि रात्री, जहाजांवरील कर्मचारी जेथे सहसा जातात त्या नाईटक्लब व डिस्कोंमध्ये गिऱ्‍हाईकांच्या शोधात फिरतात.”

शुद्धीवर असताना जी किळसवाणी कृत्ये करण्यास एक बालवेश्‍या कधीही तयार होणार नाही, अशी कृत्ये ड्रग्सच्या नशेत तिच्याकडून करवून घेतली जातात. उदाहरणार्थ, व्हेझा या मासिकानुसार पोलिसांना ९२ व्हिडियोटेप्स सापडल्या ज्यात एका डॉक्टरने ५० स्त्रियांना अत्यंत पाशवीरितीने छळल्याचे चित्रण होते; यांपैकी बऱ्‍याचजणी अल्पवयीन होत्या.

ही भयानक वस्तूस्थिती असूनही एका तरुण वेश्‍येने असे म्हटले: “माझ्याजवळ कोणतेच हुन्‍नर नाही, त्यामुळे मी काम शोधले तरीसुद्धा पोट भरण्याइतके पैसे मला मिळणे शक्य नाही. मी हा धंदा करते याविषयी माझ्या कुटुंबाला माहीत आहे; मला हा धंदा सोडायचा नाही. माझ्या शरीरावर माझा हक्क आहे आणि त्याचा मी वाटेल तसा उपयोग करायला मोकळी आहे.”

पण या मुलींचा मुळात वेश्‍या बनण्याचा इरादा नसतो. एका समाजसेविकेने सांगितले की बऱ्‍याच तरुण वेश्‍यांना “लग्न करण्याची इच्छा” असते आणि एक न एक दिवशी “स्वप्नातला राजकुमार” येऊन आपल्याला सोडवेल अशी त्यांना आशा असते. वेश्‍याव्यवसाय पत्करण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे असली तरीसुद्धा, एका संशोधकाने सांगितले की: “सर्वात धक्केदायक गोष्ट अशी आहे की बहुतेक मुलींवर स्वतःच्या घरातच बलात्कार झाला होता.”

बाल वेश्‍याव्यवसायाचा अंत?

पण हे दुःखी जीवन जगणे भाग असलेल्या या मुलांकरता आशा आहे. सर्व वयाच्या वेश्‍यांनी आपल्या जीवनात परिवर्तन केल्याची उदाहरणे आहेत. (पृष्ठ ७ वर “लोक बदलू शकतात” हे शीर्षक असलेली पेटी पाहा.) देवाच्या वचनाच्या अर्थात बायबलच्या मदतीने जगभरातील लाखो लोक चांगले शेजारी व विश्‍वासू कौटुंबिक सदस्य बनण्यात यशस्वी झाले आहेत. पूर्वी व्यभिचारी, जारकर्मी, चोर, लोभी, दारूडे असलेल्या लोकांविषयी आपण असे वाचतो: “तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.

बायबलच्या काळाप्रमाणेच आजही असे अनेकजण आहेत जे आपल्या जीवनात बदल करत आहेत. तरीसुद्धा लैंगिक शोषणाचा प्रवाह रोखण्याकरता अजून बरेच काही करण्याची गरज आहे. काही सरकारे आणि इतर संस्था सेक्स पर्यटन व बाल वेश्‍यांच्या समस्येविरुद्ध लढा देत आहेत. पण खरे पाहता दुःख व गरिबी काढून टाकण्याकरता मनुष्य फार काही करू शकत नाहीत. कायदे बनवणारे, लोकांच्या मनातले विचार व प्रवृत्तींवर बंधने घालू शकत नाहीत आणि अनैतिकतेच्या मुळाशी खरे तर हेच विचार व याच प्रवृत्ती असतात.

पण, मनुष्याच्या प्रयत्नांऐवजी आणखी एक माध्यम आहे ज्याच्याद्वारे या सर्व समस्या सोडवल्या जातील आणि ते म्हणजे देवाचे राज्य. पुढील लेखात याविषयी स्पष्टीकरण दिले जाईल. (g०३ ०२/०८)

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

गरिबी बऱ्‍याचदा बाल वेश्‍याव्यवसायाला कारणीभूत ठरते

[६ पानांवरील चौकट]

मोठी किंमत

डेझी केवळ सहा वर्षांची असताना तिच्या भावांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर १४ वर्षांची होईपर्यंत ती आपल्या मोठ्या भावाजवळच राहिली आणि मग एका नाइटक्लबमध्ये काम करू लागली. काही दिवसांनंतर डेझी आजारी पडली. ती बरी झाल्यावर नाइटक्लबच्या मालकाने तिच्यावर कर्ज असल्याचे सांगून तिला वेश्‍येचा धंदा करण्यास भाग पाडले. साधारण एका वर्षानंतर अजूनही ती ते कर्ज फेडतच होती आणि ती कधीच त्यातून मोकळी होणार नाही असे तिला वाटू लागले. पण एका खलाशाने तिचे उरलेले कर्ज फेडले आणि तिला दुसऱ्‍या एक शहरात नेले. तिथे त्याने तिला अक्षरशः गुलामासारखे वागवले. ती त्याला सोडून गेली आणि तीन वर्षे दुसऱ्‍या एका माणसासोबत राहिली. यानंतर त्या दोघांनी लग्न केले. अनेक वैवाहिक समस्यांमुळे तिने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

शेवटी ती व तिचा पती दोघेही बायबलचा अभ्यास करू लागले. पण यहोवाचे साक्षीदार बनण्यास आपण लायक नाही असे डेझीला सारखे वाटायचे. आवश्‍यक बदल करण्यास तयार असलेल्या लोकांना यहोवा देव स्वीकारतो असे तिला बायबलमधून दाखवल्यावर तिने यहोवाला आपले जीवन समर्पित केले. डेझीने योग्य आचरण ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण तिचे समाधान होत नसे. ती वारंवार खिन्‍न होत असे. पण लैंगिक दुराचार आणि बाल वेश्‍या म्हणून जगल्यामुळे झालेल्या भावनिक आघातांवर मात करण्याकरता देण्यात आलेली मदत स्वीकारून डेझी सावरली आणि तिने हे भावनिक स्थैर्य टिकवून ठेवले आहे.

[७ पानांवरील चौकट]

लोक बदलू शकतात

येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याला दुःखी, पापी लोकांची दया आली. वेश्‍या, मग त्यांचे वय काहीही असो त्या आपले जीवन बदलू शकतात याची त्याला जाणीव होती. येशूने धर्म पुढाऱ्‍यांना तर असेही सांगितले: “मी तुम्हास खचित सांगतो जकातदार व कसबिणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात.” (मत्तय २१:३१) त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात तिरस्कार असला तरीसुद्धा यांच्यापैकी खऱ्‍या मनाच्या लोकांना देवाच्या पुत्रावर विश्‍वास ठेवल्यामुळे क्षमा करण्यात आली. पश्‍चात्ताप करणारे हे लोक देवाच्या राज्याचे आशीर्वाद मिळवण्याकरता आपले पूर्वीचे जीवन त्यागण्यास तयार होते. त्यानंतर ते देवाच्या नीतिमान दर्जांनुरूप जगले. आज देखील सर्व प्रकारचे लोक देवाच्या वचनातील सत्य स्वीकारतात आणि आपल्या जीवनात बदल करतात.

पहिल्या लेखात उल्लेख केलेल्या मारिया, करीना, व एस्टेला यांच्या जीवनात काय घडले हे पाहा. मारियाच्या आईने तिच्यावर हा धंदा सुरू ठेवण्याकरता बराच दबाव आणला; या दबावाला तोंड देण्यासोबतच मारियाला ड्रग्स घेण्याची सवय सोडून देण्याकरता देखील बराच प्रयत्न करावा लागला. ती स्पष्टीकरण देते: “वेश्‍येचे जीवन जगल्यामुळे मी स्वतःच्याच नजरेतून उतरले होते आणि या भावनांना दडपून टाकण्याकरता मी ड्रग्स घ्यायचे.” यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत आपले कशाप्रकारे स्वागत झाले याविषयी मारिया सांगते: “मंडळीतल्या सदस्यांनी दाखवलेल्या प्रेमामुळे मी हरखून गेले. सर्वांनी—मुलांनी तसेच मोठ्यांनी—मला आदराने वागवले. इथे सर्व विवाहित पुरुष आपापल्या पत्नींशी विश्‍वासू होते हे माझ्या लक्षात आले. त्यांनी माझे मैत्रीपूर्ण स्वागत केले याबद्दल मला फार आनंद वाटतो.”

करीना १७ वर्षांची होती तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांनी तिला भेट दिली. ती बायबलचा अभ्यास करू लागली, पण तरीसुद्धा काही काळपर्यंत ती वेश्‍येचा धंदा करतच होती. हळूहळू तिला बायबलमधील सत्यांचे मोल कळू लागले. त्यामुळे तिने एका दूरच्या शहरात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि तिथे ती यहोवाची साक्षीदार बनली.

लहानपणापासूनच वेश्‍याव्यवसाय, अय्याशी व दारू यांसारख्या वाईट गोष्टींत अडकलेल्या एस्टेलाला बायबलबद्दल आस्था वाटू लागली. पण देव आपल्याला कधीही क्षमा करणार नाही असे तिला वाटायचे. कालांतराने तिला कळू लागले की यहोवा देव पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना क्षमा करतो. आता ती ख्रिस्ती मंडळीची एक सदस्या आहे, तिचा विवाह झाला आहे आणि ती तीन मुलांची आई आहे. एस्टेला म्हणते: “मी खूप आनंदी आहे आणि यहोवाचे आभार मानते कारण त्याने मला त्या चिखलातून बाहेर काढून त्याच्या शुद्ध संस्थेत आश्रय दिला.”

या जीवनकथांवरून बायबलच्या एका विधानाची सत्यता पटते, ते म्हणजे देवाची अशी इच्छा आहे की “सर्व माणसांचे [आणि स्त्रियांचे] तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.”—१ तीमथ्य २:४.

[७ पानांवरील चित्र]

बाल वेश्‍या सहसा ड्रग्सच्या आहारी गेलेल्या असतात

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Jan Banning/Panos Pictures, १९९७