व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जातीय द्वेषभाव उचित आहे का?

जातीय द्वेषभाव उचित आहे का?

बायबलचा दृष्टिकोन

जातीय द्वेषभाव उचित आहे का?

तुम्ही केवळ एका दुसऱ्‍या वंशाचे असल्यामुळे लोक तुम्हाला कपटी, हिंसक, मूर्ख किंवा अनैतिक समजत असल्यास तुम्हाला कसे वाटेल? * तुम्हाला ते मुळीच आवडणार नाही हे निश्‍चित. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, लाखो लोकांच्या बाबतीत हे घडले आहे. शिवाय, संपूर्ण इतिहासात असंख्य प्रामाणिक लोकांवर अत्याचार करण्यात आला आहे, त्यांना ठारही मारण्यात आले आहे. का तर, ते वेगळ्या जातीचे किंवा राष्ट्राचे होते म्हणून. आज, बहुतेक कत्तली वांशिक द्वेषामुळे होतात. आणि अशा हिंसेला पाठिंबा देणारे पुष्कळजण चक्क देवावर आणि बायबलवर विश्‍वास करत असल्याचा दावा करतात. शिवाय, असेही काही आहेत ज्यांच्या मते, जातीयवाद हा नेहमी आपल्यामध्ये असेल—कारण तो मानवी स्वभावाचा भाग आहे.

वांशिक द्वेषाकडे बायबल कानाडोळा करते का? काही परिस्थितींमध्ये वेगळ्या संस्कृतीच्या किंवा जातीच्या लोकांबद्दल द्वेष बाळगणे योग्य असेल का? भविष्यात वांशिक द्वेषभाव नसलेल्या वातावरणाची आपण आशा करू शकतो का? बायबलचा दृष्टिकोन काय आहे?

कर्मांमुळे शिक्षेस पात्र ठरवलेले

मानवजातीसोबत देवाचे आरंभीचे व्यवहार वरवर पाहिल्यास, आपला असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की, देवाने वांशिक द्वेषभावाला पाठिंबा दिला. बायबलमधल्या अनेक अहवालांप्रमाणे देवाने संपूर्ण जातींचा आणि राष्ट्रांचा नायनाट केलेला नाही का? होय, केला आहे; परंतु याचे जवळून परीक्षण केल्यास हे दिसून येते की, हे लोक वेगळ्या वंशाचे होते म्हणून नव्हे तर त्यांनी देवाच्या नियमांबद्दल तीव्र अनादर दाखवल्यामुळे देवाने त्यांना दंड दिला होता.

उदाहरणार्थ, यहोवा देवाने कनानी लोकांच्या नीतिभ्रष्ट लैंगिक आणि सैतानी धार्मिक विधींबद्दल नापसंती व्यक्‍त केली. ते तर खोट्या दैवतांना लहान मुलांचेही बली अर्पण करत असत! (अनुवाद ७:५; १८:९-१२) परंतु, काही बाबींमध्ये काही कनानी लोकांनी देवावर विश्‍वास प्रदर्शित केला आणि पश्‍चात्ताप केला. त्यानुसार, यहोवाने त्यांना जिवंत राखले आणि त्यांना आशीर्वाद दिला. (यहोशवा ९:३, २५-२७; इब्री लोकांस ११:३१) राहाब नावाची एक कनानी स्त्री तर वचनदत्त मशीहा, येशू ख्रिस्त याची पूर्वज देखील बनली.—मत्तय १:५.

देवाने इस्राएली लोकांना दिलेले नियमशास्त्र दाखवते की, तो पक्षपाती नाही. उलट, सर्व लोकांच्या हिताबद्दल त्याला खरी चिंता असल्याचे दिसून येते. लेवीय १९:३३, ३४ येथे देवाने दयाळुपणे इस्राएली लोकांना दिलेली पुढील आज्ञा सापडते: “कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका. तुमच्याबरोबर राहणाऱ्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीति करा; कारण तुम्हीहि मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्‍वर तुमचा देव आहे.” अशाच आज्ञा निर्गम आणि अनुवादाच्या पुस्तकांमध्येही सापडतात. स्पष्टतः, यहोवाने वांशिक द्वेषभाव करणे योग्य ठरवले नाही. त्याने वांशिक एकतेवर जोर दिला.

येशूने वांशिक सहिष्णुतेला उत्तेजन दिले

येशू पृथ्वीवर होता तेव्हा यहुदी आणि शोमरोनी लोक एकमेकांना तुच्छ मानत असत. येशू एक यहुदी होता आणि जेरूसलेमला जात होता केवळ एवढ्या कारणावरून शोमरोनी गावातील लोकांनी त्याला एके प्रसंगी घालवून दिले होते. तुम्हाला लोकांनी असे नाकारले असते तर तुम्ही काय केले असते? येशूच्या शिष्यांनी, “प्रभुजी, आकाशातून अग्नि पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय?” असे विचारले तेव्हा त्यांनी त्या काळात सामान्य असलेला कलुषितपणा दाखवला असावा. (लूक ९:५१-५६) परंतु आपल्या या शिष्यांच्या कलुषित मनोवृत्तीचा येशूने स्वतःवर प्रभाव होऊ दिला का? उलट, त्याने त्यांना धमकावले व तो शांतीने दुसऱ्‍या गावात गेला. त्यानंतर लगेच, येशूने चांगला शेजारी असलेल्या शोमरोन्याचा दाखला दिला. यावरून हे जोरदारपणे दाखवण्यात आले की, एका विशिष्ट वंशाचे असल्याने एक व्यक्‍ती कोणाचा शत्रू होत नाही. उलट, तीच व्यक्‍ती चांगला शेजारी असेल!

ख्रिस्ती मंडळीतले विविध वंश

आपल्या पार्थिव सेवेदरम्यान, येशूने प्रामुख्याने स्वतःच्या राष्ट्राच्या लोकांमधून शिष्य बनवण्यावर लक्ष केंद्रीत केले. परंतु त्याने हे दर्शवले की, इतरजण कालांतराने त्याचे अनुयायी होतील. (मत्तय २८:१९) सर्व वंशाच्या गटातील लोकांचा स्वीकार केला जाईल का? होय! प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) नंतर प्रेषित पौलानेही या गोष्टीला पुष्टी दिली व हे स्पष्ट केले की, ख्रिस्ती मंडळीत एका व्यक्‍तीची वांशिक पार्श्‍वभूमी महत्त्वाची नाही.—कलस्सैकर ३:११.

देव सर्व वंशाच्या लोकांचा स्वीकार करतो याचा आणखी पुरावा बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकात मिळतो. ईश्‍वरप्रेरणेने झालेल्या एका दृष्टान्तात, प्रेषित योहानाने, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे [ह्‍यांचा] . . . मोठा लोकसमुदाय” पाहिला ज्यांना देवाकडून तारण प्राप्त झाले. (प्रकटीकरण ७:९, १०) हा “मोठा लोकसमुदाय” एका नवीन मानवी समाजाचा पाया असेल ज्यात सर्व पार्श्‍वभूमीचे लोक शांतीने एकमेकांसोबत राहतील आणि देवावरील प्रेमामुळे त्यांच्यात ऐक्य असेल.

तोपर्यंत, ख्रिश्‍चनांनी आपल्या वांशिक पार्श्‍वभूमीमुळे इतरांबद्दल भेदभाव बाळगू नये. लोकांना एखाद्या वंशाचे सदस्य नव्हे तर देवाच्या दृष्टिकोनानुसार त्यांना व्यक्‍ती समजणे निःपक्षपातीपणाचे आणि प्रेमळ आहे. हाच विचार लोकांनी तुमच्याविषयी करावा असे तुम्हाला वाटत नाही का? येशू योग्यपणे आपल्याला ताकीद देतो: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) वांशिक द्वेष नसलेले जीवन सुखावह जीवन आहे. त्यामुळे मनःशांती आणि इतरांसोबत शांतीसंबंध वाढतात. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, यामुळे आपला निःपक्षपाती निर्माणकर्ता, यहोवा देव याच्या विचारांशी आपले विचार जुळतात. वांशिक द्वेषभावापासून दूर राहण्याचे हे किती जोरदार कारण आहे. (g०३ ८/८)

[तळटीप]

^ या लेखात, ‘वांशिक गट’ या शब्दाचा प्रयोग, एकाच जातीच्या, राष्ट्राच्या, जमातीच्या किंवा संस्कृतीच्या लोकांना सूचित करण्यासाठी करण्यात आला आहे.