व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधुनिक महत्त्व बाळगणारी प्राचीन शपथ

आधुनिक महत्त्व बाळगणारी प्राचीन शपथ

आधुनिक महत्त्व बाळगणारी प्राचीन शपथ

वैद्यकशास्त्राचा जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिप्पोक्रेटीझ या ग्रीक वैद्याने सा.यु.पू. ४०० च्या सुमारास हिप्पोक्रॅटिक शपथ लिहिली. ती थोर तत्त्वे आजही वैद्यकीय क्षेत्रात मार्गदर्शक तत्त्वे म्हणून समजली जातात. तुम्हाला असेच शिकवण्यात आले आहे का? असल्यास, तुम्ही एकटे नाहीत. पण खरोखरची परिस्थिती काय आहे?

वस्तुस्थिती दर्शवते की, हिप्पोक्रेटीझच्या नावाने असलेली शपथ कदाचित त्याने लिहिली नसावी. शिवाय, आजचे वैद्यकीय क्षेत्र, या मार्गदर्शक तत्त्वांच्या मूळ लेखनाचे नेहमीच समर्थन करत नाही.

ही प्राचीन शपथ नेमकी कोणी लिहिली हे आपल्याला माहीत आहे का? माहीत असले तरी, आज आपल्याकरता त्याचे काही महत्त्व आहे का?

हिप्पोक्रेटीझने शपथ लिहिली का?

हिप्पोक्रेटीझने शपथ लिहिली का अशी शंका व्यक्‍त करण्याची अनेक कारणे आहेत. एक कारण असे आहे की, या शपथेच्या सुरवातीला अनेक देवी-देवतांच्या नावाने शपथ घेण्याचा उल्लेख आहे. परंतु, हिप्पोक्रेटीझविषयी असे मानले जाते की, तो पहिलाच मनुष्य होता ज्याने औषधशास्त्र आणि धर्म यांना भिन्‍न समजले आणि आजारपणाला कारणीभूत असलेल्या अलौकिक कारणांचा नव्हे तर शारीरिक कारणांचा शोध घेतला.

शिवाय, त्या शपथेत मना केलेल्या अनेक गोष्टी हिप्पोक्रेटीझच्या काळात रूढ असलेल्या औषधशास्त्राच्या विरोधात नव्हत्या. (पृष्ठ २३ वरील पेटी पाहा.) उदाहरणार्थ, हिप्पोक्रेटीझच्या काळात, गर्भपात आणि आत्महत्या या गोष्टी नियमानुसार किंवा बहुतेक धार्मिक दर्जांनुसार अमान्य नव्हत्या. त्याचप्रमाणे, शपथ घेणारी व्यक्‍ती शस्त्रक्रियेचे काम शल्यचिकित्सकांवर सोपवण्याचे वचन घेते. परंतु, हिप्पोक्रेटीझ आणि इतर प्राचीन लेखकांना ज्या वैद्यकीय साहित्य संग्रहाचे श्रेय दिले जाते त्या हिप्पोक्रॅटिक संग्रहात चिकित्सा तंत्रांचा समावेश आहे.

हिप्पोक्रॅटिक शपथ नेमकी कोणी लिहिली या गोष्टीवर विद्वानांचा अद्याप वादविवाद चालला असला तरी, ती प्रत्यक्षात हिप्पोक्रेटीझने लिहिली नव्हती याचीच अधिक शक्यता वाटते. या शपथेतील तत्त्वज्ञान सा.यु.पू. चवथ्या शतकातील पायथोगोरियन लोकांशी मिळतेजुळते आहे; त्यांनी जीवनाच्या पावित्र्याची कल्पना स्वीकारली होती आणि ते चिकित्सक पद्धतींच्या विरोधात होते.

कालबाह्‍य व पुन्हा प्रचारात

ही शपथ लिहिणारा कोणीही असला तरी एक गोष्ट मात्र खरी की, या शपथेचा पाश्‍चिमात्य औषधशास्त्रावर आणि विशेषकरून नीतिमूल्यांवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. या शपथेला “औषधशास्त्रातील कडक नीतिमूल्यांच्या विकासाचे शिखर,” “विकसनशील जगातील रुग्ण-डॉक्टर नातेसंबंधाचा आधार,” आणि “पेशेवाईक नैतिक वर्तणुकीतला परमोच्च बिंदू” असे म्हटले गेले आहे. १९१३ साली, प्रसिद्ध कॅनेडियन डॉक्टर सर विल्यम ऑस्लर म्हणाले: “ही [शपथ] हिप्पोक्रॅटिक काळातली आहे की नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही . . . गेल्या पंचवीस शतकांमध्ये तिला या पेशातील मार्गदर्शक तत्त्व मानले गेले आहे आणि आजही अनेक विद्यापीठांमध्ये डॉक्टरची पदवी मिळवताना ती घ्यावी लागते.”

परंतु, २० व्या शतकाच्या सुरवातीला होणाऱ्‍या वैज्ञानिक प्रगतीमुळे कदाचित या शपथेविषयी नापसंती व्यक्‍त करण्यात आली. सुयुक्‍तिवादाच्या वाढत्या वातावरणात, ही शपथ पुरोगामी आणि अयोग्य वाटली असावी. परंतु, विज्ञान प्रगती पथावर असले तरी मार्गदर्शक नीतितत्त्वांची आवश्‍यकता आहेच. कदाचित यासाठीच ही शपथ अलीकडील दशकांमध्ये पुन्हा संमत करण्यात आली.

आता एका वैद्यकीय शाळेत प्रवेश घेताना किंवा त्यातून पदवीधर होताना शपथ घेण्याची प्रथा पुन्हा एकदा महत्त्वाची समजली जाऊ लागली आहे. १९९३ साली अमेरिकन आणि कॅनेडियन वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्वेक्षण घेण्यात आले व त्यात असे दिसून आले की, ९८ टक्के शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची शपथ घेतली जाते. १९२८ मध्ये हे केवळ २४ टक्के शाळांमध्ये होत असे. ब्रिटनमध्ये घेतलेल्या अशाच एका सर्वेक्षणात दिसून आले की, सध्या ५० टक्के शाळांमध्ये शपथ किंवा जाहीर वचन घेण्याची प्रथा आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही जवळजवळ ५० टक्के शाळांमध्ये शपथ घेतली जाते.

काळासोबत बदलणे

परंतु हिप्पोक्रॅटिक शपथ जशीच्या तशी राहिलेली नाही; ख्रिस्ती धर्मजगतातील विश्‍वासांनुसार गेल्या शतकांमध्ये त्यात अनेक बदल झाले आहेत. काही वेळा, वेगळे विषय सोडवण्यासाठी बदल करण्यात आले, जसे की, प्लेगच्या रुग्णांच्या उपचारासंबंधीचे विषय. आणखी अलीकडे, आधुनिक विचारांनुसार होण्यासाठी त्यात फेरबदल करण्यात आले.

शपथेत अनेक ठिकाणी, आधुनिक औषधशास्त्राशी सुसंगत नसलेल्या कल्पना काढून टाकल्या गेल्या आहेत आणि आताच्या समाजाला महत्त्वाच्या असलेल्या कल्पना त्यात सामील केल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, रुग्णाला स्वातंत्र्य असण्याच्या कल्पनेवर आधुनिक औषधशास्त्र आधारलेले असेल परंतु प्राचीन ग्रीक औषधशास्त्रात असली कोणतीही कल्पना आढळत नाही आणि हिप्पोक्रॅटिक शपथेतही ती सामील नव्हती. पण आजच्या अनेक प्रतिज्ञांमध्ये रुग्णांच्या हक्कांची कल्पना महत्त्वाची समजली जाते.

शिवाय, डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नाते देखील बदलले आहे; आज जाणीवपूर्वक संमतीसारख्या कल्पनांना फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे, काही मोजक्याच वैद्यकीय शाळांमध्ये मूळ स्वरूपातील हिप्पोक्रॅटिक शपथ घेतली जाते ही गोष्ट समजण्याजोगी आहे.

शपथेत केलेले इतर बदल कदाचित आश्‍चर्यकारक वाटतील. १९९३ साली, अमेरिकेत आणि कॅनडात केवळ ४३ टक्के शपथांमध्ये डॉक्टरांना अशी प्रतिज्ञा करावी लागे की, त्यांच्या कार्यांसाठी ते जबाबदार होते; परंतु या शपथेच्या बहुतेक आधुनिक आवृत्तींमध्ये नियमाचे उल्लंघन करण्यासाठी शिक्षेचा समावेश नाही. दयामरण आणि गर्भपात नाकारणे व देवी-देवतांना प्रार्थना करणे हे देखील इतके सामान्य नाही आणि रुग्णांसोबत कोणत्याच प्रकारचे लैंगिक संबंध न ठेवण्याची प्रतिज्ञा तर केवळ सर्वेक्षण घेतलेल्या शाळांमधील ३ टक्के शपथांमध्येच सामील आहे.

शपथेचे महत्त्व

हिप्पोक्रॅटिक शपथेत अनेक बदल केले गेले असले तरी मूळतः श्रेष्ठ व नैतिक कल्पनांचे पालन करणाऱ्‍या पेशासाठी शपथांचा वापर महत्त्वाचा असल्याचे सहसा समजले जाते. वरती उल्लेखिलेल्या १९९३ सालाच्या सर्वेक्षणात दिसून आले की, वापरात असलेल्या बहुतेक शपथांमध्ये, डॉक्टरांनी रुग्णांना दिलेल्या वचनावर जोर देण्यात आला आहे; यामुळे भावी डॉक्टरांना आपल्या रुग्णांची होता होईल तितकी चांगली काळजी घेण्याचे वचन द्यावे लागते. अशा प्रतिज्ञा वैद्यकीय पेशाचा आधार असलेल्या श्रेष्ठ नैतिक तत्त्वांकडे लक्ष आकर्षित करतात.

द मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया यात प्रकाशित झालेल्या एका स्तंभलेखात, प्राध्यापक एडमंड पेलेग्रीनो यांनी लिहिले: “आज, वैद्यकीय शपथ म्हणजे ऱ्‍हास पावलेल्या प्राचीन कल्पनेचा केवळ एक अंश असे अनेकजण समजतात. परंतु [वैद्यकीय] पेशाच्या जाणिवेत त्या कल्पनेचा काही भाग अद्याप शाबूत आहे; आणि तो याची आठवून करून देण्याकरता पुरेसा आहे की, या [कल्पनेचा] पूर्णपणे विसर पडणे म्हणजे औषधशास्त्राला व्यापाराचे, उद्योगाचे किंवा नफा मिळवण्याच्या धंद्याचे स्वरूप देणे होय.”

हिप्पोक्रॅटिक शपथ किंवा त्यातून जन्माला आलेल्या आधुनिक प्रतिज्ञा आजच्या काळाला समर्पक आहेत की नाहीत हा कदाचित विद्वानांचा वादविषय बनून राहील. एक गोष्ट मात्र खरी की, डॉक्टरांनी आजारी लोकांप्रती दाखवलेला सेवाभाव खरोखर कौतुकास्पद आहे. (g०४ ४/२२)

[२३ पानांवरील चौकट]

हिप्पोक्रॅटिक शपथ

लुटविक एडलस्टाईन यांच्या अनुवादानुसार

अपोलो डॉक्टर आणि असक्लेपियस आणि इयाइया आणि पॉनॉकीया आणि सर्व देवी देवतांच्या समक्ष मी शपथ घेतो की, ही शपथ आणि हा करार मी माझ्या क्षमतेनुसार व विचारशक्‍तीनुसार पूर्ण करीन:

ज्याने मला ही कला शिकवली त्याला माझ्या पालकांसमान समजणे आणि त्याला सहकार्य करणे, त्याला पैशांची गरज असल्यास माझ्या वाट्यातून देणे, त्याच्या मुलांना माझ्या भावांसमान समजणे आणि त्यांना ही कला—त्यांची तशी इच्छा असल्यास—विनामूल्य व अट न घालता शिकवणे; यातील तत्त्वे आणि तोंडी सूचना व इतर सर्व शिक्षण माझ्या मुलांना आणि ज्याने मला शिकवले त्याच्या मुलांना आणि या करारावर सह्‍या केलेल्या व वैद्यकीय नियमानुसार शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांना देणे, पण याशिवाय कोणालाही नाही.

मी माझ्या क्षमतेनुसार आणि विचारशक्‍तीनुसार आजारी व्यक्‍तीच्या फायद्यास्तव खास आहार घ्यायला सांगेन; त्यांना कसलीही हानी आणि अन्याय होणार नाही हे मी पाहीन.

मला कोणी एखादे घातक औषध विचारले तर मी ते त्याला देणार नाही, किंवा त्याला घेण्यास सुचवणारही नाही. त्याचप्रमाणे मी कोणा स्त्रीला गर्भपाताचा उपाय देणार नाही. मी शुद्धतेत व पवित्रतेत माझ्या जीवनाचे व माझ्या कलेचे रक्षण करीन.

मी कधीही शस्त्रक्रिया करणार नाही, खडा असलेल्यांवरही नाही, पण हे काम करणाऱ्‍यांवर त्यांना सोपवीन.

मी कोणाच्याही घरी गेलो तर आजाऱ्‍यांच्या लाभास्तव काम करीन, मुद्दामहून कसलाही अन्याय करणार नाही, कसलीही चेष्टा करणार नाही आणि खासकरून स्त्री व पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणार नाही, मग ते स्वतंत्र असोत नाहीतर दास.

उपचारादरम्यान किंवा उपचाराबाहेर मी लोकांच्या जीवनाविषयी पाहिलेली किंवा ऐकलेली कोणतीही गोष्ट, जी कोणत्याही प्रकारे जाहीर होऊ नये, ती मी माझ्याजवळच ठेवून त्यांविषयी इतरांना बोलणे लज्जास्पद आहे असे समजेन.

ही शपथ मी पूर्ण केल्यास व तिचे उल्लंघन न केल्यास, मला जीवनात व या कलेत आनंद मिळो, सर्वकाळापर्यंत सर्व लोकांमध्ये माझे कौतुक होवो; पण याचे मी उल्लंघन केल्यास व खोटेपणाने ही शपथ घेतल्यास, या सर्व गोष्टींच्या उलट घडो.

[२२ पानांवरील चित्र]

हिप्पोक्रॅटिक संग्रहातील एक पान

[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]

हिप्पोक्रेटीझ आणि पान: Courtesy of the National Library of Medicine