व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समुद्रात आपत्ती जमिनीवर दुर्घटना

समुद्रात आपत्ती जमिनीवर दुर्घटना

समुद्रात आपत्ती जमिनीवर दुर्घटना

स्पेनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाद्वारे

नोव्हेंबर १३, २००२ रोजी एका परिस्थितीकी आणि आर्थिक आपत्तीची सुरवात झाली; उसळत्या समुद्रात असलेले प्रेस्टीज हे तेल-वाहू जहाज गळू लागले. या गळत्या जहाजाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न फसले आणि सहा दिवसांनंतर—ज्या दरम्यान सुमारे २०,००० टन तेल गळाले होते—या जहाजाचे दोन तुकडे झाले आणि ते स्पेनच्या किनारपट्टीपासून सुमारे २०० किलोमीटरवर बुडाले.

बुडालेल्या जहाजात ५०,००० टनांहून अधिक तेल होते आणि त्याच्या सांगाड्यातून प्रती दिवशी १२५ टन तेल गळत राहिले. पाण्यावर तेल तंरगू लागले आणि ते किनारपट्टीवर येत राहिले. या जड इंधन तेलाच्या चिकटपणामुळे आणि विषारीपणामुळे वातावरणाला अत्यंत जबर धक्का बसला.

समुद्रकिनाऱ्‍यांवरील ही घाण काढून टाकण्यासाठी आलेल्या स्वयंसेवकांपैकी कित्येक जणांना त्यातून निघणाऱ्‍या उग्र वायुची बाधा झाली. शिवाय, तेलाचा जाडसर चिकट थर काळ्या च्युइंग गमसारखा खडकांवर चिकटून राहिला. अपघाती जल-प्रदूषणाची नोंदणी, संशोधन आणि प्रयोग केंद्राचे संचालक मिशल गरेन यांनी खेदित होऊन म्हटले की, “इतिहासातील तेल गळतीच्या सर्वात भयंकर दुर्घटनांपैकी ही एक आहे.”

शूर प्रयत्न

शेकडो मच्छीमार कित्येक आठवडे या तेल गळतीला लढा देण्यासाठी समुद्रात जात राहिले कारण त्यांच्या उपजीविकेची पंचाईत झाली होती. तेलामुळे समुद्रकिनारे काळवंडण्याआधी व जगातील फलदायी मासेमारीच्या क्षेत्रांपैकी एक असलेला हा भाग नष्ट होण्याआधी मच्छीमारांनी तेल गोळा करण्याचे शूर कार्य केले. काही पुरुषांनी तर चक्क हातांनीच तेलाचे चिकट गोळे पाण्यातून उचलून काढले. “पाठ अक्षरशः मोडेपर्यंत आम्ही काम केलं, कारण आमच्यासारख्या लहान बोटींमधील लोकांना दुसरा पर्याय नव्हता,” असे आन्टोन्यो हा स्थानीय मच्छीमार म्हणतो.

एकीकडे, मच्छीमार समुद्रात जाऊन तेल गोळा करत होते तर दुसरीकडे संपूर्ण स्पनेमधील हजारो स्वयंसेवक समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या कामाला लागले. एका वापरानंतर फेकून द्यावयाचे पांढरे खास पोषाख घालून व मास्क लावून काम करणारे हे स्वयंसेवक जीवशास्त्रीय लढाईत भाग घेणाऱ्‍यांसारखे दिसत होते. पण, त्यांना बादल्यांमध्ये तेल गोळा करून देण्याचे कष्टमय काम करावे लागत होते. मच्छीमारांप्रमाणेच, काही स्वयंसेवकांनी समुद्रकिनाऱ्‍यांवरील तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी हातांचा उपयोग केला.

भयंकर परिणाम

ज्या किनारपट्टीचा पूर्ण नाश झाला होता त्या उत्तर गॅलिसियातील कोरक्यूबॉनचे नगराध्यक्ष, राफाएल म्युसो म्हणाले, “मी पहिल्यांदा मुकिया धक्क्यावरती आदळणाऱ्‍या काळ्या, तेलकट लाटा पाहिल्या तेव्हा मला इतकं दुःख झालं की, मी दुःखाने मरून जाईन असंच मला वाटलं. तेल सांडल्याने आमच्या नगरातील कितीतरी लोकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे.”

दुःखाची गोष्ट म्हणजे, लास एस्लास आटलानटिकास या स्पेनच्या सुंदर व नवीन राष्ट्रीय उद्यानावर सर्वात भयंकर परिणाम झाला. गॅलिसियाच्या किनारपट्टीपासून दूर व पूर्वी अति सुंदर असलेल्या या पाच द्वीपांवर सागरी पक्ष्यांच्या मोठ्या वसाहती होत्या. आजूबाजूचा सागरी प्रदेश खासकरून सागरी प्राण्यांनी विपुल होता.

डिसेंबरच्या सुरवातीपर्यंत उद्यानाची ९५ टक्के किनारपट्टी तेलाने दूषित झाली होती. पक्षी तज्ज्ञांनी अंदाज बांधला की, सुमारे १,००,००० पक्ष्यांवर याचा विपरीत परिणाम घडेल. सूर मारणाऱ्‍यांनी पाहिले की, घट्ट झालेल्या तेलाचे मोठे गोळे समुद्राच्या तळाशी आपटत होते आणि तेथील नाजूक परिस्थितीकीचा नाश करत होते.

जे होल्कम यांनी पक्ष्यांना वाचवण्याचे केंद्र उभारले होते; ते म्हणाले: “पक्षी पाण्यात बुडून किंवा हायपोथर्मियामुळे मरत होते. त्यांचे पंख तेलाने माखल्याने पाण्याचा प्रतिरोध करण्याची त्यांची कुवत नाहीशी होत होती. शिवाय, भिजलेल्या कपड्यांच्या ओझ्याने जसा एखादा पोहणारा मनुष्य पाण्याखाली खेचला जातो त्याचप्रमाणे जड तेलामुळे ते पाण्याखाली फरफटले जात होते. . . . अगदी मोजक्या पक्ष्यांना का होईना पण त्यांना वाचवल्याने जरा समाधान मिळते.”

“अपेक्षित अपघात”

जग ऊर्जेसाठी तेलावर अवलंबून आहे; पण खर्च वाचवण्यासाठी तेलाची वाहतूक अत्यंत घातक व खराब परिस्थितीतील जहाजांतून केली जाते. म्हणूनच, द न्यू यॉर्क टाईम्सने या प्रसंगाचे वर्णन “अपेक्षित अपघात” असे केले.

गेल्या २६ वर्षांमध्ये, गॅलिसियाच्या किनारपट्टीपासून दूर बुडालेल्या जहाजांपैकी प्रेस्टीज हे तिसरे जहाज होते. सुमारे दहा वर्षांआधी, उत्तर गॅलिसियाच्या ला कोरुन्याजवळ एजियन सी हे जहाज बुडाले आणि त्यामुळे ४०,००० टन तेल सांडले होते; या आघातातून जवळपासच्या किनारपट्टीचे काही भाग अजूनही सावरलेले नाहीत. त्याच खाडीत १९७६ मध्ये उरकीओले हे जहाज बुडाले होते; तेल गळतीचा हा सर्वात भयंकर प्रकार होता ज्यात १,००,००० टनाहून अधिक तेल सांडले होते.

अलीकडील दुर्घटनेमुळे दुहेरी सांगाडा नसलेल्या सर्व तेल-वाहू जहाजांवर बंदी आणण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतला आहे. परंतु, युरोपच्या छिन्‍नविछिन्‍न झालेल्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यात हा उपाय कितपत पुरेसा ठरेल हे अजूनही पाहायचे आहे.

यावरून स्पष्ट दिसते की, मानवी सरकारे प्रदूषणमुक्‍त जगाची हमी देण्यास असमर्थ ठरले आहेत—मग ते तेल सांडल्याने झालेले प्रदूषण असो, विषारी पदार्थांमुळे झालेले असो नाहीतर वातावरणातील प्रदूषणामुळे असो. ख्रिस्ती लोक मात्र, भविष्यात देवाचे राज्य आपल्या ग्रहाचे परादीसात रूपांतर करण्याच्या कार्याची देखरेख करील त्या काळाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यानंतर मात्र आपला ग्रह कधीही प्रदूषित होणार नाही.—यशया ११:१, ९; प्रकटीकरण ११:१८. (g०३ ८/२२)

[२७ पानांवरील चित्र]

प्रेस्टीज जहाज ५०,००० टन तेलासहित बुडाले

[चित्राचे श्रेय]

AFP PHOTO/DOUANE FRANCAISE