व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

उपदेशांची विक्री

“उपदेश तयार करण्यास धडपडणाऱ्‍या अतिश्रमित पाळकांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले आहे: चर्च ऑफ इंग्लंडच्या एका गृहस्थाने सर्व प्रसंगांसाठी असलेल्या उपदेशांची एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे,” असे लंडनच्या द डेली टेलिग्राफ या बातमीपत्रकाने माहिती दिली. ही वेबसाईट सुरू करणाऱ्‍या बॉब ऑस्टीनचे असे म्हणणे आहे, की “पाळक आजकाल दिवसेंदिवस व्यस्त होत चालले आहेत आणि उपदेशांना बाजूला सारण्याची वृत्ती वाढत चालली आहे.” त्यामुळे आपण, “विचारशक्‍तीला चालना देणारी, प्रोत्साहनदायक आणि शैक्षणिक” असलेली “विश्‍वसनीय व आयते उपदेश” देत आहोत, असा ते दावा करतात. या साईटवर सध्या तरी, “बायबलच्या विविध वचनांवर व विषयांवर आणि ‘उपासना सेवेत वापरण्यात आलेले’ ५० पेक्षा अधिक उपदेश आहेत;” परंतु टोकाची मते व्यक्‍त करणाऱ्‍या किंवा सैद्धांतिकरीत्या वादग्रस्त असलेल्या विषयांवरील उपदेश या वेबसाईटवर नाहीत, असे बातमीपत्रकात म्हटले होते. “मंडळीतल्या सर्वांना समजतील अशा भाषेतील १० ते १२ मिनिटांच्या” या प्रत्येक उपदेशाची किंमत १३ यु.एस. डॉलर इतकी आहे. (g०४ ६/८)

लहान वयात लागलेले तंबाखूचे व्यसन

“सिगारेटचा पहिल्यांदा घेतलेला एकच झुरका, एखाद्या किशोरवयीनाला व्यसन लावू शकतो,” अशी कॅनडाच्या नॅशनल पोस्ट बातमीपत्राने माहिती दिली. “अनेक वर्षे अतिधुम्रपान केल्यानंतरच एखाद्या व्यक्‍तीला हळूहळू तंबाखूचे व्यसन लागू शकते हा प्रचलित दृष्टिकोन, थक्क करणाऱ्‍या संशोधनांवरून खोटा ठरला आहे.” १,२०० किशोरवयीनांवर अंदाजे सहा वर्षे केलेल्या अभ्यासातून संशोधकांना आढळून आले आहे, की “साथीदारांच्या दबावापेक्षा तंबाखूच्या व्यसनात किशोरवयीनांना प्रभावित करण्याची जास्त ताकद आहे; इतके की जे कधीकधी धुम्रपान करतात त्यांनाही हे व्यसन लागू शकते,” असे बातमीपत्रात म्हटले होते. अभ्यासानुसार, “पुष्कळ युवकांची शरीरे, पहिला झुरका मारल्यानंतर तंबाखूवर निर्भर राहू लागतात आणि नतंर त्यांना दररोज धुम्रपान करण्याचे व्यसन लागू शकते.” संशोधकांचे असे म्हणणे आहे, की धुम्रपान विरोधी मोहिमा, युवकांना धुम्रपान करण्याच्या दबावाचा प्रतिकार करण्यास मदत करण्यासाठीच केवळ राबविण्यात येऊ नयेत तर ज्यांना तंबाखूचे व्यसन लागले आहे त्यांना यावर मात करण्यास मदत करण्याकरता राबविण्यात याव्यात. (g०४ ५/२२)

निराश्रित मुलांची वाढती संख्या

“माद्रिदच्या रस्त्यांवर राहणाऱ्‍या किशोरवयीन मुलांची संख्या वाढत चालली आहे,” अशी बातमी एल पाईस नावाच्या एका स्पॅनिश बातमीपत्राच्या इंग्रजी आवृत्तीत आली होती. एका विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, “माद्रिदच्या ५,००० निराश्रित लोकांपैकी अंदाजे १,२५० जण, निराश्रित झाले तेव्हा ते २० वर्षांखालील होते.” संशोधनात दिसून आले, की “निराश्रित युवकांपैकी बहुतेक युवक मोडकळलेल्या घरातले होते आणि त्यांच्या जीवनावर मोठा आघात झाला होता.” वास्तविक पाहता, “तीन युवकांपैकी दोन युवक, दारुड्या किंवा मादक पदार्थ्यांचे व्यसन जडलेल्यांची मुले आहेत आणि तितक्याच युवकांना घरांतील सदस्यांकडून गैरवर्तन सहन करावे लागले होते.” अहवाल लिहिणाऱ्‍या मॅनवेल मुन्योस यांनी असे म्हटले, की “भूमध्य संस्कृतीत सहसा दिसून येणारे पारंपरिक कौटुंबिक बंधन तुटू लागले आहे.” (g०४ ५/८)

“गुटगुटीत” लोकांसाठी समुद्रकिनारा

मेक्सिकोतील एका हॉटेलने, सडसडीत बांध्याच्या लोकांची गर्दी असलेल्या समुद्रकिनाऱ्‍यावरील पाण्यात उतरायला लाजणाऱ्‍या लोकांसाठी एक वेगळे क्षेत्र आरक्षित केले आहे, अशी बातमी एल इकोनोमिस्टा नावाच्या बातमीपत्रात दिली होती. कॅन्कूनमधील समुद्रकिनाऱ्‍याजवळील या हॉटेलने, “लठ्ठ व्हा आणि खूष राहा” हे घोषवाक्य अंगीकारले आहे. “आपल्या बोजड अंगावर स्वीमिंग सूट घालून किनाऱ्‍यावर जाण्यास लाजत असलेल्या लोकांना आकर्षित करण्याचा” या हॉटेलचा उद्देश आहे. विविध अंगकाठीच्या या हॉटेलच्या कर्मचाऱ्‍यांना, निःपक्षपातीपणे बोजड शरीराच्या लोकांचा पाहुणचार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, “कारण या बोजड लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनक्रमात आधीच पक्षपाती भावनेने वागवले जाते,” असे बातमीत म्हटले होते. (g०४ ५/८)

सावधान! बालकेही आत्महत्या करू लागले आहेत

“आत्महत्येचा प्रयत्न करणारी किंवा आत्महत्या करणारी ऐंशी टक्के मुले, काही दिवसांआधी किंवा महिन्यांआधी आत्महत्या करणार असल्याचे बोलून अथवा लिहून व्यक्‍त करतात,” असे मेक्सिको सिटीच्या मिलेन्यो बातमीपत्रात आले होते. गैरवागणूक (शारीरिक, भावनिक किंवा शाब्दिक), लैंगिक शोषण, कौटुंबिक ताटातूट आणि शाळेतील समस्या, ही या बालकांमध्ये जगण्याची इच्छा नाहीशी होण्यामागची मुख्य कारणे आहेत. मेक्सिकन इन्स्टिट्यूट ऑफ सोशियल सेक्यूरिटी येथील मानसोपचार तज्ज्ञ होसे लुईस बास्क्स यांच्या मते, टीव्ही, चित्रपट, व्हिडिओ गेम्स आणि पुस्तके यांत मृत्यू हा इतका सर्वसामान्य विषय बनला आहे, की मुलांनी जीवनाच्या मूल्याविषयी चुकीची समजूत करून घेतली आहे. ते पुढे म्हणतात, की आठ ते दहा वयोगटातील दर १०० मुलांपैकी १५ मुले आत्महत्या करण्याचा विचार करतात आणि यांपैकी ५ टक्के तर आत्महत्या करतातही. बातमीपत्र असा सल्ला देते, की मुले जेव्हा आत्महत्येविषयी बोलून दाखवतात तेव्हा, ते आपल्याला केवळ धमकी देत आहेत किंवा आपले लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी आपण दक्ष झाले पाहिजे. “पालकांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे, त्यांच्याबरोबर खेळले पाहिजे, त्यांच्याबरोबर सतत दळणवळण ठेवले पाहिजे आणि ते त्यांच्यावर प्रेम करतात हे सारखे दाखवले पाहिजे” असे बातमीपत्रात पुढे म्हटले होते. (g०४ ५/२२)

माणसापेक्षा गाईला जास्त किंमत?

जगातील श्रीमंत आणि गरीब लोक यांच्यातील दरी वाढत आहे. गेल्या २० वर्षांत, संपूर्ण जगातील एकूण मार्केट शेअरमधील सर्वात अविकसनशील देशांचे (ज्यात ७० कोटी रहिवाशी आहेत) मार्केट शेअर १ टक्क्यांहून ०.६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. “आज, आफ्रिकेतील कृष्णवर्णियांतील बहुसंख्य लोक, आधीच्या पिढीपेक्षा अधिक गरीब आहेत,” असे फ्रेन्च अर्थशास्त्रज्ञ फिलिप युगरसन यांनी शॅलेन्झ या मासिकात म्हटले. उदाहरणार्थ, इथियोपियातील ६.७ कोटी लोक, लक्सम्बर्गच्या ४,००,००० रहिवाशांकडे असलेल्या मालमत्तेतील एक तृतीयांश मालमत्तेवर गुजराण करतात. युगरसन म्हणतात, की युरोपियन शेतकऱ्‍यांना एका गाईमागे दररोज २.५ युरोस अर्थसाहाय्य मिळण्याचा हक्क आहे, परंतु २५० कोटी लोक याहीपेक्षा कमी पैशावर दररोज गुजराण करतात. म्हणूनच, जगातील अनेक भागात, “गरीब मनुष्याची किंमत एका गाईपेक्षाही कमी आहे,” असे युगरसन म्हणतात. (g०४ ६/८)

झिंगलेली मुले

ब्रिटनमध्ये, ५० इस्पितळांतील अपघात व तातडीच्या विभागांच्या घेतलेल्या सर्वेत दिसून आले, की “सहा वर्षांच्या लहान मुलांना अतिमद्यपान केल्यामुळे इस्पितळांत दाखल केले जाते,” अशी लंडनच्या द डेली टेलिग्राफने बातमी दिली. एका इस्पितळातील डॉक्टरांनी व नर्सेसनी असा अहवाल दिला की उन्हाळ्याच्या सुटीतील एका आठवड्यात त्यांनी १०० झिंगलेल्या मुलांवर उपचार केले होते. बातमीपत्रक म्हणते: “७० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्‍यांचे असे मत आहे, की आजकाल अगदी लहान मुलेही मद्यप्राशन केल्यामुळे इस्पितळात दाखल होतात.” तसेच, अलीकडच्या एका सरकारी अहवालात दिसून आले, की ब्रिटनमध्ये मद्यप्राशनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण गेल्या २० वर्षांत तिप्पट झाले आहे. (g०४ ६/८)

विश्‍वव्यापी आरोग्य अनर्थ

मधुमेह कमालीचा वाढत असल्यामुळे, हे जग कधी न पाहिलेल्या “आरोग्याच्या अनर्थांपैकी एका अनर्थाकडे वाटचाल करीत आहे,” असा इशारा ब्रिटनचे प्राध्यापक सर जॉर्ज अल्बर्टी यांनी दिला; ते इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनचे (आयडीएफ) अध्यक्ष आहेत. आयडीएफच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जगभरात ३० कोटी लोकांना, ज्यामुळे मधुमेह होतो तो ग्लुकोज पचवण्याचा त्रास आहे, अशी ब्रिटनच्या गार्डियन बातमीपत्राने माहिती दिली. एके काळी टाईप २ मधुमेह प्रामुख्याने वयस्कर लोकांना व्हायचा पण आता तो ब्रिटनच्या तरुण पिढीला देखील होत आहे जी, कुपथ्य आहारामुळे व व्यायाम न केल्यामुळे लठ्ठ झाली आहे. “सर्वात दुःखाची गोष्ट अशी की मधुमेह आणि मधुमेहाचे परिणाम, जीवनशैलीत बदल केल्यामुळे टाळता येऊ शकत होते,” असे अल्बर्टी म्हणतात. विकसनशील राष्ट्रांतील लोक जसजसे “अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी व श्रीमंत राष्ट्रांची शहरी जीवनशैली” यांचे अनुकरण करत राहतील तसतसे मधुमेहाची संख्या वाढेल, असे द गार्डियनने म्हटले. (g०४ ६/२२)