व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अश्‍लील साहित्यामुळे होणारे नुकसान

अश्‍लील साहित्यामुळे होणारे नुकसान

अश्‍लील साहित्यामुळे होणारे नुकसान

सर्व प्रकारची लैंगिक माहिती आज टीव्ही, चित्रपट, संगीत व्हिडिओपट आणि इंटरनेट सारख्या माध्यमांतून सहज उपलब्ध आहे. बऱ्‍याच जणांचे म्हणणे आहे की कामोत्तेजक लैंगिक दृश्‍यांचा हा निरंतर भडिमार पूर्णपणे अनपायकारक आहे. पण हे खरे आहे का? *

अश्‍लील साहित्याचा प्रौढांवर होणारा परिणाम

समर्थक काहीही म्हणोत, पण अश्‍लील साहित्याचा लोकांवर, तसेच लैंगिक संबंध व लैंगिक वर्तन याविषयी त्यांच्या दृष्टिकोनावर अतिशय गंभीर दुष्परिणाम होतो. नॅशनल फाउंडेशन फॉर फॅमिली रीसर्च ॲन्ड एड्युकेशन येथील संशोधक या निष्कर्षावर आले की “अश्‍लील साहित्य पाहणारे लैंगिक अपवर्तनाकडे वळण्याची अधिक शक्यता असते.” एका रिपोर्टनुसार “अश्‍लील साहित्य चाळण्याची सवय असलेल्या पुरुषांमध्ये बलात्काराविषयीचा गैरसमज (की बलात्काराला खरे तर स्त्रियाच जबाबदार असतात, किंबहुना त्यांना त्यातून आनंद मिळतो आणि बलात्कार करणारे सामान्य व्यक्‍ती असतात) अगदी सर्वसामान्य आहे.”

काही संशोधक म्हणतात की अश्‍लील साहित्याचा वारंवार प्रयोग करणारे सामान्य वैवाहिक संबंध ठेवण्यास असमर्थ होतात आणि त्यांना त्यांतून आनंदही मिळत नाही. सेक्ससंबंधी व्यसनांचे उपचारतज्ज्ञ डॉ. व्हिक्टर क्लाईन यांच्या अनुभवानुसार, अश्‍लील साहित्याचा वापर करणाऱ्‍यांमध्ये सहसा असे पाहण्यात येते की हे व्यसन उत्तरोत्तर वाढतच जाते. यावर नियंत्रण न केल्यास, सहज अश्‍लील चित्रे चाळण्याचा प्रकार वाढत जाऊन व्यक्‍ती अतिशय अश्‍लील व विकृत प्रकारच्या साहित्यात रस घेऊ लागते. यामुळे कधीकधी ती व्यक्‍ती स्वतः विकृत लैंगिक गैरकृत्ये करू लागते. वर्तनशास्त्राचा अभ्यास करणारे या गोष्टीशी सहमत आहेत. डॉ. क्लाईन सांगतात की “या मार्गाने कोणत्याही प्रकारचे लैंगिक अपवर्तन निर्माण होऊ शकते . . . आणि व्यक्‍तीला कितीही दोषभावनेने ग्रासले तरीसुद्धा ते दूर करता येत नाही.” आज ना उद्या, ही दृश्‍ये पाहणारा या अश्‍लील साहित्यावर आधारित अनैतिक मनोकल्पना व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करतो आणि सहसा यामुळे भयंकर परिणाम घडतात.

क्लाईन शेवटी म्हणतात की ही समस्या हळूहळू आणि नकळत वाढू शकते. ते म्हणतात: “कर्करोगाप्रमाणे ती वाढत जाते आणि पसरत जाते. स्वतःहून ती क्वचितच थांबते आणि तिचा पूर्णपणे उपचार करणे देखील अत्यंत कठीण असते. या व्यसनाच्या आहारी गेलेले पुरुष सहसा हे कबूल करत नाहीत आणि समस्येला तोंड देण्याची इच्छा दाखवत नाहीत. हे अपेक्षित आहे. आणि सहसा यामुळे वैवाहिक बेबनाव, कधीकधी घटस्फोट आणि कधीकधी इतर जवळच्या संबंधांत वितुष्टे निर्माण होतात.”

तरुणांना होणारे नुकसान

आकडेवारीनुसार, १२ ते १७ या वयोगटातील मुले अश्‍लील साहित्याचे मुख्य उपभोक्‍ते आहेत. किंबहुना, कित्येकांना, जे काही लैंगिक शिक्षण मिळते ते याच अश्‍लील साहित्याद्वारे मिळते. यामुळे अतिशय गुंतागुंतीचे दुष्परिणाम घडतात. एका रिपोर्टनुसार, “अश्‍लील साहित्यात, किशोरवयीन मुलींची गर्भधारणा किंवा एड्‌ससारख्या लैंगिकरित्या संक्रमित रोगांचा उल्लेखही नसतो; यामुळे अशी खोटी धारणा निर्माण होते, की अश्‍लील साहित्यात दाखवल्या जाणाऱ्‍या वर्तनामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.”

काही संशोधकांचे म्हणणे आहे की अश्‍लील साहित्याच्या संपर्कात येणाऱ्‍या मुलांच्या मेंदूचा नैसर्गिकरित्या सामान्य विकास होत नाही. इन्स्टिट्यूट फॉर मिडिया एड्यूकेशनच्या अध्यक्षा डॉ. जुडिथ राइसमन यांनी असा निष्कर्ष काढला की, “अश्‍लील दृश्‍ये व ध्वनी यांच्याप्रती मेंदूच्या स्वाभाविक प्रतिक्रियेमुळे, व्यक्‍तीच्या तंत्रिका तंत्रावर होणाऱ्‍या परिणामाविषयी करण्यात आलेल्या अभ्यासातून असे निष्पन्‍न झाले की अश्‍लील दृश्‍य पाहणे ही जैविक दृष्टिकोनातून जीवनातली एक महत्त्वाची घटना ठरते; कोणत्याही गोष्टीची समज आल्यानंतर ती स्वाभाविकरित्या स्वीकारण्याच्या सामान्य प्रक्रियेत यामुळे अडथळा निर्माण होतो आणि—हे मुलांच्या ‘लवचिक’ मेंदूकरता अपायकारक ठरते कारण यामुळे त्यांना वास्तविकतेची जाणीव करून दिली जात नाही आणि अशारितीने त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर, त्यांच्या एकंदर कल्याणावर आणि जीवनात आनंद मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर अनिष्ट परिणाम होतो.”

नातेसंबंधांवर होणारा परिणाम

अश्‍लील साहित्य व्यक्‍तीच्या मनोवृत्तीला व वर्तनाला आकार देते. त्यातील माहिती मोहक असण्याचे प्रमुख कारण म्हणजे ती काल्पनिक असते आणि त्यामुळे वास्तविकतेपेक्षा अधिक रोमांचक अशा रूपात ती सादर केलेली असते. (“तुम्ही कोणता संदेश स्वीकारणार?” असे शीर्षक असलेली पेटी पाहा.) एका रिपोर्टनुसार, “अश्‍लील साहित्याचा वापर करणाऱ्‍यांच्या मनात अवास्तव अपेक्षा उत्पन्‍न होतात आणि यामुळे नातेसंबंधांत वितुष्टे निर्माण होतात.”

अश्‍लील साहित्यामुळे वैवाहिक जीवनातील भरवसा व मनमोकळेपणा नष्ट होतो; आणि या दोन गोष्टी वैवाहिक संबंधांत अतिशय महत्त्वाच्या आहेत. अश्‍लील साहित्य सहसा चोरून लपून पाहिले जात असल्यामुळे त्याचा वापर केल्याने फसवाफसवी व खोटे बोलण्याचे प्रकार घडतात. वैवाहिक सोबत्यांना आपला विश्‍वासघात झाला आहे असे वाटू लागते. आपल्या जोडीदाराला आपण पूर्वीसारखे आकर्षक का वाटत नाही हे त्यांना समजत नाही.

आध्यात्मिक तोटा

अश्‍लील साहित्यामुळे गंभीर आध्यात्मिक नुकसान होऊ शकते. देवासोबत नातेसंबंध जोडू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीच्या मार्गात यामुळे एक मोठा अडथळा निर्माण होतो. * बायबलमध्ये कामवासनेचा संबंध लोभ व मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टींशी जोडला जातो. (कलस्सैकर ३:५) एखाद्या गोष्टीचा लोभ करू लागलेल्या व्यक्‍तीला ती वस्तू इतकी हवीहवीशी वाटू लागते की तीच गोष्ट तिच्या जीवनात सर्वात महत्त्वाची बनते आणि इतर सर्व गोष्टी कमी महत्त्वाच्या वाटू लागतात. थोडक्यात, जे अश्‍लील साहित्याच्या आहारी जातात, ते आपल्या कामवासनेला देवापेक्षाही अधिक महत्त्व देऊ लागतात. जणू तिची पूजा करतात. यहोवाची स्पष्ट आज्ञा आहे, की “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.”—निर्गम २०:३.

अश्‍लील साहित्य प्रेमळ नातेसंबंधांचा घात करते. स्वतः विवाहित असणाऱ्‍या प्रेषित पेत्राने ख्रिस्ती पतींना आपापल्या पत्नींचा आदर करण्याचा आग्रह केला. जो पती असे करत नाही त्याच्या प्रार्थनांत व्यत्यय येईल. (१ पेत्र ३:७) स्त्रियांची असभ्य दृश्‍ये लपून पाहणारा पुरुष आपल्या पत्नीचा आदर करतो असे खरच म्हणता येईल का? तिला कळले तर तिला कसे वाटेल? आणि ‘सगळ्या बऱ्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करणाऱ्‍या’ आणि ‘आत्मे तोलून पाहणाऱ्‍या’ देवाला कसे वाटेल? (उपदेशक १२:१४; नीतिसूत्रे १६:२) अश्‍लील साहित्याचा वापर करणारी व्यक्‍ती, आपल्या प्रार्थना देव ऐकेल अशी अपेक्षा करू शकते का?

अश्‍लील साहित्याचा वापर करण्याच्या मुळाशी आपला स्वार्थ कोणत्याही किंमतीवर साध्य करण्याची प्रवृत्ती निश्‍चितच आहे. त्याअर्थी अश्‍लील साहित्य पाहणे प्रेमळपणाचे लक्षण नाही. देवासमोर स्वतःला निष्कलंक व नैतिकरित्या शुद्ध ठेवण्याचा एका ख्रिस्ती व्यक्‍तीचा निर्धार यामुळे कमकुवत होतो. प्रेषित पौलाने लिहिले, “देवाची इच्छा ही आहे की, . . . तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. . . . कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी ह्‍या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये.”—१ थेस्सलनीकाकर ४:३-७.

अश्‍लील साहित्य हे विशेषतः स्त्रियांचे व मुलांचे शोषण करते. हे त्यांचा अवमान करण्याचे आणि जो आदर व जे हक्क त्यांना मिळायला पाहिजेत त्यांपासून त्यांना वंचित ठेवण्याचे माध्यम आहे. जी व्यक्‍ती अश्‍लील साहित्याचा उपयोग करते ती या शोषणात सहभागी होते व त्याला पाठिंबा देते. स्टीवन हिल व नीना सिलव्हर म्हणतात, ‘माणूस स्वतःला कितीही चांगला समजत असला तरीसुद्धा, ज्याअर्थी तो अश्‍लील साहित्याला अप्रत्यक्ष का होईना पण संमती देतो त्याअर्थी तो, ज्या स्त्रीची काळजी घेणारा स्वतःला म्हणवतो तिच्याप्रती केवळ [भावनाशून्यच] नव्हे तर चक्क तिचा द्वेष करणारा ठरतो.’

अश्‍लील साहित्याच्या व्यसनातून स्वतःला सोडवणे

तुम्ही सध्या अश्‍लील साहित्याविषयीच्या आसक्‍तीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहात का? तुम्ही ही सवय कशी सोडवू शकता? बायबल यावर तोडगा देते! ख्रिस्ताची ओळख होण्याआधी सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांपैकी काहीजण जारकर्मी, व्यभिचारी, आणि लोभी होते. पण पौलाने त्यांना म्हटले, की ‘तुम्ही धुतलेले असे झाला.’ हे कसे काय शक्य झाले? पौल उत्तर देतो, की “तुम्ही . . . देवाच्या आत्म्यात पवित्र केलेले . . . असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.

देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका. बायबल म्हणते, “देव विश्‍वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही.” या समस्येतून सुटण्याचा मार्ग तो अवश्‍य पुरवेल. (१ करिंथकर १०:१३) कळकळीची प्रार्थना केल्याने—वारंवार आपली समस्या देवापुढे ठेवल्याने तुम्हाला मदत मिळू शकेल. देवाचे वचन आपल्याला प्रोत्साहन देते की, “आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.”—स्तोत्र ५५:२२.

अर्थात, तुमच्या प्रार्थनांनुसार वागणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अश्‍लील साहित्याचा धिक्कार करण्याचा जाणीवपूर्वक व मनःपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. एखादा विश्‍वासू मित्र किंवा घरातला माणूस, या निर्धाराला जडून राहण्याकरता लागणारे साहाय्य व प्रोत्साहन तुम्हाला देऊ शकतो. (“मदत मागणे” हे शीर्षक असलेली पेटी पाहा.) आपण या निर्णयानुसार वागल्याने देव नक्कीच संतुष्ट होईल याची आठवण ठेवल्याने तुम्हाला या मार्गावर टिकून राहण्यास मदत मिळेल. (नीतिसूत्रे २७:११) शिवाय, तुमचे अश्‍लील साहित्य पाहणे देवाला पसंत नाही याची जाणीव राखल्यानेही तुम्हाला ही सवय सोडून देण्याची अधिक प्रेरणा मिळू शकते. (उत्पत्ति ६:५, ६) हा संघर्ष सोपा नाही, पण तुम्ही विजय मिळवू शकता. अश्‍लील साहित्याचे व्यसन तुम्ही सोडू शकता!

अश्‍लील साहित्य पाहणे खरोखर धोकेदायक आहे. ते अपायकारक, नव्हे, विनाशकारक आहे. हे साहित्य निर्माण करणारा व त्याचा उपयोग करणारा, दोघेही यामुळे भ्रष्ट होतात. स्त्री व पुरुष दोघांचाही ते अवमान करते. ते मुलांकरता धोकेदायक आहे. सर्व किंमतीवर धिक्कार करण्याजोगी अशी ही सवय आहे. (g०३ ७/२२)

[तळटीपा]

^ इंटरनेटवरील अश्‍लील साहित्याच्या धोक्यांविषयी सविस्तर माहितीकरता कृपया सावध राहा! (इंग्रजी), जून ८, २००० अंकातील पृष्ठे ३-१० वरील “इंटरनेट पोर्नोग्राफी—यामुळे कोणते नुकसान होऊ शकते?” ही लेखमाला पाहावी.

^ अश्‍लील साहित्याविषयी बायबलच्या दृष्टिकोनाची चर्चा सावध राहा!, जुलै ८, २००२ (इंग्रजी) अंकात पृष्ठे १९-२१ वर आढळते.

[१० पानांवरील चौकट/चित्र]

मदत मागणे

अश्‍लील साहित्य पाहण्याच्या सवयीपासून मुक्‍त होण्याचा संघर्ष साधा नाही; तो अतिशय कठीण असू शकतो. शेकडो सेक्स व्यसनाधीन व्यक्‍तींचा इलाज करणारे डॉ. व्हिक्टर क्लाईन म्हणतात: “[या व्यसनात] कितीही शपथा घेतल्या तरी फायदा होत नाही. कितीही प्रामाणिक हेतू असले तरी ते व्यर्थ ठरतात. [सेक्सच्या व्यसनाला बळी पडलेली व्यक्‍ती] स्वतःच्या जोरावर ही सवय सोडूच शकत नाही.” क्लाईन यांच्या मते, व्यसनाधीन व्यक्‍ती विवाहित असल्यास यशस्वी उपचाराकरता सर्वप्रथम त्याच्या जोडीदाराला सामील करणे आवश्‍यक आहे. ते म्हणतात, “दोघे मिळून सहभागी होतात तेव्हा उपचाराला वेग येतो. आघात दोघांनाही झालेला असल्यामुळे दोघांनाही मदतीची गरज असते.”

व्यक्‍ती अविवाहित असल्यास, एखादा विश्‍वासू स्नेही किंवा नातलग तिच्या पाठीशी उभा राहू शकतो. उपचारात कोण सहभागी होतो हे तितके महत्त्वाचे नाही, पण एका नियमाविषयी क्लाईन अगदी कडक आहेत: समस्येविषयी आणि समस्या पुन्हा उद्‌भवल्यास त्याविषयी अगदी मोकळेपणाने बोलले पाहिजे. ते म्हणतात, “लपवालपवी करणे तुमच्या जिवावर बेतू शकते. यामुळे केवळ शरम व दोषभावना उत्पन्‍न होते.”

[९ पानांवरील तक्‍ता]

तुम्ही कोणता संदेश स्वीकारणार?

अश्‍लील साहित्याचा संदेश बायबलचा दृष्टिकोन

◼ कोणाही सोबत, कोणत्याही ◼ “लग्न सर्वस्वी आदरणीय

वेळी आणि कोणत्याही परिस्थितीत असावे व अंथरूण निर्दोष

सेक्स, गैर नाही आणि त्यामुळे असावे; जारकर्मी व

काही दुष्परिणामही घडत नाहीत. व्यभिचारी ह्‍यांचा

न्याय देव करील.”

इब्री लोकांस १३:४.

“जो जारकर्म करितो तो आपल्या

शरीराबाबत पाप करितो.”

१ करिंथकर ६:१८;

तसेच, रोमकर १:२६, २७ पाहावे.

◼विवाह हा परिपूर्ण लैंगिक ◼“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह

तृप्तीच्या मार्गात एक अडथळा आहे. संतुष्ट ऐस. . . .

तिच्या प्रेमाने तुझे चित्त

मोहित होवो.”नीतिसूत्रे ५:१८, १९;

तसेच, उत्पत्ति १:२८; २:२४;

१ करिंथकर ७:३ पाहावे.

◼स्त्रियांच्या अस्तित्वाचा एकच ◼“त्याच्यासाठी अनुरूप उद्देश आहे—पुरुषांच्या लैंगिक साहाय्यक मी [यहोवा देव]

वासना तृप्त करणे. करीन.”उत्पत्ति २:१८; तसेच

इफिसकर ५:२८ पाहावे.

◼स्त्रिया व पुरुष आपल्या ◼“पृथ्वीवरील तुमचे अवयव

लैंगिक वासनांचे गुलाम आहेत. म्हणजे जारकर्म,

अमंगळपणा, कामवासना,

कुवासना व लोभ—ह्‍याला

मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.”

कलस्सैकर ३:५.

“पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील

प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा

कसा ठेवावा ते समजून घ्यावे.”

१ थेस्सलनीकाकर ४:४, ५.

‘वडील स्त्रियांस मातासमान

मान, तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने

बहिणींसमान मान.’

१ तीमथ्य ५:१, २;

तसेच, १ करिंथकर ९:२७ पाहावे.

[७ पानांवरील चित्र]

काही संशोधकांचे म्हणणे आहे की लहान मुले अश्‍लील साहित्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या मेंदूच्या नैसर्गिक विकासावर याचा परिणाम होऊ शकतो

[८ पानांवरील चित्र]

अश्‍लील साहित्य वैवाहिक नात्यातील भरवसा व मनमोकळेपणा नष्ट करते

[१० पानांवरील चित्र]

कळकळीची प्रार्थना सहायक ठरेल