व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दोन धन्यांची चाकरी करण्याचा मी प्रयत्न केला

दोन धन्यांची चाकरी करण्याचा मी प्रयत्न केला

दोन धन्यांची चाकरी करण्याचा मी प्रयत्न केला

केन पेन यांच्याद्वारे कथित

१९३८ साली माझा जन्म झाला आणि न्यू मेक्सिको, अमेरिका, येथील माझ्या आजोबांच्या पशुसंगोपन मळ्यात मी लहानाचा मोठा झालो. या २४,००० एकरांच्या मळ्यात ओहळ होते, हा मोठा गवताळ प्रदेश होता आणि मागे पर्वतरांगा होत्या. मेंढ्यांचा, गुराढोरांचा, घोड्यांचा आवाज आणि गुराख्यांच्या टाचखिळ्यांचा किणकिणाट मला अजूनही आठवतो. कधी गवतातल्या मंद हवेची झुळूक तर कधी पाणथळाजवळ जमलेल्या किलडीयर पक्ष्यांची कर्कश कलकल ऐकू यायची.

एखाद्याच्या जीवनात लहानपणी पडलेली छाप खोल व कायमची असू शकते. मी माझ्या आजोबांबरोबर पुष्कळ वेळ घालवायचो. ते मला पश्‍चिम अमेरिकेतील कथा सांगायचे व हत्याकांडामुळे प्रसिद्ध झालेल्या बिली द किड नावाच्या एका फरारी तरुणाच्या काही साथीदारांनाही ते स्वतः ओळखायचे. वयाच्या २१ व्या वर्षी, १८८१ साली या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे हे हत्याकांड थांबले.

माझे आईवडील यहोवाचे साक्षीदार होते. ते मला त्यांच्यासोबत एकएकट्या पशुसंगोपन मळ्यात आणि हॉन्डो खोऱ्‍यात वर खाली वसलेल्या मातीच्या विटांनी बांधलेल्या घरांत ख्रिस्ती सेवेसाठी न्यायचे. ते बहुतेकदा जे. एफ. रदरफोर्ड यांचे बायबल आधारित रेकॉर्डींग ऐकवण्यासाठी फोनोग्राफचा उपयोग करत असत. या बांधवाच्या आवाजाची छाप माझ्या मनावर खोलवर पडली. * सर्व प्रकारच्या लोकांना—पशुसंगोपन करणारे, मेक्सिकन शेतकरी, ॲपॅचे आणि प्युब्लो यांसारख्या अमेरिकन इंडियन लोकांना आम्ही हे रेकॉर्ड ऐकवत असू. मला नियतकालिके घेऊन रस्त्यावरील साक्षकार्य करायला खूप आवडायचे—युद्धाच्या त्या दिवसांतही खूप कमी लोक, मला लहान समजून माझ्याकडून नियतकालिके घ्यायला नकार द्यायचे.

होय, माझा पाया अगदी पक्का होता. पण, येशूच्या या ईशाऱ्‍याकडे मी दुर्लक्ष केले: “कोणीहि दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” (मत्तय ६:२४) पूर्ण-वेळेच्या सेवेत मी माझं जीवन खर्च केलं असं मला म्हणायला खूप आवडलं असतं. पण बालपणीच, म्हणजे मी ३ वर्षांचा होतो तेव्हापासूनच आणखी एका ‘धन्यानं’ माझ्या मनावर चांगलाच प्रभाव पाडून पूर्णवेळेच्या सेवेच्या मार्गाहून माझं लक्ष विचलित केलं होतं. नेमकं काय झालं होतं?

मला उड्डाणाचे वेड लागले

१९४१ साली, पायपर कब नावाचं एक छोटंसं विमान आमच्या मळ्यात आणण्यात आलं. आमच्या मेंढ्यांना त्रास देणाऱ्‍या कॉओट प्राण्यांची शिकार करण्यासाठी या विमानाचा उपयोग केला जायचा. तेव्हाच म्हणजे मी अगदी तीन वर्षांचा होतो तेव्हापासूनच पायलट होण्याचा निश्‍चय केला. माझं संस्कारक्षम वय निघून गेलं आणि वयाच्या १७ व्या वर्षी मी घर सोडलं व हॉब्स, न्यू मेक्सिको येथे एका विमानतळावर काम करायला गेलो; तिथं मी उड्डाणाच्या धड्यांच्या बदल्यात झाडू मारायचं काम करू लागलो. ख्रिस्ती सेवा माझ्या जीवनात दुय्यम स्थानी येऊ लागली.

वयाच्या १८ व्या वर्षी माझं लग्न झालं आणि आम्हाला तीन मुलं झाली. आमचा उदरनिर्वाह कसा होणार होता? पिकांवर जंतुनाशके फवारण्याची, चार्टर, आणि हल्ला करणाऱ्‍या प्राण्यांची शिकार करण्याची विमाने चालवून तसेच उड्डाणाचं प्रशिक्षण देऊन आमचा उदरनिर्वाह चालायचा. सहा वर्षं अशाप्रकारचं काम केल्यानंतर, मी डॅलस, टेक्ससच्या बाहेर, टेक्सस इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून कामाला लागलो. यामुळे माझ्या जीवनाला अधिक स्थैर्य लाभले; डेन्टन मंडळीत मी वडील या नात्याने देखील सेवा करू लागलो. मी अनेक बायबल अभ्यास संचालित करू लागलो; तसेच, एक एअरलाईन कप्तान, त्याची पत्नी आणि त्याचे कुटुंब यांच्याबरोबरही मी बायबलचा अभ्यास सुरू केला. कालांतराने त्या सर्वांनी बायबल सत्य स्वीकारलं.

१९७३ सालापर्यंत, सुमारे तीन वर्षं मी प्रॉपजेट विमाने उड्डाण करत होतो; पण डीसी-३ नावाचे विमान वापरण्याचे बंद झाले तेव्हा उड्डाणातील माझी आवडही कमी होऊ लागली. खरं तर माझं मन अजूनही न्यू मेक्सिकोतच होतं. पण मी उड्डाण करण्याचं सोडून दिलं तर आमचा उदरनिर्वाह कसा चालणार?

मला कलेचे वेड लागले

१९६१ सालापासून, छंद म्हणून मी पश्‍चिम अमेरिकेतील चित्रे रंगवत होतो व त्यांची विक्रीही चांगली होत होती. त्यामुळे मी एअरलाईनचे काम सोडून दिले आणि मंत्रमुग्ध करणारी भूमी अशी ख्याती असलेल्या न्यू मेक्सिकोत पुन्हा गेलो. परंतु माझ्या जीवनात संतुलन नव्हते. कलारंजनात माझा बहुतेक वेळ जाऊ लागला. रंगवणे आणि नंतर मूर्तीकला तसेच अर्धवेळ उड्डाण यांतच माझा सर्व वेळ जायचा. मी दिवसाला १२ ते १८ तास काम करायचो. यामुळे कुटुंबाकडे आणि देवाकडे माझे खूपच दुर्लक्ष झाले. पुढे काय?

माझा विवाह मोडला, आम्ही घटस्फोट घेतला. मी उत्तरेकडे मोन्टाना येथे राहायला गेलो आणि दुःख कमी करायच्या प्रयत्नात दारूचा आसरा घेतला. ख्रिश्‍चनांना शोभणार नाही अशा या माझ्या जीवन शैलीमुळे, येशूने दिलेल्या उधळ्या पुत्राच्या दाखल्याप्रमाणे, मीही मूर्खपणे वागू लागलो. (लूक १५:११-३२) मग एके दिवशी मला जाणवले की मला एकही खरा मित्र नाही. त्रासात असलेल्या लोकांना मी भेटायचो तेव्हा त्यांना म्हणायचो: “यहोवाच्या साक्षीदारांना शोधा. ते तुम्हाला खरंच मदत करू शकतात.” पण ते मलाच म्हणायचे: “मग, तूच का होत नाहीस एक साक्षीदार?” मला हे कबूल करावे लागायचे, की माझ्यासारखी जीवन-शैली जगून कोणीही यहोवाचा साक्षीदार होऊ शकत नाही.

सरतेशेवटी, १९७८ मध्ये मी न्यू मेक्सिकोतील, मला ओळखणारे साक्षीदार ज्या मंडळीत होते त्या मंडळीत पुन्हा गेलो. मी किती वर्षांनी पहिल्यांदा राज्य सभागृहात गेलो होतो; तिथं गेल्यावर मी फक्‍त रडत होतो. यहोवानं माझ्यावर खूप दया दाखवली होती. मंडळीतील सर्व बंधूभगिनी माझ्याशी खूप दयाळुपणे वागले, यहोवाच्या मार्गांवर पुन्हा येण्यास त्यांनी मला मदत केली.

नवी साथ नवी सुरवात

१९८० साली मी, अनेक वर्षांपासून ओळख असलेल्या कॅरनशी लग्न केलं; ती यहोवाची साक्षीदार होती व दिसायला सुंदर होती. तिला तिच्या आधीच्या नवऱ्‍याकडून, जेसन आणि जॉनथन नावाची दोन मुलं होती. यहोवाबद्दल तिला उत्कट प्रेम असल्यामुळे तिनं माझ्या जीवनात स्थैर्य आणलं; आम्हा दोघांना आणखी दोन मुलं झाली, बेन आणि फिलिप. परंतु आमचं जीवन असंच सुखात जाणार नव्हतं. आमच्यावर एक आघात होणार होता.

मी कलेचा अभ्यास केला आणि मानवांच्या व प्राण्यांच्या—खासकरून घोड्यांच्या—शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यात पुष्कळ तास घालवले; तसंच, जुळवणी, मात्रा आणि कोन या विषयांचा देखील अभ्यास केला. मी मातीच्या मूर्ती खासकरून पश्‍चिम अमेरिकेतील घोडे, घोड्यावर स्वार असलेले इंडियन, गुराखी आणि घोडागाडीतून जाणारा एका जुन्या काळचा डॉक्टर, अशा मूर्ती तयार करू लागलो. यातही मला यश मिळू लागलं. त्यामुळे आम्ही एक कलादालन खोलण्याचं ठरवलं. कॅरननं यासाठी एक सुरेख नावंही ठरवलं—माऊंटन ट्रेल्स गॅलरी.

१९८७ साली, आम्ही सेडोना, ॲरिझोना येथे एक कलादालन विकत घेतलं आणि हे नाव दिलं. कॅरन कलादालन सांभाळायची आणि मी घरी स्टुडिओत काम करायचो आणि मुलांकडे लक्ष द्यायचो. पण मग मुलं आजारी पडू लागली आणि कलादालनातील वस्तूंची विक्री देखील मंदावली. त्यामुळे मग आम्ही दोघांनी एकमेकांच्या भूमिकांची अदलाबदल करण्याचं ठरवलं; ज्यामुळे कॅरन घरी राहून मुलांची काळजी घेऊ शकेल. मी, दुकानात चिकणमाती नेऊन तेथे ग्राहकांसमोर मूर्ती घडवायचो. यामुळे किती मोठा फरक पडला!

लोक मला, मी करत असलेल्या ब्राँन्झच्या मूर्तींविषयी विचारू लागले. माझ्या रचनांसाठी मी ज्या वस्तूंचा उपयोग करतो याविषयीचे वर्णन मी त्यांना द्यायचो तेव्हा मी त्यांना, ओल्ड वेस्टविषयी केलेल्या पुष्कळ वाचनात मला जे जे माहीत झालं होतं, ते नावं, ठिकाणं आणि घटना यांच्यासह सविस्तर सांगत असे. मी ज्या मूर्ती घडवत होतो त्यात लोक रस घेऊ लागले आणि काही जण तर मी मूर्ती घडवत असतानाच मला आगाऊ किंमत देत आणि बाकी रक्कम मूर्ती ब्राँन्झमध्ये पूर्ण झाल्यावर देत. अशाप्रकारे “प्रीकास्ट सेल” अर्थात मूर्ती घडवण्याआधीच ती विकण्यात आली आहे, असा अपभ्रंश प्रचलित झाला. मला या कामात खूप यश मिळू लागलं. इतकं की, आमची तीन कलादालनं होती आणि एक मोठी ओतशाळा होती ज्यात ३२ कामगार कामाला होते. पण यात आमची खूप शक्‍ती खर्च होत होती. या चक्रव्यूहातून आम्हाला कधी मुक्‍ती मिळेल का, असा कॅरन आणि मी विचार करू लागलो. आम्ही या विषयी प्रार्थना केली. एव्हाना मी एका मंडळीत वडील या नात्याने सेवा करत होतो आणि मी यहोवाची सेवा अधिक प्रमाणात करू शकतो याची मला जाणीव होती.

पुन्हा एका धन्याची सेवा

१९९६ साली आम्हाला भेट देणारे आमचे विभागीय पर्यवेक्षक आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर जेवायला बोलवलं? जेवणाआधी त्यांनी आम्हाला एक असा प्रश्‍न विचारला ज्यामुळे आम्ही खूप चकित झालो—चिन्लेत एक नवीन मंडळी स्थापण्यासाठी नावाहो इंडियन आरक्षण क्षेत्रात जायला तुम्हाला आवडेल का? हे खरोखरच एक आव्हान होते! या आरक्षित क्षेत्रात आम्ही पुष्कळदा गेलो होतो आणि तिथल्या दूरवरच्या ठिकाणी प्रचार करण्यास मदत देखील केली होती; आता आमच्या जीवनात एक नवीन ध्येय होते. भौतिकवादाच्या सतत चालणाऱ्‍या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची व यहोवा आणि त्याच्या लोकांसाठी अधिक वेळ खर्च करण्याची ही एक संधी होती! आम्ही पुन्हा एका धन्याची चाकरी करण्यास सुरवात करू लागलो होतो.

आमचे स्नेही असलेले आणखी एक वडील आणि त्यांचे कुटुंब अर्थात करसेट्टास कुटुंबाला देखील आमच्याबरोबर हे आव्हान स्वीकारण्याचं आमंत्रण देण्यात आलं. आम्ही दोघांनी आमची आरामशीर घरं विकली आणि मोबाईल घरं विकत घेतली जी आरक्षित क्षेत्रात ठेवता येऊ शकतील. मी आमची कलादालनं आणि शेवटी ओतशाळाही विकली. आम्ही आमची जीवनशैली खूप साधी केली होती व आता आम्ही आमची ख्रिस्ती सेवा वाढवण्यास मुक्‍त होतो.

१९९६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात, आमच्या नवीन चिन्ले मंडळीची पहिली सभा झाली. तेव्हापासून नावाहो लोकांमधील प्रचारकार्याला बराच वेग आला आहे; आमच्या मंडळीत नावाहो भाषा बोलणारे उत्कृष्ट नावाहो पायनियर आहेत. आम्ही नावाहो नाही तरीपण लोकांनी आमचं ऐकावं म्हणून आम्हीही हळूहळू ही महाकठीण भाषा शिकण्यास सुरवात केली आहे. इंडियन अधिकाऱ्‍यांच्या संमतीनं आम्ही इथं जागा मिळवून चिन्ले येथे एक राज्य सभागृह उभे केले व या वर्षी जून महिन्यात त्याचे समर्पण झाले.

आमच्यावर आघात होतो!

डिसेंबर १९९६ साली कॅरन सुटीसाठी म्हणून मुलांना रुईडोसो, न्यू मेक्सिको येथे घेऊन गेली होती. मी गेलो नाही; मी चिन्लेतच राहिलो. तेव्हा आमच्या १४ वर्षीय मुलाचा अर्थात बेनचा स्कीईंग करताना एका मोठ्या दगडावर आपटल्यामुळे अपघात झाला व तो मरण पावला तेव्हा आम्हाला किती जबरदस्त धक्का बसला व दुःख झाले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आम्हा सर्वांची ही भयंकर परीक्षा होती. बायबलमधील पुनरुत्थानाच्या आशेमुळे आम्ही या आघातातून सावरू शकलो आहोत. शिवाय, आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींनी देखील आम्हाला खूप मदत केली. आम्ही अनेक वर्षांपासून जिथं राहिलो होतो त्या सेडोना येथील राज्य सभागृहात, अंत्यविधीच्या भाषणासाठी जेव्हा अनेक नावाहो बंधूभगिनी आले होते तेव्हा, आमच्या शेजाऱ्‍यांना इतक्या नावाहो लोकांना पाहून खूप आश्‍चर्य वाटलं. आरक्षित क्षेत्रातले बंधूभगिनी, ३०० पेक्षा अधिक किलोमीटर दूरहून आम्हाला आधार देण्यासाठी आले होते.

बेनचा धाकटा भाऊ फिलिपही चांगली आध्यात्मिक प्रगती करत आहे हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. त्याने आध्यात्मिक ध्येये ठेवली आहेत व यामुळे आम्हाला खूप समाधान वाटतं. त्यानं अनेक बायबल अभ्यास देखील चालवले व एका शिक्षकाबरोबरही तो अभ्यास करत होता. पण आम्ही सर्व यहोवा देवानं अभिवचन दिलेल्या नवीन जगात पुन्हा बेनला पाहण्यास आतुर आहोत.—ईयोब १४:१४, १५; योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:१-४.

आमचं कुटुंब प्रेमळ, एकमेकांना आधार देणारं आहे. माझा दत्तक मुलगा जॉनथन आपली बायको केन्‍ना हिच्याबरोबर आणि माझ्या पहिल्या पत्नीकडून मला झालेला क्रिस आपली बायको लोरी हिच्याबरोबर यहोवाची सेवा करत आहेत. वुडरो आणि जोना ही माझी नातवंडं ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत विद्यार्थी भाषणं देतात. १९८७ साली माझे वडील वारले; पण आई ८४ वर्षांची अजूनही सक्रियपणे यहोवाची सेवा करत आहे; तसेच माझा धाकटा भाऊ जॉन आणि त्याची बायको चेरी देखील यहोवाची सेवा करत आहेत.

मी स्वतः अनुभवलेले येशूचे पुढील शब्द किती खरे आहेत: “कोणीहि दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, . . . तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” आताही, कलारंजन खूप वेळखाऊ असू शकते. म्हणूनच तर मी संतुलन बाळगण्याची खबरदारी घेतो जेणेकरून कलारंजनात मी पुन्हा पूर्णपणे गुरफटून जाणार नाही. प्रेषित पौलाने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास आपल्याला आणखी फायदा होऊ शकतो; तो म्हणतो: “माझ्या प्रिय बंधुनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.”—१ करिंथकर १५:५८. (g०३ ७/८)

[तळटीप]

^ बंधू जे. एफ. रदरफोर्ड यांनी, १९४२ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याचे नेतृत्व केले.

[१४, १५ पानांवरील चित्र]

१९९६ साली चिन्ले येथील माझं विमान

[१५ पानांवरील चित्र]

“दवडायला वेळ नाही” असे नाव असलेली ब्राँन्झची मूर्ती

[१७ पानांवरील चित्र]

राज्य सभागृह जिथं बांधण्यात आलं तिथं बायबल अभ्यासासाठी जमा झालो होतो

[१७ पानांवरील चित्र]

माझी पत्नी कॅरन हिच्याबरोबर

[१७ पानांवरील चित्र]

एका अस्सल नावाहो घरासमोर प्रचार करताना