“छत्री घ्यायला विसरू नका!”
“छत्री घ्यायला विसरू नका!”
ब्रिटनमधील सावध राहा! लेखकाकडून
ब्रिटनमध्ये सर्वसामान्यपणे दरदिवशी पुष्कळ लोक छत्री सोबत बाळगतात. कारण पाऊस केव्हा पडेल याचा नेम नसतो. “छत्री घ्यायला विसरू नका”! असे, घर सोडताना आम्ही एकमेकांना आठवण करून देतो आणि मग, ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा दुकानात ती विसरून येतो. होय, पुष्कळदा छत्रीला आपण क्षुल्लक समजतो कारण, एक गेली तर आपण दुसरी विकत घेऊ शकतो असे आपल्याला वाटते. परंतु छत्री नेहमीच अशी क्षुल्लक समजली जात नव्हती.
छत्रीचा निराळा इतिहास
सुरवातीच्या छत्र्यांचा पावसाशी संबंधच नव्हता. त्या फक्त, महत्त्वपूर्ण लोकांच्या प्रतिष्ठेचे व आदराचे प्रतीक दर्शवण्यासाठी होत्या. अस्सेरिया, ईजिप्त, पर्शिया आणि भारत येथील कोरीव कामांत किंवा चित्रांत, सेवकांनी राजाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री धरल्याचे दाखवण्यात आले आहे. अस्सेरियात केवळ राजाच छत्री वापरू शकत होता.
संपूर्ण इतिहासात, खासकरून आशियात छत्रीला सामर्थ्याचे प्रतीक समजले जात असे. एखाद्या राजाची प्रतिष्ठा, त्याच्याजवळ किती छत्र्या
होत्या यानुसार वाढत असे; हे एका बर्मी राजाच्या बाबतीत दिसून येते ज्याला चोवीस छत्र्यांचा छत्रपती, असे संबोधण्यात आले होते. कधीकधी छतांची संख्या देखील महत्त्वाची होती. चीनच्या सम्राटाच्या छत्रीला चार छते होती आणि सयामच्या राजाच्या छत्रीला सात की नऊ छते होती. आजही, काही पौर्वात्य व आफ्रिकन देशांत छत्रीला अधिकाराचे प्रतीक मानतात.धार्मिक छत्र्या
छत्रीच्या इतिहासाच्या सुरवातीला, छत्री धर्माशी संबंधित होती. प्राचीन ईजिप्तच्या लोकांचा असा विश्वास होता की नट नावाची देवी, आपल्या संपूर्ण शरीराने पृथ्वीला छत्रीप्रमाणे संरक्षण देते. त्यामुळे तिचे संरक्षण मिळण्याकरता लोक आपापल्या चालत्या-फिरत्या ‘छप्पराखाली’ चालत असत. भारत व चीनमधील लोकांचा असा विश्वास होता, की उघडी छत्री आकाशाच्या घेऱ्याला चित्रित करते. प्राचीन बौद्ध लोक, बुद्धाचे प्रतीक म्हणून तिचा वापर करत आणि त्यांच्या स्तूपांवर छत्रीसारखी चिन्हे आढळत. हिंदू धर्मातही छत्रीचा उपयोग केलेला आढळतो.
सा.यु.पू. ५०० पर्यंत ग्रीसमध्ये छत्रीचा वापर होऊ लागला; तेथे लोक, धार्मिक उत्सवांमध्ये देवीदेवतांच्या मूर्तींवर छत्र्या धरत असत. अथेनी स्त्रिया उन्हापासून संरक्षणाकरता आपल्या नोकरांना छत्री धरायला लावत असत पण फार कमी पुरुष छत्रीचा उपयोग करीत. ही प्रथा ग्रीसहून रोमपर्यंत पोहंचली.
रोमन कॅथलिक चर्चने आपल्या समारंभाच्या पोशाखात छत्रीचा समावेश केला. पोप, लाल व पिवळ्या पट्ट्यांच्या रेशमी कापडाच्या बनवलेल्या छत्र्या वापरत आणि कार्डिनल व बिशप यांच्या जांभळट किंवा हिरव्या छत्र्या होत्या. आजही, बॅसिलिकात पोपच्या खुर्चीवर पोपसाठी असलेल्या रंगातील छत्री किंवा ओमब्रेलोन आहे. पोपचा मृत्यू झाल्यानंतर व दुसऱ्या पोपची निवड होईपर्यंतच्या काळात चर्चचा प्रमुख म्हणून कार्य करणाऱ्या कार्डिनलकडे स्वतःची ओळख देण्यासाठी म्हणून एक ओमब्रेलोन असते.
उन्हापासून संरक्षण ते पावसापासून संरक्षण मिळवण्यापर्यंत
चिनी किंवा कदाचित प्राचीन रोमच्या स्त्रियांनी पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्या कागदी छत्र्यांना तेल किंवा मेण लावण्यास सुरवात केली. परंतु, उन्हापासून किंवा पावसापासून संरक्षणाची कल्पना, इटालियनांनी आणि नतंर फ्रेन्चांनी छत्रीचा पुन्हा उपयोग करण्यास सुरवात केली तोपर्यंत युरोपमध्ये १६ व्या शतकापर्यंत नाहीशी झाली होती.
अठराव्या शतकापर्यंत, ब्रिटनमधील स्त्रिया छत्र्या बाळगू लागल्या परंतु हातात छत्री घेणे हे बायकीपण आहे असे समजून पुरुष ती घेत नसत. केवळ, कॉफीहाऊसच्या मालकांना, ग्राहक जेव्हा आपल्या बग्गीतून बाहेर पडून दुकानापर्यंत चालत येत तेव्हा त्यांचे जोराच्या पावसातून किंवा कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्री किती लाभदायक आहे हे समजले. पाळकांना देखील, धो धो पावसात अंत्यविधी करत असताना छत्री किती महत्त्वाची आहे हे कळले.
प्रवासी व परोपकारी असलेल्या जोनस हॅन्वे या गृहस्थाने इंग्लंडमध्ये छत्रीचा इतिहास बदलला. लंडन शहरात छत्रीचा बिनधास्त उपयोग करणारे हे पहिले गृहस्थ होते असे म्हटले जाते. परदेशांत पुरुषांना छत्रीचा उपयोग करत असताना त्यांनी पाहिले; त्यामुळे त्यांनी, रस्त्यावरून चालत जाताना, मुद्दामहून गढूळ पाण्यातून बस नेऊन चिखलाचे पाणी अंगावर उडवणाऱ्या बस चालकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्रीचा उपयोग करण्याचे ठरवले. ३० वर्षांपर्यंत हॅन्वे आपल्या छत्रीसह दिसायचे आणि १७८६ साली त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत पुरुष व स्त्रिया आनंदाने छत्र्या बाळगू लागले होते.
त्या दिवसांत पावसाची छत्री सोबत बाळगणे इतके सोपे नव्हते. कारण अशा छत्र्या मोठ्या, बोजड व ओबडधोबड होत्या.
त्यांचे रेशमी तेलकट किंवा कॅन्व्हासचे कापड, काड्या आणि वेताच्या किंवा देवमाशांच्या हाडांनी बनवलेले दांडे यांमुळे, ओली छत्री उघडायला कठीण जायचे, शिवाय त्या गळायच्या देखील. तरीपण, त्या खूप लोकप्रिय झाल्या कारण, पाऊस पडायचा तेव्हा लोकांना बग्गीचे भाडे देण्यापेक्षा छत्री विकत घेणे स्वस्त पडायचे. छत्र्या बनवणाऱ्यांची व त्या विकणाऱ्या दुकानांची संख्या वाढत गेली व कंपन्या छत्रीच्या नमुन्यात नवनवीन सुधारणा करण्यात गर्क झाल्या. १९ व्या शतकाच्या मध्यात, सॅम्युएल फॉक्स यांनी पॅरगॉन प्रकारचे एकस्व मिळवले; या प्रकारची छत्री हलकी परंतु ताकदवान स्टील फ्रेमची होती. शिवाय तिचे कापड हलके होते, जसे की रेशीम, सूती आणि तेलकट कापडाऐवजी मेणाचा थर असलेल्या कापडाचा उपयोग करण्यात आला होता. अशारितीने आधुनिक छत्रीचा जन्म झाला.फॅशनचे साधन
छत्री ही इंग्लंडमधील स्टाईलिश स्त्रीसाठी फॅशनचे साधन म्हणून लोकप्रिय झाली. जसजशा फॅशन्स बदलू लागल्या तसतशी तिची नाजूक छत्री मोठी होत गेली, ती सर्व प्रकारच्या भडक रंगात आणि रेशमी व सॅटीनच्या कापडात मिळू लागली. बहुतेकदा ती आपल्या वस्राशी मॅचिंग छत्री वापरू लागली; तिच्या छत्रीच्या काठाला नाजूक लेस, काठ, रिबनी, बो आणि कधीकधी तर पिसेही लावून ती सजवली जाऊ लागली. आपल्या नाजूक कांतीचे संरक्षण करू इच्छिणारी २० व्या शतकातील कोणतीही सभ्य स्त्री, छत्रीविना बाहेर जाताना दिसणे शक्य नव्हते.
१९२० च्या दशकात, उन्हामुळे काळपटलेल्या कांतीची फॅशन चालली होती तेव्हा स्त्रियांनी छत्रीचा वापर करणे खूपच कमी केले. त्यानंतर आले शहरी सभ्य गृहस्थांचे युग; डोक्यावर बाऊलर टोपी, हातात बंद काळी छत्री जिचा अगदी स्टाईलमध्ये काठीप्रमाणेही उपयोग केला जायचा.
दुसऱ्या महायुद्धानंतर, नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारात छत्रीचे सुधारित नमुने आले, जसे की वॉटरप्रूफ नायलॉन, पॉलियस्टर फोल्डींगच्या आवरणाच्या छत्र्या. काही दुकानांत अजूनही नाजूक हाताने बनवलेल्या, महाग छत्र्या मिळतात. परंतु आजकाल, कारखाने स्वस्तात मस्त अशा सर्व रंगात व गॉल्फ आणि पटिओ छत्र्यांपासून पर्समध्ये सहज मावणाऱ्या १५ सेंटीमीटरच्या फोल्डींग छत्र्यांपर्यंतच्या सर्व आकारांत भरपूर उत्पन्न काढतात.
एकेकाळी चैनीची व प्रतिष्ठेची वस्तू समजली जाणारी छत्री आज मात्र सर्वत्र सहजगत्या उपलब्ध आहे आणि हरवलेल्या वस्तूंच्या यादीत नेहमीच सर्वात पहिल्या क्रमांकावर असते. जगात कोठेही, ऊन व पावसापासून संरक्षण मिळण्याकरता ती खूपच उपयोगी साधन आहे. आणि काही देशांमध्ये, उन्हात चालण्याविषयी धोक्यांच्या सूचनांमुळे, ती ज्या उद्देशाने बनवण्यात आली होती त्याच उद्देशाकरता पुन्हा वापरण्याची फॅशन निघाली आहे. त्यामुळे आज घरातून निघता तेव्हा तुम्हाला देखील कदाचित “छत्री घ्यायला विसरू नका!” अशी आठवण करून दिली जाईल. (g०३ ७/२२)
[तळटीप]
[२० पानांवरील चौकट/चित्र]
छत्री विकत घेणे व तिची निगा राखणे
छत्री घेताना सोय व टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्री निवडा. मोठ्या खिशात आरामशीर मावणारी फोल्डींगची स्वस्त आणि कमी काड्या असलेली छत्री जोराच्या वाऱ्यात टिकाव धरू शकणार नाही. दुसऱ्या बाजूला पाहता, बिनफोल्डींगची मोठी छत्री कदाचित महाग असेल परंतु ती कोणत्याही प्रकारच्या हवामानात तग धरू शकेल व टिकाऊ सुद्धा असेल. होय, चांगली छत्री अनेक वर्षे टिकू शकते. तुम्ही कोणत्याही प्रकारची छत्री निवडली तरी, तिची नीट काळजी घ्या; तिला बंद करून ठेवून देण्याआधी तिला उघडून ठेवा जेणेकरून तिला बुरशी लागणार नाही आणि तिच्या काड्यांवर गंज चढणार नाही. तिला एखादे आवरण घातल्यास ती स्वच्छ राहील, तिच्यावर धूळ जमणार नाही.
[१९ पानांवरील चित्रे]
अस्सेरियाच्या राजावर सेवकाने धरलेली छत्री
छत्री धरून बसलेली प्राचीन ग्रीसमधील एक स्त्री
[चित्राचे श्रेय]
चित्र: The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck
[२० पानांवरील चित्र]
सुमारे १९०० दशकातील एक छत्री
[चित्राचे श्रेय]
Culver Pictures