व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझ्या भावंडाच्या सावलीतून मी कशी मुक्‍त होऊ शकते?

माझ्या भावंडाच्या सावलीतून मी कशी मुक्‍त होऊ शकते?

तरुण लोक विचारतात . . .

माझ्या भावंडाच्या सावलीतून मी कशी मुक्‍त होऊ शकते?

मला एक वेगळी व्यक्‍ती बनायचं होतं, पण नेहमी मला माझ्या बहिणींप्रमाणेच वागावं लागायचं. आणि माझ्या बहिणींसारखं मी कधीच काही साध्य करू शकणार नाही असं मला वाटायचं.”—क्लॅर.

तुमचा भाऊ किंवा बहीण प्रत्येक गोष्टीत यशस्वी ठरते का? आणि तुम्ही देखील त्या भावासारखे किंवा बहिणीसारखे असावे म्हणून तुमचे पालक सतत तुमच्या मागे लागलेले असतात का? असे असेल तर, आपल्या भावाच्या किंवा बहिणीच्या सावलीत असण्याची भीती तुम्हाला असेल अर्थात त्याने किंवा तिने केलेल्या गोष्टींची तुमच्याशी तुलना करून तुमचे मोल ठरवले जाईल.

बॅरीचे * दोन्ही थोरले भाऊ, सुविख्यात सेवा सेवक प्रशिक्षण शाळेतून * पदवीधर झाले आहेत आणि ख्रिस्ती म्हणून त्यांनी उत्तम नाव कमावले आहे. बॅरी कबूल करतो: “मी प्रचारकार्यात किंवा लोकांसमोर बोलताना त्यांच्यासारखा प्रभावी नव्हतो म्हणून माझा आत्म-विश्‍वास खचला. मला स्वतःचे मित्र बनवता आले नाहीत कारण आम्हाला कोणी बोलवायचे तेव्हा मी फक्‍त त्यांच्या मागे मागे जायचो. आणि माझ्या भावांमुळेच लोक माझ्याशी दोस्ती करतात असं मला वाटायचं.”

तुमच्या भावाची किंवा बहिणीचीच सारखी तारीफ केली जात असेल तर ईर्ष्या वाटणे साहजिक आहे. बायबल काळात, तरुण योसेफ आपल्या भावांपेक्षा एकदम वेगळा होता. याचा त्याच्या भावंडांवर काय परिणाम झाला? “ते त्याचा द्वेष करू लागले, व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले.” (उत्पत्ति ३७:१-४) योसेफ नम्र होता पण कदाचित तुमचा भाऊ किंवा बहीण वारंवार त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण करून तुम्हाला चिडवेल किंवा राग येईल असे करेल.

यामुळे काही तरुण बंडखोर होतात—अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, ख्रिस्ती कार्यहालचालींमध्ये मागे पडतात किंवा धक्केदायक वाटेल असे वागतात. ते असा विचार करतील की, आपल्याला आपल्या भावासारखे किंवा बहिणीसारखे वागताच येत नसेल तर प्रयत्न करून काय उपयोग? पण, बंड केल्याने तुमचे नुकसानच होईल. स्वतःचा आत्मविश्‍वास न गमावता तुम्ही आपल्या भावंडाच्या सावलीतून कसे मुक्‍त होऊ शकता?

त्यांच्याविषयी योग्य दृष्टिकोन बाळगा

आपल्या भावाची किंवा बहिणीची किती प्रशंसा होते हे पाहून तुम्ही कदाचित असा विचार करू लागाल की, त्यांच्यात काहीच खोट नाही आणि तुम्ही त्यांच्यासारखे कधीच बनू शकत नाही. पण हे खरे आहे का? बायबल स्पष्टपणे सांगते की, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.”—रोमकर ३:२३.

होय, आपली भावंडे कितीही हुशार किंवा वाकबगार असली तरी तीही आपल्यासारखीच “दोष असलेली माणसे आहेत.” (प्रेषितांची कृत्ये १४:१५, NW) त्यांचा उदो उदो करण्याची किंवा त्यांना देव मानण्याची गरज नाही. मानवांमध्ये केवळ येशू ख्रिस्ताने एक परिपूर्ण उदाहरण मांडले.—१ पेत्र २:२१.

त्यांच्यापासून शिका!

आणखी एक गोष्ट म्हणजे, स्वतःच्या परिस्थितीतून काही शिकण्याचा प्रयत्न करा. येशू ख्रिस्ताच्या बहीण-भावांचेच उदाहरण घ्या. (मत्तय १३:५५, ५६) आपल्या परिपूर्ण भावापासून ते किती काही शिकू शकत होते याचा विचार करा! पण त्याचे ‘भाऊ त्याच्यावर विश्‍वास ठेवत नव्हते.’ (योहान ७:५) कदाचित अभिमान आणि ईर्ष्या त्यांच्या विश्‍वासाच्या आड आली. पण येशूच्या आध्यात्मिक भावांनी अर्थात त्याच्या शिष्यांनी, “माझ्यापासून शिका” हे त्याचे आमंत्रण स्वीकारले. (मत्तय ११:२९) येशूचे पुनरुत्थान झाल्यावरच त्याचे सख्खे भाऊ त्याची कदर करू लागले. (प्रेषितांची कृत्ये १:१४) तोपर्यंत, आपल्या भावाकडून शिकण्याच्या अनेक सुवर्ण संधी त्यांनी दवडल्या.

काईनानेसुद्धा अशीच चूक केली. त्याचा भाऊ, हाबेल हा देवाचा एक उत्तम सेवक होता. बायबल म्हणते की, “परमेश्‍वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला.” (उत्पत्ति ४:४) परंतु काही कारणास्तव परमेश्‍वराने “काईन व त्याचे अर्पण यांचा . . . आदर केला नाही.” काईनाला नम्रता दाखवून आपल्या भावाकडून काही शिकून घेता आले असते. त्याऐवजी, “काईन संतापला” आणि शेवटी त्याने हाबेलचा खून केला.—उत्पत्ति ४:५-८.

याचा अर्थ तुम्हीसुद्धा आपल्या भावावर किंवा बहिणीवर इतके चिडाल असे नाही. पण अभिमान आणि ईर्ष्येपायी तुम्ही अनेक मोलाच्या संधी गमावून बसू शकता. तुमच्या भावाचे किंवा बहिणीचे गणित किंवा इतिहास एकदम पक्के असेल, तुमच्या आवडीचा खेळ त्याला किंवा तिला छान खेळता येत असेल, शास्त्रवचनांविषयी त्याचे किंवा तिचे ज्ञान अधिक असेल किंवा तो अथवा ती वक्‍तव्य करण्यात उत्तम असेल तर ईर्ष्या टाळा! लक्षात ठेवा, “मत्सराने हाडे कुजतात” आणि यामुळे तुमचेच नुकसान होईल. (नीतिसूत्रे १४:३०; २७:४) चिडण्याऐवजी आपल्या भावापासून किंवा बहिणीपासून शिकण्याचा प्रयत्न करा. त्याच्याजवळ किंवा तिच्याजवळ अशा क्षमता किंवा कुशलता आहेत ज्या तुमच्याजवळ नाहीत हे मान्य करा. तुमचा भाऊ किंवा बहीण एखादी गोष्ट कशी करते ते पाहा—किंवा त्यांच्याकडे मदत मागणे याहून उत्तम आहे.

आधी उल्लेखिलेल्या बॅरीला कालांतराने त्याच्या भावांच्या उत्तम उदाहरणाचा लाभ झाला. तो म्हणतो, “माझे भाऊ मंडळीत आणि प्रचार कार्यात लोकांना मदत करायला तयार होते म्हणून ते किती आनंदी होते हे मी पाहिलं. म्हणून मीसुद्धा माझ्या भावांचं अनुकरण करायचं ठरवलं आणि मी राज्य सभागृह व बेथेल बांधकाम कार्यात सामील झालो. मला मिळालेल्या अनुभवाने माझा आत्मविश्‍वास वाढला आहे आणि यहोवासोबतचा माझा नातेसंबंध देखील अधिक गहिरा झाला आहे.”

आपल्या अंगी असलेले गुण शोधणे

कदाचित तुम्हाला अशी भीती वाटत असेल की, आपल्या भावाच्या किंवा बहिणीच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करता करता तुमची अस्मिता नाहीशी होईल. पण तसे घडण्याची गरज नाही. प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना असे उत्तेजन दिले: “माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ४:१६) याचा अर्थ, त्यांची वेगळी अशी अस्मिता नसावी असे पौलाला वाटत होते का? मुळीच नाही. विविधतेसाठी पुष्कळ वाव आहे. आणि तुम्ही आपल्या भावासारखे किंवा बहिणीसारखे गणितात पक्के नाही याचा अर्थ तुमच्यात खोट आहे असे नाही. तर तुम्ही वेगळे आहात असा याचा अर्थ होतो.

पौल पुढील व्यावहारिक सल्ला देतो: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” (गलतीकर ६:४) तुमच्याजवळ असलेली वेगळी कुशलता आणि क्षमता वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. एखादी नवी भाषा बोलायला, वाद्य वाजवायला किंवा कम्प्युटर वापरायला शिकल्याने तुम्हाला स्वतःविषयी बरे वाटेल आणि बहुमोल अशी कौशल्ये देखील तुम्हाला प्राप्त होतील. सर्व काही एकदम चोख झाले पाहिजे अशी चिंता करू नका! पण, हाती घेतलेले काम पूर्ण करायला व इमानदार आणि कार्यक्षम असायला शिका. (नीतिसूत्रे २२:२९) कदाचित एखाद्या कामाचे कौशल्य मुळातच तुमच्या अंगी नसेल, पण “उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो,” असे नीतिसूत्रे १२:२४ म्हणते.—तिरपे वळण आमचे.

परंतु, तुम्ही विशेषतः आध्यात्मिक प्रगती करण्यावर भर दिला पाहिजे. आध्यात्मिक कुशलता इतर कोणत्याही उल्लेखनीय कौशल्यांपेक्षा अधिक टिकणारी असते. एसाव आणि याकोब या जुळ्या भावांचे उदाहरण घ्या. एसाव “रानात फिरणारा हुशार पारधी” होता म्हणून त्याचे वडील त्याचे फार कौतुक करत. त्याचा भाऊ याकोब याच्याकडे कदाचित सुरवातीला दुर्लक्ष झाले असावे कारण तो “साधा मनुष्य असून तंबूंत राहत असे.” (उत्पत्ति २५:२७) एसावने आध्यात्मिक प्रगती केली नाही आणि यामुळे त्याला आशीर्वाद मिळाले नाहीत. याकोबाने आध्यात्मिक गोष्टींबद्दल आवड निर्माण केली आणि म्हणून यहोवाने त्याला उदंड आशीर्वाद दिला. (उत्पत्ति २७:२८, २९; इब्री लोकांस १२:१६, १७) यातून काय शिकायला मिळते? आध्यात्मिकतेत प्रगती करा, ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या,’ आणि तुमची “प्रगती सर्वांस दिसून” येईल.—मत्तय ५:१६; १ तीमथ्य ४:१५.

सुरवातीला जिच्याविषयी सांगितले होते ती क्लॅर म्हणते: “मी माझ्या थोरल्या बहिणींच्याच सतत मागे राहायचे. पण मग मी शास्त्रवचनांतला सल्ला पाळून लोकांना प्रेम दाखवण्याच्या बाबतीत ‘विशाल’ होण्याचं ठरवलं. क्षेत्र सेवेत मी मंडळीतल्या वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलं आणि मंडळीतल्या गरजवंत लोकांना मदत करण्याचे व्यावहारिक मार्ग पाहू लागले. मी वेगवेगळ्या वयोगटातल्या बंधू-बहिणींना घरी बोलावून त्यांच्यासाठी स्वयंपाक देखील करू लागले. आता माझी मैत्री पुष्कळ लोकांशी आहे आणि माझा आत्मविश्‍वास खूप वाढला आहे.”—२ करिंथकर ६:१३.

तुमचे पालक कदाचित वेळोवेळी चुकून तुम्हाला तुमच्या भावासारखे किंवा बहिणीसारखे व्हायला सांगतील. पण पालकांना तुमची चिंता वाटते हे तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचा राग काही प्रमाणात कमी होईल. (नीतिसूत्रे १९:११) पण, अशी तुलना केल्याने तुम्हाला किती वाईट वाटते हे तुम्ही आदरपूर्वक पद्धतीने आपल्या पालकांना सांगितले तर बरे होईल. मग कदाचित ते वेगळ्या पद्धतीने आपली चिंता व्यक्‍त करतील.

तुम्ही यहोवा देवाची सेवा केली तर तो स्वतः तुमची दखल घेईल हे कधीच विसरू नका. (१ करिंथकर ८:३) बॅरी शेवटी म्हणतो: “मी यहोवाची जितकी अधिक सेवा करीन तितका आनंद मला मिळतो हे मी अनुभवलं आहे. आज लोक माझ्याकडे एक वेगळी व्यक्‍ती म्हणून पाहतात आणि माझ्या भावांसारखंच ते माझंही कौतुक करतात.” (g०३ ११/२२)

[तळटीपा]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ यहोवाच्या साक्षीदारांनी स्थापन केलेली.

[१३ पानांवरील चित्र]

तुमच्या भावाकडे किंवा बहिणीकडेच नेहमी लक्ष दिलं जातं का?

[१४ पानांवरील चित्र]

तुमच्या अंगी कोणती कौशल्ये आणि आवडी-निवडी आहेत ते शोधा

[१४ पानांवरील चित्र]

आपली आध्यात्मिक कौशल्ये वाढवून “तुमचा प्रकाश लोकांसमोर . . . पडू द्या”