व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपचारातील अडचणी

उपचारातील अडचणी

उपचारातील अडचणी

“मधुमेहाच्या बाबतीत, हा प्रकार गंभीर, तो प्रकार तितका गंभीर नाही असे म्हणताच येत नाही. सगळी प्रकरणे गंभीरच असतात.”—ॲन डॅली, अमेरिकन डायबिटीस असोसिएशन.

“तुमच्या रक्‍त चाचण्यांचे रिपोर्ट आलेत. काही गंभीर बिघाड दिसून आले आहेत. तुम्हाला लगेच वैद्यकीय उपचारांची गरज आहे.” डॉक्टरांचे शब्द ऐकून डेब्रा अक्षरशः सुन्‍न झाली. ती सांगते “त्या रात्री मी कितीतरी वेळ विचार करत राहिले, की नक्कीच लॅबवाल्यांकडून काहीतरी चूक झाली असणार. मला काही आजार असणे शक्यच नाही.”

बऱ्‍याच लोकांप्रमाणे डेब्रालाही वाटत होते की आपण तर ठणठणीत आहोत. म्हणून तिने अनेक त्रासदायक लक्षणांकडे चक्क दुर्लक्ष केले होते. वारंवार तहान लागते, ती आपण घेत असलेल्या अलर्जीच्या औषधांमुळे असावी. आणि पाणी जास्त प्यायल्यामुळे साहजिकच लघवीला वारंवार जावे लागते. थकव्याचे काय, नोकरी करून मुलांना सांभाळायचे म्हटल्यावर कोणाचीही दमछाक होणारच. अशाप्रकारे तिने स्वतःची समजूत घातली.

पण मग रक्‍ताची चाचणी करताच मधुमेह या सर्व लक्षणांचे कारण असल्याचे समजले. हे निदान स्वीकारायला डेब्राचे मन तयार होईना. ती म्हणते, “मी कुणालाही याविषयी सांगितले नाही. रात्री घरातले सर्वजण झोपल्यावर मी अंधारात एक टक पाहात राहायचे आणि रडायचे.” डेब्रासारखेच अनेकजण आपल्याला मधुमेह झाल्याचे कळल्यावर अतिशय

भावनाविवश होतात. ते अगदी निराश होतात, कधीकधी चिडतात देखील. कॅरन नावाची स्त्री म्हणते, “मी बरेच दिवसपर्यंत वारंवार रडत होते. सत्याला तोंड देण्याची हिंमतच होत नव्हती.”

आपल्याच जीवनात असे का घडावे, असा स्वाभाविक विचार करून बऱ्‍याच लोकांच्या वरीलप्रमाणे प्रतिक्रिया असतात. पण जवळच्या माणसांचा आधार मिळाल्यावर मात्र मधुमेहाचे रुग्ण आपल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात. कॅरन म्हणते, “माझ्या नर्सने मला माझ्या परिस्थितीचा स्वीकार करण्यास मदत केली. मी रडायचे तेव्हा ती मला मनसोक्‍त रडू द्यायची. अशाप्रकारे भावनांना वाट करून दिल्यामुळे हळूहळू मी सावरले.”

गंभीर का?

मधुमेहाची तुलना गाडीच्या इंजीनमध्ये बिघाड होण्याशी करण्यात आली आहे. आणि याला कारण आहे. शरीर ग्लूकोजचा योग्य चयापचय करू शकत नसल्यामुळे शरीरातल्या बऱ्‍याच महत्त्वपूर्ण प्रक्रियांमध्ये बिघाड होऊन कधीकधी जिवालाही धोका संभवू शकतो. डॉ. हार्वे कॅट्‌सेफ म्हणतात, “कोणालाही मधुमेहामुळे मृत्यू येत नाही तर मधुमेहामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितींमुळे सहसा रुग्ण दगावतात. आम्ही या गुंतागुंतीच्या परिस्थिती उद्‌भवू नयेत म्हणून पावले घेण्यात तर निपुण आहोत पण त्या उद्‌भवल्यावर मात्र त्यांवर उपचार करणे आम्हाला तितके सोपे जात नाही.” *

मधुमेहग्रस्त रुग्णांना काही आशा आहे का? होय—जर त्यांनी आपल्या आजाराचे गांभीर्य ओळखले आणि उपचारपद्धतीला सहकार्य दिले तर. *

आहार व व्यायाम

टाईप १ मधुमेह टाळता येत नसला तरीसुद्धा शास्त्रज्ञ या रोगाच्या आनुवंशिकतेच्या घटकांचा अभ्यास करत आहेत आणि रोगप्रतिबंधक शक्‍तीचा शरीरावर होणारा हल्ला रोखून धरण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. (पृष्ठ  ८ वरील “ग्लूकोजची भूमिका” हे शीर्षक असलेली चौकट पाहा) “टाईप २ मधुमेह असलेल्यांची परिस्थिती त्या मानाने आशाजनक आहे,” असे मधुमेह—भावनिक व शारीरिक उपचार (इंग्रजी) या पुस्तकात म्हटले आहे. “आनुवंशितेमुळे हा रोग होण्याची शक्यता असलेल्या व्यक्‍ती केवळ संतुलित आहार घेऊन व नियमाने व्यायाम करून शारीरिकरित्या तंदुरुस्त राहतात आणि वजन आटोक्यात ठेवतात तेव्हा त्यांच्यात रोगाचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही.” *

व्यायामाच्या महत्त्वावर जोर देताना जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशनने, स्त्रियांवर घेण्यात आलेल्या एका व्यापक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला. या अभ्यासातून असे दिसून आले, की “केवळ काही वेळ शारीरिक हालचाल केल्यामुळेही, इन्सुलिनच्या माध्यमाने [शरीरातल्या पेशींद्वारे] ग्लूकोज शोषून घेण्याची प्रक्रिया जवळजवळ २४ तासांपेक्षा जास्त काळपर्यंत वाढल्याचे आढळले आहे.” म्हणूनच या अहवालातून असा निष्कर्ष काढण्यात आला की “पायी चालणे व जोमदार व्यायाम यांमुळे स्त्रियांमध्ये टाईप २ मधुमेह बऱ्‍याच प्रमाणात नियंत्रणात राहू शकतो.” हा अभ्यास करणाऱ्‍या तज्ज्ञांनी अशा रुग्णांना आठवड्यातून दररोज नाही तरी जास्तीत जास्त दिवस कमीत कमी ३० मिनिटे साधारण शारीरिक हालचाली करण्याचा सल्ला दिला आहे. अगदी पायी चालण्यासारखा साधा व्यायाम केला तरी चालेल. अमेरिकन डायबिटीस असोसिएशन कंप्लीट गाइड टू डायबिटीस यात सांगितल्यानुसार चालणे हा “सर्वात उत्तम, सर्वात सुरक्षित आणि स्वस्त प्रकारचा व्यायाम आहे.”

पण मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणताही व्यायाम निवडावा. याचे एक कारण म्हणजे मधुमेहामुळे रक्‍तवाहिन्या व मज्जातंतू यांना क्षती होऊन रक्‍ताभिसरणावर व स्पर्शेंद्रियांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाला साधे खरचटले तरी त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, आणि त्या ठिकाणी संसर्ग होऊन अल्सरही होऊ शकतो. लगेच यावर उपचार न केल्यास सबंध पाय कापून टाकण्याची पाळी येऊ शकते. *

पण नियमित व्यायाम केल्याने मधुमेहींना आपला आजार नियंत्रणात ठेवता येतो. एडीए कंप्लीट गाईड यात सांगितले आहे की “नियमित व्यायामांच्या फायद्यांवर संशोधक जितका अभ्यास करत आहेत तितकेच त्याचे अधिकाधिक फायदे त्यांना दिसून येत आहेत.”

इन्सुलिनचा उपचार

योग्य आहार व नियमित व्यायामासोबतच, मधुमेह झालेल्या बऱ्‍याचजणांना दररोज आपल्या रक्‍तातील ग्लूकोजची मात्रा तपासून दिवसांतून अनेक वेळा इन्सुलिन शरीरात टोचून घ्यावे लागते. आहारावर नियंत्रण ठेवल्यामुळे आणि व्यायामाचा नित्यक्रम पाळल्यामुळे टाईप २ मधुमेह असलेल्या काहींना, निदान काही काळासाठी इन्सुलिनचा उपचार बंद करणे शक्य झाले आहे. * कॅरन, जिला टाईप १ मधुमेह झाला आहे, तिला असे आढळले आहे की व्यायामामुळे शरीरात टोचलेल्या इन्सुलिनची परिणामकारकता वाढते. यामुळे तिला दररोजच्या इन्सुलिन डोसमध्ये २० टक्क्यांची कपात करणे शक्य झाले आहे.

अर्थात, इन्सुलिन घ्यावे लागते म्हणून मधुमेही व्यक्‍तीने निराश होण्याची गरज नाही. मेरी ॲन या अनेक मधुमेही रुग्णांची देखरेख करणाऱ्‍या एक प्रशिक्षित परिचारिका म्हणतात, “इन्सुलिन घ्यावे लागत आहे म्हणजे आपल्याकडून काही कसूर राहिली असा विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मधुमेह असला तरीसुद्धा, रक्‍तातील साखर नियंत्रित ठेवल्याने तुम्हाला नंतर होणाऱ्‍या अनेक समस्या टाळता येतील.” किंबहुना, अलीकडे घेण्यात आलेल्या एका अभ्यासावरून असे दिसून आले की टाईप १ मधुमेह असलेल्या ज्या व्यक्‍तींनी रक्‍तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवले, त्यांच्यात “मधुमेहामुळे डोळे, मूत्रपिंडे व मज्जातंतू यांत होणारे बिघाड बऱ्‍याच कमी प्रमाणात आढळले.” उदाहरणार्थ, डोळ्यांचा विकार (रेटिनोपॅथी) होण्याचा धोका ७६ टक्के कमी झाला! टाईप २ मधुमेह झालेल्यांनीही रक्‍तातील साखरेवर नियंत्रण ठेवल्यास त्यांनाही अशाचप्रकारचे फायदे होतात.

इन्सुलिन उपचार जास्तीत जास्त सोयीस्कर आणि कमीत कमी त्रासदायक व्हावा म्हणून, याकरता वापरली जाणारी सर्वसामान्य साधने, अर्थात, सिरिंज व इन्सुलिन पेन यांतील सुया अगदीच बारीक असतात, ज्यामुळे रुग्णाला सुई टोचल्यावर फार दुखत नाही. मेरी ॲन म्हणतात, “सहसा पहिल्यांदाच टोचताना सर्वात जास्त त्रास होतो. पण त्यानंतर मात्र बरेच रुग्ण सांगतात की त्यांना काहीही त्रास जाणवत नाही.” इन्सुलिन शरीरात टोचण्याच्या आणखीही काही पद्धती आहेत, उदाहरणार्थ, स्वयंचलित इंजेक्टर्स जे त्वचेतून क्षणार्धात अगदी नकळत सुई आत टोचतात; तसेच जेट इंजेक्टर्स तर जणू बंदुकीच्या वेगाने थेट इंसुलिन शरीरात टोचतात; आणि इन्फ्युसर्स, ज्यात कॅथेटरद्वारे शरीरात इन्सुलिन सोडले जाते. हे एकदा लावले की तीन चार दिवसांपर्यंत राहते. पण अलीकडल्या वर्षांत इन्सुलिन पंप नावाचे उपकरण अतिशय लोकप्रिय झाले आहे. पेजरच्या आकाराचे हे उपकरण संगणकीय तंत्रावर चालते. यात शरीराच्या दररोजच्या गरजेनुसार एका कॅथेटरमधून शरीरात इन्सुलिन सोडले जाते, ज्यामुळे इन्सुलिनचा योग्य डोस अगदी सोयीस्करित्या शरीराला मिळतो.

शिकत राहा

शेवटी काय, मधुमेह या आजारावर कोणताही निश्‍चित उपचार नाही. कोणती उपचारपद्धत स्वीकारायची हे ठरवताना प्रत्येक व्यक्‍तीने बऱ्‍याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मेरी ॲन सांगतात, “वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांचा गट तुमच्या उपचाराला दिशा देत असले तरीसुद्धा ड्रायव्हरच्या सीटवर तुम्ही स्वतः असता हे विसरू नका.” डायबिटीस केअर या माहितीपत्रकात तर असे म्हटले आहे: “स्वतः रुग्णाला जर आपल्या रोगावर कसे नियंत्रण ठेवायचे याविषयी पद्धतशीरपणे सविस्तर ज्ञान देण्यात आले नसेल तर मधुमेहावरील वैद्यकीय उपचार हा कनिष्ठ प्रतीचा, नव्हे नैतिकदृष्ट्याही दुय्यम दर्जाचा म्हणावा लागेल.”

मधुमेहींना आपल्या या आजाराविषयी जितके ज्ञान मिळेल तितकेच ते आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतील आणि दीर्घकालीन आरोग्यदायी जीवन व्यतीत करण्याच्या मार्गातील अडथळे दूर करू शकतील. पण परिणामकारकरितीने हे ज्ञान संपादन करण्याकरता धीर धरण्याची गरज आहे. मधुमेह—भावनिक व शारीरिक उपचार (इंग्रजी) या पुस्तकात स्पष्ट केल्याप्रमाणे: “सर्वकाही एकाच दमात समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही गोंधळून जाल आणि त्या माहितीचा योग्यप्रकारे वापर करू शकणार नाही. शिवाय, तुम्हाला सर्वात उपयोगी पडणारी माहिती खरे तर पुस्तकांत किंवा माहितीपत्रकांत सापडणार नाही. कारण तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार तुमच्या रक्‍तातल्या साखरेच्या प्रमाणात होणारे चढउतार समजून घेणे अत्यावश्‍यक आहे. आणि हे केवळ कालांतराने, चुकतमाकत तुम्ही स्वतःच शिकाल.”

उदाहरणार्थ, बारकाईने लक्ष दिल्यास तुम्हाला कळेल की तणावाखाली असताना तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो. कारण तणाव तुमच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. केन म्हणतात, “या मधुमेही शरीराला मी ५० वर्षे सांभाळले आहे, त्यामुळे त्याचा एकूणएक इशारा मला लगेच कळतो!” आपल्या शरीराच्या संकेतांकडे लक्ष दिल्याने केनला बरीच मदत झाली आहे. आज सत्तरी ओलांडूनही ते पूर्णवेळ काम करत आहेत!

कौटुंबिक आधाराचे महत्त्व

मधुमेहाच्या उपचारात कौटुंबिक सदस्यांची भूमिका दुर्लक्षित करून चालणार नाही. एका संदर्भग्रंथानुसार मुलांमध्ये व तरुण प्रौढांमध्ये मधुमेह आटोक्यात ठेवण्यात “रुग्णाच्या कौटुंबिक जीवनाचा दर्जा हा कदाचित सर्वात कळीचा मुद्दा म्हणता येईल.”

कौटुंबिक सदस्य मधुमेहाविषयी माहिती घेतात, रुग्णासोबत डॉक्टरकडे जातात तेव्हा बराच फायदा होतो. कारण ही माहिती त्यांना रुग्णाला साहाय्य पुरवण्यात, महत्त्वाची लक्षणे लगेच ओळखण्यात व त्यानुसार योग्य कृती करण्यास सहायक ठरतील. टेड यांच्या पत्नीला वयाच्या चवथ्या वर्षापासून टाईप १ मधुमेह आहे. ते सांगतात: “बार्बराचे शुगर लेव्हल खूप खाली गेले तर मला लगेच कळते. ती बोलता बोलता अचानक शांत होते. तिला भरभरून घाम फुटतो आणि कारण नसताना ती चिडते. तसेच तिच्या हालचाली थोड्या शिथिल वाटू लागतात.”

तसेच, केन या गृहस्थांची पत्नी कॅथरीन हिला, अचानक त्यांचा चेहरा निस्तेज दिसू लागला आहे किंवा त्यांना घाम येऊ लागला आहे असे दिसते किंवा त्यांच्या वागण्यात तिला फरक दिसतो तेव्हा ती त्यांना एखादे सोपे गणित सोडवायला सांगते. त्यांना नीट उत्तर देता आले नाही तर कॅथरीनला लगेच कळते की आता त्यांना कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ द्यायचे नाहीत. तसेच त्यांना लगेच काहीतरी मदत दिली पाहिजे. केन आणि बार्बरा या दोघांनाही आपल्या जोडीदाराला मधुमेहाविषयी ज्ञान आहे याबद्दल कृतज्ञता वाटते आणि त्यांच्यावर त्यांना प्रेम आणि पूर्ण भरवसा आहे. *

प्रेमळ कुटुंबीयांनी होता होईल तितके मदतशील, सौम्य व सहनशील असण्याचा प्रयत्न करावा. हे गुण मधुमेही व्यक्‍तीला जीवनात तिच्या वाट्याला आलेल्या आव्हानांना तोंड देण्यास साहाय्य करू शकतात आणि त्यांच्या तब्यतीत सुधारणा देखील होऊ शकते. कॅरनच्या पतीने तिला आपल्या प्रेमाचे आश्‍वासन दिल्यामुळे तिच्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडला आहे. कॅरन सांगते: “नीजल मला म्हणाले, ‘लोकांना जिवंत राहण्याकरता अन्‍नपाण्याची गरज आहे, आणि तुला अन्‍नपाण्याची व त्यासोबत इन्सुलिनच्या एका लहानशा डोसची, बस्स एवढंच.’ या समजूतदार पण व्यावहारिक शब्दांचीच मला गरज होती.”

तसेच, रक्‍तातल्या साखरेच्या प्रमाणात चढ उतार होतात तेव्हा मधुमेही व्यक्‍तीच्या मनःस्थितीवरही त्याचा परिणाम होतो याची कुटुंबीयांनी आणि परिचितांनी आठवण ठेवावी. एक स्त्री सांगते, “साखरेची पातळी घसरली की मी आपोआपच शांत, अस्वस्थ होते, चिडचिड करू लागते आणि मला कमालीची निराशा वाटू लागते. मग आपल्या या बालिश वागण्याबद्दल माझी मलाच लाज वाटू लागते. पण इतरजण जेव्हा या भावनांमागचे कारण समजून घेतात तेव्हा थोडे बरे वाटते आणि मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते.”

मधुमेही व्यक्‍तीला स्नेह्‍यांचे व कुटुंबीयांचे साहाय्य मिळाल्यास या आजारावर यशस्वीरित्या नियंत्रण ठेवता येते. बायबलची तत्त्वे देखील सहायक ठरू शकतात. ती कशी? (g०३ ५/०८)

[तळटीपा]

^ मधुमेहामुळे उद्‌भवू शकणाऱ्‍या गुंतागुंतीच्या परिस्थिती म्हणजे, हृदयरोग, पक्षाघात, मूत्रपिंडांत बिघाड, अवयवयांतील रक्‍तवाहिन्यांचा आजार आणि मज्जासंस्थेत बिघाड. पायांना योग्यप्रकारे रक्‍तपुरवठा न मिळाल्याने अल्सर तयार होतात आणि काही केसेसमध्ये तर पाय कापून टाकण्याची वेळ येते. मधुमेह, हे प्रौढांना येणाऱ्‍या अंधत्वाचे मुख्य कारण देखील आहे.

^ सावध राहा! यात कोणत्याही विशिष्ट उपचार पद्धतीची शिफारस केली जात नाही. आपल्याला मधुमेह आहे असे ज्यांना वाटते त्यांनी या आजाराच्या उपचारासंबंधी अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

^ कटिप्रदेशावर असलेल्या चरबीपेक्षा पोटावर असलेल्या अतिरिक्‍त चरबीमुळे जास्त धोका असल्याचे दिसून आले आहे.

^ धूम्रपान करणारे आणखीनच धोकेदायक परिस्थितींना आमंत्रणे देतात कारण या सवयीमुळे हृदय व रक्‍ताभिसरण संस्थेवर अनिष्ट परिणाम होतो व रक्‍तवाहिन्या संकोच पावतात. एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे की मधुमेहामुळे ज्यांचे अवयव कापून टाकावे लागते अशी ९५ टक्के प्रकरणे धूम्रपान करणाऱ्‍यांचीच असतात.

^ यांपैकी काहीजणांना तोंडावाटे घेण्याच्या औषधांमुळे मदत झाली आहे. यात स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करण्यास प्रवृत्त करणारी औषधे, रक्‍तातील साखर आटोक्यात ठेवणारी औषधे आणि इन्सुलिनचा प्रतिरोध कमी करणारी औषधे आहेत. (तोंडावाटे घेण्याची औषधे सहसा टाईप १ मधुमेहाकरता देत नाहीत.) सध्या, इन्सुलिन तोंडावाटे घेता येईल अशा रूपात उपलब्ध नाही कारण ते प्रथिन असल्यामुळे रक्‍तात मिसळण्याआधीच पाचनक्रियेदरम्यान ते पोटात नाश पावते. पण इन्सुलिन अथवा गोळ्या-औषधे इत्यादी व्यायाम व योग्य आहाराकरता पर्याय नाहीत.

^ वैद्यकीय अधिकारी असा सल्ला देतात की मधुमेह झालेल्या व्यक्‍तींनी नेहमी ओळखपत्र जवळ बाळगावे आणि आपल्याला मधुमेह आहे अशी माहिती देणारी आभुषणे वापरावीत. आणीबाणीच्या प्रसंगी या वस्तू जीवनदायक ठरू शकतात. उदाहरणार्थ, साखरेची पातळी घसरल्यामुळे एखाद्या व्यक्‍तीच्या चमत्कारिक वागणुकीचा संबंध दुसऱ्‍याच एखाद्या आजाराशी किंवा मद्यपानाशीही लावला जाण्याचा संभव आहे.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

तरुण पिढीचा आजार?

मधुमेह हा “तरुण पिढीचा आजार बनत चाललाय,” असे न्यू यॉर्कच्या माउन्ट सायनाय स्कूल ऑफ मेडिसिनच्या एका नामवंत एन्डोक्रिनोलॉजिस्ट व डीन असलेल्या डॉ. आर्थर रुबेनस्टीन यांनी म्हटले. मधुमेहाच्या रुग्णांचे सरासरी वय घसरत चालले आहे. टाईप २ मधुमेहाविषयी बोलताना, मधुमेहावरील तज्ज्ञ, डॉ. रॉबिन एस. गोलंड यांनी सांगितले, “दहा वर्षांपूर्वी आम्ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना असे शिकवायचो की ४० वर्षांच्या वयाखालील व्यक्‍तींत हा रोग आढळत नाही. पण आज १० वर्षांखालील मुलांमध्येही तो आढळू लागला आहे.”

असे घडण्यामागे काय कारण असावे? कधीकधी अर्थातच आनुवंशिकतेचा घटक असतो. पण वजन आणि वातावरण यांचाही बराच प्रभाव पडतो. मागील दोन दशकांत गलेलठ्ठ मुलांची संख्या दुप्पट झाली आहे. हे कशामुळे घडले? यु. एस. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रांचे डॉ. विल्यम डीट्‌झ यांनी सांगितल्यानुसार, “मागील २० वर्षांत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींत आणि जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. घरच्यापेक्षा बाहेर खाण्याचे वाढते प्रमाण; सकाळचा नाश्‍ता न घेण्याचे वाढते प्रमाण; सॉफ्ट ड्रिंक्स व फास्टफूडचे वाढते चलन; शाळेत [शारीरिक शिक्षणाचा] अभाव; आणि शाळेतील मधल्या सुट्ट्यांचा अभाव यांसारखी कारणे याला जबाबदार आहेत.”

एकदा मधुमेह झाला की तो बरा होत नाही. त्यामुळे मधुमेह झालेल्या एका किशोरवयीन मुलाचा हा सल्ला पाळणेच अधिक सुज्ञ मार्ग आहे: “पौष्टिकता नसलेल्या चमचमीत खाद्यपदार्थांपासून दूर राहा आणि तंदुरुस्त राहा.”

[८, ९ पानांवरील चौकट/चित्र]

ग्लूकोजची भूमिका

ग्लूकोज हे शरीरातल्या अब्जावधी कोशिकांना ऊर्जा पुरवते. पण या कोशिकांमध्ये प्रवेश मिळवण्याकरता जणू त्याला एका “चावी”ची गरज असते; आणि ही चावी म्हणजे स्वादुपिंडातून पाझरणारे इन्सुलिन नावाचे एक रसायन. टाईप १ मधुमेहात शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही. टाईप २ मध्ये शरीरात इन्सुलिन तयार होते, पण पर्याप्त मात्रेत तयार होत नाही. * शिवाय, कोशिका इन्सुलिनला आत प्रवेश करू देण्यास तयार नसतात—या स्थितीला इन्सुलिन प्रतिरोध म्हणतात. मधुमेहाच्या या दोन्ही प्रकारांत परिणाम सारखाच होतो: कुपोषित पेशी आणि रक्‍तातली साखर अतोनात वाढणे.

टाईप १ मधुमेहात शरीराची रोगप्रतिबंधक संस्था स्वादुपिंडातील इन्सुलिन उत्पन्‍न करणाऱ्‍या बीटा कोशिकांवर हल्ला करते. त्यामुळे टाईप १ मधुमेह हा आत्मप्रतिरक्षक (ऑटो-इम्यून) विकार असून कधीकधी त्याला रोगप्रतिकारक मधुमेहही म्हणतात. जिवाणू, विषारी रसायने व विशिष्ट औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्‍तीची प्रतिक्रिया प्रवृत्त होऊ शकते. आनुवंशिकतेचीही भूमिका असू शकते कारण टाईप १ मधुमेह हा सहसा एकाच कुटुंबाच्या अनेक सदस्यांमध्ये दिसून येतो आणि श्‍वेतवर्णीयांत सर्वात सामान्यपणे आढळतो.

टाईप २ मधुमेहात तर आनुवंशिकतेचा घटक अधिकच प्रबळ आहे पण हा मधुमेह अश्‍वेतवर्णीयांमध्ये जास्त आढळतो. ऑस्ट्रेलियन अबॉरिजन आणि नेटिव्ह अमेरिकन लोकांत टाईप २ मधुमेह मोठ्या प्रमाणात आढळतो; त्यातल्या त्यात नेटिव्ह अमेरिकन लोकांत याचे जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रमाण आहे. संशोधक आनुवंशिकता व स्थूलपणा यांतील संबंधाचा, तसेच, ज्यांच्या घराण्यात या रोगाची आनुवंशिकता आहे त्यांच्या शरीरात अधिक चर्बी असल्यामुळे कशाप्रकारे इन्सुलिन प्रतिरोधाची शक्यता वाढते याविषयी अभ्यास करत आहेत. * टाईप १ मधुमेह हा टाईप २ पेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा आहे, कारण तो सहसा चाळीशी ओलांडलेल्या व्यक्‍तींनाच झालेला आढळतो.

[तळटीपा]

^ नव्वद टक्के मधुमेहींना टाईप २ मधुमेह असतो. पूर्वी याला “इन्सुलिन अनावलंबी” अथवा “प्रौढवयात उद्‌भवणारा” मधुमेह म्हणत. पण ही नावे योग्य नाहीत कारण टाईप २ मधुमेह असलेल्या ४० टक्के रुग्णांना इन्सुलिनची गरज असते. शिवाय, आता भीतिदायक प्रमाणात तरुण व्यक्‍तींना—काहींना तर दहा बारा वर्षांच्या वयातच टाईप २ मधुमेह झाल्याचे आढळू लागले आहे.

^ एखाद्या व्यक्‍तीचे वजन तिच्या आदर्श वजनापेक्षा २० टक्के जास्त असते तेव्हा तिला स्थूल म्हणता येते.

[चित्र]

ग्लूकोज रेणू

[चित्राचे श्रेय]

सूत्र: Pacific Northwest National Laboratory

[९ पानांवरील चौकट]

स्वादुपिंडाची भूमिका

केळाच्या आकाराचे स्वादुपिंड पोटाच्या मागच्या बाजूला स्थिरावलेले असते. दि अनॉफिशियल गाईड टू लिव्हिंग विथ डायबिटीस या पुस्तकानुसार, “निरोगी स्वादुपिंड, शरीरातल्या ग्लूकोजचे प्रमाण दिवसभरात जसजसे वाढते किंवा कमी होते तसतसे अगदी योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करते आणि अशारितीने शरीरातल्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अगदी सुरळीतपणे करत राहते.” स्वादुपिंडात असलेल्या बीटा कोशिकांमधून विशेषतः इन्सुलिन संप्रेरक उत्पन्‍न होते.

या बीटा कोशिका पर्याप्त मात्रेत इन्सुलिन तयार करू शकत नाहीत तेव्हा आपोआपच रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि यामुळे हायपरग्लायसिमिया म्हटलेली स्थिती निर्माण होते. याउलट रक्‍तात साखरेच्या अभावाला हायपोग्लायसिमिया म्हणतात. स्वादुपिंडासोबतच यकृत देखील शरीरातले अतिरिक्‍त ग्लूकोज, ग्लायकोजन नावाच्या पदार्थाच्या रूपात साठवण्याद्वारे रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास हातभार लावते. स्वादुपिंडाने हुकूम केल्यास यकृत हे ग्लायकोजन पुन्हा ग्लूकोजच्या रूपात परिवर्तित करून शरीराच्या वापराकरता उपलब्ध करून देते.

[९ पानांवरील चौकट/चित्र]

साखरेची भूमिका

जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह होतो हा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. वैद्यकीय पुरावा दाखवतो की आनुवांशिकतेमुळे हा रोग होण्याची मुळातच शक्यता असलेल्या व्यक्‍तींचे वजन जास्त असेल तर—मग ते साखर खावोत अथवा न खावोत—त्यांना हा रोग होण्याची शक्यता अधिकच वाढते. पण नाही तरी, साखर जास्त खाणे हे आरोग्याला बाधकच आहे कारण त्यामुळे शरीराला काही विशेष पोषक तत्त्व तर मिळतच नाही उलट लठ्ठपणा वाढण्यास मदत होते.

आणखी एक गैरसमज असा आहे की मधुमेह असलेल्या व्यक्‍तींना गोड पदार्थ खाण्याची अनियंत्रित ओढ असते. पण खरे पाहता, इतरांना जितकी असते तितकीच या लोकांनाही गोड खाण्याची ओढ असते. मधुमेहावर नियंत्रण न केल्यास रुग्णाला भूक लागते पण गोड खाण्याचीच ओढ असेल असे नाही. मधुमेह झालेले लोक गोड खाऊ शकतात पण त्यांच्या सबंध आहाराकडे लक्ष देऊन किती साखर खाता येईल हे ठरवले पाहिजे.

अलीकडील अभ्यासांतून दिसून आले आहे की आहारात फ्रुक्टोज अर्थात, फळे व भाज्या यांत असलेल्या शर्करेचे जास्त प्रमाण असल्यास हे इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होण्यास हातभार लावू शकते आणि यामुळे प्राण्यांमध्ये—मग त्यांचे वजन कितीही असो—मधुमेह झाल्याचे आढळले आहे.

[८, ९ पानांवरील रेखाचित्र/चित्रे]

मधुमेहाविषयी मूलभूत माहिती

स्वादुपिंड

↓ ↓ ↓

निरोगी व्यक्‍ती टाईप १ मधुमेह टाईप २ मधुमेह

जेवल्यावर, रक्‍तातल्या इन्सुलिन उत्पन्‍न करणाऱ्‍या बऱ्‍याच रुग्णांच्या स्वादुपिंडात

साखरेचे प्रमाण वाढते व स्वादुपिंडातल्या बीटा कमी मात्रेत इन्सुलिन

त्यानुसार स्वादुपिंडातून कोशिकांवर रोगप्रतिकारक तयार होते

इन्सुलिनची योग्य मात्रा शक्‍तीचा हल्ला होतो.

शरीरात सोडली जाते यामुळे इन्सुलिन उत्पन्‍नच

होत नाही

↓ ↓ ↓

स्नायूंच्या कोशिकांवर व इन्सुलिनच्या मदतीशिवाय आणि ग्राहकांनी प्रतिसाद

इतर कोशिकांवर असलेल्या ग्लूकोज रेणू स्नायू न दिल्यामुळे रक्‍तातून ग्लूकोज

ग्राहकांवर इन्सुलिनचे रेणू कोशिकांत प्रवेश करू शोषून घेणाऱ्‍या प्रवेशिकांना

चिकटतात. यामुळे प्रवेशिकांना शकत नाहीत चालना मिळत नाही

चालना मिळून ग्लूकोजचे

रेणू कोशिकांमध्ये प्रवेशतात.

↓ ↓ ↓

स्नायू कोशिका ग्लूकोज शोषून ग्लूकोज रक्‍तातच राहते आणि त्यामुळे

घेतात व ते जाळतात. अशारितीने शरीरातील महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये अडथळा

रक्‍तातल्या ग्लूकोजची पातळी पुन्हा निर्माण होतो व रक्‍तवाहिन्यांना नुकसान होते

सामान्य होते

[रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

कोशिका

ग्राहक

प्रवेशिका

इन्सुलिन

केंद्रक

ग्लूकोज

[रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

रक्‍तवाहिनी

तांबड्या रक्‍त कोशिका

ग्लूकोज

[चित्राचे श्रेय]

माणूस: The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck

[७ पानांवरील चित्र]

मधुमेहींनी योग्य आहार घेणे अत्यावश्‍यक आहे

[१० पानांवरील चित्रे]

मधुमेही देखील सर्वसामान्य कार्यांत सामील होऊ शकतात