व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी टाटू करून घेऊ का?

मी टाटू करून घेऊ का?

तरुण लोक विचारतात . . .

मी टाटू करून घेऊ का?

“काही टाटू खूप देखणी असतात. ती अतिशय कलात्मक असतात.”—जेलीन. *

“मी दोन वर्षांपासून टाटू करून घेण्याचं स्वप्न पाहत होते.”—मिशेल.

टाटू सर्वत्र दिसून येतात—निदान असे भासते. रॉक स्टार, खेळाडू, फॅशन मॉडेल्स, सिनेतारक आपले टाटू अभिमानाने दाखवतात. पुष्कळ किशोरवयीन, या लोकांना पाहून आपल्या खांद्यांवर, हातांवर, मनगटांवर आणि पायाच्या घोट्यांवर टाटू करून घेतल्यावर ताठ मानेने ते दाखवत फिरतात. ॲन्ड्रू म्हणतो: “टाटू करून घेण्याची आज फॅशन आहे. तुम्ही टाटू करून घेतले आहे की नाही ही तुमची व्यक्‍तिगत बाब आहे.”

वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणते: “शरीरावर कायमच्या चित्राकृती काढण्याच्या प्रथेला टाटू अर्थात गोंदणे म्हणतात. नैसर्गिक रंगाच्या द्रव्यात, हाडांचे किंवा सुईचे तीक्ष्ण टोक बुडवून ते शरीरावर टोचून चित्र उठवले जाते.”

नेमकी संख्या मिळवणे सहज नसली तरी, एका स्रोताने असा अंदाज लावला, की संयुक्‍त राष्ट्रांतील सर्व १५ ते २५ वयोगटातील २५ टक्के तरुण-तरुणींनी टाटू करून घेतले आहे. सॅन्डी म्हणते: “आज टाटू करून घेणे ही लोकप्रिय गोष्ट आहे.” पण तरुणांना टाटू करून घ्यायला इतके का आवडते?

इतके लोकप्रिय का?

काहींच्या मते, टाटू करून घेणे हा प्रभावी प्रणयी भावना व्यक्‍त करण्याचा एक मार्ग आहे. मिशल म्हणतो: “माझ्या भावानं आपल्या पायाच्या घोट्यावर, तो ज्या मुलीबरोबर डेटींग करायचा तिचं नाव टाटू करून घेतलं आहे.” मग काय समस्या आहे? “तो आता तिच्याबरोबर डेटिंग करत नाही.” टीन मासिकानुसार, “डॉक्टरांचा असा अंदाज आहे, की ३० पेक्षा अधिक टक्के किशोरवयीन मुली, आपल्या पूर्वीच्या बॉयफ्रेंडचे कोरलेले नाव मिटवण्यासाठी येतात.”

काही तरुण, टाटूला कला समजतात. काही जण त्यांना स्वातंत्र्याची चिन्हे समजतात. अंगावर टाटू करून घेतलेली जोझी म्हणते: “माझ्या जीवनावर माझा हक्क आहे. टाटू करून घेण्याचा हा माझा निर्णय, माझ्या जीवनातला एकमेव महत्त्वपूर्ण व्यक्‍तिगत निर्णय आहे.” टाटू करून घेतल्यामुळे काही तरुणांना काही तरी नवीन केल्यासारखे वाटते—आपल्या स्वरूपावर आपले नियंत्रण आहे, असे त्यांना वाटते. टाटू, बंडाचे किंवा पर्यायी जीवन-शैलीचे प्रतीक असू शकते. काही जण, गलिच्छ शब्द किंवा चित्र किंवा प्रक्षोभक नारे गोंदून घेतात.

बहुसंख्य युवक फॅड म्हणून टाटू करून घेतात. परंतु सर्वजण टाटू करून घेत आहेत म्हणून तुम्हीही करावे का?

टाटू करून घेण्याची प्राचीन कला

टाटू करून घेण्याची कला ही नक्कीच आधुनिक कला नाही. ख्रिस्तपूर्व काळाच्या शेकडो वर्षांआधीच्या टाटू केलेल्या ईजिप्शियन व लिब्यन मम्मीज आढळल्या आहेत. दक्षिण अमेरिकेतही टाटू केलेल्या मम्मीज आढळल्या आहेत. पुष्कळ टाटू केलेल्या मूर्तींचा खोट्या दैवतांच्या उपासनेशी थेट संबंध होता. स्टीव्ह गिलबर्ट नावाच्या एका संशोधकाच्या मते, “सर्वात प्राचीन टाटू, अमूर्त कल्पनेवर आधारित नव्हे तर बेस दैवताचे प्रतिनिधीत्व करणारे चित्र होते. ईजिप्शियन दंतकथेत बेस विलासाचे कामातूर दैवत आहे.”

मोशेच्या नियमशास्त्राने देवाच्या लोकांना गोंदून घेण्यास मनाई केली होती, हे महत्त्वाचे आहे. लेवीय १९:२८ मध्ये म्हटले आहे: “कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्‍वर आहे.” ईजिप्शियन लोकांसारखे इतर मूर्तीपूजक आपल्या छातीवर किंवा दंडांवर आपल्या दैवतांची नावे किंवा चिन्हे टाटू करून घेत असत. टाटू न करण्याविषयी यहोवाने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्यामुळे इस्राएली लोक इतर राष्ट्रांतील लोकांपासून वेगळे उठून दिसायचे.—अनुवाद १४:१, २.

आज ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राधीन नसले तरी, टाटूच्याबाबतीत त्यातील मनाई विचार करायला लावणारी आहे. (इफिसकर २:१५; कलस्सैकर २:१४, १५) तुम्ही ख्रिस्ती असाल तर, तुम्हाला तुमच्या शरीरावर—मग ते तात्पुरते असले तरी—असे कोणतेही चिन्ह करायला आवडणार नाही जे मूर्तीपूजेची किंवा खोट्या उपासनेची आठवण करून देईल.

आरोग्याला धोका

टाटू करून घेतल्याने आरोग्याला धोका होऊ शकतो, हेही तुम्ही विचारात घेतले पाहिजे. त्वचाशास्त्राचे सहकारी प्राध्यापक डॉ. रॉबर्ट टॉमसीक म्हणतात: “तुम्ही वास्तविक पाहता, त्वचा फाडता आणि त्या जागी रंगीत द्रव्य घालता. तुम्ही त्वचेतून केव्हाही फक्‍त सुई जरी घुसवत असला तरी, तुम्हाला जीवाणुंची किंवा रोगाणुंची लागण होण्याचा धोका असतो. मला तर वाटतं, की टाटू ही नेहमीच एक जोखीम आहे.” ते पुढे म्हणाले: “एकदा रंगद्रव्य शरीरात गेल्यावर तेथे कसलेही रोगसंक्रमण नसले तरी, अलर्जी, त्वचारोग, अलर्जीचे दुष्परिणाम होण्याची संभावना आहे ज्यामुळे त्वचा लाल होण्याची, सूज येण्याची किंवा त्यावर खवडे पडण्याची व खाज सुटण्याची संभावना आहे.”

टाटू हे कायम राहण्याकरता केले जात असले तरी, ते काढण्याकरता, लेसर पद्धत (गोंदणे केलेला भाग जाळणे), शस्त्रक्रिया (गोंदण केलेला भाग कापून टाकणे), डर्माब्रेशन पद्धत (तारेच्या ब्रशने बाह्‍यत्वचा आणि उपत्वचा घासून काढणे), सालाब्रेशन पद्धत (गोंदलेली त्वचा भिजत ठेवण्यासाठी खारट द्रव्याचा उपयोग करणे) आणि स्कारीफिकेशन पद्धत (रासायनिक द्रव्याने गोंदण काढून त्याठिकाणी व्रण करणे) यांसारख्या विविध पद्धतींचा उपयोग केला जातो. या पद्धती महागड्या तर असतात शिवाय त्या वेदनादायकही असतात. “लेसरने टाटू काढणे इतके वेदनादायक असते की एकवेळेला टाटू करून घेणे परवडते,” असे टीन मासिकात म्हटले होते.

इतरजण काय विचार करतील?

टाटू करून घेतल्याने इतरांना कसे वाटेल याचाही तुम्ही गंभीरपणे विचार केला पाहिजे; कारण पुष्कळांना गोंदण आवडत नाही. (१ करिंथकर १०:२९-३३) तायवानमधील ली नावाच्या एका स्त्रीने वयाच्या १६ व्या वर्षी अशीच एक लहर आली म्हणून टाटू करून घेतले होते. आता ती २१ वर्षांची आहे व कार्यालयात काम करते. ली आता कबूल करते: “माझं टाटू पाहून माझे सहकर्मी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतात तेव्हा मी खूप अस्वस्थ होते.” ब्रिटिश मानसिक-आरोग्य सेवक थिओडोर डाल्रेम्पल म्हणतात, की पुष्कळ लोक, एखाद्या व्यक्‍तीच्या अंगावरचे टाटू, “हिंसक, क्रूर, समाजविरोधक व गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचे चिन्ह” समजतात.

अमेरिकन डेमोग्राफिक्स नावाच्या मासिकात आलेल्या एका लेखात म्हटले होते, की: “शरीरावर दिसेल अशा ठिकाणी चित्राकृती काढणे हे जिकरीचे असल्याचे बहुतेक अमेरिकन समजतात, हे स्पष्ट आहे. पंचांयशी टक्के [तरुण] या वाक्याशी सहमत आहेत, की ‘शरीरावर दिसेल अशा ठिकाणी टाटू असलेल्या लोकांना . . . समजले पाहिजे की स्वतःचे मनोगत व्यक्‍त करण्याच्या या प्रकारामुळे, आपल्या करिअरमध्ये किंवा व्यक्‍तिगत नातेसंबंधांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.’”

टाटू केल्याने, तुम्ही ख्रिश्‍चन आहात हा दावा आणखी सबळ होतो की कमकुवत होतो, याचा देखील विचार केला पाहिजे. ते इतरांना “अडखळण्यास कारण” बनू शकते का? (२ करिंथकर ६:३) हे खरे आहे, की काही युवकांनी शरीराचा जो भाग झाकलेला असतो तेथे टाटू करून घेतले असेल. त्यांच्या पालकांनाही याविषयी काही माहीत नसेल. पण थांबा! डॉक्टरकडे अचानक जावे लागल्यास किंवा शाळेत अंघोळ करण्याची सोय असते तेव्हा अंघोळ करते वेळी तुमचे छुपे टाटू सर्वांना दिसू शकते! तेव्हा स्वतःची फसवणूक करून घेण्यापेक्षा ‘सर्व बाबतीत चांगले [प्रामाणिक] वागणे’ सर्वात उत्तम नाही का?—इब्री लोकांस १३:१८.

सर्व फॅडप्रमाणे टाटू करून घेण्याचे फॅडही कालांतराने कमी होईल. तुमचा सर्वात आवडता एखादा पोशाख, मग ती जिन्स असो, शर्ट असो, एखादा ड्रेस असो किंवा तुमचे सर्वात आवडते शूज असोत—तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनभर घालणार आहात का? मुळीच नाही! स्टाईल्स, वेगवेगळे कट्‌स आणि रंग बदलत राहतात. अर्थात कपड्याप्रमाणे टाटू काढता येत नाहीत. तसेच, आज तुम्ही १६ वर्षांचे असताना तुम्हाला आवडत असलेली “फॅशन,” तुम्ही ३० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला कदाचित इतकी आवडणार नाही.

पुष्कळ जणांना आता आपल्या स्वरूपात केलेल्या कायमच्या बदलांचा पस्तावा होत आहे. एमी म्हणते: “यहोवाविषयी शिकण्याआधी मी अंगावर टाटू करून घेतलं होतं. मी त्याला नेहमी लपवण्याचा प्रयत्न करते. मंडळीतल्या लोकांना जर का ते कधी दिसलंच तर मला खूप लाज वाटते.” काय शिकतो आपण यावरून? स्वतःला रंगवून घेण्याआधी विचार करा. नंतर पस्तावा होईल असा निर्णय घेऊ नका. (g०३ ९/२२)

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२२ पानांवरील चित्र]

टाटूचा सहसा, बंड दर्शवणाऱ्‍या जीवन-शैलीशी संबंध जोडला जातो

[२२ पानांवरील चित्र]

नंतर, पुष्कळांना टाटू करून घेतल्याचा पस्तावा होतो

[२३ पानांवरील चित्र]

स्वतःला रंगवून घेण्याआधी विचार करा