व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रोगांचे पुनरागमन—का?

रोगांचे पुनरागमन—का?

रोगांचे पुनरागमन—का?

सुमारे ४० वर्षांपूर्वी, मलेरिया, पीतज्वर आणि डेंग्यू यांसारखे, कीटकांद्वारे होणारे सर्वसामान्य रोग पृथ्वीवरील बऱ्‍याच प्रदेशांतून नामशेष झाले आहेत असे वाटू लागले. पण मग अनपेक्षित ते घडले—कीटकांद्वारे होणाऱ्‍या रोगांचे चिन्ह पुन्हा दिसू लागले.

का? एक तर, काही कीटक आणि ज्यांना ते वाहतात असे जंतू त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या कीटकनाशकांविरुद्ध व औषधांविरुद्ध प्रतिकारक बनले आहेत. जुळवून घेण्याच्या या नैसर्गिक प्रक्रियेला कीटकनाशकांच्या अत्याधिक उपयोगामुळेच नव्हे तर औषधांच्या दुरुपयोगामुळेही चालना मिळाली आहे. डास (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हटले आहे: “बऱ्‍याच गरीब कुटुंबांत लोक औषधे विकत आणतात, रोगाच्या लक्षणांपासून आराम मिळेपर्यंत केवळ त्यांचा उपयोग करतात आणि मग पुढच्या आजारपणासाठी ती साठवून ठेवतात.” अशा अपूर्ण उपचारामुळे अधिक शक्‍तिशाली जिवाणू व्यक्‍तीच्या शरीरातच राहू शकतात आणि ते अशा नव्या जिवाणूंना जन्म देतात ज्यांच्यावर त्या विशिष्ट औषधाचा काहीही परिणाम होत नाही.

हवामानात बदल

कीटकांद्वारे होणाऱ्‍या रोगांच्या पुनरागमनाकरता जबाबदार असलेले आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे बदल—निसर्गात आणि मानवसमाजात. एक चांगले उदाहरण म्हणजे जागतिक हवामानात बदल. काही शास्त्रज्ञांच्या मते सबंध जगात उष्णता वाढत असल्यामुळे रोगवाहक कीटक सध्या थंड हवामान असलेल्या ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना, असे घडण्यास सुरवात झाल्याचा पुरावा आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूल यासोबत संलग्न असलेल्या आरोग्य व जागतिक वातावरण केंद्राचे डॉ. पॉल आर. इपस्टीन म्हणतात: “कीटक आणि कीटकांद्वारे होणारे रोग आज आफ्रिका, आशिया व लॅटिन अमेरिकेतील उंच ठिकाणांवर नोंदवले जात आहेत.” कोस्टा रिका येथे डेंग्यू डोंगराळ प्रदेशापर्यंत पोचला आहे; अलीकडच्या काळापर्यंत या डोंगरांमुळे हा रोग पॅसिफिक समुद्रकिनाऱ्‍यापर्यंतच मर्यादित होता पण आज त्याने सबंध देशाला व्यापले आहे.

पण उष्ण हवामानाचा परिणाम एवढ्यावरच मर्यादित नाही. काही प्रदेशांत त्यामुळे नदींचे रूपांतर तळ्यांमध्ये होते, तर इतर ठिकाणी अतिवर्षणामुळे पाण्याची लहान तळी निर्माण होतात, ज्यात पाणी साठते. दोन्ही प्रकारांत, साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढण्याकरता उत्तम परिस्थिती निर्माण होते. उष्ण हवामानामुळे डासांच्या फैलावाची प्रक्रिया अधिक सुलभ होते, त्यांच्या प्रजनन प्रमाणात झपाट्याने वाढ होते आणि त्यांच्या भरभराटीचा काळ वाढतो. उष्ण हवामानात डास अधिक सक्रिय असतात. उष्ण तापमानाचा परिणाम डासांच्या शरीरातील रोगाच्या जंतूपर्यंत पोचतो; या जंतूंचे प्रजननाचे प्रमाण देखील वाढते आणि यामुळे एकाच दंशात संसर्ग होण्याची शक्यता बळावते. पण चिंता करण्यासारख्या इतरही गोष्टी आहेत.

रोगाचे विश्‍लेषण

मानव समाजातील बदलांमुळेही कीटकांद्वारे होणाऱ्‍या रोगांचे प्रमाण वाढते. हे कसे घडते हे समजून घेण्याकरता रोग संक्रमणाच्या क्रियेत कीटकांची भूमिका समजून घेतली पाहिजे. बऱ्‍याच रोगांत, संक्रमणाच्या साखळीतील कित्येक कड्यांपैकी कीटक केवळ एक कडी असू शकतो. एखाद्या पशू अथवा पक्ष्याच्या शरीरावर सूक्ष्म जंतू राहतात किंवा त्यांच्या रक्‍तात ते वस्ती करतात तेव्हा तो पशू अथवा पक्षी त्या रोगाचा वाहक बनतो. हे वाहक या रोगांना शरीरात थारा देऊनही जिवंत राहिले तर ते त्या रोगाचे संचय बनतात.

अमेरिकेतील कनेक्टीकट राज्यातील लाइम शहरात सर्वप्रथम १९७५ साली ओळख करण्यात आल्यामुळे लाइम रोग असे नाव देण्यात आलेल्या रोगाचे उदाहरण पाहा. लाइम रोगाला कारणीभूत ठरणारे जिवाणू युरोपातून येणाऱ्‍या जहाजांतील उंदरांद्वारे अथवा जनावरांद्वारे जवळजवळ शंभर वर्षांआधी उत्तर अमेरिकेत पोचली असावेत. इक्सोडस नावाच्या लहानशा गोचिडीने रोगग्रस्त जनावराचे रक्‍त शोषल्यास, रोगाचे जिवाणू आयुष्यभर त्या गोचीडीच्या पोटात राहतात. गोचीड दुसऱ्‍या एखाद्या प्राण्याला अथवा मनुष्याला चावते तेव्हा त्यांच्या रक्‍तात रोगाचे जिवाणू मिसळले जातात.

ईशान्य अमेरिकेत लाइम रोग एक प्रदेशनिष्ठ रोग आहे—बऱ्‍याच काळापासून तो येथे अस्तित्वात आहे. पांढऱ्‍या पायांचे उंदीर या लाइम रोगाच्या बॅक्टेरियाचे स्थानिक संचय आहेत. या उंदरांच्या शरीरावर गोचीडे, खासकरून विकासाच्या अवस्थेतील गोचीडे राहतात. पूर्ण विकास झालेली गोचीडे सहसा मृगांच्या शरीरावर राहणे पसंत करतात; तेथे ते स्वतःचे पोषण व समागम करतात. शोषलेल्या रक्‍ताने त्यांचे शरीर लडबडून गेल्यावर पूर्ण विकास झालेली मादी गोचीड जमिनीवर पडते व अंडी देते, ज्यातून लवकरच कीटक बाहेर पडून पुन्हा तेच चक्र सुरू होते.

परिस्थितीत बदल

मानवांना रोगग्रस्त न करताही रोगजंतू कित्येक वर्षे प्राण्यांच्या व कीटकांच्या शरीरात वस्ती करतात. पण परिस्थितीत बदल झाल्यास प्रदेशनिष्ठ रोग सर्वत्र फैलावणाऱ्‍या साथीचे रूप धारण करू शकतो—अर्थात एखाद्या भागातील अनेक लोक या रोगाने पछाडले जाऊ शकतात. लाइम रोगाच्या बाबतीत परस्थितीत कशाप्रकारे बदल झाला?

गतकाळात, शिकारी पशूंनी मृगांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याद्वारे मृगांच्या शरीरावरील गोचीडांचा मानवांशी संपर्क न येऊ देण्यास मदत केली. युरोपातील लोक पहिल्यांदा अमेरिकेत येऊन वस्ती करू लागले तेव्हा त्यांनी शेतमळ्यांकरता जमीन तयार करण्यासाठी जंगलतोड केली; यामुळे मृगांची संख्या कमी झाली आणि शिकारी पशू देखील हा प्रदेश सोडून इतरत्र गेले. पण १८०० शतकाच्या मध्यात, लोक पश्‍चिम भागात शेती करू लागले व बरीच शेतमळे उजाड पडली. हळूहळू तेथे पुन्हा जंगल वाढू लागले. कालांतराने मृग परत आले पण त्यांचे नैसर्गिक शिकारी परत आले नाहीत. अशारितीने मृगांची संख्या झपाट्याने वाढली आणि त्यासोबत गोचीडांचीही संख्या वाढली.

काही काळानंतर लाइम रोगाचे जंतू आले आणि कित्येक दशके मानवांना काहीही उपद्रव न करता ते अस्तित्वात होते. पण जंगलाच्या कडेकडेने उपनगरे वसू लागली तसतसे मोठ्या संख्येने लहान मुले व प्रौढ स्त्रीपुरूष या गोचीडांच्या संपर्कात येऊ लागली. गोचीडांनी मग मृगांसोबत मानवांशी सलगी केली आणि पाहता पाहता लाइम रोगाचा फैलाव झाला.

एका अस्थिर जगात रोगप्रसार

वरती वर्णन केलेला घटनाक्रम रोगप्रसाराच्या केवळ एका मार्गाचे चित्रण करतो आणि मानवाच्या कृतींमुळे रोगांच्या फैलावाला कशाप्रकारे हातभार लागतो याचे हे केवळ एक उदाहरण आहे. भविष्य अगदी स्पष्ट दिसत आहे (इंग्रजी) नावाच्या ग्रंथात, वातावरणविज्ञान तज्ज्ञ युजीन लिन्डन लिहितात, “जवळजवळ सर्व नवे, अधिक शक्‍तिशाली रूपात अवतरलेले रोग मनुष्याच्याच चुकीमुळे परतले आहेत.” इतर काही उदाहरणे: आधुनिक प्रवासाच्या लोकप्रियतेमुळे व वेगामुळे रोगजंतू व रोगवाहक सबंध जगात पसरू शकतात. लहान मोठ्या प्राण्यांच्या नैसर्गिक निवासक्षेत्रांना हानी झाल्यामुळे जैवविविधतेला धोका संभवतो. लिन्डन सांगतात, “प्रदूषण वायूत व पाण्यात पसरते आणि त्यामुळे प्राण्यांच्या व मानवांच्या रोगप्रतिबंधक यंत्रणेला क्षती पोहंचते.” पुढे ते डॉ. इपस्टीन यांच्या निष्कर्षाची पुनरुक्‍ती करतात: “सारांशात सांगायचे तर, मानवांनी परिस्थितीकीत लुडबूड केल्याने जागतिक रोगप्रतिबंधक यंत्रणा दुर्बल झाली असून रोगकारक जंतूंकरता परिस्थिती अगदी अनुकूल बनली आहे.”

राजकीय अस्थिरतेमुळे युद्धे होतात व युद्धांमुळे परिस्थितीकीला नुकसान होते, तसेच आरोग्य सेवा व अन्‍न वितरीत करणाऱ्‍या यंत्रणा देखील कोलमडतात. त्यासोबत, नैसर्गिक इतिहासाच्या अमेरिकन वस्तुसंग्रहालयाची बायोबुलेटिन पत्रिका सांगते त्यानुसार: “कुपोषित व दुर्बल झालेल्या निर्वासितांची अत्याधिक संख्येने निर्वासितांच्या छावण्यांत सोय केली जाते; येथल्या दाटीवाटीच्या व अनारोग्यकारक परिस्थितीत ते विविध प्रकारच्या संसर्गांच्या संपर्कात येतात.”

आर्थिक अस्थिरतेमुळे लोक स्थानांतर करतात; काही देशांतर्गत तर काही परदेशांत व तेसुद्धा गर्दीच्या शहरी परिसरांत. बायोबुलेटिन म्हणते, “रोगजंतूंना गर्दीची ठिकाणे आवडतात.” शहरांतील लोकसंख्या विस्फोटामुळे “सहसा आवश्‍यक सार्वजनिक आरोग्य सेवा, अर्थात, मूलभूत शिक्षण, पोषण व लसीकरण कार्यक्रम सर्वांना पुरवणे अशक्य होते.” दाटीवाटीमुळे पाणी पुरवठा, मलवहन आणि कचऱ्‍याची विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणांवर जादा भार पडतो ज्यामुळे साहजिकच आरोग्यरक्षण आणि वैयक्‍तिक स्वच्छता कठीण होऊन बसते. शिवाय कीटकांच्या व इतर रोगवाहकांच्या वाढीकरता परिस्थिती अनुकूल बनते. पण इतके असूनही, परिस्थिती निराशाजनक नाही, याविषयी पुढील लेखात पाहू. (g०३ ५/२२)

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

“जवळजवळ सर्व नवे, अधिक शक्‍तिशाली रूपात अवतरलेले रोग मनुष्याच्याच चुकीमुळे परतले आहेत”

[७ पानांवरील चौकट/चित्र]

वेस्ट नाईल विषाणूचा संयुक्‍त संस्थानांवर हल्ला

वेस्ट नाईल विषाणूचे संक्रमण मनुष्याला सर्वप्रथम डासांद्वारे झाले; १९३७ साली पहिल्यांदा युगांडात या विषाणूची ओळख पटवण्यात आली आणि नंतर हेच जंतू मध्यपूर्व, आशिया, ओशनिया आणि युरोप येथेही आढळले. पश्‍चिम गोलार्धात १९९९ सालापर्यंत हा विषाणू आढळला नव्हता. पण १९९९ सालापासून संयुक्‍त संस्थानांत ३,००० पेक्षा अधिक संसर्गाची प्रकरणे नोंदवण्यात आली असून २०० हून अधिक जण या रोगामुळे दगावले आहेत.

संक्रमण झालेल्या लोकांपैकी बहुतेकांना याची जाणीव नसते; केवळ काही जणांत फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. पण मोजक्या केसेसमध्ये रोग्याला गंभीर रोगांची लक्षणे उद्‌भवतात, उदाहरणार्थ, मस्तिष्कशोथ व मेरुरज्जुचा परिमस्तिष्क ज्वर. अद्याप वेस्ट नाईल विषाणूवर गुणकारी ठरणारी कोणतीही लस अथवा विशिष्ट उपचारपद्धत निर्माण करण्यात आलेली नाही. यु.एस. रोग नियंत्रण व अटकाव केंद्र ताकीद देते की संक्रमित दात्याच्या शरीर अवयवांच्या रोपणामुळे अथवा रक्‍त संक्रमणामुळे वेस्ट नाईल विषाणू दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या शरीरात प्रवेश करू शकतो. २००२ साली रॉयटर्स बातमी सेवेच्या वृत्तानुसार संक्रमणापूर्वी “रक्‍तात वेस्ट नाईल विषाणू आहे किंवा नाही याची परीक्षा करण्याची अद्याप कोणतीही पद्धत उपलब्ध नाही.”

[चित्राचे श्रेय]

CDC/James D. Gathany

[८, ९ पानांवरील चौकट/चित्र]

तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकता? कराव्यात व करू नयेत अशा काही गोष्टी

कीटकांद्वारे पसरणाऱ्‍या रोगांच्या समस्येने ग्रस्त असलेल्या भागांतील रहिवाशांसोबत विचारविनिमय करून सावध राहाने! निरोगी राहण्याकरता मदत करणाऱ्‍या काही सूचना गोळा केल्या आहेत. त्यांनी सुचवलेल्या गोष्टी कदाचित तुम्हाला तुमच्या परिसरातही उपयोगी पडतील.

स्वच्छता—तुमची पहिली बचाव नीती

आपले घर स्वच्छ ठेवा

“अन्‍न ठेवलेली भांडी नीट झाकून ठेवा. स्वयंपाक करून झाल्यावर वाढेपर्यंत अन्‍न झाकून ठेवा. अन्‍न खाली सांडल्यास लगेच ती जागा स्वच्छ करा. रात्रीची खरकटी भांडी सकाळपर्यंत तशीच ठेवू नका आणि दुसऱ्‍या दिवशी सकाळी फेकू म्हणून खाद्य पदार्थांचा कचरा उघड्यावर ठेवू नका. तो एकतर झाकून ठेवा किंवा पुरून टाका कारण कीटक व उंदीर रात्रीच खाद्याच्या शोधात फिरतात. मातीच्या जमिनीवर कॉन्क्रीटचा पातळ थर असल्यास घर स्वच्छ ठेवणे सोपे जाते व कीटक सहजासहजी येत नाहीत.”—आफ्रिका.

“फळे अथवा कीटकांना आकर्षित करेल असे काहीही घरापासून दूर ठेवा. बकऱ्‍या, डुक्कर, कोंबड्या यांसारखी पाळीव जनावरे घराबाहेर ठेवा. उघड्या शौचालयांवर आच्छादन असावे. जनावरांची विष्ठा लगेच पुरावी अथवा माश्‍या त्यावर बसू नयेत म्हणून त्यावर चुना घालावा. शेजारचे लोक असे करत नसतील तरीसुद्धा तुम्ही या सुचनांचे पालन केल्यास कीटकांची संख्या कमीतकमी ठेवून इतरांकरता एक चांगले उदाहरण तुम्ही ठेवू शकता.”—दक्षिण अमेरिका.

Picture]

खाण्याचे पदार्थ किंवा कचरा झाकून न ठेवणे हे कीटकांना आपल्यासोबत जेवणाचे निमंत्रण देण्यासारखे आहे

वैयक्‍तिक स्वच्छता

“साबण कोणालाही परवडण्यासारखी वस्तू आहे. तेव्हा, हात व कपडे वारंवार, खासकरून इतर लोकांशी किंवा प्राण्यांशी संपर्क झाल्यावर धुवा. मृत जनावरांना स्पर्श करण्याचे टाळा. आपल्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना हात लावण्याचे टाळा. कपडे स्वच्छ दिसत असले तरीसुद्धा ते नियमितरित्या धुवावेत. पण काही सुगंधांमुळे कीटक आकर्षित होतात त्यामुळे सुगंधित साबणे व धुण्याची उत्पादने वापरण्याचे टाळावे.”—आफ्रिका.

प्रतिबंधक उपाय

डास जेथे अंडी घालू शकतील अशा जागा नाहीशा करा.

पाण्याच्या टाक्या इत्यादी झाकून ठेवा. जेथे पाणी साठू शकते अशी कोणतीही पात्रे ठेवू नका. झाडे लावलेल्या कुंडीत पाणी साठू देऊ नका. चार दिवसांपेक्षा जास्त काळ जेथेही पाणी साठेल तेथे डासांची पैदास होऊ शकते.—आग्नेय आशिया.

कीटकांशी संपर्क शक्यतो टाळा

अन्‍नाच्या शोधार्थ बाहेर पडण्याची कीटकांची आवडती वेळ व जागा टाळा. उष्णप्रदेशांत सूर्य लवकर मावळतो, त्यामुळे बरीच दैनंदिन कामे अंधार पडल्यावर केली जातात जेव्हा बरेच कीटक अधिक क्रियाशील असतात. बाहेर बसल्यामुळे व झोपल्यामुळे कीटकांद्वारे पसरणाऱ्‍या रोगांचे प्रचलन असलेल्या काळात तुम्ही स्वतःला धोक्यात घालता.—आफ्रिका.

[चित्र]

डास असलेल्या भागांत उघड्यावर झोपणे देखील डासांना आपल्यावर मेजवानी करू देण्याचे निमंत्रण देण्यासारखे आहे

शरीराचा जास्त भाग उघडा राहणार नाही अशाप्रकारचे कपडे घाला, खासकरून जंगलातील परिसरात असताना. आपल्या कपड्यांवर व त्वचेवर कीटकरोधक लावा व हे लावताना नेहमी लेबलवरील सूचनांचे पालन करा. सहलीला अथवा बाहेर कोठे जाऊन आल्यावर स्वतःच्या अथवा मुलांच्या अंगावर अथवा कपड्यांवर गोचीडे तर लागलेली नाहीत याची खात्री करा. पाळीव प्राण्यांना स्वच्छ ठेवा व त्यांच्या शरीरावर पिसवा नाहीत याची काळजी घ्या.—उत्तर अमेरिका.

शेतमळ्यांतील प्राण्यांशी कमीतकमी संपर्क ठेवा कारण त्यांच्यापासून मानवांना रोगांचे सहजासहजी संक्रमण होऊ शकते.—मध्य आशिया.

मच्छरदाणी वापरा—शक्य असल्यास कीटकनाशक पदार्थांनी युक्‍त असलेली मच्छरदाणी कुटुंबातील सर्व सदस्यांकरता वापरा. खिडक्यांना जाळ्या लावा व या जाळ्या सुस्थितीत ठेवा. छतातील छिद्रांतून कीटक घरात प्रवेश करू शकतात, त्यामुळे ही छिद्रे बुजवून टाका. अशाप्रकारचे प्रतिबंधक उपाय करण्यास थोडा पैसा खर्च करावा लागू शकतो, पण मुलांना इस्पितळात न्यावे लागले किंवा घरचा कमवता माणूस आजारी पडल्यास तुम्हाला याहून मोठा भुर्दंड बसू शकतो.—आफ्रिका.

[चित्र]

कीटकरोधक औषधांनी युक्‍त अशी मच्छरदाणी औषधांपेक्षा आणि इस्पितळाच्या खर्चापेक्षा स्वस्त पडते

कीटक लपू शकतील अशा जागा आपल्या घरातून नाहीशा करा. भिंतींवर व छताला प्लॅस्टर लावा आणि कोठे फटी अथवा छिद्रे झाल्यास ती बुजवून टाका. गवत, फांद्या इत्यादी वापरून बनवलेल्या छताला आतल्याबाजूने कीटकरोधक कापड लावा. कीटक जेथे लपू शकतील अशा अनावश्‍यक वस्तूंचा पसारा, उदाहरणार्थ कागदांचे किंवा कपड्यांचे ढीग ठेवू नका किंवा भिंतींवर बरीच चित्रे लावू नका.—दक्षिण अमेरिका.

काही लोक कीटकांना व उंदरांना पाहुणे समजून थारा देतात. हे पाहुणे नाहीत! त्यांना घरात प्रवेश करू देऊ नका. कीटकरोधके व कीटकनाशके वापरा पण ती वापरताना सूचनांचे पालन करा. माश्‍यांना मारण्याची उपकरणे वापरा. कल्पकतेचा वापर करा: एका स्त्रीने कापडाची लांब नळी तयार केली, त्यात वाळू भरली आणि कीडे घरात येऊ नयेत म्हणून दाराखालच्या फटीत ती ठेवली.—आफ्रिका.

[चित्र]

कीटकांना पाहुणे समजू नका. त्यांना बाहेर काढा!

प्रतिबंधक औषधे

योग्य आहार, विश्राम व व्यायाम यांद्वारे आपली रोगप्रतिबंधक यंत्रणा बळकट करा. तणाव कमी करा.—आफ्रिका.

प्रवाशांकरता: कीटकांद्वारे पसरणाऱ्‍या रोगांविषयी अद्ययावत माहिती मिळवा. सार्वजनिक आरोग्य केंद्रांतून व सरकारी इंटरनेट साइट्‌सवर माहिती उपलब्ध असते. प्रवासाला निघण्याआधी तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्यानुसार योग्य प्रतिबंधक उपचार करवून घ्या.

बरे वाटत नसल्यास

लगेच डॉक्टरचा सल्ला घ्या

लवकर निदान झाल्यास बऱ्‍याच रोगांवर उपचार करणे सोपे जाते.

सांभाळा, निदान चुकीचेही असू शकते

रोगवाहक कीटकांद्वारे पसरणाऱ्‍या रोगांविषयी व उष्णप्रदेशांतील (तुम्ही त्या भागात असल्यास) रोगांविषयी जागरूक असलेल्या डॉक्टरचाच सल्ला घ्या. डॉक्टरांना तुमची सर्व लक्षणे सांगा, गतकाळात तुम्ही कोठे प्रवास केला याविषयीही माहिती द्या. आवश्‍यक असेल तरच ॲन्टिबायोटिक घ्या आणि चुकूनही औषधे मध्येच बंद करू नका.

[चित्र]

कीटकांद्वारे पसरणारे रोग इतर रोगांसारखेच भासू शकतात. तुमच्या डॉक्टरांना पूर्ण माहिती द्या

[चित्राचे श्रेय]

पृथ्वीचा गोल: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[१० पानांवरील चौकट/चित्र]

कीटकांमुळे एचआयव्ही पसरतो का?

एक दशकापेक्षा अधिक काळ तपास व संशोधन केल्यानंतर कीटकवैज्ञानिकांना व वैद्यकीय शास्त्रज्ञांना डास अथवा इतर कोणतेही कीटक एड्‌स विषाणू, अर्थात एचआयव्ही याचे संक्रमण करत असल्याचा पुरावा आढळलेला नाही.

उदाहरणार्थ, डासांच्या बाबतीत पाहिल्यास, या कीटकांचे तोंड एकच छिद्र असलेल्या इंजेक्शनच्या सुईसारखे नसते, ज्यातून त्याने शोषलेले रक्‍त पुन्हा एखाद्या प्राण्याच्या शरीरात टोचता येते. डास एका छिद्रातून रक्‍त शोषतात आणि दुसऱ्‍या एका छिद्रातून लाळ बाहेर काढतात. शिवाय, झांबिया येथील माँगू नावाच्या नगरातील प्रांतीय आरोग्य व्यवस्थापन गटाचे एचआयव्ही तज्ज्ञ थॉमस डामासो खुलासा करतात, की डासांची पाचन संस्था रक्‍ताचे विघटीकरण करते ज्यामुळे एचआयव्ही विषाणू नष्ट होतो. कीटकांच्या विष्ठेत एचआयव्ही आढळत नाहीत. आणि मलेरियाचे परजीवी ज्याप्रमाणे डासाच्या लाळेत प्रवेश करतात त्याप्रमाणे एचआयव्ही विषाणूच्या बाबतीत घडत नाही.

एचआयव्हीचे संक्रमण होण्याकरता एका व्यक्‍तीला कित्येक संसर्गजन्य कणांच्या संपर्कात येणे आवश्‍यक असते. डास एखाद्या व्यक्‍तीचे रक्‍त शोषत असताना मध्येच काही व्यत्यय आले आणि तो लगेच उडून दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या शरीरावर बसला तरीसुद्धा त्याच्या मुखांगांवर लागलेले रक्‍त अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे त्यापासून धोका संभवू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, एचआयव्हीच्या संक्रमित रक्‍ताने भरलेला डास आपल्या शरीरावरील उघड्या जखमेवर मारला तरीसुद्धा एचआयव्हीचे संक्रमण होणार नाही.

[चित्राचे श्रेय]

CDC/James D. Gathany

[७ पानांवरील चित्रे]

मृगांच्या शरीरावर राहणारी गोचीड (उजवीकडे आकार मोठा करून दाखवलेली) मानवांना लाइम रोग देतात

डावीकडून उजवीकडे: पूर्ण  विकास झालेली मादी, पूर्ण विकास झालेला नर, आणि अर्भक सर्व खऱ्‍या आकारात दाखवलेले

[चित्राचे श्रेय]

सर्व गोचिडी: CDC

[१०, ११ पानांवरील चित्रे]

पूर, अनारोग्यकारक परिस्थिती व मानवी स्थानांतर कीटकांद्वारे होणाऱ्‍या रोगांना हातभार लावतात

[चित्राचे श्रेय]

FOTO UNACIONES (from U.S. Army)