व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आतषबाजीचे आकर्षण

आतषबाजीचे आकर्षण

आतषबाजीचे आकर्षण

दिवाळीसाठी असो नाहीतर ऑलंपिक खेळांसाठी असो, फटाक्यांचा नेहमीच उत्सवाशी संबंध लावला जातो. अमेरिकेच्या स्वतंत्र दिनी, फ्रान्सच्या बॅस्टिल दिनी, आणि नूतन वर्षाच्या रात्री जगातील प्रत्येक मोठ्या शहरातील आकाशात प्रकाशाची उधळण दिसते.

मनुष्यांना आतषबाजीचा छंद केव्हापासून लागला? हे नेत्रदीपक देखावे निर्माण करण्यात कसली सर्जनशीलता गोवलेली आहे?

पौर्वात्य परंपरा

बहुतेक इतिहासकार हे मानतात की, चिनी लोकांनी आपल्या सामान्य युगाच्या दहाव्या शतकाच्या सुमारास फटाक्यांची निर्मिती केली होती; त्या वेळी पौर्वात्य रसायनशास्त्रज्ञांना कळाले की, गंधक आणि कोळसा यांच्यासोबत सोरा (पोटॅशियम नायट्रेट) मिसळल्यास स्फोटक मिश्रण तयार होते. मार्को पोलोसारखे पाश्‍चात्त्य शोधक किंवा कदाचित अरबी व्यापारी यांनी हा स्फोटक पदार्थ युरोपमध्ये आणला आणि १४ व्या शतकापासून युरोपियन लोक आतषबाजीचा नेत्रसुखद अनुभव घेऊ लागले.

परंतु, नेत्रदीपक मनोरंजन करणाऱ्‍या या मिश्रणाने युरोपियन इतिहासाची दिशा देखील बदलली. त्या पदार्थाला नंतर दारू हे नाव पडले; लष्कराने त्याचा उपयोग शिशाच्या गोळ्या झाडण्यासाठी, किल्ले उडवण्यासाठी आणि राजकीय शक्‍ती नष्ट करण्यासाठी केला. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो, “युरोपियन मध्ययुगादरम्यान, लष्करी स्फोटकांसोबत फटाक्यांचाही पाश्‍चात्त्य देशांमध्ये प्रसार झाला आणि युरोपमध्ये लष्करी स्फोटक तज्ज्ञाला विजय आणि शांतीचा पायरोटेक्निक [अर्थात, फटाक्याने] उत्सव साजरा करण्यासाठी सांगण्यात आले.”

बहुतेक चिनी लोकांनी, दारूचा उपयोग विनाशासाठी केला जाऊ शकतो या शक्यतेकडे दुर्लक्ष केले. १६ व्या शतकात, मॉटेओ रिची या चीनमधील इटालियन जेसूट मिशनरीने असे लिहिले: “चिनी लोक दारूगोळा व तोफ वापरण्यात तरबेज नाहीत आणि युद्धात ते यांचा फारसा उपयोग करत नाहीत. परंतु, खेळांमध्ये आणि सणांमध्ये आतषबाजीचे प्रदर्शन करण्याकरता सोरा पदार्थ बहुतप्रमाणात उपयोगात आणला जातो. अशा प्रदर्शनांचा चिनी लोकांना अत्यंत छंद आहे . . . आतषबाजी करण्यातील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.”

दैदीप्यमान प्रदर्शनाचे तंत्र

आतषबाजी करणाऱ्‍या प्राचीन लोकांना विविध देखावे निर्माण करण्यासाठी कौशल्याची आणि धैर्याची देखील गरज होती यात शंका नाही. त्यांना हे समजले की, दारूच्या बारीक कणांचा एकदम स्फोट होतो पण मोठ्या कणांचा तुलनात्मकरित्या हळूहळू स्फोट होतो. रॉकेट तयार करण्यासाठी लांबट बांबूचे किंवा कागदी ट्यूबचे एक टोक बंद केले जाई आणि खालच्या बाजूला मोठ्या कणांची दारू भरली जाई. दारूला आग लावल्यावर, ट्यूबच्या उघड्या टोकातून जोराने विस्तार पावणारे वायु बाहेर पडत आणि ट्यूब आकाशात फेकली जाई. (अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी आज हेच मूलभूत तत्त्व वापरले जाते.) रॉकेट यशस्वीपणे वर गेल्यावर शेवटी त्याचा विस्फोट व्हावा म्हणून त्याच्या वरच्या टोकाशी बारीक दारू भरली जाई.

फटाक्यांच्या तंत्रात कित्येक शतकांपासून फारसा फरक झालेला नाही. त्यात सुधारणा मात्र झाली आहे. पौर्वात्य लोकांना सुरवातीला केवळ पांढरी किंवा सोनेरी रंगात आतषबाजी करण्यास ठाऊक होते. इटालियन लोकांनी त्यात रंग भरले. १९ व्या शतकाच्या सुरवातीला, इटालियन लोकांना हा शोध लागला की, दारूत पोटॅशियम क्लोरेट मिसळल्यावर धातूंचे वायुमध्ये रूपांतर करण्याइतकी उष्णता निर्माण होऊन आगीला रंग येत होता. आज, लाल ज्वाला निर्माण करण्यासाठी स्ट्रोंटियम कार्बोनेटचा वापर केला जातो. पांढरी शुभ्र ज्वाला टायटेनियम, अल्यूमिनियम आणि मॅग्नेशियमद्वारे निर्माण केली जाते; तांब्याच्या घटकांद्वारे निळी; बेरियम नायट्रेट्‌सद्वारे हिरवी; आणि सोडियम ऑक्झलेटच्या मिश्रणाद्वारे पिवळी.

संगणकांनी आतषबाजीत आणखी सुधारणा केली आहे. हातांनी फटाके उडवण्याऐवजी संगीताच्या तालावर विजेने फटाके उडवण्याकरता संगणकांना प्रोग्रॅम करून तंत्रज्ञ आतषबाजीचे अचूक प्रदर्शन घडवून आणू शकतात.

धर्माशी संबंध

जेसूट मिशनरी रिची यांनी म्हटल्याप्रमाणे, चिनी धार्मिक उत्सवांमध्ये आतषबाजीचा हमखास समावेश असे. पॉप्युलर मेकॅनिक्स या पत्रिकेत म्हटले आहे की, “चिनी लोकांनी नूतन वर्षाच्या व इतर सणासुधीच्या प्रसंगी दुरात्म्यांना घालवून लावण्यासाठी” आतषबाजीचा शोध लावला होता. डेज ॲण्ड कस्टम्स ऑफ ऑल फेथ्स या आपल्या पुस्तकात हॉवर्ड व्ही. हार्पर म्हणतात: “पूर्वीच्या मूर्तिपूजक काळापासून लोकांनी मोठमोठ्या धार्मिक प्रसंगी मशाली घेतल्या आहेत आणि शेकोट्या पेटवल्या आहेत. म्हणूनच, आतषबाजीतील नेत्रदीपक रंगांची आणि हलत्या प्रकाशाची या उत्सवांमध्ये भर पडली.”

तथाकथित ख्रिश्‍चनांनी आतषबाजीची संस्कृती स्वीकारल्यानंतर आतषबाजी करणाऱ्‍यांकरता एक रक्षक संत नेमण्यात आले. द कोलंबिया एन्सायक्लोपिडिया यात म्हटले आहे: “अशी कथा आहे की, [संत बार्बरा] ख्रिस्ती होती म्हणून तिच्या वडिलांनी तिला एका बुरूजात कोंडून ठेवले होते आणि नंतर तिला ठार मारले. मग त्यांच्यावर वीज पडली व ते मेले म्हणून संत बार्बरा दारूगोळा व फटाके निर्माण करणाऱ्‍यांची व वापरणाऱ्‍यांची रक्षणकर्ती बनली.”

अमाप खर्च

धार्मिक उत्सव असोत नाहीतर इतर कोणतेही उत्सव, जनसामान्यांना अधिकाधिक उत्कृष्ट व मोठ्या आतषबाजी पाहण्याची इच्छा होते. १६ व्या शतकातील एका चिनी आतषबाजीचे वर्णन करताना, रिची यांनी लिहिले: “मी नानकिंगमध्ये होतो तेव्हा त्यांच्या सर्वात मोठ्या सणाच्या वेळी म्हणजे वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या उत्सवानिमित्ताने केलेली एक आतषबाजी मी पाहिली आणि या प्रसंगी मी अंदाज केला, की त्यांनी अनेक वर्षे चालेल अशा मोठ्या युद्धासाठी पुरेल इतकी दारू वापरली.” या आतषबाजीच्या खर्चाविषयी ते म्हणाले: “आतषबाजीच्या बाबतीत ते पैशांची कदर करत नाहीत.”

त्यानंतरच्या शतकांतही परिस्थिती फारशी बदललेली नाही. २००० साली, सिडनी हार्बर ब्रिजवर साजरा केलेल्या केवळ एकाच उत्सवात, त्या बंदराच्या किनाऱ्‍यावर जमलेल्या दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकांच्या मनोरंजनाकरता २० टन फटाके उडवण्यात आले. त्याच वर्षी, अमेरिकेत, जवळजवळ ७,००,००,००० किलो फटाक्यांसाठी ६२.५ कोटी डॉलर खर्च करण्यात आले. आतषबाजीचे आकर्षण आजही अनेक संस्कृतींना आहे आणि आजही त्यांच्याबाबतीत असे म्हणता येऊ शकते: “आतषबाजीच्या बाबतीत ते पैशांची कदर करत नाहीत.” (g०४ २/८)