व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अश्‍लील साहित्य विरोधी दृष्टिकोन

अश्‍लील साहित्य विरोधी दृष्टिकोन

अश्‍लील साहित्य विरोधी दृष्टिकोन

“यामुळे अशा अभिलाषा निर्माण होतात ज्या मुळात असू नयेत, अशा वासनांना खतपाणी मिळते ज्या कधीही तृप्त केल्या जाऊ नयेत.”टोनी पार्सन्स, स्तंभलेखक.

‘इंटरनेट सेक्सच्या’ आपण कधी आहारी जाऊ असे जॉनला स्वप्नातही वाटले नव्हते. * बरेचजण काही ध्यानीमनी नसताना अचानक आपल्या कंप्युटरवर अश्‍लील साहित्याच्या अथवा सेक्स चॅट रूम्सच्या संपर्कात येतात; त्याचप्रकारे, जॉनला देखील एकदा इंटरनेटवर काहीतरी काम होते आणि अचानक त्याला अशाप्रकारच्या चॅट रूम्सची जाहिरात करणारी एक साईट आढळली. पाहता पाहता तो सायबरसेक्सच्या दुनियेत पूर्णपणे बुडाला होता. त्या दिवसांची आठवण करून तो सांगतो: “माझी बायको कधी एकदाची कामावर जाते असे मला व्हायचे. ती जाताच मी अंथरुणातून बाहेर पडून सरळ कंप्युटरसमोर जाऊन बसायचो आणि कित्येक तास तिथेच बसून राहायचो.” कधीकधी तर तो अक्षरशः तहानभूक विसरून तासन्‌तास कंप्युटर समोर बसत असे. तो सांगतो: “मला भूक लागल्याची जाणीवच होत नसे.” या गुप्त कारभाराबद्दल तो आपल्या पत्नीशी खोटे बोलू लागला. त्याचे कामातही मन लागेना आणि दिवसेंदिवस तो संशयी वृत्तीने वागू लागला. त्याच्या वैवाहिक जीवनावर याचा परिणाम झाला आणि शेवटी एकदा सेक्स चॅटरूमवर ओळख झालेल्या एका व्यक्‍तीशी प्रत्यक्षात भेटण्याची त्याने योजना केली तेव्हा त्याच्या पत्नीला याचा सुगावा लागला. आज जॉनवर त्याच्या या व्यसनासाठी उपचार सुरू आहेत.

अश्‍लील साहित्यविरोधी कार्यकर्ते अशाप्रकारच्या घटनांचे उदाहरण देऊन अश्‍लील साहित्याचे दुष्परिणाम सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे म्हणणे आहे, की यामुळे नाती तुटतात, स्त्रियांचा अवमान होतो, मुलांशी दुर्व्यवहार होतो आणि लैंगिकतेविषयी एक विकृत हानीकारक दृष्टिकोन निर्माण होतो. दुसरीकडे पाहता, अश्‍लील साहित्याचे समर्थन करणारे असे म्हणतात की ही मुक्‍त अभिव्यक्‍ती असून याचा विरोध करणारे नैतिकता टोकाला नेत आहेत. एका समर्थकाने लिहिले: “आपल्या लैंगिक पसंतीविषयी अथवा वासनांविषयी कोणालाही लाज वाटण्याची गरज नाही. अश्‍लील साहित्याचा उपयोग, सेक्सविषयी मनमोकळ्या चर्चा सुरू करण्यासाठी व अशा चर्चांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो.” काहीतर इथपर्यंतही म्हणतात, की अश्‍लील साहित्याची वाढ एका निःसंकोच सुदृढ समाजाचे गुणलक्षण आहे. लेखक ब्रायन मकनेअर म्हणतात: “दोघांची संमती असलेल्या एका प्रौढ जोडप्यामधील संभोगाचे उघड चित्रण स्वीकारण्याइतपत जो समाज परिपक्व आहे त्यात साहजिकच लैंगिक विविधता आणि स्त्रियांचे समान हक्क देखील विनासायास स्वीकारले जातील.”

पण केवळ समाजातील परस्परविरोधी दृष्टिकोनामुळे अश्‍लीलता स्वीकारार्ह ठरते का? ती इतकी प्रचलित का आहे? अश्‍लील साहित्यात रुची घेणे खरोखर धोकेदायक आहे का? पुढील लेख या प्रश्‍नांची उत्तरे देतील. (g०३ ७/२२)

[तळटीप]

^ नावे बदलण्यात आली आहेत.