व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धाड घालण्यास निघालेले लष्कर!

धाड घालण्यास निघालेले लष्कर!

धाड घालण्यास निघालेले लष्कर!

“आम्ही एका बेलिझियन गावात राहतो जेथे अलीकडेच विकास होऊ लागला आहे; आमच्या आजूबाजूला खूप झाडेझुडपे आहेत. एकदा सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आमच्या घरात एक सेना चाल करून आली. मुंग्यांचा थवा दाराखालून आणि दिसेल त्या फटीतून भक्ष्याच्या शोधात आत आला होता. आमच्याजवळ तास दोन तासांकरता घर सोडून बाहेर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही परतलो तेव्हा मुंग्यांचा थांगपत्ता नव्हता.”

बेलिझसारख्या उष्णकटिबंधातील देशांमध्ये राहणाऱ्‍या अनेकांकरता ही सामान्य गोष्ट आहे आणि त्यांना यांचा राग येत नाही. उलट, घरातील झुरळे आणि इतर उपद्रवी जीवजंतु नष्ट करण्याचा हा एक मार्ग आहे. शिवाय, हे काम पूर्ण झाल्यावर घरात कसलीही घाण राहत नाही.

येथे ज्या मुंग्यांविषयी सांगितले आहे त्यांना लष्करी मुंग्या म्हणतात कारण त्यांची जीवनशैली व त्यांच्या कार्यहालचाली लष्करासारख्या असतात. * कायमची घरटी करून राहण्याऐवजी लाखोंच्या संख्येतील हे भटके “लष्कर” तात्पुरती घरे बनवतात; या मुंग्या एकमेकांच्या पायांत पाय अडकवून राणी आणि तिच्या पिल्लांभोवती जणू काय एक जिवंत पडदा तयार करतात. या घरातून धाड घालणाऱ्‍यांचे गट ओळीने पाठवले जातात आणि ते कीटक व पालींसारखे लहान प्राणी शोधून आणतात. धाड घालणाऱ्‍या गटातील प्रमुख मुंग्या भक्ष्य पकडण्यासाठी बाजूने कूच करतात. समोरच्या बाजूला असलेल्या कामकरी मुंग्यांना स्रावाच्या माध्यमाने संदेश मिळत नाही व त्या पुढे सरकत नाहीत तेव्हा हे घडते. अशा वेळी, मागच्या मुंग्या पुढे चाल करून जातात आणि समोरच्या ओळीत काही ठिकाणी मुंग्यांची अधिक संख्या होते; त्यांची ही चाल बाजूने कूच करत असल्यासारखी असते.

लष्करी मुंग्यांचे ३६ दिवसांचे चक्र असते. १६ दिवस त्या धाडी घालत फिरतात आणि मग २० दिवस मुक्काम करतात; या काळादरम्यान राणी मुंगी अंडी घालत असते. त्यानंतर भूकेने व्याकूळ झालेल्या मुंग्या पुन्हा एकदा भक्ष्याच्या शोधात फिरतात. सुमारे दहा मीटर रुंद ओळीत चाल करून जाणाऱ्‍या या मुंग्यांपासून कोष्टी, विंचू, भुंगेरे, बेडूक आणि सरडे पळ काढत असतात आणि त्यांच्यापासून पळणाऱ्‍या या प्राण्यांमागे पक्षी लागलेले असतात.

नीतिसूत्रे ३०:२४, २५ येथे बायबलमध्ये “अत्यंत शहाणे” असे वर्णन केलेल्या मुंग्या निर्मितीतील आश्‍चर्यांपैकी एक आहेत. (g०३ ६/८)

[तळटीप]

^ या लेखात मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील एसीटोन जातीच्या मुंग्यांविषयी सांगितले आहे.

[२९ पानांवरील चित्र]

लष्करी मुंगी

[चित्राचे श्रेय]

© Frederick D. Atwood

[२९ पानांवरील चित्र]

पायांत पाय अडकवून तयार केलेला पूल

[चित्राचे श्रेय]

© Tim Brown/www.infiniteworld.org