व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या मुलाला ताप येतो तेव्हा

तुमच्या मुलाला ताप येतो तेव्हा

तुमच्या मुलाला ताप येतो तेव्हा

“मला बरं वाटत नाहीए!”असे तुमचे मूल तुम्हाला म्हणते तेव्हा तुम्ही लगेच त्याचे अंग गरम आहे की काय हे पाहता. अंगात ताप असेल तर साहजिकच तुम्हाला काळजी वाटू लागते.

अमेरिकेतील मेरीलँड, बाल्टीमोर येथील जॉन्स हॉपकिन्स बालकेंद्राने केलेल्या एका अभ्यासानुसार, ९१ टक्के पालकांचा असा विश्‍वास होता की, “साधारण तापामुळेसुद्धा निदान एक तरी हानीकारक परिणाम होऊ शकतो, जसे की झटके येऊ शकतात किंवा मेंदूला इजा पोहंचू शकते.” याच अभ्यासात पुढे असेही दाखवण्यात आले, की “८९ टक्के पालकांनी, आपल्या मुलांचा ताप १०२ डिग्री फॅरनहाईट (३८.९°सें.) इतका वाढण्याआधी, त्यांना ताप कमी करणारी औषधे दिली.”

पण मुलाला ताप येतो तेव्हा तुम्ही नेमके काय केले पाहिजे? ताप कमी करण्याचे सर्वात उत्तम मार्ग कोणते आहेत?

तापाची महत्त्वपूर्ण भूमिका

ताप कशामुळे येतो? शरीराचे तापमान प्राकृतावस्थेत ९८.६ डिग्री फॅरनहाईट (थर्मोमीटर तोंडात किंवा बगलेत ठेवून घेतलेले तापमान) इतके असते तरीपण, संपूर्ण दिवसात तापमानात एक ते दोन अंशाचा फरक नेहमीच पडतो. * त्यामुळे सकाळच्या वेळी ते कमी असते तर संध्याकाळच्या वेळी सर्वोच्च असते. एका तापनियंत्रकाप्रमाणे शरीराच्या तापमानाचे नियंत्रण मस्तिष्काच्या तळाशी असलेल्या अधोथॅलॅमसाच्या केंद्राकडून होत असते. जंतू किंवा विषाणूंचे आक्रमण होऊन रोगप्रतिकारकक्षमता रक्‍तामध्ये तापजनक पदार्थ तयार करते तेव्हा ताप येतो. यामुळे अधोथॅलॅमस उष्णता वाढवते.

तापामुळे अस्वस्थता किंवा निर्जलीकरण होते हे कबूल आहे परंतु त्याचा असा अर्थ होत नाही की ते खूपच गंभीर व हानीकारक आहे. उलट, ताप शरीरातील जंतू व विषाणूंचे संसर्ग बाहेर टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे मेओ फाउन्डेशन फॉर मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्चने म्हटले. “सर्दी आणि इतर श्‍वसन संसर्ग ज्या विषाणुंमुळे होतात त्या विषाणूंना कमी तापमान आवडते. तुमचे शरीर, तापमानात जराशी वाढ करून खरे तर विषाणूंचा नाश करण्यात हातभार लावत असते.” त्यामुळे, याच संशोधन केंद्राने पुढे म्हटले, की “बारीक ताप येतो तेव्हा तो कमी करण्याची गरज नाही; असे केल्यास तुमच्या मुलाच्या शरीराच्या नैसर्गिकरीत्या बरे होण्याच्या क्रियेत बाधा येते.” मेक्सिकोतील एका इस्पितळात, रुग्णाच्या शरीराचे तापमान वाढवून विशिष्ट आजारांवर उपचार केले जातात; या उपचाराला हायपरथर्मिया म्हणतात.

अमेरिकन कॉलेज ऑफ इमर्जन्सी फिजिशियन्सच्या डॉ. अल सकेटीने म्हटले: “तापामुळे सहसा काही समस्या उद्‌भवत नाही. परंतु ताप येणे, हे कदाचित शरीरात कशाचा तरी संसर्ग झाल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे, एखाद्या मुलाला ताप येतो तेव्हा, तापमानाकडे नव्हे तर मुलावर आणि संभाव्य संसर्गावर उपचार करा.” दि अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्स म्हणते: “१०१ डिग्री फॅरेनहाईटपेक्षा (३८.३ डिग्री से.) कमी असलेल्या तापावर सहसा—तुमच्या मुलाला अस्वस्थ वाटत नसेल किंवा तापासोबत झटके येण्याची प्रवृत्ती नसेल तर—त्याला औषध द्यावे लागत नाही. तुमच्या मुलाला पूर्वी कधी झटके येत नसल्यास अथवा एखादा दीर्घकाळचा आजार नसल्यास, जास्त तापसुद्धा सहसा घातक नसतो. तुमचे मूल कसे वागत आहे याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे. ते जर व्यवस्थित खात-पीत असेल, अधूनमधून खेळत असेल तर कदाचित त्याला कोणत्याही उपचाराची आवश्‍यकता नाही.”

सौम्य ताप येतो तेव्हा

याचा अर्थ असा नाही, की तुम्ही तुमच्या मुलासाठी काहीच करू शकत नाही. काही वैद्यकीय तज्ज्ञ सौम्य तापावर पुढील प्रमाणे उपचार सांगतात: तुमचे मूल ज्या खोलीत आहे त्या खोलीचे तापमान मानवेल इतके थंड ठेवा. मुलाला हलके कपडे घाला. (लोकरीच्या गरम कपड्यांमुळे ताप वाढू शकतो.) मुलाला, जादा द्रव्ये द्या, जसे की पाणी, फळांचा सौम्य रस, सूप; कारण, तापामुळे शरीरातील जल बाहेर पडते. * (कॅफेन असलेली पेये जसे की कोला किंवा काळा चहा मूत्रवर्धक असल्यामुळे शरीरातील आहे तितकेही जल कदाचित बाहेर पडेल.) नवजात अर्भकांना तापातही अंगावरचे दूध पाजले पाहिजे. जड अन्‍न टाळा; कारण तापामुळे पचनक्रिया मंदावते.

मुलाचा ताप जेव्हा १०२ डिग्री फॅरेनहाईटपेक्षा अधिक वाढतो तेव्हा सहसा ताप कमी करणारी औषधांच्या दुकानात मिळणारी औषधे जसे की ॲसीटॅमिनोफेन अथवा पॅरासिटामोल किंवा आयबुब्रुफेन दिली जातात. परंतु औषधांच्या पाकीटावरील औषधांच्या प्रमाणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. (दोन वर्षांखालील मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतेही औषधे देण्यात येऊ नये.) ताप कमी करणारी औषधे प्रतिविषाणू नसतात. त्यामुळे, ही औषधे घेतल्यावर एखाद्या मुलास सर्दी झाली असेल किंवा त्यासारखा आणखी दुसरा त्रास होत असेल तर तो नाहीसा होत नाही तर फक्‍त ताप कमी झाल्यामुळे अस्वस्थता कमी होते. काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की ताप कमी करण्यासाठी, १६ वर्षांखालील मुलांना ॲस्प्रीन देऊ नये कारण त्यामुळे रेझ सिंड्रोम—संभाव्य जीव-घेणा आजार—होण्याची शक्यता आहे. *

गार पाण्याने अंग पुसल्याने देखील ताप कमी करता येतो. मुलाला एक किंवा दोन इंच कोमट पाणी असलेल्या टबमध्ये बसवून मग त्याचे अंग गार पाण्याने पुसण्याद्वारे ताप कमी करता येतो. (चोळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या अल्कोहॉलचा उपयोग करू नका, ते विषारी ठरू शकते.)

डॉक्टरकडे केव्हा जायचे यासंबंधाने, सोबतच्या पेटीमध्ये काही उपयोगी माहिती दिली आहे. डेंग्यू, इबोला व्हायरस, विषमज्वर किंवा पीतज्वर यांसारख्या घातक ज्वरांची ज्या भागात साथ चालली आहे अशा भागांमध्ये राहणाऱ्‍यांनी खासकरून वैद्यकीय काळजी घेण्याची गरज आहे.

प्रामुख्याने, तुमच्या मुलाला होता होईल तितके आरामदायक ठेवा. मज्जातंतुवर परिणाम होईल किंवा मृत्यू संभावेल इतका उच्च ताप फार क्वचित येतो, हे लक्षात ठेवा. तापामुळे येणारे झटके, भयावह असले तरीसुद्धा या झटक्यांमुळे कायमचे व्यंगत्व येत नाही.

अर्थात, संसर्ग टाळणेच सर्वात उत्तम औषध आहे; आणि तुमच्या मुलाला संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचा एक सर्वात प्रभावशाली मार्ग म्हणजे त्याला किंवा तिला स्वच्छतेचे मूलभूत नियम शिकवणे. वेळोवेळी आपले हात धुण्यास मुलांना शिकवले पाहिजे—खासकरून, जेवणाआधी, लघवीला किंवा शौचालयास जाऊन आल्यानंतर, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यानंतर किंवा पाळीव प्राण्यांबरोबर खेळल्यानंतर. हे सर्व करूनही तुमच्या मुलाला बारीक ताप आलाच तर घाबरू नका. आपण शिकल्याप्रमाणे, तुमच्या मुलाला बरे होण्याकरता तुम्ही पुष्कळ काही करू शकता. (g०३ १२/०८)

[तळटीपा]

^ तापमान कोठे घेतले आहे आणि कोणत्या प्रकारचे थर्मोमीटर वापरले आहे त्यानुसार तापमानात फरक होऊ शकतो.

^ तापाबरोबर अतिसार किंवा उलट्या होत असतील तर जीवनरक्षक पेय कसे तयार करायचे त्यासंबंधाने सावध राहा!, एप्रिल ८, १९९५, (इंग्रजी) पृष्ठ ११ पाहा.

^ रेझ सिंड्रोम तीव्र मज्जातंतुचा आजार आहे जो मुलांना व्हायरल इन्फेक्शननंतर होऊ शकतो.

[३१ पानांवरील चौकट]

तुमच्या ताप आलेल्या मुलाला डॉक्टरांकडे न्या जर . . .

◼ ते तीन महिन्यांचे किंवा त्याहूनही कमी आहे व त्याला १००.४ डिग्री फॅरेनहाईट किंवा याहूनही जास्त ताप आहे

◼ ते तीन ते सहा महिन्यांचे आहे व त्याला १०१ डिग्री फॅरेनहाईट किंवा त्याहूनही अधिक ताप आहे

◼ सहा महिन्यांपेक्षा जास्त आहे व त्याला १०४ डिग्री फॅरेनहाईट किंवा त्याहूनही अधिक ताप आहे

◼ ते पेये घेत नाही व त्याच्यात निर्जलीकरणाची लक्षणे दिसत आहेत

◼ त्याला झटका आला आहे किंवा ते खूपच गळून गेले आहे

◼ ७२ तासांनंतरही त्याला ताप आहे

◼ ते सतत रडत आहे किंवा त्याच्यात अस्वस्थता, वात, बडबड यांसारखी लक्षणे दिसत आहेत

◼ त्याच्या अंगावर पुरळ उठली आहे, श्‍वास घ्यायला त्याला त्रास होत आहे, त्याला अतिसार किंवा सतत उलट्या होत आहेत

◼ त्याची मान आखडली आहे किंवा अचानक त्याचे डोके दुखू लागले आहे

[चित्राचे श्रेय]

मूळ: द अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिआट्रिक्स