व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गृहपाठ करायला मला वेळ कोठून मिळेल?

गृहपाठ करायला मला वेळ कोठून मिळेल?

तरुण लोक विचारतात . . .

गृहपाठ करायला मला वेळ कोठून मिळेल?

‘मी उच्च माध्यमिक शाळेत सिनियर आहे, आणि मला हा तणाव आता झेपत नाहीये. . . . माझ्याजवळ इतके प्रोजेक्ट्‌स, प्रेसेंटेशन्स आहेत की काय सांगू; ही काही तोंडची गोष्ट नाही. माझ्याजवळ हे सर्व करायला वेळ नाही.’—१८ वर्षांची एक मुलगी.

दररोज दुपारी शाळेतून गृहपाठाची थप्पी आणताना तुम्हाला भारावून गेल्यासारखे वाटते का? असे असल्यास, तुम्ही एकटे नाहीत. “जगभरातील शाळा आपला दर्जा—आणि प्रमाणित परीक्षांचे मार्क—वाढवण्याचा प्रयत्न करतात तसे गृहपाठाचे प्रमाण वाढवले जात आहे,” असे अमेरिकेतील एका वर्तमान पत्राच्या अहवालात म्हटले होते. “काही ठिकाणी उच्च शाळेतील विद्यार्थी रात्रीचे तीन तासांहून अधिक तास [गृहपाठ] करण्यात घालवतात. मिशिगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे सुचवण्यात आले की, २० वर्षांआधीच्या मुलांपेक्षा [आताच्या लहान मुलांना] तिप्पट गृहपाठ करावा लागतो.”

केवळ अमेरिकेतल्याच विद्यार्थ्यांना भरमसाट गृहपाठ मिळतो असे नाही. अहवालानुसार तेथे, गृहपाठासाठी दोन तास घालवणारी १३ वर्षांच्या वयोगटातील सुमारे ३० टक्के मुले आहेत, तर तायवान आणि कोरियात ४० टक्के व फ्रान्समध्ये ५० टक्क्यांहून अधिक आहेत. “काही वेळा मला खूप गृहपाठ असतो तेव्हा माझ्यावर खूप तणाव येतो,” असे अमेरिकेतील विद्यापीठाची एक विद्यार्थिनी, कॅटी म्हणते. मार्सेल्स, फ्रान्स येथे शाळेत जाणाऱ्‍या मॅरलिन आणि बेलिंडा यांनाही तिच्यासारखेच वाटते. मॅरलिन म्हणते, “आम्ही गृहपाठासाठी सहसा दोन तास किंवा अधिक वेळ खर्च करतो. पण इतर जबाबदाऱ्‍या असतात तेव्हा वेळ काढायला जमत नाही.”

मला वेळ कोठून मिळेल?

आपल्याला हवे तेव्हा दिवसातले तास वाढवून गृहपाठ पूर्ण करता आला आणि बाकीच्या इतरही गोष्टी करता आल्या तर किती बरे होईल नाही? खरे पाहता, इफिसकर ५:१५, १६ [NW] येथील बायबलच्या तत्त्वातून तुम्ही धडा घेतलात तर तुम्हाला असेच काहीतरी करता येईल; तेथे म्हटले आहे: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळ विकत घ्या.” बायबलच्या लेखकाने गृहपाठ लक्षात ठेवून ते शब्द लिहिले नसले तरी हे तत्त्व दररोजच्या जीवनात लागू करता येऊ शकते. तुम्ही काहीतरी विकत घेता तेव्हा त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी द्यावे लागते. येथे मुद्दा असा आहे की, अभ्यासासाठी वेळ काढण्यासाठी तुम्हाला दुसऱ्‍या एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. पण कशाचा त्याग?

जिल्यन नावाची एक तरुणी म्हणते, “आपल्याला कोणत्या गोष्टी पहिल्या करायच्या आहेत त्यांची सगळ्यात आधी यादी करायची.” दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते ठरवा. ख्रिस्ती सभा आणि आध्यात्मिक गोष्टी तुमच्या यादीत सर्वात पहिल्या असल्या पाहिजेत. शिवाय, तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍या, घरातली कामे आणि होय, गृहपाठ यांच्याविषयी विसरू नका.

त्यानंतर, एक आठवड्यासाठी तुम्ही स्वतःचा वेळ खरोखर कसा घालवता हे डायरीत लिहून ठेवायचा प्रयत्न करा. ते पाहिल्यावर तुम्हालाच आश्‍चर्य वाटेल. टीव्ही पाहण्यात, इंटरनेटवर, चित्रपट पाहण्यात, फोनवर बोलण्यात, मित्रांना भेटण्यात तुम्ही किती वेळ घालवता? आता, तुम्ही ठरवलेल्या महत्त्वाच्या गोष्टींशी ही डायरी तपासून पाहा. तुम्हाला काय दिसते? कदाचित तुम्हाला फक्‍त टीव्ही पाहणे, फोनवर बोलणे, किंवा वेब-सर्फींग अशा सवयींचा विचार करावा लागेल आणि या गोष्टींमधूनच भरपूर वेळ काढता येईल!

महत्त्वाच्या गोष्टी प्रथम

याचा अर्थ तुम्ही टीव्ही फेकून द्यावा किंवा संन्यासी बनावे असे नाही. एवढेच की तुम्हाला “महत्त्वाच्या गोष्टी प्रथम” हे तत्त्व पाळावे लागेल. येथे बायबलमधील एक वचन लागू होते; त्यात म्हटले आहे: “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे.” (फिलिप्पैकर १:१०) उदाहरणार्थ, तुमची शाळा महत्त्वाची असल्यामुळे, तुम्ही स्वतःकरता असा नियम करू शकता की, जोवर घरातली कामे आटपून होत नाहीत, ख्रिस्ती सभांचा अभ्यास करून होत नाही आणि गृहपाठ करून होत नाही तोवर तुम्ही टीव्ही लावणार नाही. तुमचा आवडता कार्यक्रम चुकवल्यामुळे निराशा होते हे खरे. पण, प्रामाणिकपणे विचार करा: असे कितींदा झाले आहे की, तुम्ही फक्‍त तुमचा आवडता कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने बसता आणि संपूर्ण संध्याकाळ टीव्हीसमोर बसून राहता आणि काहीच साध्य करत नाही?

दुसऱ्‍या बाजूला पाहता, तुम्ही ख्रिस्ती सभांना योग्य ते महत्त्व देण्याची गरज आहे. जसे की, एखादी महत्त्वाची परीक्षा येणार आहे किंवा गृहपाठ मिळणार आहे असे तुम्हाला माहीत असले तर तुम्ही आधीपासूनच त्यासाठी तयारी करण्याचा प्रयत्न करू शकता म्हणजे सभांवर त्याचा परिणाम होणार नाही. तुम्ही कदाचित शिक्षकांशीही याविषयी बोलू शकता आणि त्यांना सांगू शकता की, सभेच्या दिवशी मिळणार असलेल्या गृहपाठाविषयी तुम्हाला अगोदरच कळाले तर फार बरे होईल. काही शिक्षक कदाचित सहयोग द्यायला तयार होतील.

बायबलमध्ये मार्था नावाच्या येशूच्या एका परिचयाच्या स्त्रीच्या अहवालात आणखी एक फायदेकारक तत्त्व शिकवले आहे. ती अत्यंत व्यस्त आणि कामासू होती, पण महत्त्वाच्या गोष्टींना ती प्राधान्य देत नव्हती. एके प्रसंगी, येशूकरता अनेक पक्वान्‍ने तयार करण्यासाठी तिची धावपळ सुरू होती पण तिची बहीण मरीया तिला मदत करण्याऐवजी येशू जे सांगत होता ते ऐकत बसली होती. मार्थाने याविषयी तक्रार केली तेव्हा येशू तिला म्हणाला: “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहूना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”—लूक १०:४१, ४२.

यातून काय धडा मिळतो? पुष्कळ पक्वान्‍ने करू नका. हे तत्त्व तुम्ही तुमच्या परिस्थितीला कसे लागू करू शकता? तुम्ही देखील “पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग” करता का—कदाचित गृहपाठ आणि अर्ध-वेळेची नोकरी या दोन्ही गोष्टी करायचा प्रयत्न करत आहात का? तुम्ही नोकरी करत असल्यास, तुमच्या कुटुंबाला त्या पैशांची खरोखर गरज आहे का? की, आवश्‍यक असलेल्या वस्तू नव्हे तर हव्या असलेल्या वस्तू घेण्यासाठी वरचे पैसे जवळ असावेत असे तुम्हाला वाटते?

जसे की, काही देशांमध्ये तरुणांना स्वतःची कार विकत घ्यायची उत्सुकता असते. उच्च-शाळेतील सल्लागार कॅरन टर्नर म्हणतात की, “कारचा खर्च फार जास्त असल्यामुळे आजकाल तरुणांना पैसे जवळ ठेवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी जबरदस्त दबाव आणला जातो.” परंतु, टर्नर म्हणतात: “इतर कार्यहालचाली, काम, शिक्षणाचा बोजा अशा अनेक गोष्टी सांभाळायचा प्रयत्न केला तर कठीण जाते. मग विद्यार्थ्याला फार ओझे झाल्यासारखे वाटते.” गरज नसताना अनावश्‍यक बोजा का घ्यावा? शाळेच्या अभ्यासावर परिणाम होत असेल तर कामाचे तास कमी करता येऊ शकतील किंवा काम सोडता येऊ शकेल.

शाळेत वेळ काढा

शाळेनंतरच्या कार्यांतून वेळ काढण्याशिवाय शाळेत असताना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल याचा विचार करा. होस्वे म्हणतो: “मी अभ्यासासाठी दिलेल्या वेळातच होता होईल तितका गृहपाठ पूर्ण करायचा प्रयत्न करतो. अशाने त्या दिवसाच्या वर्गातून मला काही समजले नाही तर शिक्षकांनाही विचारता येतं.”

आणखी एका गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता आणि ती अशी की, पर्यायी वर्ग कमी करता येऊ शकतात. शिवाय, शाळेनंतरच्या जादा कार्यहालचाली सोडून द्यायचा तुम्ही विचार करू शकता. या गोष्टींमध्ये फेरफार करून, अभ्यासाकरता अधिक वेळ तुम्ही काढू शकता.

परिणामकारक ठरेल असा वेळेचा वापर करणे

तुम्ही त्याग करून आणि काही बदल करून गृहपाठासाठी अधिक वेळ काढला असेल. त्या वेळेचा तुम्ही किती परिणामकारकरित्या वापर कराल? त्याच वेळेत, ५० टक्के अधिक गृहपाठ केलात तर ५० टक्के अधिक वेळ तुम्हाला मिळणार नाही का? तर मग, परिणामकारकता वाढण्यासाठी येथे काही सल्ले दिले आहे.

नियोजन करा. गृहपाठ सुरू करण्याआधी पुढील गोष्टींचा विचार करा: कोणता विषय पहिला घ्यावा? त्यासाठी किती वेळ द्यावा? त्यासाठी काय काय लागेल—पुस्तके, पेपर, पेन, कॅलक्यूलेटर इत्यादी?

अभ्यासाकरता ठिकाण शोधा. असे ठिकाण असावे, जेथे तुमचे मन भरकटणार नाही. एलीस नावाची तरुणी म्हणते, ‘एखादा टेबल असेल तर त्याचा वापर करा. बिछान्यात झोपून काही करण्याऐवजी सरळ बसून अभ्यास केला तर मन एकाग्र करता येतं.’ तुमच्याजवळ स्वतःची खोली नसल्यास, कदाचित तुमचे भाऊ किंवा बहिणी तुम्हाला शांतीने अभ्यास करू देतील. किंवा तुम्ही बागेत अथवा सार्वजनिक ग्रंथालयात जाऊ शकता. पण तुमची स्वतःची खोली असेल तर, अभ्यास करताना टीव्ही लावून किंवा लक्ष विचलित करणारे संगीत लावून तुमच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणायचा प्रयत्न करू नका.

अधूनमधून विश्रांती घ्या. काही काळानंतर, तुमचे लक्ष लागत नसल्यास, अल्पावधीसाठी विश्रांती घेतल्याने मन पुन्हा एकाग्र व्हायला मदत मिळेल.

दिरंगाई करू नका! आधी जिचा उल्लेख केला होता ती कॅटी म्हणते, “मला दिरंगाईची सवयच लागली आहे. मी अगदी शेवटल्या घटकेपर्यंत थांबून राहते.” गृहपाठासाठी आराखडा तयार करून व तो पाळून दिरंगाई करण्याचे टाळा.

शाळेचे काम महत्त्वाचे आहे, पण येशूने मार्थेला सांगितल्याप्रमाणे, सर्वात महत्त्वाच्या गोष्टी—“चांगला वाटा”—आध्यात्मिक गोष्टींचा आहे. गृहपाठामुळे बायबल वाचन, सेवाकार्यात सहभाग घेणे आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे अशा महत्त्वाच्या कार्यहालचाली चुकणार नाहीत याची खातरी करा. कारण या गोष्टींनी तुमचे सर्वकाळचे जीवन समृद्ध होईल!—स्तोत्र १:१, २; इब्री लोकांस १०:२४, २५. (g०४ १/२२)

[२३ पानांवरील चित्रे]

एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्यास गृहपाठासाठी वेळ काढणे कठीण होईल

[२३ पानांवरील चित्र]

उत्तम नियोजनामुळे गृहपाठासाठी तुम्हाला अधिक वेळ काढता येईल