व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

मर्कट लीला

काहींचा असा विचार आहे, की असंख्य माकडांना अनेक टाईपराईटर दिल्यास ते एक ना एक दिवशी शेकस्पीयरची सर्व पुस्तके टाईप करतील. त्यामुळे इंग्लंड येथील प्लिमथ युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सहा माकडांना एक महिन्यासाठी एक कंप्युटर दिला. या माकडांनी “एकही शब्द टाईप केला नाही,” अशी द न्यू यॉर्क टाईम्सने बातमी दिली. दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील पेनटन प्राणीसंग्रहालयातील ही सहा माकडे “केवळ पाच पानांचा मजकूर टाईप” करू शकले; आणि या पानांवर अधिककरून एकच अक्षर वारंवार टाईप करण्यात आले होते. मजकूराच्या शेवटी त्यांनी इतर काही अक्षरे टाईप केली. शिवाय, त्यांनी की-बोर्डला सार्वजनिक मुतारी करून टाकली. (g०४ १/२२)

अंड्यापासून बनवलेले प्रतिसर्पविष

“प्रतिसर्पविष बनवण्यासाठी कोंबडीच्या अंड्यांतून रेणू मिळू शकतात, हा शोध भारतीय शास्त्रज्ज्ञांना लागला आहे,” असे द टाईम्स ऑफ इंडियामध्ये म्हटले आहे. १२ आठवड्यांच्या कोंबड्यांना “त्यांच्या स्नायूंमध्ये विषाचे कमी प्रमाण टोचले जाते” आणि दोन ते तीन आठवड्यांनंतर शक्‍तिवर्धक डोस टोचला जातो. २१ आठवड्यांनंतर, या कोंबड्या प्रतिसर्पविष प्रतिपिंडे असलेली अंडी देण्यास सुरवात करतात. संशोधकांची अशी आशा आहे, की घोड्यांकडून मिळणाऱ्‍या प्रतिसर्पविषाऐवजी, प्रतिसर्पविष असलेली अशी अंडी भविष्यात वापरली जातील; “प्रतिसर्पविष मिळवण्यासाठी घोड्यांना वेदनाकारक चाचण्या सहन कराव्या लागतात,” असे द टाईम्सने म्हटले. ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिक, प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये या नवीन तंत्रज्ञानात यश मिळाल्याचा दावा करत आहेत. अंड्यातून मिळालेले प्रतिविष मानवांवर काम करू लागल्यास, भारताला हे एक वरदान ठरू शकेल जेथे दर वर्षी सर्पदंशाच्या ३,००,००० केसेस होतात. यांपैकी १० टक्के लोक मरण पावतात. (g०४ १/८)

टेलिफोनवरून अतिदूर देशांची सेवा

अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरातील एक स्त्री, स्थानीय ग्राहक सेवेचा नंबर लावते. दुसरीकडून उत्तर देणारी तरुणी स्वतःचे नाव मिशल असे सांगते परंतु तिचे खरे नाव आहे, मेघना; आणि ती राहते भारतात व तिला हा फोनकॉल येतो तेव्हा मध्यरात्र असते. भारतातील कॉलसेंटर्समध्ये १,००,००० लोक कामाला आहेत जे, अमेरिकन एक्सप्रेस, एटी ॲण्ड टी, ब्रिटिश एअरवेज, सिटीबँक, जेनरल इल्केट्रिक सारख्या परकीय कंपन्यांसाठी “कॉल घेतात.” इंडिया टुडे मासिकानुसार पाश्‍चिमात्य देशांतील कंपन्यांनी भारतात हे काम हलवले आहे, कारण येथे आंतरराष्ट्रीय टेलिफोन दर कमी आहे आणि भारतात शिक्षित, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या कामगारांची कमी नाही; शिवाय, “पाश्‍चिमात्य देशात हेच काम करणाऱ्‍यांपेक्षा या कामगारांचा पगार ८० टक्के कमी आहे.” अमेरिकन लोकांसारखे बोलण्यासाठी, मेघनासारख्या ऑपरेटर्सना अनेक महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते; ते “अमेरिकन प्रांतांतील बोलण्याच्या विविध पद्धती शिकण्यासाठी हॉलीवूडचे लोकप्रिय चित्रपटही पाहतात.” मेघनाच्या कंप्युटरवर तिला फिलाडेल्फियातील हवामानाविषयीची माहिती देखील मिळते; यामुळे ती जणू फिलाडेल्फियातूनच बोलते आहे, असे वाटते. भारतात या वेळी मध्यरात्र असताना, संभाषणाच्या शेवटी ती म्हणते: “हॅव अ गुड डे!” म्हणजे तुमचा दिवस चांगला जावो! (g०३ १२/२२)

धडपडणारे शेतकरी

एका अहवालानुसार, “जगभरातील बहुतेक देशांमध्ये कृषी उत्पादन वाढवणाऱ्‍या हरित क्रांतीमुळे चांगले उत्पादन मिळाले खरे परंतु त्याच वेळेला याचा वाईट परिणामही झाला: आफ्रिकेत जगातील सर्वात गरीब असे कोट्यवधी शेतकरी दारिद्र्‌याच्या दलदलीत आणखी रुतत गेले,” असे न्यू साईन्टिस्ट मासिकात म्हटले होते. ते कसे? १९५० च्या दशकाच्या शेवटी, झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येमुळे होणारी अन्‍नटंचाई टाळण्यासाठी गहू आणि तांदूळ यांच्या अधिक उत्पादन देणाऱ्‍या जाती वापरण्यात आल्या. परंतु या अधिक उत्पादन देणाऱ्‍या अन्‍नधान्यांच्या जातींमुळे झालेल्या विपुल उत्पादनामुळे किंमती घसरल्या. “नवीन जातींची बियाणे लावणाऱ्‍या शेतकऱ्‍यांना कमी किंमत मिळाली असली तरी त्यांचा फायदा झाला कारण त्यांचे अन्‍नधान्यांचे उत्पादन चांगले झाले; परंतु ज्यांना ही नवीन बियाणे विकत घेणे परवडत नव्हते त्यांचे मात्र नुकसान झाले,” असे न्यू साईन्टिस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय, नवीन जातीची बियाणे आफ्रिकेतील हवामानात चांगल्याप्रकारे वाढली नाहीत कारण ती, आशियाई व लॅटिन अमेरिकन देशांतील हवामानात वाढण्याकरता बनवण्यात आली होती. (g०४ १/२२)

वितळणारे हिमनद

भारतात पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे, एकीकडे संपूर्ण पंजाबमधील जलाशयातील पाणी कमी झाले परंतु दुसरीकडे सतलज नदीवरील बक्र धरणाचे पाणी, मागील वर्षाच्या पातळीपेक्षा जवळजवळ दुप्पट वाढले. का? सतलज नदीचा मुख्य प्रवाह ८९ हिमनद असलेल्या क्षेत्रातून वाहतो, असे डाऊन टू अर्त मासिकात म्हटले आहे. “पाऊस न पडल्यामुळे हिमनद हळूहळू वितळू लागले आहेत. आकाशात ढग नसल्यामुळे, हिमनदांवर कडक सूर्यप्रकाश पडतो. याशिवाय, उच्च तापमानांमुळे हे हिमनद लवकर वितळतात,” असे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील हिमनद तज्ज्ञ सईद इकबाल हसनेन यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की हिमनद वितळत असल्यामुळे हिमनद्यांमुळे तयार झालेल्या नद्यांना पूर येऊ शकतो. तसेच, वितळल्यामुळे कमी झालेले हिमनद म्हणजे, पाण्याचा भविष्यात कमी पुरवठा होईल ज्याचा उर्जा उत्पादनावर व शेती उत्पन्‍नावर परिणाम होऊ शकेल. (g०४ १/२२)

साबणामुळे जीवन वाचते

केवळ साबणाने हात धुतल्यामुळे दर वर्षी दहा लाख लोकांचा जीव वाचू शकतो कारण त्यामुळे लोक अतिसाराशी संबंधित आजार टाळू शकतील, असे लंडन स्कूल ऑफ हायजीन ॲण्ड ट्रॉपिकल मेडिसीन येथील प्राध्यापिका, वेल कर्टीस यांचे म्हणणे आहे. जपानमधील क्योटो येथे झालेल्या तिसऱ्‍या विश्‍व-जल चर्चापीठात, कर्टीस यांनी, मानवी मलमूत्रातील रोग उत्पन्‍न करणाऱ्‍या जिवाणूचे वर्गीकरण “समाजाचा सर्वात मोठा शत्रू” असे केल्याचा अहवाल, द डेली योम्युरीने दिला. या बातमीपत्रकात पुढे म्हटले होते: “काही समाजात असे पाहण्यात आले आहे, की स्त्रिया बाळाच्या किंवा मुलाच्या शौचानंतर त्याला धुतल्यावर स्वतःचे हात न धुताच स्वयंपाकाला लागतात.” साबणाने व पाण्याने हात धुतल्याने जीवघेणे विषाणू व जिवाणू यांचा प्रसार टाळता येऊ शकतो. कर्टीस यांच्या मते, विकसनशील देशांत, साबणाने हात धुतल्यामुळे अतिसाराशी संबंधित आजारांचा धोका तीन पटीने कमी करता येऊ शकेल. (g०४ २/२२)

लॅटिन भाषेला जिवंत ठेवणे

लॅटिन भाषा वापरातून नाहीशी होत आहे असे अनेकांना वाटत असले तरी, व्हॅटिकन तिला जिवंत व अद्ययावत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. का? कारण, व्हॅटिकनची इटालियन भाषा असली तरी, लॅटिन ही तिची अधिकृत भाषा आहे व पोपच्या पत्रांमध्ये व इतर दस्तऐवजांमध्ये तिचाच वापर होत आहे. १९७० च्या दशकात स्थानीय भाषांमध्ये मिस्सा घेतला जाऊ शकतो अशी घोषणा करण्यात आल्यापासून लॅटिन भाषेचा वापर फारच झपाट्याने कमी झाला. त्यामुळे, ही भाषा जिवंत ठेवण्याकरता पोप पॉल सहावे यांनी लॅटिन फाऊन्डेशनची सुरवात केली. एक पाऊल जे उचलण्यात आले ते म्हणजे, दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये एक लॅटिन-इटालियन डिक्शनरी प्रकाशित करण्यात आली व तिचे उपलब्ध असलेले सर्व खंड खपले. आता दोन्ही खंडांचा मिळून एक खंड बनवण्यात आला आहे ज्याची किंमत आहे ११५ डॉलर. यामध्ये सुमारे १५,००० आधुनिक लॅटिन शब्द आहेत; जसे की, “एस्कारियोरम लॉवॉटोर” (डिशवॉशर). पुढील दोन तीन वर्षांत, एक नवीन खंड “येण्याची शक्यता आहे,” असे द न्यू यॉर्क टाईम्सने म्हटले. यांतील बहुतेक शब्द, कंप्युटर आणि माहितीक्षेत्रात वापरले जाणारे शब्द असतील.” (g०४ २/२२)