व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनाला झोंबणारे शब्द टाळा

मनाला झोंबणारे शब्द टाळा

बायबलचा दृष्टिकोन

मनाला झोंबणारे शब्द टाळा

“एकाच तोंडातून स्तुति व शाप निघतात, माझ्या बंधूंनो, ह्‍या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.”—याकोब ३:१०.

बोलण्याची क्षमता हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे जे आपल्याला प्राण्यांपासून वेगळे करते. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे काही लोक या देणगीचा गैरवापर करतात. अपमान, शाप, गलिच्छ भाषा, दुर्भाषण, पांचट व अश्‍लील भाषा—या सर्वांमुळे कधीकधी शारीरिक जखमांपेक्षा जास्त इजा पोहंचते. “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो,” असे बायबल म्हणते.—नीतिसूत्रे १२:१८.

अधिकाधिक लोक सर्रासपणे शिवीगाळ करतात. शाळेत मुलांमध्ये अश्‍लील भाषा बोलण्याचे प्रमाण वाढल्याचा अहवाल दिला जातो. पण काहींचे म्हणणे आहे, की हानीकारक बोलणे मन मोकळे करण्यासाठी चांगले असते. राजनीती शास्त्राच्या एका विद्यार्थ्याने असे लिहिले: “तुमच्या सर्वसामान्य बोलण्यातून तुमच्या गहन भावना व्यक्‍त करता येत नाहीत तेव्हा प्रभावकारी होण्यासाठी तुम्ही गलिच्छ भाषा वापरली पाहिजे.” हानीकारक बोलण्याबद्दल ख्रिश्‍चनांनी अशी बेपर्वा मनोवृत्ती बाळगावी का? या बाबतीत देवाचा काय दृष्टिकोन आहे?

बीभत्स मस्करीचा वीट माना

बीभत्स भाषा ही आधुनिक दिवसांतील गोष्ट नाही. प्रेषितांच्या दिवसांत म्हणजे जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी लोक बीभत्स भाषा वापरत होते. आश्‍चर्य वाटले का ऐकून? असे दिसते, की कलस्सै मंडळीतील काही जण रागाच्या भरात बीभत्स भाषा वापरत होते. त्यांनी असे कदाचित, मुद्दामहून हल्ला करण्यासाठी किंवा इतरांना दुःख देण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी केले असावे. तसेच, आजही पुष्कळ लोक रागाच्या भरात बीभत्स भाषा वापरतात. म्हणूनच, कलस्सैकरांना पौलाने लिहिलेले पत्र आजही आपल्या दिवसांत लागू होते. पौलाने लिहिले: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.” (कलस्सैकर ३:८) स्पष्टतः, ख्रिश्‍चनांना रागाचा उद्रेक होऊ देण्याचा व रागामुळे वापरली जाणारी बीभत्स भाषा टाळण्याचा सल्ला दिला जातो.

पुष्कळ लोक, इतरांवर हल्ला करण्यासाठी किंवा इतरांना इजा पोहंचवण्यासाठी बीभत्स भाषा वापरत नाहीत, हे खरे आहे. तर बीभत्स भाषा बहुतेकदा सवयीमुळे किंवा सहजपणे वापरली जाते. यामुळे घाणेरडे शब्द दररोजच्या संभाषणाचे जणू भागच होऊन जातात. काहींना शिवीगाळ केल्याशिवाय आपले विचार व्यक्‍तच करता येत नाही. कधीकधी, इतरांना हसवण्यासाठी बीभत्स मस्करी केली जाते. परंतु अशाप्रकारची बीभत्स मस्करी क्षुल्लक, चालण्याजोगा अपराध आहे असे आपण समजावे का? पुढील गोष्टीचा विचार करा.

बीभत्स मस्करी ही धक्का बसेल इतकी अश्‍लील असते जी इतरांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने केली जाते. आज बीभस्त मस्करी ही बहुतेक सेक्सविषयीच असते. स्वतःला आदरणीय समजणाऱ्‍या पुष्कळ लोकांना अशाप्रकारचे बोलणे मनोरंजनदायक वाटते. (रोमकर १:२८-३२) त्यामुळे, नैसर्गिक व अनैसर्गिक अशा दोन्ही प्रकारच्या लैंगिक वर्तनाचा विषय हा पुष्कळ पेशेवाईक विनोदी नटांचा आवडता विषय आहे, यात काही आश्‍चर्य नाही. पुष्कळ चित्रपटांमध्ये तसेच टीव्ही व रेडिओ कार्यक्रमांमध्ये बीभत्स मस्करी दाखवली जाते.

बायबल बीभत्स मस्करीविषयी देखील सल्ला देते. इफिसमधील ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने असे लिहिले: “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये, तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी [“बीभत्स मस्करी,” NW] ह्‍यांचाहि उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुति होवो.” (तिरपे वळण आमचे) (इफिसकर ५:३, ४) स्पष्टतः बीभत्स भाषा मग ती कोणत्याही उद्देशाने वापरली जात असली तरीसुद्धा देवाविरुद्ध एक पाप आहे. ती वाईट आहे. अशी भाषा इतरांच्या मनाला झोंबते.

देवाला नाखूष करणारे कटू शब्द

हानीकारक बोलण्यात केवळ बीभस्त भाषाच समाविष्ट नाही. अपमान, टोमणे, थट्टा आणि निर्दयी टीकासुद्धा मनाला झोंबू शकते. टीकात्मक व एखाद्याच्या पाठीमागे बोलणाऱ्‍या बहुसंख्य लोकांमध्ये राहत असताना खासकरून आपणही कधीकधी आपल्या बोलण्याद्वारे पाप करतो, हे खरे आहे. (याकोब ३:२) तरीपण, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी केव्हाही अपमानास्पद बोलण्याबद्दल बपर्वा मनोवृत्ती स्वीकारू नये. बायबल हे स्पष्टपणे दाखवते, की यहोवा देवाला, मनाला झोंबणारे सर्वप्रकारचे शब्द अमान्य आहेत.

उदाहरणार्थ, बायबलमधील दुसरे राजे नावाच्या पुस्तकात आपण मुलांच्या एका गटाविषयी वाचतो ज्यांनी संदेष्टा अलीशाची टिंगल केली. अहवाल म्हणतो, की ती पोरे त्याला, “ए टकल्या नीघ येथून, ए टकल्या जातोस की नाही! असे त्याला चिडवू लागली.” या तरुण पोरांचे मन यहोवा ओळखू शकत असल्यामुळे, द्वेषभावनेने ते त्याला चिडवत होते हे यहोवाने पाहिले आणि त्यांचे चिडवणे त्याने अतिशय गंभीर घेतले. अहवाल पुढे म्हणतो की या पोरांनी टिंगल केल्यामुळे देवाने ४२ पोरांना ठार मारले.—२ राजे २:२३, २४, मराठी कॉमन लँग्वेज.

इस्राएल लोक, “देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्‍वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.” (२ इतिहास ३६:१६) देवाचा कोप प्रामुख्याने लोकांच्या मूर्तीपूजक व अवज्ञाकारी मार्गाक्रमणामुळे भडकला असला तरी, एक गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे व ती म्हणजे बायबल खासकरून, देवाच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना केल्याचा देखील उल्लेख करते. यावरून एक गोष्ट ठळकपणे जाणवते, की देव अशा वर्तनाचा अगदी सरळ सरळ निषेध करतो.

त्याच अनुषंगाने बायबल ख्रिश्‍चनांना असाही सल्ला देते: “वडील माणसाला टाकून बोलू नको.” (१ तीमथ्य ५:१) हे तत्त्व, इतरांबरोबरच्या आपल्या व्यवहाराला देखील लागू होऊ शकते. “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे,” असे बायबल आपल्याला उत्तेजन देते.—तीत ३:२.

आपली वाणी स्वाधीन ठेवणे

कधीकधी, इतरांना खोचक बोलण्याचे टाळणे जड जाऊ शकते. एखाद्याने आपल्याविरुद्ध अपराध केला असेल तर, खोचक, झोंबणाऱ्‍या शब्दांनी त्याची—समोर किंवा त्याच्या पाठीमागे—खरडपट्टी काढण्याद्वारे आपण त्याला शिक्षा देऊन उचित करतो असा आपण विचार करू. तरीपण, ख्रिश्‍चनांनी अशाप्रकारच्या तीव्र इच्छेचा प्रतिकार करावा. नीतिसूत्रे १०:१९ म्हणते: “फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा.”

देवाच्या स्वर्गदूतांनी उत्तम उदाहरण मांडले आहे. मानवजात करीत असलेल्या सर्वप्रकारच्या अपराधांची त्यांना जाणीव आहे. स्वर्गदूत मानवांपेक्षा शक्‍ती व बल यांत वरचढ असले तरी, “यहोवाबद्दल मनात आदर असल्यामुळे” ते मानवांची निर्भर्त्सना करून त्यांच्यावर दोषारोप करीत नाहीत. (२ पेत्र २:११, NW) देवाला सर्वांच्या अपराधांची जाणीव आहे आणि सुधारणा करण्याची त्याच्याजवळ ताकद आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे ते आपली वाणी स्वाधीन ठेवतात. स्वर्गदूतांचा प्रमुख, मीखाएल हा तर दियाबलाची देखील निंदा करण्यापासून परावृत्त झाला.—यहुदा ९.

ख्रिस्ती जन स्वर्गदूतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. ते या बायबलमधील सल्ल्याचे पालन करतात: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.”—रोमकर १२:१७-१९.

आपल्या आवाजाचा स्वर आणि ध्वनिमान यांनी देखील आपले बोलणे मनास लागेल असे होऊ शकते. एकमेकांवर खेकसून बोलून इजा पोहंचवणारे पती पत्नी आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. पुष्कळ पालक आपल्या मुलांवर धावून जातात. परंतु आपल्या भावना व्यक्‍त करण्यासाठी खेकसण्याची किंवा ओरडून बोलण्याची गरज नसते. बायबल आर्जवते: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला [अर्थात, ओरडणे] व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ४:३१) बायबल असेही म्हणते, की “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे.—२ तीमथ्य २:२४.

आरोग्यदायी शब्द

आज सर्वत्र निंदात्मक व बीभत्स भाषा वापरली जात असल्यामुळे, ख्रिश्‍चनांकडे या हानीकारक प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी एक कौशल्य असले पाहिजे. बायबलमध्ये एका उत्तम कौशल्याचा उल्लेख केला आहे; अर्थात आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करण्याचे कौशल्य. (मत्तय ७:१२; लूक १०:२७) शेजाऱ्‍यांबद्दल खरी काळजी आणि प्रेम आपल्याला आरोग्यदायी शब्द वापरण्यास प्रवृत्त करेल. बायबल म्हणते: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.”—इफिसकर ४:२९.

शिवाय, देवाचे वचन आपल्या मनात रूजू दिल्याने देखील आपल्याला मनास लागेल अशी भाषा टाळण्यास मदत मिळू शकते. पवित्र शास्त्रवचनांचे वाचन व त्यावर मनन केल्याने आपल्याला “सर्व मलिनता” सोडून देण्यास मदत मिळेल. (याकोब १:२१) होय, देवाच्या वचनामुळे आपले मन आरोग्यदायक होऊ शकते. (g०३ ६/८)