व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

मधमाशा हत्तींचा प्रतिबंध करतात

केनियातील हत्तींची संख्या वाढत आहे, पण यामुळे समस्या निर्माण होत आहेत. आक्रमण करणारे हत्ती झाडे आणि पीकांचा नाश करतात आणि साधारणतः दर दोन आठवड्यांमध्ये एक व्यक्‍ती त्यांच्या पायांखाली चिरडून ठार मारला जातो. परंतु, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे जीवशास्त्रवेत्ते, फ्रीट्‌स वोल्रॉट यांना एका प्रतिबंधक उपायाचा शोध लागला आहे. हत्तींनी चुकून एखाद्या मधमाशांचे पोळे डिवचले तर “ते बेफिकीर नसतात. ते पळत सुटतात आणि मधमाशा कित्येक किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग करतात.” मधमाशा हत्तींना अगदी नाजूक ठिकाणी म्हणजे डोळ्यांभोवती, कानांमागे, सोंडेच्या खाली आणि पोटावर चावतात. वोल्रॉट यांनी हत्तींची सतत ये-जा असलेल्या भागातील काही झाडांवर काही भरलेले आणि काही रिकामे मोहळ लावले. न्यू सायंटिस्ट पत्रिकेनुसार, हे प्राणी भरलेले मोहळ असलेल्या सर्व झाडांपासून आणि रिकामे मोहळ असलेल्या एक तृतीयांश झाडांपासून दूर राहिले. परंतु ज्या झाडांवर मोहळ नव्हते त्या १० पैकी ९ झाडांवर त्यांनी हल्ला केला. वोल्रॉट यांना हे देखील कळले की, हत्ती चिडलेल्या मधमाश्‍यांच्या आवाजापासूनही दूर राहतात; मग तो आवाज लाउडस्पीकरवरून ऐकवला जात असला तरी. (g०३ ७/०८)

भारतामध्ये मधुमेहात वाढ

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) जगभरात १७ कोटींहून अधिक लोकांना मधुमेह आहे. भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत—३.२ कोटी—आणि ही संख्या २००५ सालापर्यंत ५.७ कोटींहून अधिक होईल असे वृत्त डेक्कन हेरल्ड बातमीपत्रात आले होते. आशियातील मधुमेहासंबंधी श्रीलंकेत भरवण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय सभेत तज्ज्ञांनी म्हटले की, या अचानक वाढीला आहार व जीवनशैलीतील बदल ही प्रमुख कारणे असून तणाव, जननिक कारणे, जन्मण्याच्या वेळी कमी वजन आणि नवजात बालकांना प्रमाणापेक्षा जास्त भरवणे ही कारणे देखील आहेत. भारतामध्ये, मधुमेहाच्या उपचाराकरता लागणारा खर्च जगातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा सर्वात कमी आहे. तरीसुद्धा, मधुमेहासंबंधी निर्माण होणाऱ्‍या समस्या आणि मृतांची संख्या अधिकच आहे. काही अंशी याला अज्ञान आणि रोगाचे उशिरा निदान होणे या गोष्टी कारणीभूत आहेत. भारतातील महानगरांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, प्रौढांपैकी १२ टक्के लोकांना मधुमेह आहे आणि १४ टक्के लोकांना ग्लुकोज पचवण्याची उत्तम क्षमता नाही आणि ही स्थिती सहसा मधुमेह होण्याआधीची असते. (g०३ ७/२२)

चेतातंतूचे दोन जोड?

मानवांना प्राप्त झालेल्या एका खास चेतासंस्थेद्वारे त्यांना प्रेम आणि कोमलतेची जाणीव होते, असे वृत्त बिल्ट डेर व्हिसनशॉफ्ट या जर्मन वैद्यकीय पत्रिकेत देण्यात आले होते. स्वीडिश वैज्ञानिकांना हे आढळून आले की, एका स्त्रीची मुख्य स्पर्श इंद्रिये काम करत नसतानाही तिच्यावर मऊ केसांचा कुंचला फिरवल्यावर तिला छान वाटले. ही सुखद भावना त्वचेतील एका दुसऱ्‍या चेतातंतूच्या जाळ्याने निर्माण होत होती ज्यात स्पर्शज्ञान देणारे सी तंतू नावाचे धीमे-वाहक तंतू होते. हे जाळे केवळ कोमल स्पर्शास प्रतिसाद देते आणि भावनांशी संबंधित असलेल्या मेंदूतील भागांस जागृत करते. मानवांना चेतासंस्थेचे दोन वेगळे जोड का असावेत यावर इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यूनने अशी टिपणी केली: “धीमे तंतू जीवनाच्या अगदी सुरवातीच्या क्षणांपासून कार्यरत असतात, कदाचित त्यांचे कार्य गर्भाशयातही चालू असते; तर वेगवान तंतूंचा जन्मानंतर हळूहळू विकास होतो. नवजात बालकांना पालकांचा स्पर्श होण्याआधीच त्यांच्या स्पर्शातील प्रेमाची जाणीव होत असावी.” (g०३ ७/२२)

डासांपासून संरक्षण

मेहिको डेसकोनोसेडो या पत्रिकेनुसार, “डासांच्या २,५०० जाती असून त्या संपूर्ण जगभर आढळतात.” नर आणि मादी हे दोन्ही मकरंदावर गुजराण करतात परंतु केवळ मादी डास चावत असते. याद्वारे ते मानवांना मलेरिया, डेंग्यू आणि वेस्ट नाईल व्हायरससारखे रोग संक्रमित करतात. डासांपासून तुम्ही आपले संरक्षण कसे करू शकता? त्या अहवालात पुढील सल्ले दिले आहेत: (१) संध्याकाळच्या वेळी आणि रात्री बाहेर जायचे टाळा; त्या वेळी डास सर्वात जास्त सक्रिय असतात. (२) मच्छरदाण्यांचा उपयोग करा, प्रतिरोधक औषधांनी फवारलेल्या मच्छरदाण्या सर्वात उत्तम. (३) लांब बाह्‍यांचे ढगळ कपडे आणि पँट घाला आणि आवश्‍यकता भासल्यास, जाळीदार हॅट घाला ज्याने संपूर्ण डोके झाकले जाईल. (४) शरीराचे जे भाग सहसा उघडे राहतात त्यांवर प्रतिरोधक औषध लावा. (५) दररोज जीवनसत्व बी हे ३०० मिलीग्रॅम या प्रमाणात घ्या. यामुळे काही लोकांना येणाऱ्‍या घामाने डास जवळ येत नाहीत. (६) दलदलीच्या प्रदेशांमध्ये, तत्कालिक संरक्षणाकरता अंगावर चिखल लावा. डास चावल्यास, खाजवण्याचे टाळा कारण रक्‍त काढल्याने संसर्ग होऊ शकतो. त्याऐवजी कॅलेमाईन लोशन लावा. (g०३ ८/०८)