व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

छोटासा बहुउपयोगी शेंगदाणा

छोटासा बहुउपयोगी शेंगदाणा

छोटासा बहुउपयोगी शेंगदाणा

शेंगदाणे तुम्हाला आवडतात का? इतरही पुष्कळांना शेंगदाणे आवडतात. मानवजातीतील बहुतेकांना ते आवडतात. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेली दोन राष्ट्रे—चीन आणि भारत—एकत्र मिळून एकूण जागतिक पीकाच्या ५० टक्क्यांहून अधिक पीक काढतात.

अमेरिकेत दरवर्षी शेंगदाण्याचे कोट्यवधी किलोंचे पीक काढले जाते—म्हणजे, जगाच्या एकूण पीकातील १० टक्के उत्पन्‍न. आर्जेंटिना, ब्राझील, मलावी, नायजेरिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका आणि सुदान हे देखील शेंगदाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्‍न काढणारे देश आहेत. शेंगदाणा इतका लोकप्रिय कसा बनला? शेंगदाणे न खाणे केव्हा चांगले आहे?

दीर्घ इतिहास

शेंगदाणा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे असे म्हटले जाते. पेरूमध्ये सापडलेली कोलंबिया-पूर्व काळातील एक फुलदाणी, शेंगदाणा हा मानवाचा आवडता खाद्यपदार्थ आहे हे दाखवणारी सर्वात पुरातन वस्तू आहे. ही फुलदाणी शेंगदाण्याच्या आकाराची असून त्यावर शेंगदाण्याच्या आकाराची नक्षी काढलेली आहे. सर्वात प्रथम, दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश शोधकांना शेंगदाण्याचा तपास लागला तेव्हा शेंगदाणे प्रवासांदरम्यान अत्यंत पोषक अन्‍न असल्याचे त्यांना आढळले. मग त्यांनी काही शेंगदाणे आपल्यासोबत युरोपला आणले. युरोपियन लोकांनी शेंगदाण्याचा आणखी उपयोग केला; ते कॉफीच्या बियांऐवजी त्याचा उपयोग करू लागले.

नंतर, पोर्तुगीज लोकांनी आफ्रिकेत शेंगदाणे नेले. तेथे काही काळातच, शेंगदाणा मौल्यवान खाद्यपदार्थ बनला आणि इतर पीकांकरता योग्य नसलेल्या पडीक जमिनीतही तो उगवत असल्याचे तेथील लोकांच्या लक्षात आले. उलट, शेंगदाण्याच्या वनस्पतींनी नापीक जमिनीला आवश्‍यक असलेले नायट्रोजन देऊन जमिनीचा कस वाढवला. गुलामांच्या व्यापाराच्या काळात शेंगदाण्याने आफ्रिकेतून उत्तर अमेरिकेपर्यंतचा प्रवास केला.

१५३० च्या दशकात शेंगदाण्याने पोर्तुगीजांसोबत भारत व माकाऊला आणि स्पॅनिश लोकांसोबत फिलिपाईन्सला प्रवास केला. नंतर व्यापाऱ्‍यांनी या देशांमधून चीनमध्ये शेंगदाणा नेला. त्या देशात शेंगदाण्याचे पीक दुष्काळात आसरा ठरले.

१७०० च्या दशकातील वनस्पतीतज्ज्ञांनी शेंगदाण्याचा अभ्यास केला (याला ते भूईमूग म्हणत) व त्यांनी असा निष्कर्ष काढला की डुकरांसाठी ते उत्तम खाद्य आहे. १८०० च्या दशकाच्या सुरवातीला, अमेरिकेत, दक्षिण कॅरोलिना येथे शेंगदाण्याचे व्यापारी उत्पन्‍न काढू लागले. १८६१ साली सुरू झालेल्या अमेरिकन मुलकी युद्धादरम्यान शेंगदाणा हा दोन्ही पक्षातील सैनिकांचे अन्‍न होता.

परंतु, त्या वेळी, पुष्कळांच्या मते शेंगदाणे केवळ गरिबांचे अन्‍न होते. यावरून, त्या काळाच्या अमेरिकन शेतकऱ्‍यांनी मानवी खाद्याकरता शेंगदाण्याचे भरघोस पीक का काढले नाही याचे काही अंशी स्पष्टीकरण मिळते. शिवाय, यंत्रयुक्‍त सामग्रीचा शोध लागण्यापूर्वी १९०० सालाच्या सुमारास शेंगदाण्याचे पीक काढण्यासाठी पुष्कळ मजुरांची गरज लागत होती.

परंतु १९०३ पर्यंत कृषी रसायनाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर या अमेरिकन तज्ज्ञाने शेंगदाण्याच्या वनस्पतीच्या नवीन उपयोगांचे संशोधन करायला सुरवात केली होती. त्याचे ३०० हून अधिक उपयोग त्याने शोधून काढले; यात पेय, सौंदर्य प्रसाधने, रंग, औषधे, कपडे धुण्याचा साबण, कीटकनाशक औषधे आणि छपाईची शाई यांचा समावेश होता. कार्वरने स्थानीय शेतकऱ्‍यांना कापसाचे उत्पादन काढण्याचे थांबवून एक पीकाआड शेंगदाण्याचे पीक काढण्यासही प्रोत्साहन दिले कारण कापसामुळे जमीन निकस होत चालली होती. त्या काळात कापसाला बोल वीविलची कीड लागली आणि पुष्कळ शेतकरी कार्वरचा सल्ला अनुसरू लागले. याचा परिणाम? शेंगदाण्याचे पीक इतके यशस्वी झाले की, अमेरिकेतील दक्षिण भागातील ते सर्वात किफायतशीर पीक ठरले. आज कार्वर यांचे एक स्मारक डोथान, अलाबामा येथे उभे आहे. इतकेच नव्हे तर, अलाबामातील एन्टरप्राईस शहरात बोल वीविल कीटकाचेही स्मारक बांधले आहे कारण त्या कीडीनेच शेतकऱ्‍यांना शेंगदाण्याचे पीक काढण्यास प्रवृत्त केले.

शेंगदाण्याची लागवड

शेंगदाणे हे कवच फळे नाहीत तर भूईमुगाच्या झाडाच्या बिया आहेत. झाड वाढल्यावर त्याला पिवळी फुले येतात आणि ही फुले स्वपरागण करतात.

देठासमान असलेल्या किंजधराच्या टोकावर, वनस्पतीचे फलित झालेले अंडाशय, ज्यात भूईमुगाचे अंकुरबीज असते, जमिनीत शिरू लागते. जमिनीच्या खाली जमिनीच्या समांतर हे अंकुरबीज पसरते व जमिनीखाली ते पक्व होऊ लागते आणि शेवटी भूईमुगाचे रूप धारण करते. एकाच झाडाला जवळजवळ ४० भूईमूगाच्या शेंगा लागू शकतात.

शेंगदाण्याला उष्ण आणि साधारण पावसाचे हवामान आवश्‍यक असते. पेरणीपासून शेंगा तयार होण्यास भूईमुगाचा प्रकार आणि हवामान यानुसार १२० ते १६० दिवस लागू शकतात. शेंगा काढण्यासाठी, भूईमुगाचे संपूर्ण झाड उपटून शेंगा वाळण्यासाठी ते उलटे करून ठेवतात ज्यामुळे त्या साठवून ठेवायला उपयुक्‍त होतात. आज शेतकऱ्‍यांजवळ आधुनिक उपकरणे आहेत ज्यांकरवी, काढणी, माती अलग करणे आणि झाडे उलटी करणे हे सर्व एकाच वेळी केले जाते.

शेंगदाण्याचे बहुउपयोग

पोषणाच्या दृष्टीने शेंगदाण्याचे मूल्य उल्लेखनीय आहे. शेंगदाण्यात अधिक प्रमाणात तंतू असतात आणि त्यांत १३ जीवनसत्वे व २६ खनिज पदार्थ असतात जी यांतील बहुतेक आधुनिक आहारांमध्ये सापडत नाहीत. “बीफ लिव्हर आणि शेंगदाणे समप्रमाणात घेतल्यास, शेंगदाण्यात बीफ लिव्हरपेक्षा अधिक प्रथिने, खनिज पदार्थ आणि जीवनसत्वे असतात,” असे द एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो. पण वजन घटवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांनो सावधान! शेंगदाण्यामध्ये “जाड साईपेक्षा अधिक स्निग्ध पदार्थ” आणि “साखरेपेक्षा अधिक ऊर्जा (कॅलरी)” असते.

पुष्कळ राष्ट्रांच्या भोजनात शेंगदाण्यांचा उपयोग केला जातो. त्यांची वेगळी चव लगेच लक्षात येते. पाककला लेखक आन्या फॉन ब्रेमझन लिहितात, “शेंगदाण्याची चव इतकी तीव्र आणि निराळी असते की शेंगदाण्याचा मसाला असलेल्या कोणत्याही पाककृतीची चव सारखी असते. त्यामुळे इंडोनेशियन शेंगदाण्याची चटणी, पश्‍चिम आफ्रिकन सूप, चायनिज नूडल्स, पेरूव्हियन स्टू आणि पीनट बटर सँडविच यांची चव जवळजवळ सारखीच असते.”

जगभरात, शेंगदाण्यांतून इतरही अल्पोपहाराचे पदार्थ बनवले जातात. उदाहरणार्थ, भारतात, शेंगदाणे इतर वाळलेल्या शेंगांसोबत मिसळून टाईमपास म्हणून रस्त्यावर विकले जातात. मनोरंजक गोष्ट म्हणजे, महान अमेरिकन शेंगदाणा (इंग्रजी) या प्रकाशनात म्हटले आहे की, अहवालांनुसार, काही देशांमध्ये सँडविच स्प्रेडसाठी वापरले जाणारे लोकप्रिय पीनट बटर हे “१८९० च्या सुमारास सेंट लुई [अमेरिका] येथील एका डॉक्टरने वयस्क लोकांकरता आरोग्य आहार म्हणून तयार केले होते.”

पण अन्‍नाशिवाय शेंगदाण्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. आशियात, शेंगदाण्यातून स्वयंपाकाचे तेल तयार केले जाते. अत्यंत उच्च तापमानात स्वयंपाक करण्यासाठी देखील शेंगदाण्याच्या तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो आणि त्याला शिजत असलेल्या इतर पदार्थांची चव लागत नाही.

ब्राझीलमध्ये, शेंगदाण्याची पेंड, जी शेंगदाण्याच्या तेलाचा उप-पदार्थ आहे ती पशुखाद्य म्हणून वापरली जाते. आणि शेंगदाण्याचा उपयोग दररोजच्या इतर अनेक वस्तूंमध्येही केला जातो.—वरती पाहा.

सावधान—शेंगदाण्याची अलर्जी!

शेंगदाणे फ्रिजमध्ये न ठेवता अनेक दिवसांपर्यंत साठवता येतात. परंतु, याबाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बुरशी आलेल्या शेंगदाण्यांमध्ये ॲफ्लाटॉक्सीन अर्थात कर्करोगास कारणीभूत असलेला शक्‍तिशाली पदार्थ असतो. त्याशिवाय, काही लोकांना शेंगदाण्यांची अलर्जी असते. अलर्जीमुळे “नाकातून पाणी गळणे, पुरळ उठणे किंवा जीवन घातक अतिसंवेदनशीलता” देखील होऊ शकते असे प्रिव्हेन्शन या पत्रिकेत म्हटले आहे. अनेक अभ्यासांतून हे दिसून येत आहे की, लहान मुलांना शेंगदाण्याची अलर्जी होण्याचा प्रकार अधिक सर्वसामान्य होत चालला आहे.

मुलाच्या दोन्ही पालकांना दमा, अलर्जिक नासिकाशोथ किंवा इसब असला तर त्या मुलाला शेंगदाण्याची अलर्जी होण्याचा अधिक धोका आहे असे प्रिव्हेन्शन पत्रिका म्हणते.

हीच गोष्ट, ज्या बालकांच्या मातांना अलर्जीचा त्रास आहे आणि ज्या बालकांना पहिल्या वर्षात दुधाची अलर्जी होते त्यांच्याबाबतीत खरी ठरते. “अशा आईवडिलांनी लहान मुलांना ते निदान तीन वर्षांचे होईपर्यंत तरी पीनट बटर न दिलेले बरे,” असे अमेरिकेतील जॉन हॉप्किन्स विद्यापीठ वैद्यकशास्त्र केंद्रातील बालरोग विभागाचे प्राध्यापक, डॉ. ह्‍यू सॅमसन म्हणतात.

शेंगदाणे तुम्हाला आवडत असले किंवा नसले तरी शेंगदाण्याच्या बहुपयोगाच्या या माहितीमुळे या छोट्याशा परंतु अत्यंत लोकप्रिय बीजाविषयी तुमची कदर वाढली असेल. (g०३ ४/२२)

[२८ पानांवरील चौकट/चित्र]

शेंगदाण्याचे उप-पदार्थ दररोजच्या अनेक वस्तूंमध्ये सापडतात

• वॉलबोर्ड

• फायरप्लेसचे लाकूड

• प्राण्यांना घाण करण्यासाठी केलेला बिछाना

• कागद

• डिटर्जंट

• मलम

• मेटल पॉलिश

• ब्लीच

• शाई

• ॲक्सलचे वंगण

• शेविंग क्रीम

• चेहऱ्‍यावर लावण्याची क्रीम

• साबण

• लिनोलिअम

• रबर

• सौंदर्य प्रसाधने

• रंग

• स्फोटके

• शाम्पू

• औषधे

[चित्राचे श्रेय]

सूत्र: महान अमेरिकन शेंगदाणा

[२६ पानांवरील रेखाचित्र/चित्र]

पाने

किंजधर

जमिनीलगत

मुळे शेंगदाणा

[चित्राचे श्रेय]

The Peanut Farmer magazine

[२६ पानांवरील चित्र]

जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे स्मारक

[२७ पानांवरील चित्र]

अमेरिका

[२७ पानांवरील चित्र]

आफ्रिका

[२७ पानांवरील चित्र]

आशिया

[चित्राचे श्रेय]

FAO photo/R. Faidutti

[२७ पानांवरील चित्र]

शेंगदाण्याचे काही विविध अल्पोपहार

[२८ पानांवरील चित्र]

काही देशांमध्ये पीनट बटर अत्यंत लोकप्रिय आहे