व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ढगांवरील जीवन

ढगांवरील जीवन

ढगांवरील जीवन

बोलिव्हियाच्या सावध राहा! लेखकाकडून

एकान्त, नेत्रदीपक देखावे तसेच फिरणे, गिर्यारोहण व स्कीइंग यामुळे लोक सुटीसाठी डोंगरांकडे आकर्षित होतात. शिवाय, लाखो लोक डोंगरदऱ्‍यांमध्ये आणि अनेक ढगांपेक्षा उंच असलेल्या पठारांवर वसती करून आहेत. एक गोष्ट मात्र खरी की, इतक्या उंचीवर राहिल्याने लोकांच्या आरोग्यावर किंवा मोटार गाड्यांवर किंवा स्वयंपाकावरही याचा विपरित परिणाम होऊ शकतो. हा परिणाम का होतो आणि यावर काय उपाय करता येईल? प्रथम हे पाहू या की, इतके लोक खरोखरच उंच डोंगरांमध्ये राहतात का?

डोंगरांवरील अनेक प्रदेशांमध्ये आर्थिक वाढ होत आहे. मेक्सिको सिटीत लाखो लोक समुद्र सपाटीच्या ७,००० फूट उंचीवर राहतात. डेन्वर, कोलोराडो, अमेरिका; नैरोबी, केनिया; आणि जोहानिसबर्ग, दक्षिण आफ्रिका ही ठिकाणे ५,००० फुटांहून अधिक उंचीवर वसलेली आहेत. हिमालयातील लाखो लोक ९,००० फूट उंचीवर राहतात. अँडीजमध्ये तर कित्येक मोठी शहरे ११,००० फुटांहून अधिक उंचीवर वसलेली आहेत आणि तेथील लोक २०,००० फूट उंचीवर असलेल्या खाणींमध्ये काम करतात. इतके लोक उंच प्रदेशांमध्ये राहत असल्यामुळे आपले शरीर तेथील जीवनाशी कसे जुळवून घेते याच्या अभ्यासाला आजकाल महत्त्व प्राप्त झाले आहे. यातून जे शिकायला मिळाले ते जाणून तुम्हाला तुमच्या शरीराच्या अद्‌भुत रचनेबद्दल अधिक कदर वाटू लागेल.

कशाची अपेक्षा करावी

अँडीज पर्वतांमध्ये डग पोहंचले तेव्हा त्यांना आलेला अनुभव अगदी सामान्य होता. ते म्हणतात: “विमानतळावर मी सूटकेसेस उचलल्या तेव्हा मला एकदम चक्कर आल्यासारखी वाटली आणि मी पडता पडता वाचलो. ही लक्षणे लवकर नाहीशी झाली पण पहिल्या एक-दोन आठवड्यांपर्यंत मला सतत डोकेदुखी असायची आणि सलग झोप लागायची नाही. झोपेच्या मध्येच जाग येऊन माझा श्‍वास कोंदटला जातोय असं वाटायचं. मग, काही महिन्यांपर्यंत मला खायची इच्छाच होत नव्हती, फार लवकर थकवा यायचा आणि मला जास्त झोप लागायची.” कॅटी म्हणते: “मला वाटायचं की, उंचीवर राहणाऱ्‍यांना जो त्रास होतो तो सगळा त्यांच्या कल्पनेतच आहे. पण आता मला कळतं की तसं नाहीये.”

डग यांना झोप लागत नव्हती तसा त्रास तुम्हालाही होऊ लागला तर तुम्हाला भीती वाटू लागेल. झोपेत असताना, वेळोवेळी श्‍वास अक्षरशः काही सेकंदांसाठी थांबतो. काही वेळा, यामुळे माणूस एकदम दचकून उठतो आणि तो श्‍वास घ्यायचा प्रयत्न करू लागतो.

काही लोकांना उंचीवर गेल्यावर काहीच त्रास होत नाही. अनेक लोकांना, ६,००० फूट उंचीवर गेल्यावर त्रास होऊ लागतो आणि १०,००० फूट उंचीवर प्रथमच जाणाऱ्‍यांपैकी निम्म्या लोकांना त्रास होतो. गंमत म्हणजे, उंच ठिकाणी राहणारे लोक, दोन-तीन आठवडे सखल प्रदेशात राहिल्यावर परत जातात तेव्हा त्यांना देखील असाच त्रास होतो. का?

उंचीचा शरीराला त्रास का होतो?

बहुतेक समस्या ऑक्सीजनच्या अभावामुळे निर्माण होतात. आपण जितके उंच जाऊ तितकाच हवामानातील दाब कमी होत असल्यामुळे ६,५०० फूट उंचीवर, कोणत्याही विशिष्ट हवेच्या घनतेत २० टक्के कमी ऑक्सीजन असतो आणि १३,००० फूट उंचीवर हवेत ४० टक्के कमी ऑक्सीजन असतो. ऑक्सीजनच्या अभावाचा शरीरावर परिणाम होतो. स्नायू फारसे काम करू शकत नाहीत, मज्जातंतू संस्था फारसा तणाव सोसू शकत नाही आणि पचन संस्था जास्त मेद पचवू शकत नाही. सहसा शरीराला अधिक ऑक्सीजन हवा असतो तेव्हा आपोआप श्‍वासोच्छ्‌वास वाढतो आणि ही गरज भागवली जाते. पण मग उंचीवर गेल्यावर हे का घडत नाही?

आपले शरीर श्‍वासोच्छ्‌वासाच्या गतीवर कसे नियंत्रण करते हे अद्याप पूर्णपणे न समजलेला एक चमत्कार आहे. तुम्ही अधिक श्रम करता तेव्हा ऑक्सीजनच्या अभावामुळेच केवळ श्‍वासोच्छ्‌वास वाढतो असे नाही. तर, स्नायूंच्या हालचालीने रक्‍तामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा श्‍वासोच्छ्‌वास वाढतो. उंचावर गेल्यावर सहसा आपला श्‍वास वाढतो पण त्याने सातत्याने वाटणारी ऑक्सीजनची कमी भरून निघत नाही.

डोकेदुखी कशामुळे होते? ला पाझ, बोलिव्हिया येथे भरवण्यात आलेल्या फर्स्ट वर्ल्ड काँग्रेस ऑफ हाय ऑल्टीट्यूड मेडिसीन ॲण्ड फिजिओलॉजी येथील वक्‍त्‌याने म्हटले की, उंचावर गेल्यावर होणारा त्रास सहसा मेंदूत द्रव साठल्याने होतो. काही लोकांमध्ये यामुळे डोक्यामध्ये दाब निर्माण होतो. काही लोकांच्या कवटीच्या आकारामुळे त्यांना असा त्रास होत नाही. परंतु, क्वचित प्रसंगी, हे जीवघेणे ठरू शकते. स्नायूंवर नियंत्रण नसणे, दृष्टी धूसर होणे, विचित्र भास होणे आणि मानसिक गोंधळ ही लक्षणे याचा इशारा आहेत की तुम्ही लागलीच डॉक्टरांकडे जावे आणि कमी उंचीच्या ठिकाणी जावे.

शहाणपणाचे उपाय

उंचावर गेल्यावर होणारा त्रास सहसा दुसऱ्‍या किंवा तिसऱ्‍या दिवशी जास्त वाढतो म्हणून डोंगरांमध्ये पोहंचण्याआधी आणि नंतर दोन-चार दिवस हलके जेवण (विशेषतः रात्रीच्या वेळी) केलेले बरे. वर पोहंचल्यावर मेदयुक्‍त पदार्थ खाण्याऐवजी भात, ओट्‌स, बटाटे यांसारखी कर्बोदके खावीत. “न्याहारी राजासारखी, पण रात्रीचे जेवण भिकाऱ्‍यासारखे खावे,” ही म्हण कदाचित तुमच्या फायद्याची ठरेल. शिवाय, एकदम थकवा येईल असे काही करू नका कारण त्यामुळे अचानक त्रास होऊ शकेल. कदाचित तरुण लोक हा सल्ला मानत नसल्यामुळे सहसा त्यांनाच अधिक त्रास होतो.

“डोक्यावर टोपी घाला आणि उन्हापासून संरक्षण करणारी भरपूर क्रीम लावा” हा सल्ला येथे देखील फायद्याचा आहे कारण सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करण्यासाठी येथे पुरेसे हवामान नसते. या किरणांमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो किंवा डोळे खराबही होऊ शकतात त्यामुळे चांगल्या दर्जाचे सनग्लासेस वापरा. डोंगरांमधील हवा पातळ असल्याने डोळे देखील कोरडे पडतात व डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे भरपूर पेय घ्या.

ज्यांचे शरीर बोजड आहे किंवा ज्यांना उच्च रक्‍तदाब, दात्र-कोशिका पांडुरोग, किंवा हृदयविकार वा फुफ्फुसांचा विकार आहे अशांनी ढगांवरील यात्रेला जाण्याचा निर्णय घेण्याआधी काळजीपूर्वक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. * तुम्हाला जास्त सर्दी झाली असेल, श्‍वासनलिकादाह किंवा न्यूमोनिया झाला असेल तर तुमची यात्रा पुढे ढकललेली बरी कारण उंची शिवाय श्‍वसन संसर्ग किंवा अति शारीरिक व्यायाम यांमुळे काही वेळा फुफ्फुसांमध्ये द्रव साठून जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. श्‍वसन तक्रारींमुळे डोंगरांमध्ये नेहमी राहणाऱ्‍या लोकांना देखील पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही आणि म्हणून त्यांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. दुसऱ्‍या बाजूला पाहता, दमा असलेल्या लोकांना डोंगरांमध्ये राहिल्याने बरे वाटते. रशियन डॉक्टरांच्या एका गटाने तर फर्स्ट वर्ल्ड काँग्रेस ऑफ हाय ऑल्टीट्यूड मेडिसीन ॲण्ड फिजिओलॉजीला असेही सांगितले की, ते विशिष्ट तक्रारी असलेल्या रुग्णांना उपचाराकरता डोंगरांमध्ये असलेल्या दवाखान्यात नेतात.

डोंगरांमध्ये वसणे

डोंगरांमध्ये वसण्याविषयी भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. उलट, कॉकेसस पर्वतांसारखे काही डोंगराळ प्रदेश, असाधारण दीर्घायुष्य जगलेल्या अनेक मूळच्या लोकांकरता प्रसिद्ध आहे. आणि काही लोक अनेक वर्षांपर्यंत डोंगरांमध्ये राहू शकले आहेत. अँडीजमध्ये राहणाऱ्‍या सावध राहा! नियतकालिकाच्या एका वाचकाने म्हटले: “मी १९,५०० फूट उंचीवर एका ज्वालामुखीच्या टोकाजवळ १३ वर्षे राहून एका खाणीत काम केले. घणाने गंधक फोडण्याचे काम फार श्रमाचे होते. तरीपण दिवसाच्या शेवटी, आम्ही सॉकर खेळायचो!” मानवी शरीरात नवीन परिस्थितींशी जुळवून घेण्याची इतकी उल्लेखनीय क्षमता आहे की, निर्माणकर्त्याच्या बुद्धीने आपण अचंबित होतो. डोंगरांमध्ये ऑक्सीजनच्या अभावाला शरीर कसे तोंड देते?

उंचावर गेल्यावर शरीराची सर्वात पहिली प्रतिक्रिया म्हणजे, हृदय आणि फुफ्फुसांच्या कार्याचा वेग वाढवणे. मग, रक्‍तातून प्लाझमा बाहेर टाकला जातो आणि अशाप्रकारे ऑक्सिजन वाहून नेणाऱ्‍या लाल पेशी जमवल्या जातात. त्यानंतर लगेच, मेंदूला रक्‍ताचा जादा प्रवाह पाठवला जातो जेथे त्याची अधिक आवश्‍यकता असते. मग, केवळ काही तासांच्या आत, तुमच्या अस्थिमज्जेत लाल रक्‍त पेशींची निर्मिती सुरू होते ज्या ऑक्सीजन वाहून नेण्यास अधिक सक्षम असतात. याचा अर्थ, उंचावरच्या ठिकाणाशी पूर्णपणे जुळवून घेण्यास काही महिने लागत असले तरी हृदयाचे स्पंदन आणि श्‍वासोच्छ्‌वास दोन-चार दिवसांत ठीक होते.

गाडी चालवणे आणि स्वयंपाकाच्या समस्या

ऑक्सीजनचा अभाव केवळ तुमच्या शरीरालाच जाणवतो असे नाही. तुमची मोटार गाडी देखील सुस्त होऊ शकते. एखाद्या मेकॅनिकने फ्युएल मिक्स्चर बदलून दिले आणि इग्नीशनची वेळ वाढवून दिली तरी तुमच्या इंजिनमध्ये पूर्वीसारखी ताकद नसेल. आणि स्वयंपाकघराचे काय?

केक फुलत नाही, ब्रेडचे तुकडे पडतात, शेंगा शिजत नाहीत आणि अंडी उकडत नाहीत तेव्हा स्वयंपाक करणाऱ्‍याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते. याला काय कारण असावे आणि त्याविषयी तुम्ही काय करू शकता?

विशेषतः बेकींगचे प्रकार अपयशी ठरतात आणि त्याचे परिणाम स्पष्ट दिसतातही. हवेचा दाब कमी असल्यामुळे ब्रेड आणि केकला फुलवणारे वायू समुद्र सपाटीपेक्षा येथे जास्त विस्तार पावतात. मग, कणकेतील किंवा मिश्रणातील बुडबडे मोठे होतात आणि यामुळे ब्रेड किंवा केकचे सहजासहजी तुकडे होतात; याहूनही वाईट म्हणजे, बुडबुडे फुटून केक फुललाच जात नाही. पण ही अडचण फार कठीण नाही. फेटलेली अंडी घालून केक हलका केला जात असेल, तर ती जास्त वेळ फेटू नका. किंवा तो पदार्थ फुलण्यासाठी खास काही घातले जात असेल तर कमी मात्रेत घाला. द न्यू हाय ऑल्टीट्यूड कुकबुक यामध्ये सांगितल्यानुसार पदार्थ फुलण्यासाठी वापरली जाणारी वस्तू २,००० फूट उंचीवर २५ टक्के कमी तर ८,००० फूट उंचीवर ७५ टक्के कमी वापरावी.

यीस्ट घालून ब्रेड बनवताना कणिक फुलून दुप्पट प्रमाणाची होणार नाही याची काळजी घ्या. अंड्यांमुळे केकमधील पेशींची रचना मजबूत होत असल्यामुळे पाककृतीत फेरफार करतेवेळी मोठी अंडी वापरा. दुसऱ्‍या बाजूला, अधिक साखरेने पेशींची रचना कमजोर बनते म्हणून कमी साखर वापरा कारण हवेच्या कमी दाबामुळे मिश्रणातील पाण्याचे प्रमाण लवकर आटते व फक्‍त साखर उरत असते. खरे पाहता, बहुतेक पाककृतींसाठी अधिक द्रवपदार्थाची गरज असते कारण डोंगरांमधील पातळ, शुष्क हवेमुळे अन्‍नपदार्थांमधील आर्द्रता कमी होत असते.

उंच ठिकाणी बहुतेक सर्वच पदार्थ शिजायला वेळ लागतो. जसे की, अंडी उकडण्यासाठी ५,००० फूट उंचीवर एक मिनिट अधिक लागतो व १०,००० फूट उंचीवर तीन मिनिटे अधिक लागतात. अशावेळी, प्रेशर कुकर कामी येतो. उलट, त्याच्याविना घेवडा आणि मटर शिजवताच येत नाहीत.

हे सर्व ऐकून डोंगरांमध्ये फिरायला जायला भिऊ नका. तुम्हाला दम लागेल, तुमचा स्पाँज केक एखाद्या पॅनकेकसारखा बनेल आणि तुमची गाडी सांधेदुखी असलेल्या कासवासारखी चालेल पण तुमची तब्येत बऱ्‍यापैकी असल्यास डोंगरांमधील पर्यटनाचा अनुभव अत्यंत तजेलादायक ठरेल. (g०४ ३/८)

[तळटीप]

^ काही डॉक्टर फार उंच ठिकाणी श्‍वासोच्छ्‌वासाला उद्दीपित करण्यासाठी असेटाझोलामाईड हे औषध देण्याची शिफारस करतात. उंचीमुळे त्रास होणाऱ्‍यांसाठी इतर औषधांची देखील जाहिरात दिली जाते परंतु सगळेच डॉक्टर त्यांची शिफारस करत नाहीत.

[१६, १७ पानांवरील रेखाचित्र/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

जगातील काही उंचीवर असलेली ठिकाणे आणि पर्वत

—३०,००० फूट

एव्हरेस्ट पर्वत, नेपाळ आणि चीन

२९,०३५ फूट

—२५,००० फूट

—२०,००० फूट—

किलिमांजारो पर्वत, टांझानिया

१९,३४१ फूट

आऊकांगकिल्चा, चिली

१७,५३९ फूट

माँट ब्लँक, फ्रान्स

१५,७७१ फूट

—१५,००० फूट—

पोटोसी, बोलिव्हिया

१३,७०० फूट

प्यूनो, पेरू

१२,५४९ फूट

फूजी पर्वत, जपान

१२,३८७ फूट

ला पाझ, बोलिव्हिया

११,९०० फूट

—१०,००० फूट—

ट्रंग्सो झाँग, भूटान

७,८६७ फूट

मेक्सिको सिटी, मेक्सिको

७,३४७ फूट

वॉशिंग्टन पर्वत, न्यू हॅम्पशायर,

अमेरिका, ६,२८८ फूट

नैरोबी, केनिया

५,४९५ फूट

डेन्वर, कोलोराडो, अमेरिका

५,२८० फूट

—५,००० फूट—

—समुद्र सपाटी—

[१४ पानांवरील चित्र]

ला पाझ, बोलिव्हिया ११,९०० फूट

[१४ पानांवरील चित्र]

जोहानिसबर्ग, दक्षिण आफ्रिका ५,७४० फूट