व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मधुमेह “चोरपावलांनी येऊन घात करणारा”

मधुमेह “चोरपावलांनी येऊन घात करणारा”

मधुमेह “चोरपावलांनी येऊन घात करणारा”

एकवीस वर्षांचा असताना केन नावाच्या एका तरुणाला सतत, भयंकर तहान लागण्याचा विचित्र प्रकार सुरू झाला. त्याला वारंवार लघवीलाही जावे लागायचे—कालांतराने, दर वीस मिनिटांनी एकदा. मग केनला पायात जडपणा जाणवू लागला. तो सतत थकलेला असायचा आणि त्याची दृष्टी देखील अस्पष्ट होऊ लागली.

एकदा त्याला एका विषाणूचा संसर्ग झाला, तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. डॉक्टरकडे गेल्यावर कळले की त्याला केवळ फ्लू झाला नव्हता—तर डायबिटीस मेलिटस, टाइप १, थोडक्यात डायबिटीस अर्थात मधुमेह झाला होता. ही एक रासायनिक विकृती असून हा रोग झालेल्या व्यक्‍तीचे शरीर विशिष्ट पोषक तत्त्वांचा, खासकरून ग्लूकोजचा वापर करण्यास असमर्थ ठरते. केनला सहा आठवडे इस्पितळात राहावे लागले, तेव्हा कोठे त्याच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण सामान्य झाले.

हे ५० वर्षांआधी घडले होते. मागच्या ५० वर्षांत मधुमेहाच्या उपचारपद्धतीत बऱ्‍याच सुधारणा झाल्या आहेत. पण केन आजही मधुमेही आहे आणि तो एकटा नाही. सबंध जगात अंदाजे १४ कोटींपेक्षा जास्त मधुमेही आहेत आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ही संख्या २०२५ सालापर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. साहजिकच, तज्ज्ञांकरता हा एक काळजीचा विषय बनला आहे. अमेरिकेतील एका उपचार केंद्राचे सहसंचालक डॉ. रॉबिन एस. गोलंड म्हणतात, “आमच्या अंदाजांवरून असे दिसू लागले आहे की हा रोग एका साथीचे स्वरूप घेणार आहे.”

हे संक्षिप्त जागतिक रिपोट्‌र्स पाहा.

ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थेने दिलेल्या माहितीनुसार “मधुमेह हा २१ व्या शतकातील सर्वात गंभीर आरोग्याचा प्रश्‍न आहे.”

भारत: कमीतकमी तीन कोटी लोकांना मधुमेहाचा विकार जडलेला आहे. एका डॉक्टरने म्हटले: “जवळजवळ १५ वर्षांपूर्वी ४० वर्षांखालचा मधुमेहाचा रुग्ण क्वचितच आढळायचा. आज मात्र दर दुसरा रुग्ण या वयोगटातला आहे.”

सिंगापूर: जनसंख्येतील ३० ते ६९ वयोगटापैकी एक तृतीयांश जणांना मधुमेह जडला आहे. बऱ्‍याच मुलांना देखील हा रोग असल्याचे आढळले आहे; यांपैकी काहीतर फक्‍त दहा वर्षांची आहेत.

संयुक्‍त संस्थाने: जवळजवळ १.६ कोटी लोकांना मधुमेह आहे आणि दर वर्षी ८,००,००० नवीन केसेसचा शोध लागत आहे. लाखो जणांना हा रोग आहे पण अद्याप त्यांना त्याची चाहूल लागलेली नाही.

रोगाचे निदान होण्यापूर्वी बऱ्‍याच काळापासून रोग्याला मधुमेह असण्याची शक्यता असल्यामुळे या रोगावरील उपचार अधिकच कठीण होऊन बसतो. एशियावीक नियतकालिकानुसार, “सुरवातीची लक्षणे सौम्य असल्यामुळे मधुमेह झाला असल्याचे लवकर लक्षात येत नाही.” म्हणूनच मधुमेहाला चोरपावलांनी येऊन घात करणारा रोग म्हणण्यात आले आहे.

या आजाराचे प्रचलन आणि तीव्रता लक्षात घेऊन पुढील लेखांत खालील प्रश्‍नांवर चर्चा केली आहे:

•मधुमेह का व कसा होतो?

•ज्यांना तो झाला आहे ते त्याला कसा आटोक्यात ठेवू शकतात? (g०३ ५/०८)

[४ पानांवरील चौकट/चित्र]

नावाचा अर्थ

मधुमेहाचे शास्त्रीय नाव “डायबिटीस मेलिटस,” हे “नलिकेवाटे उत्सर्जन” या अर्थाचा एक ग्रीक शब्द व “मधासारखे गोड” या अर्थाचा एक लॅटिन शब्द यांपासून बनले आहे. हे शब्द या आजाराचे अचूक वर्णन करतात कारण मधुमेह झालेल्या व्यक्‍तीने तोंडातून घेतलेले पाणी मूत्रमार्गावाटे सरळ शरीराबाहेर टाकले जाते. शिवाय, या व्यक्‍तीची लघवी त्यातील साखरेमुळे गोड असते. किंबहुना, आधुनिक तंत्रांचा शोध लागण्यापूर्वी मधुमेहाची चाचणी करण्याकरता रुग्णाची लघवी मुंग्यांच्या वारुळाजवळ ओतली जायची. मुंग्या लागल्या तर त्यात साखरेचे प्रमाण आहे असे समजले जायचे.