व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कीटकांपासून होणारे रोग वाढती समस्या

कीटकांपासून होणारे रोग वाढती समस्या

कीटकांपासून होणारे रोग वाढती समस्या

एका लॅटिन-अमेरिकन कुटुंबाचे घर. रात्रीची वेळ आहे. आई आपल्या लहान मुलाला बिछान्यात झोपवून त्याच्यावर प्रेमळपणे पांघरूण घालते आणि त्याला गुडनाईट म्हणून ती तेथून निघून जाते. पण अंधारात, एक काळा कुळकुळीत ढेकूण बिछान्यावरील छताच्या लहानशा फटीतून बाहेर येतो. जास्तीतजास्त तीन सेंटीमीटर लांबीचा हा कीडा झोपलेल्या मुलाच्या चेहऱ्‍यावर पडतो; मुलाला कसलीही जाणीव होत नाही, पण तो कीडा मुलाच्या त्वचेवर आपल्या तोंडाने दंश करतो व त्याचे रक्‍त शोषू लागतो. त्याचवेळेस, असंख्य परजीवींनी भरलेला किड्याचा मल मुलाच्या चेहऱ्‍यावर लागतो. मुलगा झोपेतच आपला चेहरा खाजवतो, ज्यामुळे संसर्गजन्य मल जखमेत शिरतो.

या एका घटनेमुळे त्या मुलाला शागास रोग होतो. एखाददोन आठवड्यांत त्याला जोरदार ताप येतो आणि त्याचे सबंध शरीर सुजते. तो बरा झाला तरीसुद्धा, परजीवी त्याच्या शरीरात वस्ती करू शकतात आणि नंतर ते त्याचे हृदय, मज्जातंतु आणि आंतरिक उतकांतही शिरू शकतात. कधीकधी १० ते २० वर्षांपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही. पण मग त्याच्या पाचन संस्थेत दुखापत होऊ शकते, त्याला मेंदूचा संसर्ग होऊ शकतो आणि शेवटी त्याचे हृदय बंद पडून तो दगावू शकतो.

वरील घटना काल्पनिक आहे, पण शागास रोग एखाद्या व्यक्‍तीला कसा होतो याचे अगदी वास्तविक वर्णन त्यात केले आहे. लॅटिन अमेरिकेत कोट्यवधी लोकांना हे जिवघेणे चुंबन मिळण्याची शक्यता आहे.

मनुष्याचे बहुष्पाद साथीदार

एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यानुसार “मनुष्यप्राण्यांतील मुख्य प्रकारचे ज्वर सहसा सूक्ष्म जंतूंमुळे होतात आणि या जंतूंचा कीटकांद्वारे प्रसार होतो.” लोक सहसा माशा, पिसू, डास, उवा आणि भुंगेरे यांसारख्या सहा पायांच्या किड्यांनाच नव्हे तर माइट्‌स व गोचीड यांसारख्या आठ पायांच्या जंतुंनाही “कीटक” हेच नाव देतात. शास्त्रज्ञ या सर्व किड्यांचे आर्थ्रोपॉड या मोठ्या संघात वर्गीकरण करतात—प्राणीजगतातील हे सर्वात मोठे वर्गीकरण असून त्यात आजवर शोध लागलेल्या १०,००,००० जातींचा समावेश आहे.

बहुतेक कीटकांमुळे मनुष्याला काहीही उपद्रव होत नाही आणि काही कीटक तर अतिशय उपयोगी आहेत. त्यांच्या मदतीशिवाय, मानव व पशू अन्‍नाकरता ज्या झाडांवर व वृक्षांवर अवलंबून असतात त्यांचे परागण होणार नाही आणि ते फलोत्पादन देखील करू शकणार नाहीत. काही कीटक टाकाऊ पदार्थांचे नवीनीकरण करण्यास मदत करतात. अनेक कीटक केवळ वनस्पतींवर गुजराण करतात तर काही कीटक इतर कीटकांना खातात.

अर्थात, काही कीटक वेदनाकारी दंशाने किंवा मोठ्या संख्येने येऊन मानवाला व प्राण्यांना उपद्रव करतात. काही कीटक पीकांचा फडशा पाडतात. पण त्याहूनही वाईट म्हणजे, काही कीटक रोग पसरवून मृत्यूलाही कारणीभूत ठरतात. यु.एस. सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शनचे ड्‌वेन गब्लर म्हणतात की कीटकजन्य रोगांनी “सतराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत इतर सर्व कारणांच्या तुलनेत, मनुष्यप्राण्यांत सर्वाधिक रोग पसरवून त्यांचे बळी घेतले आहेत.”

सध्या, दर ६ जणांपैकी जवळजवळ १ जणाला कीटकांद्वारे पसरणाऱ्‍या रोगाचा संसर्ग झालेला आहे. मनुष्याला उपद्रव करण्याव्यतिरिक्‍त कीटकजन्य रोग मोठे आर्थिक ओझे आणतात. खासकरून, या रोगांना तोंड देण्याची कुवत नसलेल्या विकसनशील देशांना यांचा फटका बसतो. अशा रोगांची केवळ एक साथच पुरेशी असते. पश्‍चिम भारतात १९९४ साली आलेल्या अशा एका साथीमुळे तेथील स्थानिक व जागतिक अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचा भुर्दंड सहन करावा लागला असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्युएचओ) माहितीनुसार, अशाप्रकारच्या आरोग्य समस्यांना आळा घातल्याशिवाय जगातील सर्वात गरीब देशांचा विकास होऊ शकणार नाही.

कीटकांमुळे रोग कसे पसरतात

कीटक मुख्यतः दोन मार्गांनी रोगप्रसाराचे काम करतात. पहिला मार्ग म्हणजे यांत्रिक रोगप्रसार. ज्याप्रकारे लोक आपल्या चप्पलबुटांवर लागलेली घाण नकळत घरात आणतात त्याचप्रकारे, एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यानुसार, “घरमाशा आपल्या पायांवर लाखो सूक्ष्मजीव वाहू शकतात; पुरेशा मात्रेत असल्यास हे सूक्ष्मजीव रोगकारक ठरू शकतात.” उदाहरणार्थ, माशा दूषित विष्ठेवरून उडून आपल्या खाण्याच्या अथवा पिण्याच्या पदार्थांवर बसतात. अशारितीने मानवांना टायफॉइड, अतिसार, आणि पटकी (कॉलेरा) यांसारखे क्षीणवणारे व जीवघेणे रोग होऊ शकतात. अंधळेपणा आणणारे जगातील प्रमुख कारण असलेला ट्रॅकोमा नावाचा रोग देखील माशांच्या द्वारे पसरतो. ट्रॅकोमा या रोगात डोळ्यातील स्वच्छमंडलाला, अर्थात कनीनिकेसमोर असलेल्या डोळ्याच्या स्वच्छ भागाला—क्षती होऊन अंधळेपण येऊ शकते. सबंध जगात जवळजवळ ५०,००,००,००० मानवांना या रोगाने ग्रासले आहे.

घाणीत ज्यांची भरभराट होते ती झुरळे देखील नकळत रोगप्रसार करत असल्याची शक्यता आहे. यासोबत, दम्याने ग्रस्त असलेल्या, खासकरून मुलांच्या संख्येत अलीकडे लक्षणीय वाढ होण्याला झुरळांच्या अलर्जींचा संबंध असावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, ॲश्‍ली नावाच्या एका १५ वर्षीय मुलीला दमा झाल्यामुळे कित्येकदा रात्रीच्या वेळी श्‍वास घेण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो. तिचे डॉक्टर तिच्या छातीची तपासणी करणार, इतक्यात एक झुरळ ॲश्‍लीच्या शर्टातून बाहेर येऊन तपासणीच्या टेबलवर पळू लागते.

आंतरिक रोग

कीटक आणखी एक मार्गाने रोग पसरवतात. हे तेव्हा घडते, जेव्हा ते स्वतःच्या शरीरात वस्ती करणारे विषाणू, सूक्ष्मजंतू किंवा परजीवी, दंश करण्याद्वारे किंवा इतर मार्गाने दुसऱ्‍या प्राण्याच्या शरीरात घालतात. या मार्गाने मानवांना रोगांचे संक्रमण करणाऱ्‍या कीटकांची संख्या फार कमी आहे. उदाहरणार्थ, डासांचे हजारो प्रकार आहेत, पण केवळ ॲनोफिलीस नावाच्या जातीचे डासच मलेरिया रोगाचा प्रार्दुभाव करण्यास कारणीभूत आहेत, जो (क्षयरोगाच्या पाठोपाठ) जगातील सर्वात भयंकर संसर्गजन्य रोग आहे.

तरीसुद्धा, इतर प्रकारचे डास दुसऱ्‍या अनेक रोगांच्या फैलावाकरता जबाबदार आहेत. डब्ल्युएचओ अनुसार: “रोग पसरवणाऱ्‍या सर्व कीटकांपैकी सर्वाधिक उपसर्ग करणारे कीटक म्हणजे डास. डासांमुळेच पसरणारे मलेरिया, डेंग्यू आणि पीतज्वर, हे रोग दरवर्षी लाखो लोकांचा बळी घेतात आणि कोट्यवधी लोकांना ग्रासतात.” जगातील लोकसंख्येपैकी कमीतकमी ४० टक्के लोकांना मलेरिया होण्याचा आणि ४० टक्के लोकांना डेंग्यू होण्याचा धोका आहे. बऱ्‍याच ठिकाणी एकाच व्यक्‍तीला या दोन्ही रोगांचा संसर्ग होऊ शकतो.

अर्थात, केवळ डासच रोगवाहक कीटक आहेत असे नाही. त्सेत्से माश्‍या, झोपेचा रोग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्‍या प्रजीवसंघाचा प्रसार करतात. या रोगाची लाखो लोकांना लागण झाली असून काही ठिकाणी सबंध गावातल्या लोकांना आपली सुपीक शेते सोडून जावे लागले आहे. रिव्हर ब्लाइंड्‌नेस व्हायला कारणीभूत ठरणाऱ्‍या परजीवीचे संक्रमण करण्याद्वारे काळ्या माश्‍यांनी ४,००,००० आफ्रिकन लोकांना अंधत्व दिले आहे. सॅन्ड फ्लाय नावाच्या माशीच्या शरीरात राहणाऱ्‍या प्रजीवसंघामुळे लेशमॅनिॲसिस नावाने ओळखले जाणारे रोग होतात. या गटातील रोगांमुळे व्यक्‍तीला अपंगत्व किंवा विरूपता येऊ शकते, किंवा तो दगावू शकतो. सध्या सबंध जगात सर्व वयोगटांतील लाखो जण या रोगाने ग्रस्त आहेत. सर्वत्र आढळणाऱ्‍या पिसवांच्या शरीरात पट्टकृमी व मस्तिष्कशोथ, टुलेरिमिया आणि सहसा काळ्या मृत्यूशी संबंध जोडला जाणारा प्लेग यांसारख्या रोगांचे जंतू देखील वस्ती करतात. मध्य युगांत, ब्युबोनिक प्लेग (काळा मृत्यू) या रोगाची भयंकर साथ आली तेव्हा अवघ्या सहा वर्षांत तिने युरोपातील एक तृतीयांशाहून अधिक लोकसंख्येचा बळी घेतला.

उवा, माइट्‌स व गोचीड यांसारखे लहान कीटक इतर रोगांखेरीज वेगवेगळ्या प्रकारच्या प्रलापक ज्वरांची (टायफस) लागण करू शकतात. जगातील समशीतोष्ण प्रदेशांतील गोचीड क्षीणवणाऱ्‍या लाइम रोगाचे वाहक असतात—वाहकाद्वारे लागण होणारा हा अमेरिका व युरोपातील सर्वात सामान्य रोग आहे. एका स्वीडिश अभ्यासावरून असे दिसून आले की देशांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटरपर्यंत ही गोचीडे नेतात आणि कदाचित अशाप्रकारे या नवीन प्रदेशांत ते रोग देखील फैलावतात. ब्रिटानिका यात असे म्हटले आहे की “मनुष्यप्राण्याला सर्वाधिक रोग संक्रामित करणाऱ्‍या कृमीकीटकांपैकी (डासांचा अपवाद सोडला तर) गोचीडे पहिल्या क्रमांकावर आहेत.” किंबहुना, एका गोचीडेतच तीन वेगवेगळ्या रोगांचे जंतू असू शकतात आणि या तिन्ही रोगांची लागण एकाच दंशात होऊ शकते!

रोगांपासून “मुक्‍ती”

कीटकांद्वारे रोगांची लागण होते हे शास्त्रीय आधारावर अलीकडेच म्हणजे १८७७ साली सिद्ध करण्यात आले. तेव्हापासून रोग फैलावणाऱ्‍या कीटकांवर आळा घालण्यासाठी किंवा त्यांचा नायनाट करण्यासाठी अनेक मोठ्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. १९३९ साली या कीटकांविरुद्ध वापरल्या जाणाऱ्‍या शस्त्रांत, डीडीटी नावाच्या नव्या शस्त्राची भर पडली आणि १९६० च्या दशकापर्यंत एक आफ्रिका सोडून इतर भागांत, कीटकांद्वारे होणाऱ्‍या रोगांना फारसा मोठा धोका समजण्याचे लोकांनी सोडून दिले. या रोगवाहक कीटकांवर नियंत्रण करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आणीबाणीच्या परिस्थितीत कोणत्या औषधांच्या उपयोगाने लक्षणांवर नियंत्रण करता येईल यावर अधिक भर देण्यात येऊ लागला; तसेच, कीटक व त्यांच्या निवासक्षेत्राविषयी अभ्यास करण्यात कोणाला फारसा रस उरला नाही. नवनव्या औषधांचा शोध लागत होता आणि असे वाटू लागले जणू लवकरच विज्ञान सर्व रोगांवर गुणकारी ठरेल असे “जादुई औषध” शोधून काढण्यात यशस्वी होईल. जगाला जणू संसर्गजन्य रोगांपासून “मुक्‍ती” मिळाली होती. पण ही परिस्थिती फार काळ टिकणार नव्हती. याचे कारण पुढील लेखात स्पष्ट केले आहे. (g०३ ५/२२)

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

आज, ६ पैकी १ व्यक्‍ती कीटकांपासून होणाऱ्‍या रोगाने ग्रस्त आहे

[३ पानांवरील चित्र]

चुंबन घेणारा कीडा

[४ पानांवरील चित्र]

घरमाशांच्या पायांवर रोगाला कारणीभूत ठरणारे जंतू असतात

[५ पानांवरील चित्रे]

बऱ्‍याच कीटकांच्या शरीरात रोगांचे जंतू असतात

काळ्या माश्‍यांमुळे रिव्हर ब्लाइंडनेस रोग होतो

डासांमुळे मलेरिया, डेंग्यू आणि पीतज्वर होतो

उवांमुळे टायफस ज्वर होतो

पिसवांमुळे मस्तिष्कशोथ व इतर रोगांचे संक्रमण होते

त्सेत्से माशांमुळे निद्रारोगाचे संक्रमण होते

[चित्राचे श्रेय]

WHO/TDR/LSTM

CDC/James D. Gathany

CDC/Dr. Dennis D. Juranek

CDC/Janice Carr

WHO/TDR/Fisher

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

Clemson University - USDA Cooperative Extension Slide Series, www.insectimages.org