नातेवाईकांचा आपल्यासारखाच विश्वास नसतो तेव्हा
बायबलचा दृष्टिकोन
नातेवाईकांचा आपल्यासारखाच विश्वास नसतो तेव्हा
एका अंदाजानुसार जगात १०,००० हून अधिक धर्म आणि पंथ आहेत. एका देशाच्या लोकसंख्येतील १६ टक्के प्रौढांनी आपल्या जीवनात कधीतरी धर्म बदलला आहे. म्हणूनच, नातेवाईक आणि मित्रांमध्ये धार्मिक विश्वासांच्या बाबतीत मतभेद असतात. काही वेळा यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होतात. अशाने प्रश्न निर्माण होतो की, आपल्यासारखाच विश्वास नसलेल्या नातेवाईकांशी ख्रिश्चनांनी कसा व्यवहार करावा?
खास नाते
उदाहरणार्थ, पालक आणि मुलांमधील खास नातेसंबंधाबद्दल बायबल काय म्हणते ते पाहा. “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख” या निर्गम २०:१२ मधील आज्ञेत वेळेची मर्यादा स्पष्ट केलेली नाही. उलट, मत्तय १५:४-६ नुसार, या आज्ञेविषयी येशू चर्चा करत होता तेव्हा प्रौढ मुलांनी पालकांना आदर देण्याविषयी तो बोलत होता हे स्पष्ट होते.
नीतिसूत्रे २३:२२ येथे असा सल्ला दिला आहे की, “आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको.” नीतिसूत्रे १९:२६ येथे हा स्पष्ट इशारा दिला आहे की, “जो आपल्या बापाशी दंडेली करितो व आपल्या आईला हाकून लावितो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय.”
नीतिसूत्रे या बायबलमधील पुस्तकात आपल्या पालकांचा अनादर करू नये अशी ताकीद देण्यात आली आहे.तर शास्त्रवचनांतून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, आपल्या पालकांशी आपण हलगर्जीपणाने वागू नये. आपले पालक आपला धर्म स्वीकारत नाहीत म्हणून त्यांचे आपल्याशी नाते तुटत नाही. हीच बायबलची तत्त्वे इतर नातेवाईकांच्या आणि विवाहसोबत्याच्या संबंधाने लागू होतात. यावरून दिसून येते की, आपल्या नातेवाईकांवर प्रेम करणे हे ख्रिश्चनांचे नैतिक आणि शास्त्रवचनीय कर्तव्य आहे.
माफक असणे अत्यावश्यक
अर्थात, बायबलमध्ये वाईट संगतीविषयी इशारा दिला आहे, आणि याचा प्रभाव जवळच्या नातेवाईकांकडूनच होऊ शकतो. (१ करिंथकर १५:३३) गतकाळातील देवाच्या अनेक विश्वासू सेवकांचे आईवडील त्यांच्या विरोधात होते तरीही ते स्वतः सत्याच्या बाजूने स्थिर राहिले. कोरहच्या पुत्रांच्या बाबतीत हे खरे असल्याचे दिसून येते. (गणना १६:३२, ३३; २६:१०, ११) खऱ्या ख्रिश्चनांनी इतरांना—आपल्या नातेवाईकांना देखील—खूष करण्यासाठी आपल्या विश्वासाशी हातमिळवणी करू नये.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
काही परिस्थितींमध्ये, पालक किंवा इतर प्रिय जन एखाद्या ख्रिश्चनाच्या विश्वासामुळे त्याचा कडाडून विरोध करतील. काही तर खऱ्या ख्रिस्ती धर्माच्याच विरोधात होतील. अशा वेळी, आपण आध्यात्मिकरित्या खचू नये म्हणून काही ख्रिस्ती माफक पावले उचलतील. येशूने असे अगदी योग्यपणे म्हटले: “मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही.”—मत्तय १०:३६, ३७.
परंतु, बहुतेक वेळा, ख्रिश्चनांना आपल्या नातेवाईकांकडून इतका तीव्र विरोध होत नाही. त्यांचे नातेवाईक फक्त बायबलच्या शिकवणुकींच्या बाबतीत सारखीच समज बाळगत नाहीत. पवित्र शास्त्रवचने, ख्रिस्ताच्या अनुयायांना विश्वासात नसलेल्यांशी “सौम्यतेने” आणि “भीडस्तपणाने” वागायला उत्तेजन देतात. (२ तीमथ्य २:२५; १ पेत्र ३:१५) बायबलमध्ये उचितपणे हा सल्ला दिला आहे: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य” असावे. (२ तीमथ्य २:२४) प्रेषित पौलानेही, “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे” असा सल्ला ख्रिश्चनांना दिला.—तीत ३:२.
संपर्क ठेवा आणि प्रेम व्यक्त करा
ख्रिश्चनांना १ पेत्र २:१२ मध्ये पुढील उत्तेजन देण्यात आले आहे: “परराष्ट्रीयांत [विश्वास नसलेल्यांमध्ये] आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, . . . त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून . . . देवाचे गौरव करावे.” बायबलमुळे आपल्या जीवनात कोणते बदल झाले आहेत ते सहसा विश्वास न मानणारे आपले नातेवाईक पाहतात. हे लक्षात असू द्या की, एकेकाळी आस्था न दाखवणाऱ्या किंवा बायबल सत्याचा विरोध करणाऱ्या लोकांनीही आपले मन बदलले आहे. एखाद्या व्यक्तीने अनेक वर्षे आपल्या विवाहसोबत्याचे किंवा आपल्या मुलाचे अथवा मुलीचे चांगले वर्तन पाहिले असेल आणि मग त्यांच्या अशा वागण्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. एखाद्या ख्रिश्चनाने आपल्या नातेवाईकाची काळजी न घेतल्यामुळे नातेवाईकाने बायबल सत्ये स्वाकारली नाहीत असे व्हायला नको.
मान्य आहे की, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि काही ख्रिस्ती साक्षीदार आपल्या पालकांपासून दूर राहतात. त्यामुळे इच्छा असतानाही नेहमी नेहमी त्यांना भेट देणे जमण्यासारखे नसेल. पण पत्र लिहून, टेलिफोन करून किंवा इतर मार्गांनी त्यांच्यासोबत नियमितपणे संपर्क ठेवून आपल्या नातेवाईकांबद्दल आपल्याला प्रेम आहे याची खात्री त्यांना मिळेल. खरे ख्रिस्ती नसलेले पुष्कळ लोक, आपल्या पालकांचा आणि इतर नातेवाईकांचा धर्म कोणताही असला तरी त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांच्याशी नियमितरित्या संपर्क ठेवतात. मग ख्रिस्ती साक्षीदारांनी निदान एवढे तरी करणे योग्य नव्हे काय? (g०३ ११/०८)
[२० पानांवरील चित्र]
आपल्या नातेवाईकांशी संपर्क ठेवल्याने तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता याची खात्री त्यांना मिळेल