व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुट्टिमचित्रे दगडी चित्रकला

कुट्टिमचित्रे दगडी चित्रकला

कुट्टिमचित्रे दगडी चित्रकला

इटलीतील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाद्वारे

कुट्टिमचित्रे यास “निराळा कला प्रकार,” “उठून दिसणारी” कलाकृती आणि “प्राचीन काळातील आलंकारिक कलाकृतीचा सर्वात टिकाऊ प्रकार” असे म्हटले आहे. पंधराव्या शतकातील इटालियन कलाकार डोमेनिको घर्लांडाजो याने त्यास “चिरकालिक चित्रकलेची खरी पद्धत” असे म्हटले. कुट्टिमचित्रांचा इतिहास मात्र खरोखरच रंजक आहे.

लहान, जवळजवळ बसवलेल्या दगडांच्या, काचेच्या किंवा फरश्‍यांच्या तुकड्यांनी बनवलेल्या रचनेने फरशी, भिंत किंवा घुमट हे पृष्ठभाग सजवण्याची कला म्हणजे कुट्टिमचित्रे. प्राचीन काळी देखील फरशा आणि भिंती सुशोभित करण्यासाठी कुट्टिमचित्रांचा वापर केला जाई. स्नानगृहे, जलतरण तलाव आणि कारंज्यांवरही कुट्टिमचित्रे आढळतात; अशा ठिकाणी इतर प्रकारची नाजूक कला ओलाव्यामुळे केव्हाच नष्ट झाली असती.

एकाच रंगाच्या फरश्‍यांपासून कृष्णधवल चित्रांपर्यंत, जटिल रंगीत फुलांच्या कलाकृतीपासून उठावदार चित्रणापर्यंत तऱ्‍हेतऱ्‍हेची कुट्टिमचित्रे असू शकतात.

शोध आणि विकास

कुट्टिमचित्रांचा शोध कोणी लावला हे स्पष्टपणे ठाऊक नाही. प्राचीन काळचे ईजिप्शियन आणि सुमेरियन लोक इमारतींवर रंगीत चित्रे काढत. परंतु, ही कला विकसित न होताच लोप पावली असे दिसते. आशिया मायनर, कार्थेज, क्रीट, ग्रीस, सिसिली, स्पेन आणि सिरीया ही स्थळे कुट्टिमचित्रांचा उगमस्थान असल्याचे मानले जाते; यासंदर्भात एका लेखकाने असे म्हटले की, या तंत्राचा “शोध भूमध्य सागराच्या आसपासच्या अनेक ठिकाणी लावण्यात आला, मग त्याचा विसर पडला आणि वेगवेगळ्या समयी पुन्हा तो लावण्यात आला.”

सा.यु.पू. नवव्या शतकामधील प्राचीन काळची कुट्टिमचित्रे, गुळगुळीत गोट्यांनी तयार केलेल्या साध्या रचना होत्या. स्थानीयरित्या उपलब्ध असलेल्या दगडांवरती रंगाची विविधता अवलंबून होती. हे दगड सहसा १० ते २० मिलीमीटर व्यासाचे असायचे परंतु काही सूक्ष्म रचनांकरता पाच मिलीमीटर व्यासाचे एकदम बारीक खडे देखील वापरले आहेत. सा.यु.पू. चवथ्या शतकापर्यंत, कारागीर, या गोट्यांचे लहान लहान तुकडे करून वापरू लागले. यामुळे चित्रांमधील अचूकपणा वाढवता आला. हळूहळू गोट्यांच्या जागी चौकोनी दगडी तुकडे वापरण्यात येऊ लागले. हे चौकोनी दगड बऱ्‍याच रंगांमध्ये उपलब्ध होते आणि त्यांना जडवणे अधिक सोपे होते व ते वाटेल त्या डिझाईनमध्ये एकदम सहजासहजी बसवले जायचे. त्यांचा पृष्ठभाग सपाट असल्यामुळे त्यांचा रंग खुलवण्यासाठी त्यांच्यावर पॉलिशींग किंवा वॅक्सिंग सहजगत्या करता येत होती. सा.यु. दुसऱ्‍या शतकापर्यंत, रंगीत काचेच्या लहान तुकड्यांचाही भरपूर वापर करण्यात येऊ लागला आणि कलाकाराला बरेच रंग उपलब्ध झाले.

खासकरून ग्रीकांच्या काळात (सु. सा.य.पू. ३०० ते सु. सा.य.पू. ३०) उत्कृष्ट चित्रलेख तयार होत होते. “सर्वाधिक रंग वापरून आणि एक घनाकार मिलीमीटरचे लहान चौकोनी दगड वापरून कुट्टिमचित्र तयार करणाऱ्‍या ग्रीक कलाकारांची कलाकृती भित्तीचित्रांशी बरोबरी करू लागली,” असे ग्लोसार्यो टेकनिको-स्टोरिको डेल मोसाइको (टेक्निकल-हिस्टॉरिकल ग्लॉसरी ऑफ मोझाइक आर्ट) हे पुस्तक म्हणते. प्रकाश, सावली, सखोलता, विस्तार आणि यथादर्शन यांचे बारकावे तयार करण्यासाठी रंगाचा कलापूर्ण पद्धतीने वापर करण्यात येई.

ग्रीक कलाकृतींचे वैशिष्ट्य म्हणजे, अत्यंत सूक्ष्म तपशील असलेले मध्य चित्र किंवा प्रतिमा—ही सहसा एखाद्या सुप्रसिद्ध पेंटिंगची उच्च प्रतीची नक्कल असे—आणि त्याच्या बाजूला नक्षीकार कडा असत. काही मध्य चित्रांमध्ये इतके बारीक खडे वापरले जातात आणि ते इतके छान बसतात की हे लहान खडे नसून कुंचल्याने मारलेले फटकारे आहेत असे भासते.

रोमन कुट्टिमचित्रे

कुट्टिमचित्रे ही रोमन कला मानली जाते कारण इटली आणि रोमन साम्राज्याच्या प्रांतांमध्ये ती विपुलतेत आढळतात. एका पुस्तकानुसार, “उत्तर ब्रिटनपासून लिबियापर्यंत, ॲटलांटिक किनारपट्टीपासून सिरीयन वाळवंटापर्यंत रोमन शासनकाळातील इमारतींमध्ये अशा फरसबंदीचे हजारो प्रकार आढळले आहेत. काही वेळा, एखाद्या भागात रोमनांचे अस्तित्व असल्याचा हा एक पुरावा मानला जातो; रोमन संस्कृतीच्या प्रसाराशी त्याचा इतका जवळचा नातेसंबंध आहे.”

परंतु, रंगीबेरंगी कुट्टिमचित्रांचे चित्रलेख प्राचीन रोमी साम्राज्याची गरज पूर्ण करू शकले नाहीत. सा.यु. पहिल्या शतकातील शहरांचा झपाट्याने विकास झाला आणि यामुळे कमी वेळात व कमी किंमतीत कुट्टिमचित्रांची मागणी होऊ लागली. यामुळे केवळ कृष्णधवल खडे वापरून कुट्टिमचित्रे बनवली जाऊ लागली. उत्पादनात भरपूर वाढ झाली आणि इन्चिक्लोपेड्या डेलार्टे आन्टिका (प्राचीन कलेचा विश्‍वकोश) यात म्हटल्यानुसार, ‘रोमन साम्राज्यात असे एकही श्रीमंत घर नव्हते की ज्यात कुट्टिमचित्र नव्हते.’

विशिष्ट रचनांच्या हुबेहूब नकला दूरदूरच्या भागांमध्ये आढळतात. याचा अर्थ, कारागीरांचे गट—किंवा कदाचित कुट्टिमचित्रांची पुस्तके—एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जात होती. हवे असल्यास, स्टुडिओत ऑर्डर देऊन प्रतिमा तयार करवून घेता येत होती आणि मग ती संगमरवर किंवा टेराकोटाच्या तबकडीवर बांधकामाच्या ठिकाणी पोहंचवली व बसवली जात होती. उर्वरित कुट्टिमचित्र बांधकाम स्थळीच केले जाई.

एखाद्या चित्रातील रचना आणि कडा नीट मावण्यासाठी सुनियोजन करावे लागे. पाया आणि पृष्ठभागाकडे लक्ष दिले जाई आणि तो सपाट आहे याची खात्री केली जाई. त्यानंतर, चुन्याच्या बारीक गाराचा (ज्याला जडाव थर म्हटले जात) एक पातळ थर ओतला जाई; गारा सुकून जाण्याआधी त्यावर काम करता यावे म्हणून हा थर कदाचित एक चौरस मीटरपेक्षा कमी जागेत ओतला जात असे. मग पृष्ठभागावर चित्र आखले जात असे. त्यानंतर, हव्या त्या आकारानुसार चौकोनी दगड कापून कारागीर ते चित्रावर बसवत.

एक एक चौकोनी दगड गाऱ्‍यात बसवला जाई आणि अशाप्रकारे बसवताना दोन दगडांमधील गारा वर येत असे. एक भाग पूर्ण झाल्यावरच नंतरच्या भागात जडाव थर ओतला जाई आणि अशाप्रकारे हळूहळू ते चित्र पूर्ण केले जात असे. कुशल कारागीर अधिक जटिल भागांवर काम करायचे तर त्यांचे साहाय्यक सोपे भाग भरून काढण्याचे काम करत असत.

ख्रिस्ती धर्मजगतातील कुट्टिमचित्रे

सा.यु. चवथ्या शतकात, ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसमध्ये कुट्टिमचित्रांचा उपयोग होऊ लागला. सहसा बायबल कथांवर आधारलेली ही कुट्टिमचित्रे उपासकांना बोध देण्याच्या उद्देशाने तयार केली जात असत. सोनेरी व रंगीत काचेच्या चौकोनी तुकड्यांवर लुकलुकणारा प्रकाश पाडून गूढतेचा आभास निर्माण करण्यात येई. स्टोर्या डेलार्टे इटाल्याना (इटालियन कलेचा इतिहास) यात म्हटले आहे: “कुट्टिमचित्रांची कला त्या काळाच्या विचारसरणीशी एकदम जुळणारी होती; त्यावर अधिककरून प्रभाव होता तो . . . नेओप्लेटोनिझमचा. कुट्टिमचित्रे तयार करण्याच्या प्रक्रियेत, निर्जीव पदार्थांचे परिवर्तन आध्यात्म, प्रकाश आणि अधिक जागा व्यक्‍त करणाऱ्‍या घटकांत होते.” * हा प्रकार, ख्रिस्ती धर्माचा संस्थापक—येशू ख्रिस्त—याने शिकवलेल्या साध्यासोप्या उपासना मार्गापासून कितीतरी वेगळा आहे!—योहान ४:२१-२४.

बायझंटाईन चर्चेसमध्ये कुट्टिमचित्रांचे उल्लेखनीय प्रकार पाहायला मिळतात. काही उपासना स्थळांच्या आतील भिंती आणि घुमट चौकोनी दगडांनी पूर्णपणे भरलेले आहेत. “उत्कृष्ट ख्रिस्ती कुट्टिमचित्रे” रव्हेन्‍ना, इटली येथे पाहायला मिळतात जेथे सोनेरी पार्श्‍वभूमी उठावदार असून त्यातून दैवी प्रकाश आणि आध्यात्माची गूढता व्यक्‍त केली आहे.

पाश्‍चात्त्य युरोपियन चर्चेसमध्ये मध्ययुगापर्यंतच्या काळात कुट्टिमचित्रांचा प्रामुख्याने उपयोग होत होता आणि इस्लाम धर्मातही त्यांचा कुशलतेने उपयोग करण्यात आला. पुनरूज्जीवन काळातील इटलीत, मोठमोठी ख्रिस्ती देऊळे—व्हेनिसमधील सेंट मार्क्स आणि रोममधील सेंट पीटर्स—यांना जोडून असलेल्या कार्यशाळा कुट्टिमचित्रांची उत्पादन केंद्रे होती. १७७५ च्या सुमारास, रोममधील कारागीर, वाटेल त्या रंगातील वितळलेल्या काचेच्या धाग्यांचे बारीक तुकडे कापायला शिकले; यामुळे चित्रकलेच्या लहान नकला करून कुट्टिमचित्रे तयार करणे शक्य झाले.

आधुनिक पद्धती आणि उपयोग

कुट्टिमचित्रे तयार करणारे आधुनिक कारागीर अप्रत्यक्ष पद्धतीचा वापर करतात. यामध्ये, पूर्ण आकाराच्या कागदी रचनेवर चौकोनी दगड सुलट बाजूने चिकटवले जातात आणि त्यांची उलट बाजू वरती असते; हे काम कार्यशाळेत पार पाडले जाते. मग या कुट्टिमचित्राचा एक-एक भाग, कुट्टिमचित्र जेथे बसवायचे असते त्या ठिकाणी नेला जातो आणि मग जडाव थरात चौकोनी दगडांची उलट बाजू दाबली जाते. जडाव थरातील गारा सुकल्यावर कागद आणि चिकट पदार्थ धुऊन टाकले जातात आणि दृश्‍य बाजू वर येते. या पद्धतीत वेळ आणि मजुरी कमी लागते, परंतु, त्याच्या निस्तेज पृष्ठभागाला मध्ययुगीन कलाकृतींची चमक नसते.

तरीही, १९ व्या शतकातील असंख्य विधायक गृहे, ऑपेरा हाऊसेस, चर्चेस आणि इतर इमारती याच पद्धतीने सजवण्यात आल्या. याशिवाय, ही पद्धत, मेक्सिको सिटीपासून मॉस्कोपर्यंत आणि इस्राएलपासून जपानपर्यंत संग्रहालये, भुयारी स्टेशन, शॉपिंग मॉल, बगीचे व क्रिडांगणे अशा सर्व ठिकाणी सर्रासपणे वापरली जाऊ लागली. सपाट परंतु अनेक पैलू असलेली कुट्टिमचित्रे आधुनिक इमारतींच्या मोठ्या दर्शनीभागांना सुशोभित करण्यासाठीही योग्य मानण्यात आली आहेत.

सोळाव्या शतकातील इटालियन कलाकार आणि कला इतिहासकार जोर्जो व्हासारी यांनी लिहिले: “कुट्टिमचित्र ही सर्वात टिकाऊ चित्रणपद्धत आहे. इतर प्रकारच्या चित्रकलेतील रंग काही काळाने विटतो पण कुट्टिमचित्राचे सौंदर्य काळाने खुलत जाते.” होय, कुट्टिमचित्रांची कलाकुसर लक्ष वेधणारी आहे. खरोखरच, कुट्टिमचित्रे म्हणजे उल्लेखनीय दगडी चित्रकला! (g०३ १०/०८)

[तळटीप]

^ शिवाय, नेओप्लेटोनिक तत्त्वज्ञान, शास्त्रवचनांनुसार नसलेल्या आत्म्याच्या अमरत्वाचे शिक्षणही देत असे.

[२२ पानांवरील चित्र]

जेरूसलेमचा नकाशा (सा.यु. सहावे शतक)

[चित्राचे श्रेय]

Garo Nalbandian

[२२ पानांवरील चित्र]

सम्राट अलेक्झांडर (सा.यु.पू. दुसरे शतक)

[चित्राचे श्रेय]

Erich Lessing/Art Resource, NY

[२३ पानांवरील चित्रे]

डोम ऑफ द रॉक, जेरूसलेम (सा.यु. ६८५-६९१ दरम्यान बांधलेले)

[२३ पानांवरील चित्र]

“डायनिसस,” अँटियोक (सा.यु. ३२५ च्या सुमारास)

[चित्राचे श्रेय]

Museum of Art, Rhode Island School of Design, by exchange with the Worcester Art Museum, photography by Del Bogart

[२४ पानांवरील चित्र]

चौकोनी दगड, रंगीत काच आणि गोट्या यांचा आजही कुट्टिमचित्रांमध्ये उपयोग केला जातो

[२४ पानांवरील चित्र]

लिन्‍न हेरिटेज राष्ट्रीय उद्यान, मॅसेच्युसेट्‌स येथे प्रदर्शित केलेले कुट्टिमचित्र

[चित्राचे श्रेय]

Kindra Clineff/Index Stock Photography

[२४ पानांवरील चित्रे]

बार्सिलोनामध्ये अँटोनी गाउडी यांनी रचलेली कुट्टिमचित्रे (१८५२-१९२६)

[चित्राचे श्रेय]

फोटो: Por cortesía de la Fundació Caixa Catalunya